28 February 2021

News Flash

निष्ठावान शिक्षकाचे अनुभवसंचित

आपल्या देशाला गुरू-शिष्यांची फार मोठी परंपरा लाभलेली आहे.

आपल्या देशाला गुरू-शिष्यांची फार मोठी परंपरा लाभलेली आहे. शिष्य नेहमी गुरूने दिलेला वसा जपत, त्यात स्वत:ची भर टाकत पुढल्या पिढीचा गुरू होत जातो. केवळ गुरूमुळेच शिष्याच्या जीवनप्रवाहाला आकार मिळतो असे नाही, तर शिष्याकडूनही अनेक गोष्टी गुरूलाही शिकायला मिळतात आणि त्याला स्वत:च्या ज्ञानाला तपासण्याची संधी मिळते. असं हे एकमेकांना प्रभावित करणारं नातं. परंतु काळाच्या ओघात शिक्षणक्षेत्रात बदल होत गेला. आजच्या ‘फास्ट लाइफ’मध्ये तर शिक्षणाची गती मेट्रोसारखीच ‘फास्ट’ झालेली आहे. शैक्षणिक धोरणं सातत्यानं बदलत आहेत. शाळा नवी कात धारण करताना दिसतायत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणाच्या गाभा घटकांचे नियोजन करून अभ्यासक्रम आखला जातोय. परंतु ते गाभा घटक मुलांपर्यंत पोचविण्यासाठी पोषक असं वातावरण आपल्या सभोवताली नाही. आपण कुठेतरी कमी पडत आहोत, शिक्षणातून जे मिळायला हवंय ते न मिळता काहीतरी हरवत चाललंय, असं मनापासून वाटत राहतं. अशावेळी काही पुस्तकं हाती लागतात आणि पुढच्या प्रवासासाठी ती प्रेरणादायी ठरतात. रघुराज मेटकरी लिखित ‘माझे विद्यार्थी’ हे पुस्तक त्यापैकीच एक.

‘माझे विद्यार्थी’ या शीर्षकावरूनच लक्षात येते, की एका शिक्षकाने लिहिलेले हे पुस्तक आहे. शिक्षकाची नोकरी करताना विद्यार्थ्यांचे आलेले विविध अनुभव या पुस्तकातून कथनात्मक पद्धतीने मांडले आहेत.

पुस्तकाच्या सुरुवातीला मेटकरी स्वत:च्या आयुष्याचा सारिपाठ मनोगतातून मांडतात. मेटकरी स्वत: शेतकरी कुटुंबातून असलेले. घरी निरक्षरता. परंतु वडिलांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखले. अनेक चटके सोशीत त्यांनी मेटकरी यांना शिकविले. पदवी शिक्षणानंतर शिकवण्याच्या ध्यासापायी लवकरच ते जिल्हा परिषदेच्या शाळेत अध्यापक म्हणून रुजू झाले. विद्यार्थ्यांना संपन्न करत असताना त्यांचेही आयुष्य समृद्ध झाले. १९९९ मध्ये महाराष्ट्र सरकारचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ त्यांना मिळाला.  एकांकिका-नाटके, कथा, कविता रचत, त्यामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेत अनौपचारिक शिक्षणप्रकल्प, वाचनालय अशा अनेक गोष्टी त्यांना साध्य करता आल्या. हे सारे करतानाच्या अनुभवांचेच हे शब्दरूप.

शिक्षक म्हणून कर्तव्य बजावताना मेटकरी यांचा विविध प्रकारच्या विद्यार्थ्यांशी संबंध आला. अशा विद्यार्थ्यांच्या मेटकरी यांनी सांगितलेल्या या पुस्तकातील कहाण्यांमधून विद्यार्थ्यांबरोबरच पालकांची आणि समाजाचीही मानसिकता टिपली गेली आहे.

हुशार असणारा गजा लोखंडे आपल्या मेहनतीने शाळेतील सगळ्याच कार्यक्रमांत आणि अभ्यासात पुढे. चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत त्याने उत्तम यश मिळवावे अशी सरांची त्याच्याकडून अपेक्षा असते. पण नंतर गजाचे वर्गात न येणे, आई वेश्याव्यवसाय करत असल्यामुळे त्याने शेवटी शाळा सोडून देणे याबद्दलची हळहळ ‘गजा लोखंडे’ या लेखात व्यक्त होते.. एकपाठी, हुशार, चाणाक्ष असलेला गोरक्ष हासुद्धा सातवीनंतर शिक्षण सोडून केरळला जातो. आपल्या वडिलांच्या इच्छेनुसार त्यांचे दुकान सांभाळण्याकरीता त्याला शिक्षण सोडण्यासाठी पालक भाग पाडतात, याबद्दलची खंत लेखकाने ‘गोरक्ष पाटील’ या लेखात व्यक्त केली आहे.. अत्यंत खोडकर असणारा गणू गुजले हा जितका द्वाड तितकाच मेहनती. त्याच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्याचे लेखकाने केलेले प्रयत्न आणि त्यातून गणूत झालेला बदल याविषयी ‘गणू गुजले’ या लेखात वाचायला मिळते.

सुजित अतिशय हुशार विद्यार्थी. परंतु पालकांच्या भांडणांमुळे, त्यांच्या अवास्तव अपेक्षांमुळे त्रस्त होऊन स्वत:ला गळफास लावून घेतो. त्याच्यावरील लेखात मेटकरी यांनी पालकांच्या अवास्तव अपेक्षांचे दुष्परिणाम मांडले आहेत.. आराधी समाजात जन्मलेला गोड गळ्याचा अवधूत भोसले नवरात्रात गाणं गाऊन भिक्षा मागून आपल्या कुटुंबाला मदत करीत असे. मात्र आपल्या वडिलांवर होणाऱ्या अन्यायामुळे व्यथित होऊन अवधूत कायदेतज्ज्ञ होण्याचा निर्णय घेतो आणि कठोर परिश्रमाने त्या ध्येयापर्यंत पोचतो.. चंद्रकांत वाघिरे हा चुणचुणीत मुलगा, पण पायाळू जन्माला आल्यामुळे त्याला देवऋषी मानले जाते. त्याचे वडील त्याच्या या देवरसीपणातून धूर्तपणे पैसे कमवून व्यसनाच्या आहारी जातात. परंतु शिक्षकांवर विश्वास ठेवून चंद्रकांत स्वत:ला कसे घडवतो, याविषयी ‘देवरसी’ या लेखातून कळते.

अशा अनेक विद्यार्थ्यांच्या सुख-दु:खांत त्यांचा आधार असणारा एक निष्ठावान शिक्षक सातत्याने आपल्याला या लेखासंग्रहातून भेटत राहतो. या निष्ठावान शिक्षकाला आपले विद्यार्थी, समाज आणि समाजातील प्रत्येक घटकाबद्दल आस्था आहे आणि जिथे उणिवा जाणवतायत तिथे तो त्या भरून काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न करताना दिसतोय. आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या बाबतीतच नव्हे, तर आर्थिक-मानसिक पातळीवरही मदत करण्याचा प्रयत्न हा कृतिशील शिक्षक करताना दिसतोय. विद्यार्थ्यांच्या सुख-दु:खांशी लेखक अशाप्रकारे एकरूप झाल्यामुळेच लेखांतील भाषा जिवंत वाटते. त्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवे.

  • ‘माझे विद्यार्थी’ – रघुराज मेटकरी,
  • साधना प्रकाशन, पृष्ठे- १५२, मूल्य- १२५ रुपये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2018 3:12 am

Web Title: maze vidyarthi loksatta book review
Next Stories
1 मऱ्हाटी अंतरंगाची लोककला
2 अमृतमयी औदुंबर संमेलन!
3 लोकरंगी नाटय़कर्मी
Just Now!
X