News Flash

दखल : स्वातंत्र्योत्तर पिढीचे आत्मरंग

घडणीच्या काळात जन्माला आलेली पिढी यांच्यातील संवाद-संघर्षांची पाश्र्वभूमी या आत्मकथनाला लाभली आहे.

कोणतेही आत्मचरित्र वैयक्तिक आठवणी जागवणारेच असले तरी त्यातून त्या, त्या काळातील सामाजिक वास्तवाचेही प्रतिबिंब उमटत असते. दलित साहित्याने अशा आत्मकथनांची समृद्ध परंपराच निर्माण केली आहे. व्ही. जे. पुहाळे- पालमकर यांच्या ‘आठवणींचे दिवस’ या निर्मल प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या आत्मकथनाने त्यात भर घातली आहे. देशाला मिळालेले स्वातंत्र्य आणि त्या घडणीच्या काळात जन्माला आलेली पिढी यांच्यातील संवाद-संघर्षांची पाश्र्वभूमी या आत्मकथनाला लाभली आहे. शेतात काम करण्यापासून ते गुरेढोरे सांभाळणे अशा कुतरओढीपासून पुढे शासकीय सेवेत अधिकारी पदावर पोहोचण्यापर्यंतचा आपला प्रवास लेखकाने यात मांडला आहे. यात गावकीचे चित्रणही सविस्तर आले आहे. कोणताही प्रसंग नटवून-सजवून न सांगता प्रांजळपणे केलेले हे आत्मकथन स्वातंत्र्योत्तर काळातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व आर्थिक परिस्थितीचा वास्तवदर्शी मागोवा घेते.
‘आठवणीचे दिवस’- व्ही. जे. पुहाळे- पालमकर, निर्मल प्रकाशन, नांदेड,
पृष्ठे- १८३, मूल्य- २०० रुपये.

गोंयच्या पाश्र्वभूमीवरील कथा
अभिव्यक्ती ही वेदनेतून जन्म घेते असे म्हणतात. अभिव्यक्तीला संवेदनेबरोबरच सहवेदनेची जोड मिळाल्यास वैयक्तिकतेच्या पलीकडे जाऊन समष्टीच्या वेदनेशी तिची नाळ जुळते. दयाराम पाडलोस्कर यांच्या ‘खपली निघाल्यानंतर..’ या देवदया प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या कथासंग्रहातील कथा अशा सहवेदना संवेदनशीलतेने चित्रित करतात. या आशयवैशिष्टय़ाबरोबरच या कथांचे आणखी एक वेगळेपण आहे. ते म्हणजे या कथांतून चित्रित झालेला भाषिक आणि सांस्कृतिक अवकाश. गोव्यातल्या सीमाभागातील भाषिक-सांस्कृतिक संचित या कथांतील व्यक्तिरेखा, स्थळ-काळ यांच्यातून उमटत राहते. या संग्रहात एकूण सोळा कथा आहेत. या सर्व कथा ग्रामीण भाग आणि तिथले अस्सल जीवनानुभव यांच्याशी तादात्म्य पावलेल्या आहेत. शेती, निसर्ग, दैनंदिन व्यवहार व मानवी नातेसंबंधांचा एक भाषिक-सांस्कृतिक आलेखच या कथांमधून उभा राहतो. पारंपरिक मराठी ग्रामीण कथा ज्या सांस्कृतिक अवकाशाची अनुभूती देतात, त्यापेक्षा निराळी व नवी अनुभूती देणारा हा संग्रह वाचनीय आहे.
‘खपली निघाल्या नंतर..’ – दयाराम पाडलोस्कर, देवदया प्रकाशन, गोवा,
पृष्ठे- १०६, मूल्य- १३० रुपये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2016 1:50 am

Web Title: marathi books review
Next Stories
1 अटलांटिक सनद भारतीय स्वातंत्र्याची दुसरी बाजू
2 ‘सर्न’द्वारी नटराज!
3 ‘साठी’तल्या पिढीचं आत्मवृत्त
Just Now!
X