27 February 2021

News Flash

युगांतराच्या कालखंडाचा दस्तावेज

राम प्रधान यांनी स्पर्धा परीक्षेद्वारे १९५२ मध्ये भारतीय प्रशासन सेवेत प्रवेश केला.

प्रशासन सेवेतील सर्वोच्च स्तरावर प्रदीर्घ काळ सेवा बजावलेले अधिकारी बहुधा प्रसिद्धीच्या प्रकाशझोतात नसतात. किंबहुना, त्यांनी आपली कामे पडद्याआड राहूनच करावी असे लोकशाही प्रशासनाचे सर्वमान्य संकेत आहेत. कित्येकदा ऐतिहासिक स्वरूपाची कामगिरी हे अधिकारी बजावतात. अशा काही मोजक्या प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये राम प्रधान यांचा समावेश होतो. पंडित नेहरू, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, राजीव गांधी यांच्यासारख्या नेत्यांचा गाढा विश्वास त्यांनी संपादन केला होता, तो त्यांच्या अंगभूत गुणांच्या बळावर! त्यांची प्रखर बुद्धिमत्ता, अभ्यासू कार्यशैली आणि चातुर्य या बाबी निर्विवाद होत्या. त्याचप्रमाणे त्यांच्या नि:पक्षपाती ध्येयनिष्ठेविषयीही कधीच शंका उपस्थित झाल्या नाहीत. त्यांनी लिहिलेल्या ‘वादळमाथा ते १९६५ भारत-पाक युद्ध’ या पुस्तकात त्यांच्या आत्मचरित्राचा काही अंश ओघाने येऊन गेला आहे. तथापि ते पुस्तक प्रामुख्याने यशवंतराव चव्हाण यांच्या संरक्षणमंत्रिपदावरील कामगिरीविषयी आहे. ज्याला खऱ्या अर्थाने आत्मकथन म्हणता येईल असे त्यांचे नवे पुस्तक म्हणजे ‘माझी वाटचाल- मेटकॉफ हाऊस ते राजभवन (१९५२- १९८९)’!

राम प्रधान यांनी स्पर्धा परीक्षेद्वारे १९५२ मध्ये भारतीय प्रशासन सेवेत प्रवेश केला. तेव्हापासून सेवानिवृत्तीपश्चात १९८९ मध्ये त्यांची अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून नेमणूक झाली, तोपर्यंतचा विस्तृत अनुभवपट त्यांनी या आत्मचरित्रात उलगडला आहे.

सर्वसाधारणपणे महाराष्ट्राचे गृहसचिव आणि मुख्य सचिव, तसेच केंद्र शासनाचे गृहसचिव या पदांवरील त्यांची नेत्रदीपक कामगिरी मराठीजनांना परिचित आहे. १९६२ मधील चीन युद्धानंतर यशवंतराव चव्हाण यांची देशाच्या संरक्षणमंत्रिपदी निवड झाली. तेव्हा आपल्यासमवेत काम करण्यासाठी ते प्रधानांना दिल्लीला घेऊन गेले. प्रधानांच्या संरक्षण मंत्रालयातील कार्यकाळाविषयीही थोडीफार माहिती महाराष्ट्राला आहे. तथापि अन्य काही महत्त्वाच्या पदांवरही त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. ज्यात- सुमारे दहा वर्षे त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर वाणिज्यविषयक काम केले, त्याचा समावेश होतो. ‘माझी वाटचाल’ या पुस्तकात त्यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभवांचे विवेचन आले आहे. युनो किंवा युएनसीटीडी यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांचे कामकाज कसे चालते, आणि तेथे जाऊन एखाद्या देशाच्या प्रतिनिधीला कोणकोणत्या जबाबदाऱ्या पेलाव्या लागतात याची माहिती या पुस्तकात मिळते. तीच बाब नौकानयन विभागासंबंधी. सामान्यत: भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्याला अशा भूमिका निभावण्याचे पूर्वप्रशिक्षण नसते. अगदी नवे, महत्त्वाचे आणि काहीशा तांत्रिक स्वरूपाचे विषय समर्थपणे हाताळून तेथेही आपल्या कर्तृत्वाची मोहोर उमटवताना लेखकाने किती परिश्रमपूर्वक अभ्यास केला असेल याची कल्पना हे पुस्तक वाचल्यावर वाचक करू शकतो. राज्यात आणि केंद्रात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना भिवंडीची दंगल असो, दत्ता सामंतप्रणीत गिरणी कामगार संप असो किंवा पंजाब, आसाम आणि मिझोरामविषयक ऐतिहासिक करार असोत; अशा अनेकविध प्रसंगांत उद्भवलेली आव्हाने आणि आलेले अनुभव आदी कित्येक घडमोडींचा तपशील प्रधान यांनी तटस्थपणे मांडला आहे. या सर्व प्रसंगांतील त्यांची कामगिरी नेत्रदीपक होती. तरीही विवेचनात आत्मप्रौढीचा वास कोठेही येणार नाही याची पुरेपूर काळजी त्यांनी घेतली आहे. त्यामुळे या पुस्तकाची वाचनीयता आणि विश्वासार्हता कित्येक पटीने वाढली आहे.

प्रधान यांचा प्रशासन सेवेतील सुरुवातीचा प्रशिक्षण कालावधी आणि (आताच्या) गुजरात प्रांतातला कार्यकाळ ही प्रकरणे वाचताना वाचक नकळतपणे इतिहासात काही दशके मागे जातो. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुरुवातीच्या काळात प्रशासनाची कार्यपद्धती बव्हंशी ब्रिटिश पठडीतलीच होती. परंतु नव्या जमान्यातील वास्तवाला सामोरे जाताना अधिकाऱ्यांना किती जाणीवपूर्वक पावले उचलावी लागत होती, याचे मनोज्ञ चित्र लेखकाने सहजगत्या रेखाटले आहे. प्रशासन सेवेच्या दृष्टीने पाहता हे एक युगांतर होते. अशा कसोटीच्या काळात नवे मापदंड निर्माण करण्याची जबाबदारी प्रशासन सेवेत नव्याने प्रवेश केलेल्या अधिकाऱ्यांवर येऊन पडली होती. त्यांची प्रगल्भता, विकासविषयक मानसिकता स्वीकारण्याची तयारी आणि तारतम्य या सर्वाची ती परीक्षा होती. या संक्रमणावस्थेत लेखकाने आपली जडणघडण कशी केली, हे वाचताना आपण थक्क होऊन जातो. आजच्या पिढीतल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना हे सर्व उद्बोधक वाटावे. आपल्या भूमिका बदलत्या काळानुसार कशा सतत तपासून पाहाव्या लागतात आणि नवी कौशल्ये कशी आत्मसात करावी लागतात, याचा एक वस्तुपाठ नव्या प्रशासकांसमोर या आत्मकथनातून मांडला गेला आहे.

कोल्हापूरच्या बाजार समितीची स्थापना किंवा राजा दिनकर केळकर संग्रहालयाची पुनर्रचना असो, लेखकाच्या उपक्रमशीलतेची अशी कित्येक उदाहरणे जागोजागी आपल्यासमोर येतात. आपल्या कार्यसूचीत समाविष्ट नसलेली जनहिताची अनेक कामे सहजगत्या करणे कुशल प्रशासकाला शक्य असते. मात्र, त्यासाठी पुढाकार घेणे आणि सर्वसंबंधितांची मने विधायक कार्यासाठी वळवून घेणे महत्त्वाचे असते याची प्रचीती लेखक आणून देतो.

प्रशासन हा विषय तसे पाहू गेल्यास काहीसा क्लिष्ट असला तरी तो सोपा आणि रंजक करून मांडण्याची हातोटी लेखकाकडे आहे. पुस्तकाची भाषा अत्यंत ओघवती आहे. त्यामुळेच हे आत्मकथन अत्यंत वाचनीय झाले आहे. आपल्या व्यक्तिगत जीवनातील ताणतणाव किंवा चढउतारांविषयी लेखकाने हात काहीसा आखडता घेतला आहे, असे मात्र जाणवते. विशेषत: कटु अनुभवांविषयी विस्ताराने न लिहिणे हेही अपघाताने घडलेले नाही, तर सहेतुकपणे झाले आहे.

देशाच्या इतिहासातील काही अत्यंत महत्त्वाच्या घडामोडींचा दस्तावेज, असे अनन्यसाधारण महत्त्व प्रधान यांच्या या आत्मकथनाला आहे. भावी काळातील संशोधक- वाचकांना हे अमोल साधन यानिमित्ताने त्यांनी उपलब्ध करून दिले आहे यात शंका नाही.

अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल, महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सदस्य किंवा मुंबईत झालेल्या अतिरेकी हल्ल्यांच्या चौकशी समितीचे अध्यक्ष या नात्याने त्यांना आलेले अनुभवही कुतूहलजनक आहेत. त्याविषयी त्यांनी आत्मचरित्राच्या दुसऱ्या खंडात अधिक मोकळेपणाने लिहावे अशीच अपेक्षा वाचक ठेवतील. त्यानिमित्ताने सद्य:स्थितीतील राजकारण, प्रशासन आणि सामाजिक उलाढाली यांबाबतचे त्यांचे परिपक्व चिंतन आणि भाष्य वाचकाच्या हाती पडावे अशी अपेक्षा आहे.

  • ‘माझी वाटचाल : मेटकॉफ हाऊस ते राजभवन (१९५२-१९८९)’ – राम प्रधान ,
  • मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे,
  • पृष्ठे- ४४२, मूल्य- ५०० रुपये.

 

प्रभाकर (बापू) करंदीकर

pkarandikar50@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2018 3:14 am

Web Title: mazi vatchal metcof house te rajbhavan
Next Stories
1 निष्ठावान शिक्षकाचे अनुभवसंचित
2 मऱ्हाटी अंतरंगाची लोककला
3 अमृतमयी औदुंबर संमेलन!
Just Now!
X