आज जगण्याची गती खूप वाढलीय. जगातील सगळ्याच गोष्टी खूप जवळ आल्यासारख्या वाटताहेत. तंत्रज्ञानाच्या अफाट क्रांतीमुळे माणसाच्या जगण्याशी संबंधित निरनिराळ्या प्रकारची माहिती एखाद्या धबधब्यासारखी कोसळत आपल्यापर्यंत पोहोचतेय. माध्यमांच्या सर्वसाक्षी सामर्थ्यांमुळे तर मानवी जगण्याची कुठलीच बाजू आता प्रकाशात आल्याशिवाय राहूच शकणार नाही याची खात्री पटत चाललीय. त्यामुळे एकाच वेळी परस्परविसंगत अशा मानवी जगण्याच्या चेहऱ्यांशी समकालीन माणसाचा सामना होतोय. सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, आíथक अशा जगण्याच्या अंगांचा स्वतंत्र, कप्पेबंद विचार समकालात मागे पडत जाऊन अशा मानवी जगण्याच्या अंगोपांगांची सरमिसळ, काहीसा गुंताच समकालीन माणसाच्या वाटय़ास येतोय.

या भोवतालात सामान्य माणूस तर भांबावलाय; पण बुद्धिजीवी म्हणवल्या जाणाऱ्या संवेदनशील अन् सर्जनशील माणसांनादेखील नेमकेपणाने हे उमजत नाहीये, की या समकालीन गुंत्याला प्रतिसाद नेमका कसा द्यावा? कारण या जगण्याचा अंत:स्तर उसवून त्याची ठसठस जाणून घेण्याइतपत आपल्या भावना, संवेदना आणि विचार यांना मुरवण्यासाठी समकालीन सर्जनशील माणसाला वेळ कुठेय? तंत्रज्ञानाच्या वरवर संवादी, पण मूलत: आभासी अशा भूलभुलयात कोणाच्या तरी प्रतिक्रियेला तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी तत्पर राहताना आपल्या भावना, संवेदना आणि विचार यांना नीट पारखून, तपासून व्यक्त होण्यासाठी कितपत अवकाश उपलब्ध आहे, हा एक गहन प्रश्नच आहे. एका बाजूला समकालीन जगण्याचा गुंता, तो उकलून जगण्याचा अंत:स्तर समजून घेण्याची धडपड, त्याकरिता अपरिहार्य असलेली स्वजाणिवांची कठोर तपासणी आणि दुसऱ्या बाजूला माहितीचा प्रचंड प्रपात, जगण्याच्या विभिन्न कंगोऱ्यांचा होत जाणारा परिचय, माध्यमांचे ‘ब्रेकिंग न्यूज’चे विश्व आणि कच्च्या-पक्क्या अशा भावना, असे विचार व्यक्त करण्यासाठी सतत खुणावणारी घाऊक प्रतिक्रियांची सुलभ उपलब्ध असणारी व्यासपीठे.. अशा परस्परविरोधी बाबींमधला ताण समकालीन सर्जनशील माणसांच्या जगण्याला व्यापून आहे. हा ताण पेलण्यास पुरेशी सक्षम नसणारी सर्जनशील मने भावना व विचारांच्या उथळ अभिव्यक्तीच्या जगात, प्रतिक्रियांच्या खेळात आणि समकालाच्या अपुऱ्या भानात हरवत गेल्याचा प्रत्यय बऱ्याचदा येतो आहे. याउलट, समकालीन जगण्याचा गुंता उकलण्यासाठी आपल्या भावना व विचारांना पणास लावणाऱ्या आणि त्यातून प्राप्त झालेल्या प्रगल्भ जीवनदृष्टीतून जगण्याचे समंजस भान व्यक्त करणाऱ्या सर्जनशील मनांचा आविष्कारही अलीकडे काही प्रमाणात वाचायला मिळतो आहे. पी. विठ्ठल यांचे ‘करुणेचा अंत:स्वर’ हे पुस्तक हे याचे उत्तम उदाहरण आहे.

loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
Like daughter even daughter in law can get job on compassionate basis
मुलीप्रमाणेच सुनेलासुद्धा अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळू शकते…
Loksatta career article about A career in singing
चौकट मोडताना: गोड गळय़ाच्या मल्हारचे बाबा

वृत्तपत्रीय सदरासाठी केलेल्या लेखनातून हे पुस्तक आकाराला आलेले असले तरी तात्कालिकतेच्या मोहात हे लेखन हरवलेले नाही. ‘मानवी स्वातंत्र्य आणि सर्जनशीलता, नतिकता आणि विवेक या गोष्टी मला महत्त्वाच्या वाटत आल्या आहेत. त्याचबरोबर भोवतीच्या अनेक प्रश्नांनी निर्माण केलेली आव्हानेही मी नजरेआड करू शकत नाही. अर्थात लेखक म्हणून आपण सगळ्याच प्रश्नांना भिडू शकत नसलो, तरी किमान त्यापकी काहींच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे? असा विचार करूनच मी हे सदरलेखन केले..’ ही लेखकाची भूमिका या पुस्तकातील लेखनाचे स्वरूप स्पष्ट करण्यास समर्थ आहे. अशा प्रकारचे सदरलेखन हे ललितगद्य या लेखनप्रकारात समाविष्ट केले जाते. ललितगद्य या लेखनप्रकाराचे स्वरूप बरेचसे मुक्त असते. घटना, घडामोडी, प्रसंग, व्यक्ती, अनुभव, आठवण, कथन, निवेदन अशा निरनिराळ्या तऱ्हांनी या लेखनाला आकार येत असतो. अशा लेखनाचा मार्ग चोखाळताना लेखकाला टिप्पणी, भाष्य, स्पष्टीकरण, वर्णन, विश्लेषण करण्यास भरपूर वाव असतो. यात कधी भावनांच्या प्रवाहात भिजलेले असे लेखन केले जाते, किंवा कधी विचारांच्या मुद्देसूद पेरणीतून असे लेखन उभे राहते. या ठिकाणी पी. विठ्ठल यांची लेखनविषयक भूमिका ‘भोवतीच्या अनेक प्रश्नांनी निर्माण केलेल्या आव्हानांना भिडण्याची’ असल्यामुळे या पुस्तकातील लेखनातून संवेदनांच्या भावओल्या प्रवाहासोबतच विचारभानाच्या विवेकी निष्ठेचेही उत्कट प्रत्यंतर येते. कारण समकालीन आव्हानांना निव्वळ तर्ककठोरपणे भिडण्याची भूमिका या लेखकमनाने महत्त्वाची मानलेली नाही, तर समकालीन जगण्याचा अमानवी, भीषण अंत:स्तर शब्दबद्ध करण्यासाठी एका सर्जनशील मनाने आपल्या अंत:करणातील ‘करुणेच्या अंत:स्वरा’ला केलेले आवाहन ही दृष्टी या लेखनामागे आहे. भोवतालात सातत्याने प्रत्ययास येणाऱ्या आणि आपल्या काना-डोळ्यांपर्यंत सततच येणाऱ्या घटनांबद्दल हळहळ आणि दया व्यक्त करण्यापलीकडे फारसे काही करावेसे आपल्याला वाटत नाही. समकालीन जगण्याच्या रेटय़ामुळे बधिर होत चाललेल्या मनांचे उफराटे वास्तव आम्ही आपसूकच मान्य करत चाललोय. त्यामुळे एकतर भोवतालाने उभ्या केलेल्या प्रश्नांबद्दल सोयीस्कर मौन बाळगणे अथवा बघ्याची असंवेदनशील भूमिका घेणे, किंवा मग भोवतालाच्या ओंगळवाण्या, हिडीस, उथळ, झगमगाटी रूपात रममाण होऊन आपल्या मनाला करमणुकीच्या दावणीला बांधणे- अशा पेचात आपण सारेचजण आज सापडलेलो आहोत. या संभ्रमाच्या परिस्थितीत आपल्या अभिव्यक्तीला न अडकवता मानवी अंत:करणातील ‘करुणा’ या मूलभूत मूल्याची दृष्टी अंगीकारून समकालीन जगण्याचा अंत:स्तर उसवू पाहणारे या पुस्तकातील लेखन महत्त्वाचे ठरणारे आहे. ही करुणेची दृष्टी गरिबी, दारिद्रय़, उपासमार, पोरकेपण, धर्म-जात-रूढी यांच्या वरवंटय़ामुळे आलेले पिचलेपण असे समाज-संस्कृतीच्या अंगोपांगात झिरपलेले मानवी दु:ख आपल्या ओंजळीत घेऊ पाहते. समकालीन अधोविश्वाचे संवेदना आणि विवेक या दोन्ही पातळ्यांवरून वास्तव दर्शन घडवणारी, गौतम बुद्धाने जगाला दिलेली ही करुणेची दृष्टी या लेखकाला अपरिहार्य वाटते, हे विशेष आहे. हे  वृत्तपत्रीय सदरलेखन असल्यामुळे ते वाचककेंद्री असणे स्वाभाविकच आहे. परंतु हे लेखन वाचकांच्या भावना-संवेदना मोहरून टाकणारे अथवा त्यांच्या तथाकथित विचारांना गोंजारणारे, वाचकांचा अनुनय करणारे नाहीये, एवढे मात्र निश्चित, कारण या लेखनातून प्रत्ययास येणारी करुणेची दृष्टी या लेखकाच्या अंत:स्वरातून निपजलेली आहे. समकालीन जगणे आणि त्याची अभिव्यक्ती असलेले समकालीन साहित्यही एवढे ‘बहुस्वरीय’ झालेले आहे, की त्यात संयत, समंजस सुरात व्यक्त होणाऱ्या संवेदनशील माणसांचा ‘अंत:स्वर’ बऱ्याचदा अगदी कान देऊनच ऐकावा लागतो. एका अर्थाने जगणं समजून-उमजून घेऊन, भोवतालातून उभ्या ठाकलेल्या आव्हानांना नेमकेपणाने भिडून आणि त्यासाठी आपल्या भावना-विचारांच्या प्रवाहाला तावूनसुलाखून घेऊन प्रकट होणारा अंत:स्वर हा चांगल्या साहित्यनिर्मितीची एक महत्त्वाची खूण आहे. त्याशिवाय लेखनाला स्वतंत्र व्यक्तित्व लाभू शकत नाही. या अंगाने विचार करता ‘करुणेचा अंत:स्वर’मधील पी. विठ्ठल यांचे लेखन लेखकाच्या स्वतंत्र व्यक्तित्वाची छाप मनावर उमटविणारे आहे.

या पुस्तकात एकूण त्रेपन्न ललित लेख असून त्यांची विभागणी तीन भागांमध्ये केलेली आहे. त्या विभागांना नावे दिलेली नसली तरी त्यांतून आलेल्या लेखांच्या आशयावरून सहज लक्षात येते, की पहिला विभाग हा साहित्यविषयक चिंतनातून लिहिल्या गेलेल्या लेखांचा आहे. समाज-संस्कृतीच्या अंगोपांगातील विरूप दर्शनातून आलेले लेख पुस्तकाच्या दुसऱ्या विभागात आहेत. तर तिसऱ्या विभागात स्त्रीविषयक वास्तवाला भिडणाऱ्या लेखांचा समावेश केलेला आहे. ‘एका लेखकाचा मृत्यू’ या पेरुमल मुरुगन या लेखकाच्या मृत्यूच्या घोषणेने उपस्थित केलेल्या लोकशाही व्यवस्थेतील लेखकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या प्रश्नापासून या पुस्तकाचा प्रारंभ होतो आणि ‘आम्हाला आमच्या शरीराचा अभिमान आहे’ असा उद्घोष करणाऱ्या ‘हॅपी टू ब्लीड’ चळवळीने उपस्थित केलेल्या स्त्रीच्या शोषणमूलक जगण्याला असलेल्या धार्मिक अधिष्ठानाची परखड चिकित्सा करणाऱ्या लेखाने या पुस्तकाचा समारोप झालेला आहे.

पुस्तकाच्या पहिल्या भागातील ‘निमित्त : मला गांधी भेटला’, ‘लेखकाची ही भीती सार्थ ठरो’, ‘सामाजिक सहिष्णुता आणि लेखकाचं बंड’ हे लेख लेखकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या समकालीन वास्तवाचा विद्रूप चेहरा उघडा पाडणारे आहेत. त्यातून मांडलेला लेखनाची स्वायत्तता आणि त्या अनुषंगाने येणारा नतिकता आणि विवेक यांचा विचार वृत्तपत्रीय सदरलेखनाच्या रूढ चौकटीत खरे तर मावणारा नाही. मर्ढेकरांच्या ‘गणपत वाणी’ या कवितेतून येणारा सामान्य माणसाच्या अर्थहीन जगण्याचा शोकात्म शेवट, ‘धोंडय़ा न्हाव्या’चे चरित्र सांगणाऱ्या कवितेतून करंदीकरांनी रेखाटलेला दारिद्रय़ाने पिचलेल्या माणसाचा चेहरा, अभावग्रस्त जगण्याचा परिपक्व आणि चिंतनशील सूर छेडणारी वीरा राठोड यांची कविता आणि शोषितांच्या लढय़ाला जातिअंताच्या व्यापक लढाईचे रूप प्राप्त करून देण्यासाठी धडपडणारी सचिन माळी यांची कविता या आणि अशा अन्यही लेखांमधून साहित्याचे समाजवास्तवाशी जोडले गेलेले अतूट बंधच लेखकाला अधोरेखित करावयाचे आहेत. विलास सारंग, मंगेश पाडगांवकर, द. भि. कुलकर्णी यांना त्यांच्या निधनानंतर आदरांजली अर्पण करणारे लेख हे तेवढय़ापुरतेच सीमित नाहीत. या वाङ्मयीन व्यक्तित्वांचे जीवन आणि कर्तृत्व यांची मर्मस्थळे शोधण्याचा प्रयत्न या लेखांमधून केलेला आहे. उदाहरणार्थ, विलास सारंग यांच्यावरील लेखात पी. विठ्ठल लिहितात- ‘..सारंगांचा सगळा लेखनप्रपंच खूप अनौपचारिक शैलीत आहे. लेखक म्हणून ते घटनेकडे, कलाकृतींकडे ज्या नजरेतून बघतात, ती नजर विश्व-वाङ्मयाच्या आकलनातून आलेली आहे. प्रचंड संदर्भ, सखोल विश्लेषण हे त्यांचे वैशिष्टय़. तुकाराम, शेक्सपिअरपासून ते बालकवी, मर्ढेकर, नेमाडे यांची जशी चिकित्सा ते करतात, तशीच चिकित्सा बुद्ध आणि जातककथांचीही करतात. स्वत:ला कोणत्याही एका विशिष्ट मर्यादेत बांधून न ठेवणारा हा लेखक वाङ्मयाचा-संस्कृतीचा जाणकार भाष्यकार होता..’ याच पद्धतीने चांगले लेखन करणाऱ्या, पण दुर्लक्षित राहिलेल्या सोपान हाळमकर आणि रावजी राठोड या लेखकांवरील लेखही वाचकांच्या साहित्याकलनाच्या दृष्टीला व्यापक परिमाण प्राप्त करून देणारे आहेत.

पुस्तकाच्या दुसऱ्या विभागातील ललित लेख समकालीन समाज-संस्कृतीचे अंतरंग उकलून त्यातून प्रत्ययाला येणाऱ्या विसंगतीपूर्ण वास्तव मांडणारे आहेत. देव-धर्म-जात या लंबकांमध्ये टोलवले जाणारे सामान्य माणसांचे आयुष्य यातील बऱ्याच लेखांमधून चिंतनाचा विषय ठरले आहे. ‘..देवदेवतांनी आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या श्रद्धा-समजुतींनी निरक्षर लोकांना दुबळे बनवले असे कधीकाळी म्हटले जात असे. परंतु आज विज्ञाननिष्ठ वगरे असणाऱ्या काळातील तथाकथित बुद्धिजीवी वर्ग हा अधिक दुबळा आणि भयग्रस्त असल्याचे चित्र आहे..’ असे समकालाचे नेमके विश्लेषण एका लेखात येते. धर्म आणि अध्यात्म यांच्या समकालीन संदर्भात घडणाऱ्या ओंगळवाण्या प्रदर्शनावर निरनिराळ्या प्रसंगांची उदाहरणे देऊन परखड फटकारे लेखकाने मारलेले आहेत. धर्मव्यवस्थेच्या तेजीत असलेल्या बाजाराचा बुरखा फाडतानाच जातिव्यवस्थेच्या अधिकाधिक बंदिस्त होत चाललेल्या कप्प्यांमुळे समता प्रस्थापनेच्या विवेकी विचाराची होत असलेली पीछेहाट हा काही लेखांचा मध्यवर्ती विषय आहे. जातपंचायतीच्या दंडुकेशाहीमुळे नाथजोगी समाजाला नाकारले जाणारे माणूसपण, पारधी जमातीच्या जगण्याला गुन्हेगार म्हणून कायमस्वरूपी चिकटलेला शोषणाचा भोगवटा या भीषण वास्तवावर झगझगीत प्रकाश टाकून पुरोगामित्वाचा बुरखा पांघरून वावरणाऱ्या प्रवृत्तींचा दंभस्फोट लेखकाने या लेखांमधून केलेला आहे. समकालीन समाज-संस्कृतीच्या सुस्थिर, संपन्न अशा वरपांगी रूपाखाली दडपल्या गेलेल्या दारिद्रय़, उपासमार, अनाथपण, व्यसनाधीनता, दहशतवाद, शेतकरी आत्महत्या अशा विकारी रूपांच्या अमानवी तऱ्हांमुळे अस्वस्थ झालेले संवेदनशील मन अन्य लेखांमधूनही प्रत्ययास येते. रेल्वेच्या प्रवासातून परिचित होत जाणारे वंचितांचे जग पाहून ‘आपल्या अवतीभोवती विखुरलेल्या या हीनदीन आणि दुबळ्या माणसांना कधी सुखाची स्वप्ने पडत असतील की नाही असा प्रश्न सतत मनात येतो. त्यांना स्वप्नंच पडू नयेत अशी व्यवस्था तर आपण करून ठेवलेली नाही ना?’ असा केवळ बेचनीपुरता मर्यादित नव्हे, तर आत्मपरीक्षणाचा सूर या लेखकाचे मन लावते. हजारो लोकांसमोर झाडावर चढून गळफास लावून घेणाऱ्या शेतकऱ्याच्या आत्महत्येमुळे हादरलेला हा लेखक लिहितो- ‘केवळ कथा-कविता-कादंबरी आणि सिनेमातून अशा दु:खगाथा मांडून आपल्याला आपले दायित्व सोडता येणार नाही. सर्जनाचे बीजघटक म्हणून आत्महत्येच्या प्रश्नाकडे प्रतिभावंतांनी बघू नये. तसे घडले तर ती आपली फार मोठी फसवणूक ठरू शकेल.’

राजकीय नेत्याच्या पुरुषी वासनेची बळी ठरलेली श्यामा, पुरुषी वासनांधतेमुळे मृत्यूच्या दारात दीर्घकाळ रखडलेले यातनामय जगणे भोगणारी अरुणा शानबाग यांच्या निमित्ताने लिहिलेले लेख या पुस्तकाच्या अखेरच्या भागात येतात. स्त्रीस्वातंत्र्याची चर्चा आणि त्याबाबतचे प्रत्यक्ष सामाजिक वास्तव यांतील तफावत या लेखांमधून नेमकेपणाने अधोरेखित झाली आहे. बदलत्या काळानुरूप आईची बदलत असलेली प्रतिमाही या लेखकमनाला अस्वस्थ करते. ते व्यक्त होतं.. ‘आई आणि मुलातल्या जैविक संबंधांचा परीघही जोमानं बदलतोय, ही घटना मात्र आपल्या सार्वत्रिक ऱ्हासाची द्योतक आहे.’ याच पद्धतीने ‘बारबाला’ आणि ‘मराठा मुलगी’ या दोन आत्मकथनांमधून आलेल्या स्त्रीजीवनाच्या विदारक वास्तवावर प्रकाश टाकताना आधुनिक समाजापुढे उभ्या ठाकलेल्या गहन पेचांकडे लेखकाने लक्ष वेधलेले आहे. ते लिहितात- ‘नतिकतेचा बाऊ करून या स्त्रियांना खलनायिका करण्यापेक्षा आपण आपले चरित्र तपासून बघायला काय हरकत आहे. मुळात आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन, इंटरनेट आहे. काय बघावे आणि काय बघू नये, याचे कुठलेच नियम आपल्याकडे नाहीत. महत्त्वाचे म्हणजे आचारसंहिता एखाद्या व्यवसायाला नव्हे, तर समाजाला असायला हवी. आपले वर्तन संस्कारशील आणि संपन्न असेल तर भय बाळगण्याचे कारण काय ?’ याच परखड भूमिकेतून स्त्री-पुरुष नात्याच्या निखळ आणि नसíगक गाभ्याला तडा देणाऱ्या, स्त्रीच्या सर्जनशील आणि संवेदनशील मनावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष शोषणाचे ओरखडे ओढणाऱ्या भेदभावमूलक बाबींचा धिक्कार करायला हवा, हा विचार ‘हॅपी टू ब्लीड’ या लेखातून मांडून या पुस्तकाचा समारोप केलेला आहे.

या ललितगद्य लेखनातून लेखकाच्या कविमनातील चिंतनशीलतेचा प्रत्यय येतो. तथापि आत्मनिष्ठ भावभावनांच्या रम्य, मनविभोर जगात हे चिंतन हरवून जात नाही. समकालीन वास्तवाची भेदक जाणीव आपल्या आत्मनिष्ठ भावदृष्टीत मुरवल्यामुळे लेखकाच्या चिंतनशीलतेला कठोर मांडणीचे स्वरूप न लाभता वाचकांशी साधलेल्या भावसंवादासोबतच विचारांच्या विवेकी संवादाचेही अनोखे स्वरूप प्राप्त झाले आहे. अर्थातच त्यामागे लेखकाचे व्यक्तित्व आहे. जगण्याचा प्रवाह ढवळून काढणाऱ्या घटना, प्रसंग, व्यक्ती यांच्यामुळे संवेदना आणि विचार या दोन्ही पातळ्यांवरून अस्वस्थ होणारे आणि त्यातूनच जगण्याच्या प्रवाहाकडे तटस्थपणे, पण तितक्याच आत्मीयतेने बघणारे, त्याबद्दल अंतर्मुख वृत्तीने आणि विवेकी भूमिकेने विचारप्रवण होणारे संवेदनसंपन्न व्यक्तित्व या पुस्तकातील लेखनामागील मुख्य ऊर्जास्रोत आहे. हे लेखन वाचकांशी संवाद साधत, त्यांच्या जीवनविषयक आकलनाची प्रत ध्यानात घेत, ती अधिक सूक्ष्म आणि उन्नत व्हावी यासाठी अनिवार्य अशा विवेकी संवेदनसमृद्धीचा मार्ग खुला करून देत झालेले आहे. समकालीन समाज, संस्कृती, समूह व व्यक्तिमन यांच्या स्पंदनांना जाणून घेण्याची ही भूमिका निश्चितच लक्षणीय आहे. वर्तमानाची नोंद प्रगल्भतेने आणि संवेदनशीलतेने कवितारूपात घेणाऱ्या पी. विठ्ठल यांच्या लेखणीने सामान्य वाचकांच्या अंत:स्वराला जागविण्यासाठी गद्यरूपाने जागविलेला स्व-अंत:करणातील करुणेचा स्वर हा समकालीन मराठी ललितगद्य लेखनातील एक लक्षणीय आविष्कार आहे.

‘करुणेचा अंत:स्वर’- पी. विठ्ठल,

कैलाश पब्लिकेशन्स, औरंगाबाद,

पृष्ठे- १९५, मूल्य- २०० रुपये.

pashutosh30@gmail.com