मेधा आलकरी

‘पर्वतीय गोरिला’ हे मर्कट जातीतील एक अनोखे जनावर. आता नाममात्र संख्येत उरलेल्या या पर्वतीय गोरिलांचे आठ गट रवांडा येथील ‘व्होल्कॅनो नॅशनल पार्क’मध्ये वास्तव्यास आहेत. त्यांच्या दर्शनाचे हे उत्कट अनुभवचित्र..

Abuse of young woman, Kharghar,
खारघरमधील तरुणीवर अत्याचार
46 lakhs in the bungalow and house of the corrupt Tehsildar
नोटांचे ढीग पाहून एसीबी अधिकारीही चक्रावले; लाचखोर तहसीलदाराच्या बंगला व घरात ४६ लाखाचे घबाड, कॅश मोजायला…
taiwan earthquake
तैवानमध्ये भूकंपात बेपत्ता लोकांची शोधमोहीम अद्याप सुरू
Bhayander
भाईंदर : माजी आमदार गिल्बर्ट मेन्डोन्सांच्या भूमिकेकडे लक्ष, महायुती व महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच

‘पर्वतीय गोरिला’ हे मर्कट जातीतील एक अनोखं जनावर. जगातील मोठय़ा सस्तन प्राण्यांमधील एक. जगभरात अवघी ७५० एवढी नाममात्र संख्या असलेल्या या प्राण्याचं वास्तव्य पूर्व आफ्रिकेतील उत्तर रवांडा, युगांडा व कांगो या तीन देशांच्या सीमाप्रदेशात असून, त्यातील जवळपास अर्धे गोरिला रवांडा येथील ‘व्होल्कॅनो नॅशनल पार्क’मध्ये स्थित आहेत. तिथे जाऊन ‘विरुंग’ नावाचा पर्वत चढून, बांबूच्या वनात विलसलेल्या या गोरिला कुटुंबीयांना पाहणं हा एक मुलखावेगळा अनुभव आहे.

व्होल्कॅनो नॅशनल पार्क हे एक मोठ्ठं जंगलच आहे. गोरिलांचे आठ गट तिथे वास्तव्यास आहेत. पैकी पाच गटांना पर्यटक भेट देऊ  शकतात व तीन संशोधनांसाठी राखीव आहेत. प्रत्येक गोरिला कुटुंबाची संख्या वेगळी. काही अगदी पर्वताच्या टोकाशी वास्तव्य करून आहेत, तर काही मध्यावर. त्यांच्यापर्यंत पोहोचणारा मार्ग हा कमी-अधिक अंतराप्रमाणे सुकर व दुर्गम होत जातो. त्यापैकी ‘उमुबानो’ कुटुंबाला भेट देण्यासाठी आम्हाला तब्बल अडीच तासांचा दमछाकपूर्ण ट्रेक करावा लागला. नॅशनल पार्कच्या पर्यटक केंद्राकडून आपल्याला एक निष्णात गाइड दिला जातो. या गाइडवरच आपली सारी भिस्त असते.

चढायला सुरुवात केली तेव्हा वाट धुक्यात हरवली होती. छानसा गारवा होता. जसजशी उंची गाठत गेलो तसतसे घामाने भिजलेले कपडे पाठीवरील हॅवरसॅकमध्ये कोंबायला सुरुवात केली. गरज वाटली तर तुमचं ओझं उचलून तुमच्यासोबत चालण्यासाठी मदतनीस असतात. त्यासाठी कष्टाच्या मानाने नाममात्र शुल्क ते घेतात. आम्ही त्यातल्या एकाला बरोबर घेतलं होता. भुसभुशीत जमिनीचा अंदाज घेत, काठय़ांवर भार देत, झाडांच्या बुंध्यांवरून लोंबकळत, लोंबत्या वेलींचा गुंता सोडवत, कधी मोकळ्या तर कधी घनदाट जंगलातून आमची चढउतार चालू होती. अडीच तासांच्या या ट्रेकमध्ये गाइडने आम्हाला बरीच माहिती दिली. गोरिलांसमोर घ्यायची काळजी, दक्षता अतिशय विनोदी पद्धतीने सांगितली.

पर्यटकांना तो विनंतीपूर्वक सांगत होता की, तुम्ही या शांत प्राण्याला घाबरू नका. त्यांच्या नैसर्गिक निवासात त्यांना पाहायचा आनंद पुरेपूर लुटा. पर्वतीय गोरिला हा खरं तर शांतताप्रिय, कुटुंबवत्सल आणि अनाक्रमक स्वभावाचा प्राणी. मात्र त्याच्या परिवाराच्या सुरक्षिततेला धोका आहे, अशी नुसती शंका जरी आली तरी तो चवताळून ‘मी काय करू शकतो’ याची एक झलक दाखवतो. त्यामुळे त्याच्या आणि तुमच्यामध्ये सात मीटरचं सुरक्षित अंतर ठेवा, हा कानमंत्र त्याने आम्हाला दिला. त्याला आपली खास विनोदी टिप्पणी जोडताना तो म्हणाला, ‘‘पण हा नियम गोरिलाला लागू नाही! हे त्याचं घर आहे. एन्जॉय हिज कंपनी! मात्र स्वत:हून त्याच्या मार्गात आडवे येऊ  नका, त्याची वाट सोडा. एका आगाऊ  बाईला त्याने पंजाच्या एका झटक्यात खाली लोळवलं आहे. सिनेमातील किंगकाँग माणसं खायचा, पण प्रत्यक्षात गोरिला हे पाला खाणारे शाकाहारी जीव आहेत. त्यामुळे तशी भीती नाही आणि बाकी काही आणीबाणी उद्भवली तर मैं हूँ ना!’’

‘‘हो आणखी एक काळजी घ्यायची, त्याच्यासमोर शिंकायचं नाही.’’ का? तर, ‘‘मनुष्याच्या शिंकेतून होणारा जंतुसंसर्ग गोरिलांसाठी घातक आहे. त्यामुळे शिंक द्यायची तर ती चेहरा फिरवून रुमालात द्यावी.’’

मजल-दरमजल करत आम्ही एकदाचे गंतव्यस्थानाच्या अगदी जवळ येऊन पोचलो. गाइडने सांगितल्याप्रमाणे बांबूचं वन दिसू लागलं होतं. कोणत्याही क्षणी गोरिलांचं प्रथम दर्शन होण्याची शक्यता होती. ‘हे कुटुंब नेहमी त्याच जागेवर वस्ती करून राहतं का?’ या माझ्या प्रश्नाचं एकदम आश्चर्यकारक उत्तर मला मिळालं. गोरिलांना म्हणे रोज रात्री नवं घर हवं असतं. ही मंडळी ‘कशासाठी? पोटासाठी!’ करत करत जंगलभर फिरतात. दिवसभरात साधारण ४० चौ.कि.मी. इतकं अंतर ते अन्नाच्या शोधात तुडवतात. त्यांचं आवडतं अन्न म्हणजे ‘नेटल’ नावाची काटेरी वनस्पती आणि बांबूचे कोवळे कोंब. बांबू खाताना तो हातात धरून, त्याची वरची टणक व कडवट साल दातांच्या साहाय्याने सोलवटून आतला कोवळा कोंबच फक्त ते मटकावतात. असा एकंदर ७० प्रकारच्या वनस्पती आणि मर्कट जातीला शोभेल असं पानं, फुलं, फळं व कंदमुळांचं भक्षण गोरिला करतात. शाकाहारी असूनही क्वचितप्रसंगी आहारातील प्रथिनांची कमी भरून काढण्यासाठी काही प्रकारच्या मुंग्या व वाळवीही ते खातात. गोरिला पाणी पित नाहीत. पर्वताच्या त्या उंचीवर नेहमीच पाणी मिळेल याची शाश्वती नाही. मुळापासून गळून पडलेलं झाडाचं खोड जमिनीवर पडून हळूहळू कुजायला लागतं तेव्हा त्यात पाण्याचा भरपूर अंश साठलेला असतो. ही खोडं चघळून किंवा पाणी साठवणाऱ्या इतर वनस्पती खाऊन त्यांची पाण्याची तहान भागते. दिवसभर तहान-भूक करत पायपीट झाली, की संध्याकाळी बांबूच्या वनातल्या सपाटश्या जागी पालापाचोळ्यांची शय्या बनवून हे कुटुंब निद्राधीन होतं. दुपारच्या वामकुक्षीसाठीही असाच एखादा निवारा मिळाला की लगेच आडवे होतात. संशोधक मंडळींच्या अभ्यासात ही घरकुलं फार महत्त्वाची ठरतात. त्यांचा आकार, संख्या व घराबाहेरील विष्ठेचा अभ्यास करून त्यांच्या वयाचा अंदाज लावला जातो.

उत्साह व उत्सुकतेसह आम्ही पाचच मिनिटं चाललो असू, आम्हाला पहिल्या गोरिलाचं दर्शन झालं. ११-११.३० चा सुमार होता. भरपेट नाश्ता करून स्वारी मस्त लोळत पडली होती. गाइडने परवलीचे शब्द वापरून त्याला जागं केलं. गुरकावत, डोळे किलकिले करून त्याने आमच्याकडे पाहिलं आणि अंग झटकून आमच्यासमोर फतकल मारून बसला. गाइडला गोरिलांच्या आवाजाची भाषा अवगत होती. महाराज कधी रागावलेत, कधी वैतागलेत आणि कधी आनंदात आहेत हे सगळं त्याच्या रेकण्यातून, गुरकावण्यातून आणि गर्जनांमधून प्रदर्शित होतं. अशा प्रकारच्या भावना दर्शवणारे २५ आवाज अभ्यासूंनी शोधून त्यांची नोंद करून ठेवली आहे. जवळून घेतलेलं गोरिलाचं ते प्रथम दर्शन. चकचकीत गोटय़ांसारखे कथ्थ्या रंगाचे ते भावपूर्ण डोळे, फेंदारलेलं वाटावं असं थोडं वर उचललेलं नाक, केसाळ काया, हातापायाचे पंजे अगदी मनुष्यासारखे, नखंही तशीच. हस्तरेखा स्पष्टपणे दिसत होत्या. गोरिलाने जवळची नेटलची कांडी उचलली आणि निर्विकारपणे ती खाऊ  लागला. नेटल ही एक काटेरी वनस्पती आहे. जंगलातून चालताना तिचा स्पर्श जरी झाला तरी मेंदूत झिणझिण्या जातात. विंचवाच्या डंखासारखा दुखरा असा तो स्पर्श असतो. कातडीवर पित्तासारख्या लाल गांध्या येतात, प्रचंड आग होते. त्या आगीला शीतल करणारी दुसरी वनस्पती तिथेच उपलब्ध आहे. तर, अशी ही खतरनाक काटेरी नेटल हातांनी सोलून गोरिला खात असतो. त्याच्या अंगावरील जाड केसाळ कातडीसमोर नेटलच नांगी टाकत असावं!

या गोरिलाचं प्रथम दर्शन झालं, तिथून पुढे बरोबर एक तास आम्ही गोरिलांच्या सान्निध्यात घालवणार होतो. गाइडने आम्हाला गोरिलांची कुटुंबपद्धती समजावून सांगितली. कुटुंबप्रमुख असतो ‘अल्फा सिल्व्हर बॅक’ नर. त्याच्या तीन-चार माद्या व छोटी-मोठी पिल्लं असतात. सिल्व्हर बॅक म्हणजे पाठीवरचे केस रुपेरी झालेला प्रौढ नर. त्याचं वजन असतं तब्बल २००-२५० किलो आणि खुराक असतो ३५ किलोचा! त्यामानाने माद्या २० किलो चारा खाऊन गुजारा करतात. आणि सुरकुत्या पडल्या तरी त्यांचे केस मात्र काळेच राहतात. गोरिलांची वयोमर्यादा असते साधारण ४६ वर्षे. वयाच्या १०-१२ व्या वर्षी या नरांना पाठीवर रुपेरी ‘मिसुरडं’ फुटू लागतं व ते माद्यांकडे आकर्षित होतात. मात्र त्यांनी लक्ष्मणरेषा ओलांडली तर त्यांचा बाप त्यांना कधी छडीचा मार देतो, तर कधी कुटुंबाबाहेर राहण्याची शिक्षा!

एव्हाना चालत चालत आम्ही त्यांच्या ‘हाऊस ऑफ बांबूज्’पाशी येऊन पोहोचलो. बांबूच्या झाडांच्या काडय़ा वाकवून आणि जमिनीवर पाला पसरून त्यावर मजेत पसरलेलं ‘चार्ल्स’ नामक सिल्व्हरबॅकचं ते लेकुरवाळं कुटुंब पाहून आम्ही हरखूनच गेलो. बांबूचे घर, बांबूचे दार, बांबूची जमीन पिवळीशार. चार्ल्सची वामकुक्षी सुरू होती. बांबूतून डोकावणाऱ्या उन्हाच्या तिरपीत त्याची रुपेरी पाठ चमकत होती. घरात एक ओली बाळंतीण होती. दीड महिन्याच्या मुलाचं स्तनपान चालू होतं. दचकून भेदरलेल्या नजरेनं आमच्याकडे पाहत त्याने आईच्या पोटाला घट्ट धरून ठेवलं. त्या माऊलीचा सरावला हात आपसूकच त्याच्या पाठीवर गेला. दीड-दोन वर्षांची दोन पिल्लं तर इतकी गोड, जणू काळ्या लोकरीचे दोन गुंडे! तीन वर्षे वयाच्या दोन कन्यका अगदी गळ्यात गळा घालून झोपल्या होत्या. तीन सवतीही एकमेकींच्या बाजूस शांत पहुडल्या होत्या. लक्ष देऊन न्याहाळू लागल्यावर त्यांच्या मानवसदृश हालचाली, सवयी, लकबी पाहून अचंबित झालो. फतकल मारून बसलेली थोडी मोठी मुलं आपल्यातच मग्न होती. गोरिलांच्या हातापायाला मनुष्यासारखीच पाच बोटं असतात. पायाचा अंगठा इतर बोटांपेक्षा मोठा असतो. दातांची बत्तीशी असते. पुढे सुळे, मागे दाढा. नाकाची ठेवणं ही त्यांच्या व्यक्तिविशेषाची ओळख आहे. प्रत्येक गोरिलाच्या नाकाची ठेवण वेगळी. शास्त्रज्ञ या नाकावरूनच त्यांना ओळखतात. गोरिला हा माणसासारखाच बुद्धिमान, समाजशील, भावनिक गुंतवणूक असलेला आणि पाचही इंद्रिये विकसित असलेला प्राणी आहे.

त्या लोकरीच्या गुंडय़ांच्या बाळलीला पाहताना पुढचा तासभर कसा गेला कळलंच नाही. बांबूच्या एका खांबाभोवती ते खेळत होते. मध्येच सरसर वर चढत, धप्पकन खाली उडी मारत शर्यतच लावली होती जणू. थोडय़ाच वेळात कंटाळून खांब सोडून जमिनीवर आले. एकमेकांच्या अंगावर लोळण घेत, पाठीवर धबधबा मारत, कुस्ती करत, चिडवत, गुदगुल्या करत खेळू लागले. या सगळ्यात आवाज होता, पण कमी होती ती खिदळणाऱ्या हास्याची. विधात्याने फक्त मनुष्यालाच ही हास्याची देणगी का बरं बहाल केली असेल?

प्रसंगी खूप आकांडतांडव करून घाबरवून सोडणारा सिल्व्हरबॅक त्याच्या बच्च्या- कच्च्यांसमोर मात्र फारच मवाळ असतो. आमचा चार्ल्स फक्त एकदाच मुलांवर गुरकावला होता. त्यात ‘येऊ  का रे तिकडे?’ अशी गोड धमकी असावी! लहानपण सरलं की या बछडय़ांचं झाडावर चढणं थांबून जातं. मग ३० टक्के वेळ उदरभरणात, ४० टक्के निद्रादेवीच्या कुशीत आणि उरलेला ३० टक्के मार्गक्रमणात जातो.

कबिल्याला आता जाग आली होती. मगापासून शांत झोपलेल्या त्या बहिणी आता उठल्या. उभं राहून एक छानशी ‘अंगडाई’ देत परत एकमेकींच्या गळ्यात पडल्या. तेवढय़ात तो लोकरीचा गुंडा धावत येऊन आईच्या पाठुंगळी बसला. घरात वर्दळ सुरू झाली तरी ‘बाबा’ काही उठत नव्हते. सिल्व्हरबॅकला पूर्ण आवेशात उभा ठाकलेला पाहायला मिळणार नाही, अशी चुटपुट लागून राहिली असताना मनकवडय़ा चार्ल्सने झोप आवरून एक झकास आळस देत आपलं विराट रूप आम्हास दाखवलं व आमचा तो ‘जादूई तास’ संपला.

मानवाशी साधर्म्य असलेल्या या गोरिलांचा निरोप घेणं खरंच खूप जड गेलं. पर्वतीय गोरिला हे विनाशाच्या पदचिन्हांवर उभे आहेत हे ऐकून तर मन खूपच हळहळलं. रवांडा, युगांडा आणि कांगो या तिन्ही देशांची सरकारं त्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी प्रयत्नशील आहेत ही बाब खरंच प्रशंसनीय. जंगलतोड करणं हे गोरिलांच्या राहत्या घरावर आक्रमणच आहे. त्यांना जिवंत ठेवायचं तर हवं मोकळं, गर्द रान. हे प्राणी काळाच्या पडद्याआड गेले काय न गेले काय, आम्हाला इतक्या लांब त्याचा काय फरक पडतोय, असा प्रश्न कदाचित कुणाच्या मनात उद्भवू शकतो. परंतु आपण सारेच या सृष्टीरूपी माळेचे मणी आहोत. सारे एकत्र गुंफलेले आहोत. ही माळ अभंग राहण्यासाठी त्यातील प्रत्येक मण्याची काळजी घ्यायला हवी.

medhaalkari@gmail.com