News Flash

टूरटूर

आज कुठेही पर्यटनाला जा, हमखास तिथे मराठी पर्यटक भेटतातच.

आज कुठेही पर्यटनाला जा, हमखास तिथे मराठी पर्यटक भेटतातच. पर्यटक संस्थांसोबत जाणे ते अधिक पसंत करतात. कारण मग कुठल्याही ताणाशिवाय भटकंती करता येते. पण या भ्रमंतीत तिथला प्रदेश, संस्कृती, लोकजीवन याबद्दल  जाणून घेण्याची उत्सुकता त्यांना किती असते, याबाबत मात्र शंका आहे. जग बघणं होतं, पण ते प्रत्यक्षात ‘अनुभवलं’ जातं का?

बाकीच्या क्षेत्रांचे माहीत नाही, पण पर्यटन क्षेत्राला ‘अच्छे दिन’ आले आहेत, हे मान्य करावे लागेल. कोणतेही वर्तमानपत्र उघडा, पुढची-मागची रंगीबेरंगी पाने टुरिस्ट कंपन्यांच्या जाहिरातींनी भरलेली असतात. ‘चला मॉरिशसला..’, ‘चला बँकॉकला..’, ‘चला स्वप्ननगरी स्वित्र्झलडला..’ अशी साद या जाहिराती घालत असतात. या आवाहनास प्रतिसादही जोरदार मिळताना दिसतो.

एकूण या खासगी पर्यटन संस्थांच्या क्षेत्रात उत्साहवर्धक वातावरण आहे. या संस्थांची आता संस्थाने झाली आहेत. अर्थात यात काय वाईट आहे? या संस्थांमुळे आमचा मराठी माणूस घराबाहेर पडू लागला आहे. केवळ आपला देशच नाही, तर परदेशही पाहू लागला आहे. हे निश्चितच चांगले आहे. परंतु परदेश पाहू लागला म्हणजे नेमके काय पाहू लागला? पर्यटन कंपन्या त्याला काय दाखवतात? कसे दाखवतात? आणि पर्यटक त्याकडे कसे बघतात? पर्यटन कंपन्यांच्या बाबतीतले या पर्यटकांचे अनुभव काय आहेत? याची थोडी चाचपणी केली तर उलटसुलट, संमिश्र आणि गमतीशीर प्रतिक्रिया ऐकायला मिळतात. पर्यटक आणि पर्यटन कंपन्या यांचे गुंतागुंतीचे नातेही त्यातून समोर येते.

वसंत वाकणकर एका सरकारी कार्यालयात अकौन्टंट म्हणून काम पाहतात. त्यांनी एका नावाजलेल्या टूर कंपनीबरोबर अमेरिका, युरोप आणि इतर प्रांतांच्या चार-पाच टूर्स केल्या आहेत. त्यांना रस्त्यात गाठले. ते फार खूश वाटले टूर कंपनीच्या व्यवस्थापनाबद्दल. म्हणाले, ‘‘सबंध टूरमध्ये हे लोक जे भोजन द्यायचे ते इतके छान असायचे हो! अमेरिकेसारख्या देशात आपण जिलेबी, श्रीखंड अशा भारतीय मिष्टान्नाचा आस्वाद घेतोय ही गोष्टच इतकी थ्रिलिंग आहे म्हणून सांगू!!’’ मला एकदम मराठी साहित्य संमेलनाची आठवण झाली. पूर्वी संमेलनानंतर तिथे हजेरी लावलेल्या मराठी माणसाला संमेलनाच्या वैशिष्टय़ाबद्दल विचारले की तो तिथल्या वांगीभाताची रसभरीत वर्णने ऐकवायचा!

आमच्या शेजारच्या सोसायटीतले देसाईदेखील टूर कंपनीच्या प्रेमात होते. म्हणाले, ‘‘बँकॉकला या टूरवाल्यांनी आम्हाला इतक्या पॉश हॉटेलात उतरवले होते, की बोलायची सोय नाही. डोळ्यांचे पारणेच फिटले.’’ तिथे हॉटेलव्यतिरिक्त इतर काय पाहिले हे सांगायला मात्र ते फारसे उत्सुक नव्हते.

एका बँकेतल्या तारा कुलकर्णी यांची प्रतिक्रिया बरीचशी प्रातिनिधिक होती. त्या म्हणाल्या, ‘‘सर्वच ट्रॅव्हल कंपन्या काही चांगल्या नसतात. मागे आम्ही दुबईला गेलो होतो तेव्हा आमच्या टूर लीडरने आम्हाला शॉपिंगसाठी दोन दिवस देणार असे प्रॉमिस दिले होते. पण कसले काय, प्रत्यक्षात एकच दिवस शॉपिंगला दिला. त्याआधीच्या फ्रान्समधला टूर लीडर तर औरंगजेबच निघाला. त्याने बसमध्ये गाणी गायलाच बंदी घातली होती. चार तासांचा बोअर बसप्रवास! बाहेरची सीनसिनेरी माणूस किती काळ बघणार? आपण परक्या देशात असतो, हेल्पलेस असतो. त्यामुळे भांडूही शकत नाही.’’ कुलकर्णी बाईंच्या या मताशी मिळत्याजुळत्या प्रतिक्रिया नंतर बऱ्याच मिळाल्या. आमच्या सोसायटीतले सप्रे टूरवाल्यांच्या नावाने कायम खडे फोडत असतात. पण तरीही देश असो वा परदेश- सप्रेकाका ट्रॅव्हल कंपनीचा हात धरूनच प्रवास करणार, हे ठरलेलंच. ट्रॅव्हल कंपन्यांशी अशी ‘लव्ह-हेट रिलेशनशिप’ असलेले पर्यटक बरेच भेटले.

या टूर कंपन्या- खासकरून मराठी टूर कंपन्या पर्यटकांना परदेशातल्या भारतीय उपाहारगृहांत नेतात आणि अस्सल भारतीय पद्धतीचे जेवण देतात हे ऐकले होते. आमच्या एका मित्राने याबद्दल टूर कंपनीच्या मॅनेजरला एकदा छेडलेही होते. टूर लीडर आणि मॅनेजर दोघांनाही त्याने प्रश्न विचारला, ‘‘आपण ज्या देशात जातो तिथले वैशिष्टय़पूर्ण पदार्थ खाणे हा तुमच्या सहलीचा एक आवश्यक भाग असायला नको का? वेगवेगळ्या प्रांतांतल्या खाद्यसंस्कृतींचा, लोकजीवनाचा अनुभव घ्यायला नको?’’

‘‘तुमची सूचना योग्यच आहे,’’ असे सांगून मॅनेजर म्हणाले, ‘‘पण मराठी माणसांना तिथले फूड मानवत नाही.. म्हणजे आवडत नाही. सहज गंमत म्हणून नव्या, वेगळ्या पदार्थाची चव घेऊन पाहायलाही मराठी पर्यटक तयार नसतात. या मानसिकतेचे काय करायचे?’’

या टूर कंपन्या ज्या पर्यटन स्थळांना घेऊन जातात त्याची नीट माहितीही देत नाहीत. नुसतेच ठिकाणाचे नाव सांगतात, अशाही काही तक्रारी ऐकू येतात. मित्राने त्याबद्दलही त्या मॅनेजरला विचारले. ‘‘काही कंपन्यांत हे चालत असेल. आम्ही मात्र याबाबत पर्टिक्युलर आहोत,’’ तो म्हणाला, ‘‘आमच्या तुकडीतले लीडर त्या- त्या स्थळाची भौगोलिक आणि सांस्कृतिकही माहिती देतात. शिवाय अनेक ठिकाणी आम्ही त्या- त्या देशातले प्रोफेशनल गाईड बुक करतो. पण अनुभव असा, की काही प्रवासी मंडळींना अशा प्रकारे माहिती ऐकणे बोअर वाटते. गाईड माहिती देत असताना या मंडळींचे वेगळेच उद्योग चालू असतात.’’

‘‘वेगळे म्हणजे कुठले?’’ मित्राने विचारले. ‘‘उदाहरणार्थ, सेल्फी काढणे, आपसात गप्पा मारणे,’’ मॅनेजर म्हणाला. ‘‘पण तुम्ही अशा लोकांना सुनवायला पाहिजे..’’ यावर मॅनेजरचे उत्तर होते- ‘‘हे बघा, आम्ही कोणी टीचर किंवा समाजसेवक नाही आहोत. आम्ही बिझनेसमन आहोत. पर्यटक आमचे ग्राहक- म्हणजे कस्टमर असतात. कस्टमर नाराज होतील, दुखावतील असे काही करून आम्हाला चालणार नाही. थिंक फ्रॉम अवर पस्र्पेक्टिव्ह. ग्राहकांचा संतोष हेच आमचे समाधान.’’

हे बाकी खरे आहे. वेगवेगळ्या विचारांचे, आचारांचे ग्राहक टूरनिमित्त एकत्र येत असल्याने ग्राहकांचा संतोष म्हणजे कोणाचा संतोष, असा प्रश्न उभा राहतो. आम्हालाही युरोपच्या सहलीत बेजबाबदार पर्यटकांचे विचित्र अनुभव आलेत.

आमची शानदार टुरिस्ट बस स्वित्र्झलडमधून चालली होती. टूर लीडर आत्मीयतेने त्या शांत, मनोहारी देशाची आणि त्याच्या अलिप्त राजकीय धोरणाची माहिती देत होता. काही ज्येष्ठ नागरिक त्यांना माहीत असलेल्या तपशिलांची त्यात भर घालत होते. त्याचवेळी बसमधला एक गट आपसात मोठय़ा आवाजात संभाषण करत होता. काय म्हणणार? कोणाकोणाचे प्रबोधन करणार? लीडर काही उपयुक्त माहिती देतोय याचे त्यांना काहीच सोयरसुतक नव्हते.

टूर लीडरचे मार्गदर्शन संपले. आम्ही सारे गाडीच्या काचेतून दिसणारी लहान लहान टुमदार घरे पाहण्यात गर्क झालो. बाहेर ख्रिसमस शुभेच्छा कार्डाची आठवण यावी असा सीन होता. त्या टारगट गटाने त्याचवेळी सिनेसंगीताच्या भेंडय़ा खेळायला घेतल्या आणि बसमध्ये हैदोस घातला. खिडकीतून बाहेर डोकावत त्या विलक्षण निसर्गसौंदर्याचा आस्वाद घ्यावा असे त्यांच्यापैकी कुणालाच वाटत नव्हते.

केरळच्या सफरीतही असाच एक वाईट अनुभव आला. बॅकवॉटरमधून आमची नौका संथपणे पुढे सरकत होती. आजूबाजूला नीरव शांतता. अधूनमधून पक्ष्यांचे आवाज. नौकेत आमच्याबरोबर एक टुरिस्ट ग्रुप होता. ग्रुप लीडरच्या हातात माइक होता. त्यावरून तो गाण्याची फर्माईश करत होता आणि मुले त्यानुसार सिनेमातली गाणी म्हणत होती. आम्हाला राहवले नाही. हात जोडून आम्ही त्यांना विनंती केली, ‘‘बाबांनो, थांबवा हे. सिनेमातली गाणी ऐकायला आम्ही इथे आलेलो नाही. आम्हाला इथल्या निसर्गातल्या शांततेचे स्वर ऐकू द्या. तुम्हीही ऐका. सिनेमातली गाणी आपण मुंबईतही ऐकतो. ती ऐकायला इथे एवढय़ा लांब कशाला यायचे?’’

सहली आणि कॉलेजच्या पिकनिक यांच्यातला फरक अजून भल्याभल्यांना कळलेला नाही असे अनेकदा वाटते. तो समजून घेतला तर सहप्रवासातला आनंद वाढेल.

आपल्या खूप अपेक्षा असतात टूर आयोजकांकडून. आपल्याला वाटते, टूरवाल्यांनी कमी पैशांत खूप काही दाखवावे. नुसतेच प्रसिद्ध स्थळांचे दर्शन घडवण्यात समाधान मानू नये. थोडेफार प्रबोधनात्मकही काम करावे. बाजारहाट करायला भरपूर वेळ द्यावा. केवळ इमारती, चौक, किल्ले, राजवाडे, मंदिरे आणि चर्च न दाखवता तिथले लोकजीवनही दाखवावे. स्थानिक लोकांशी प्रवाशांचा संवाद होईल हे पाहावे.. प्रवाशांच्या या अपेक्षांना अंतच नसतो. कोणत्याही टूर कंपन्या त्या पूर्ण करतील अशी आज तरी स्थिती नाही. त्यामागे त्यांच्या म्हणून काही अडचणी असतात.. आहेत.

टूर कंपन्यांचे आयोजक आणि संचालक हे काही आभाळातून पडलेले नसतात. आपल्यातूनच ते आलेले असतात. एका अर्थाने ते आपलेच प्रतिनिधित्व करत असतात. त्यांची मानसिकता पर्यटकांच्या मानसिकतेहून फार भिन्न कशी असेल? आणि बिझनेस म्हटल्यावर त्यांचे लक्ष नफा-तोटय़ावर असणारच.

लोकांना कमीत कमी दिवसांत अधिकाधिक पर्यटन स्थळांचे दर्शन घडावे यासाठी टूरवाले प्रयत्नशील असतात. त्यातून घाईघाईत सर्व उरकायची गरज निर्माण होते. कोणत्याही ठिकाणी पोहोचल्यावर दहा-पंधरा मिनिटे झाली की ‘चला चला, फोटोबिटो काय ते आटपा, बसमध्ये बसा..’ अशी त्यांची हाकाटी सुरू होते. परदेशातली म्युझियम्स घाईने पाहायलाही तीन-चार तास लागतात. म्हणून मग टूर लीडर म्युझियमची इमारत बाहेरूनच दाखवतात. टीममध्ये नाना तऱ्हेच्या स्वभावांचे लोक असतात. त्यांचा तऱ्हेवाईकपणा सांभाळून घ्यावा लागतो. टूरमधले लीडर खरे तर डिक्टेटर असतात, पण ते डिक्टेटरसारखे वागत नाहीत. समस्या गोडीगुलाबीने सोडवण्याकडे त्यांचा कल असतो. टूरवाल्यांच्या पस्र्पेक्टिव्हमधून पाहायला पाहिजे, असे त्यांच्यापैकी एक जण म्हणाला ते खरेच आहे.

वैयक्तिक स्वातंत्र्यावर प्रेम असणाऱ्यांची गोष्ट वेगळी. मुक्त संचार करणे ते अधिक पसंत करतात. दुसऱ्या कुणाच्या नेतृत्वाखाली सहलीला जायचे ते शक्यतो टाळतात. त्याची किंमत मोजायची त्यांची तयारी असते. परदेशातले हॉटेल बुकिंग, वाहतूक व्यवस्थेचे झंझट टाळण्यासाठी बरेच जण ‘आयोजित’ सहल कंपन्यांकडे वळतात. टुरिस्ट कंपन्या पर्यटकांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर बंधने आणतात हे त्यांना ठाऊक नसते असे नाही. मुक्त संचाराचा आनंद त्यांनाही हवा असतो. पण व्यवस्थापनाची दगदग आणि तणाव टाळण्यासाठी तडजोड म्हणून ट्रॅव्हल कंपन्यांचे नेतृत्व ते नाइलाजाने स्वीकारतात. थोडी शिस्त, थोडी बंधने आणि थोडी मुक्तता यांची चतुर सांगड घालणाऱ्या पर्यटन कंपन्या आज या क्षेत्रात पाय रोवून आहेत.

जाता जाता मुद्दाम सांगावे असे काही : अगदी ठरवून टूरवाल्यांच्या भानगडीत न पडता आम्ही केरळची सहल केली. केरळी मित्राबरोबर मनसोक्त हिंडलो. शहरातला वावर टाळला. केरळच्या खेडय़ात केरळी कुटुंबात पाच-सहा दिवस राहिलो. अस्सल केरळी पदार्थाचा आस्वाद घेतला. मल्याळी भाषेची प्राथमिक पुस्तके खरेदी केली. मल्याळी अक्षरांची थोडीफार ओळख करून घेतली. त्यामुळे दोन दिवसांत मल्याळी भाषेतल्या पाटय़ा वाचता यायला लागल्या. बसवरचे फलक वाचून ती कोणत्या भागात चाललीय समजायला लागले. मित्राच्या खेडय़ातल्या घरासमोर एका झाडावर लहानशी पाटी होती. जवळजवळ निर्जन अशा या परिसरात ही पाटी कसली? त्यावर काय लिहिले असेल याचे नेहमी गूढ वाटायचे. मल्याळी अक्षरे वाचता यायला लागल्यावर ते गूढ उकलले. त्यावर लिहिले होते- ‘कॉम्प्युटर क्लासेस’! संगणक साक्षरता इतक्या दूरवर पोहोचलेली पाहून आश्चर्यमिश्रित आनंद झाला.

असा साक्षात्कार, अशा अविस्मरणीय गमती आणि असा मुक्त संचाराचा अनुभव टूर कंपन्यांनी आयोजित केलेल्या शिस्तबद्ध सहलीत कुठून मिळायला?

– अवधूत परळकर

awdhooot@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2018 1:09 am

Web Title: marathi people local to global tourism part 2
Next Stories
1 अन्त महज एक मुहावरा है!
2 प्रतिमेहून प्रत्यक्ष सुंदर..
3 ध्येयासक्त स्टीफन
Just Now!
X