|| नीलांबरी जोशी

‘वाटेवर काटे वेचीत चाललो, वाटले जसा फुलाफुलांत चाललो..’ या वसंतराव देशपांडे यांनी आपल्या आवाजानं अजरामर केलेल्या कवी अनिल लिखित गाण्यातले प्रसन्न, मोकळे आणि अंतरंगाला भिडणारे भाव ‘मीचि मज व्यालो’ हे प्रवीण कुलकर्णी लिखित पुस्तक वाचताना सतत जाणवतात. परंतु त्या गाण्यातल्या-

‘भय’भूती: साहिब हम को डर लागे | Loksatta chaturang Different types of fear infatuation the fear
‘भय’भूती: साहिब हम को डर लागे
Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
lokrang article, book review, ekla chalo re, Autobiographical book, sanjeev sabnis, loksatta,
सकारात्मक आत्मकथन
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…

‘मिसळुनी मेळ्यात कधी, एक हात धरूनि कधी, आपुलीच साथ कधी करित चाललो..

आधिचा प्रसाद घेत, पुढची ऐकीत साद, नादातच शीळ वाजवीत चाललो..

चुकली तालात चाल, लागला जिवास बोल, ढळलेला तोल सावरीत चाललो..

खांद्यावर बाळगिले, ओझे सुखदु:खाचे, फेकून देऊन अता परत चाललो..’

– या संपूर्ण ओळींमधल्या प्रत्येक शब्दातला अर्थही प्रवीण कुलकर्णी यांच्या जीवनप्रवासाला समर्पक आहे.

उन्मेष प्रकाशनानं नुकतंच प्रकाशित केलेलं हे पुस्तक ‘एकदा वाचून संपवलं’ अशा जातीचं नाही. त्यातलं मधलं कुठलंही पान उघडून कधीही वाचलं तरी आपल्या आयुष्यातल्या कोणत्या तरी प्रसंगाचं, घटनेचं किंवा आपल्या मनातल्या भावभावनांचं त्यात प्रतिबिंब सापडतं. मन गढूळ असेल तर ते शांतवण्याचं कामही हे पुस्तक करू शकेल. महत्त्वाचं म्हणजे काहीशा अधांतरी, एकाकी भासणाऱ्या जीवनयात्रेत आपल्या प्रत्येकाला ‘आपल्यासारखं कोणीतरी आहे’ हा आधार खूप गरजेचा असतो. तो आधार देण्याचं काम हे पुस्तक करतं.

लौकिकार्थानं पाहायला गेलं तर मध्यमवर्गीय बालपण सोलापूरमध्ये गेलेल्या, बँकेत काम केलेल्या, बायको आणि दोन मुलं असलेल्या एका व्यक्तीचा हा सामान्य भासणारा जीवनपट आहे. आयुष्यात आलेले काही शारीरिक आजार आणि ‘नैराश्य’ हा मानसिक आजार यातून लेखक कसा बाहेर पडला, त्याची ही कथा! ही कथा वाचकांना का सांगितली, याचं कारण मनोगतात येतं. ते म्हणजे- ‘माझ्यासारख्या सर्वसामान्य, मध्यमवर्गीय लाखो माणसांचं अनुभवविश्व थोडय़ाफार फरकानं सारखंच असलं, तरी स्वभावातल्या आणि दृष्टिकोनातल्या फरकाने ते स्वतंत्र आणि भिन्न होतं. या सर्वामागे आहे- माझं मन, माझा स्वभाव, प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा माझा असा एक दृष्टिकोन.. हा दृष्टिकोन, हा स्वभाव व्यक्तिनिष्ठ असतो, एकमेवाद्वितीय असतो. म्हणून तो सांगण्यासारखा आहे.’

आपल्या आयुष्याची गोष्ट सांगत जाताना ‘मनाने मनाला पाहावे’ अशा निर्मळतेनं लेखकानं स्वत:च्या मनातल्या भावभावनांसमोर एक आरसा ठेवला आहे. अत्यंत प्रामाणिकपणे त्यात उमटलेल्या भावना ‘आपल्या सुहृदांना लिहिलेली पत्रं’ अशा फॉर्ममधून या पुस्तकातून वाचकांसमोर मांडल्या आहेत. ‘बघा, मी किती सहन केलंय,

मी किती भोगलंय.. हा सूर मला अजिबात नको होता. कारण अशा परिस्थितीतून सकारात्मक मनोवृत्तीने आणि जवळच्या जिवलगांच्या साथीने बाहेर पडता येतं हे मला अधोरेखित करायचं होतं..’ असं लेखकानं मनोगतातच नमूद केलं आहे. तो हेतू या पुस्तकात नक्कीच साध्य झाला आहे.

शास्त्रीय संगीताबद्दल मनात असलेले नकारात्मक भाव ‘मला उमजलेले बालगंधर्व’ हा कुमार गंधर्व यांचा कार्यक्रम ऐकून संपणे, तसंच एका प्रसन्न संध्याकाळी ऐकलेल्या गुलाम अली, मेहदी हसन यांच्या गझला, जवळच्या मित्राबरोबर इंदिरा संत यांच्या साहित्यावर सादर केलेले कार्यक्रम, ‘जागते रहो’सारखे असंख्य कलात्मक चित्रपट पाहून त्यावर गप्पा मारत घालवलेल्या कित्येक रात्री.. अशा वर्णनांमधून लेखकाचं कलासक्त मन समोर येतं.

अशा वृत्तीची माणसं सहसा संवेदनशील असतात. लहानपणी घराची किल्ली हरवली म्हणून वाटलेली प्रचंड अपराधी भावना लेखकाने एके ठिकाणी नोंदवली आहे. अशा प्रसंगांमधून लेखकाची संवेदनशीलता समोर येतेच; परंतु आपल्यापैकी अनेक जण त्या गोष्टींशी स्वत:ला जोडून घेऊ शकतात. वडिलांचा अव्यक्त स्वभाव आणि त्यामुळे लहानपणापासून जास्त प्रमाणात जाणवलेला दबलेपणा, एकाकीपणा अशाही गोष्टींतून लेखकाचं संवेदनशील मन दिसतं. लहानपणी घडलेल्या अशा प्रसंगांचं सावट मनावर राहतं, असा विचार लेखकाच्या उत्तरायुष्यातल्या नैराश्याबाबत केला तर परत एकदा फ्रॉईड आठवतो. खरं तर बालपणातल्या प्रसंगांबरोबरच शारीरिक आरोग्यासाठी मानसिक, सामाजिक आणि सांस्कृतिक गोष्टी किती महत्त्वाच्या असतात, हे सहसा आपल्या लक्षात येत नाही. मानसिक ताणतणाव शारीरिक आरोग्यावर थेट घाला घालू शकतात. जागतिक आरोग्य संघटनेनं २०२० साली इतर शारीरिक आजारांपेक्षा ‘नैराश्य’ या मनोविकारामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण सर्वाधिक असेल असा इशारा दिला आहे. भारतात दर पाचपैकी एका माणसाला समुपदेशनाची गरज आहे. कॉर्पोरेट क्षेत्रातल्या ४२ टक्के जणांना ‘नैराश्य’ हा मानसिक आजार सतावतो, इतकं नैराश्याचं प्रमाण गंभीर आहे. परंतु समाजात त्यासंदर्भातला ‘स्टिग्मा’ही प्रचंड आहे. मानसोपचारतज्ज्ञाकडे किंवा समुपदेशकाकडे जाणं हे कित्येकांना शरमेचं वाटतं. ‘जितके सामान्य लोक आपल्या शुभार्थी कहाण्या जनमानसासमोर ठेवतील तितक्याच प्रमाणात जनमानसाचा मानसिक आरोग्य आणि आजार याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल..’ असं या पुस्तकाच्या प्रस्तावनेत डॉ. आनंद नाडकर्णी यांनी यासाठीच लिहिलं आहे. अशा वेळी दीपिका पदुकोणसारखी लोकप्रिय व्यक्तिमत्त्वं पुढे येऊन लोकांसमोर आपलं नैराश्य, त्यातून बाहेर पडण्याचे उपाय मांडतात हे खूप स्वागतार्ह वाटतं.

या दृष्टिकोनातून लेखकाचं नैराश्य या मनोविकारातून कुटुंबीयांच्या मदतीनं बाहेर पडणं आणि आपले अनुभव मोकळेपणानं मांडणं हे महत्त्वाचं ठरतं. डॉ. आनंद नाडकर्णी (मनोविकारतज्ज्ञ) आणि डॉ. शुभा थत्ते (मानसोपचारतज्ज्ञ) या दोघांकडून घेतलेल्या उपचारांमुळे लेखकाला या विकारातून बाहेर पडता आलं. डॉ. अल्बर्ट एलिस यानं सुरू केलेल्या ‘आर.ई.बी.टी.’ (रॅशनल इमोटिव्ह बिहेविअरल थेरपी) या थेरपीचा उपयोग आपल्याला झाल्याचं लेखकानं आवर्जून सांगितलं आहे. स्वभावाला औषध नाही असं म्हणणं कसं चूक आहे, ते या थेरपीमध्ये शिकवलं जातं. आपले विचार, भावना आणि वर्तन यांच्यावर नियंत्रण आणणं, चुकीच्या प्रतिक्रिया देणं थांबवणं अशा अनेक गोष्टी आर.ई.बी.टी. शिकवते; परंतु त्या अंगी बाणवणं तुलनेनं अवघड असतं. लेखकानं ते जमवलं आणि बँकेतल्या सहकाऱ्यांशी, बायको-मुलांशी, आप्तेष्टांशी त्यांचं नातं जास्त प्रवाही आणि दृढ झालं. त्याहून महत्त्वाचं म्हणजे स्वत:चं स्वत:शी उत्तम नातं जुळलं! पुस्तकातलं एक वाक्य मात्र मनोविकार असणाऱ्या आणि नसणाऱ्या सर्वासाठीच महत्त्वाचं आहे.. ‘मी अनुभवतो आहे ते मोकळेपण. आता लोक म्हणतात म्हणून किंवा लोक काय म्हणतील म्हणून मी एखादी गोष्ट करेन किंवा करणार नाही असं घडणार नाही.’ हे आपण सर्वानी अंगीकारणं जरुरी आहे!

‘मीचि मज व्यालो’ – प्रवीण कुलकर्णी, उन्मेष प्रकाशन,

पृष्ठे- १५४, मूल्य – २०० रुपये.

neelambari.joshi@gmail.com