News Flash

देशसेवेच्या ‘सोवळ्या’ प्रयोगाची कहाणी

जनसामान्यांच्या मनात मात्र ‘भारत सेवक समाज’ या जुन्या नावानेच ही संस्था आपला आब राखून आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या अनेक सेवाभावी, देशभक्त संस्थांमध्ये ‘भारत सेवक समाज’चे स्थान वैशिष्टय़पूर्ण आहे. नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी १९०५ साली स्थापन केलेली ही संस्था संख्यात्मक अंगाने विचार केला तर कधीच खूप मोठी झाली नाही आणि तरीही ती दखलपात्र ठरली. कारण तिच्या सदस्यांनी केलेल्या कार्याची गुणवत्ता. स्वातंत्र्योत्तर काळात सरकारने याच नावाची दुसरी संस्था पुरस्कृत केल्यामुळे संस्थेने आपले नाव बदलले आणि ‘हिंद सेवक समाज’ असे नवे नाव सरकार दरबारी नोंदवले. जनसामान्यांच्या मनात मात्र ‘भारत सेवक समाज’ या जुन्या नावानेच ही संस्था आपला आब राखून आहे. अशा या संस्थेचा, तिच्या देशभक्त संस्थापकांचा, त्यांच्या कडव्या ध्येयवादाचा प्रेरक परिचय करून देणारे नरेन्द्र चपळगावकर लिखित ‘नामदार गोखल्यांचा भारत सेवक समाज’ हे पुस्तक छोटेखानी असले तरी आशयाच्या दृष्टीने समृद्ध आहे.

विसाव्या शतकाच्या प्रारंभी गोपाळ कृष्ण गोखले यांनी आपल्या काही जीवनव्रती मित्रांच्या सहकार्याने ‘भा. से. समाज’ची स्थापना केली. तथापि, त्यापूर्वीचे त्यांचे जीवनही नेमस्त देशकारणाला वाहिलेलेच होते आणि त्या देशकारणाला इंग्रजी अमदानीच्या प्रारंभापासून महाराष्ट्रात घडलेल्या बहुविध विचारमंथनाची व्यापक पाश्र्वभूमी होती. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकांच्या संधिकाळात गोखले पुण्याच्या फग्र्युसन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करू लागले. त्यापूर्वी सुमारे दहा वर्षे ते टिळक- आगरकर- चिपळूणकर प्रभृतींनी स्थापन केलेल्या ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’च्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकवत होते. सोसायटीचे आजीव सदस्यही झाले होते. अवघ्या पस्तीस रुपयांच्या मासिक वेतनावर ती सेवा पार पाडताना सर्व संबंधितांची आर्थिक कुचंबणा होई. त्या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी टिळक- आगरकरांप्रमाणेच गोखल्यांनीही विद्यार्थ्यांना उपयुक्त असे गणिताचे एक पुस्तक लिहिले होते. त्यात वापरलेली सोपी, साधी इंग्रजी भाषा व देशी उदाहरणे यांमुळे ते पुस्तक विलक्षण लोकप्रिय झाले. पुढे तर इंग्लंडमधील मॅक्मिलन कंपनीनेही ते प्रकाशित केले. त्याच्या अनेक आवृत्त्याही निघाल्या.

चपळगावकरांनी गोखल्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील हा रंजक तपशील जसा आपल्या विवेचनात समाविष्ट केला आहे तसाच संस्था स्थापनेच्या संदर्भातील एक गमतीशीर साहित्यिक तपशीलही अंदाजाच्या स्वरूपात नोंदवला आहे. सुप्रसिद्ध कादंबरीकार हरि नारायण आपटे हे गोखल्यांचे निकटवर्ती मित्र होते. त्यांच्या ‘मी’ या कादंबरीतील शिवरामपंत आणि भावानंद ही पात्रे अनुक्रमे न्या. महादेव गोविंद रानडे आणि गोपाळ कृष्ण गोखले या गुरु-शिष्यांवरून सुचली असावीत, असा अंदाज चपळगावकरांनी व्यक्त केला आहे. देशसेवेचे व्रत घेणारे नि:स्वार्थी कार्यकर्ते आपल्या मठात घडवावेत, अशी संन्यस्त भावानंदाची योजना असते; शिवरामपंत हे त्याचे मार्गदर्शक असतात. भावानंदाची ‘ती’ कादंबरीतील योजना आणि गोखल्यांची ‘समाज’ स्थापनेमागची कल्पना यांतील साम्य लक्षात आणून देऊन चपळगावकरांनी आपल्या विवेचनाला एक वेगळीच मिती प्राप्त करून दिली आहे.

या छोटेखानी पुस्तकात एकूण अकरा प्रकरणे असली, तरी ढोबळ मानाने त्याची तीन भागांत रचना केल्याचे जाणवते. पहिल्या तीन प्रकरणांमध्ये प्रामुख्याने नामदार गोखले यांच्या आयुष्यातील विविध घटनांना प्राधान्य देण्यात आले आहे. पाच ते नऊ ही प्रकरणे भारत सेवक समाजाच्या पाच आधारस्तंभ- गोपाळ कृष्ण देवधर, नारायण मल्हार जोशी, श्रीनिवास शास्त्री, ठक्करबाप्पा आणि हृदयनाथ कुंझरू- यांचे कार्यवृत्तान्त सांगणारी आहेत. तर चौथ्या  प्रकरणात संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला असून दहाव्या प्रकरणात ‘गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थे’च्या एकूणच ‘काटकसरी’ कारभारावर आणि महत्त्वाच्या संशोधन प्रकल्पांवर धावते भाष्य केले आहे. अकरावे छोटेसे प्रकरण समारोपाचे असून, त्यात काही आव्हानात्मक प्रश्नांचे सूतोवाच केले आहे.

अशी ढोबळ मांडणी असणाऱ्या पुस्तकात महत्त्वाचे तपशील चपळगावकरांनी अशा रीतीने विखरून ठेवले आहेत, की संपूर्ण पुस्तकालाच एका ऐतिहासिक दस्तऐवजाचे वजन प्राप्त व्हावे. मग ती गांधीजींनी आत्मचरित्रात नमूद केलेली गोखल्यांच्या वापरात असलेल्या उपरण्याबद्दलची आठवण असो (ते उपरणे न्या. रानडय़ांनी गोखल्यांना भेट म्हणून दिले होते. गोखले खास प्रसंगीच ते उपरणे वापरीत. दक्षिण आफ्रिकेत गोखले गेले असताना त्यांच्या खांद्यावरचे ते उपरणे चुरगळलेले पाहून गांधींनी त्याला इस्त्री करून दिली होती..) किंवा भारत सेवक समाजाच्या घटनेबद्दलचा आणि स्थापनेच्या वेळी प्रारंभीच्या सभासदांनी घेतलेल्या देशसेवेच्या ‘सोवळ्या’ शपथेचा तपशील असो, आज कालबाह्य़ वा विसंगत वाटतील अशा ‘क्षुल्लक’ गोष्टींप्रमाणेच केव्हाही देशभक्तांना प्रेरणादायी ठरतील. अशा ‘मौलिक’ गोष्टीही संदर्भासहित पुस्तकाच्या पानोपानी वाचायला मिळतात. ज्या संस्थेने खुद्द महात्मा गांधींना सभासद करून घ्यायला नकार दिला, त्या या सेवाभावी संस्थेचा ‘शिस्तबद्ध’ कारभार किती पराकोटीचा विक्षिप्त होता, हे समजल्यावर मात्र वाचकांच्या मनात उभ्या राहणाऱ्या प्रश्नाचे उत्तरही मिळते. सदस्य संख्या वाढवण्यावर घातलेली अनाकलनीय मर्यादा आणि जेमतेम ३०-३५ रुपयांच्या विद्यावेतनावर सदस्याने ‘समाज’चे कार्य करण्याबद्दलची अपेक्षा अशा हट्टाग्रहांमुळेच स्वातंत्र्यपूर्व काळात ही संस्था म्हणावी तशी फोफावू शकली नसणार, हे ऐतिहासिक वास्तव स्पष्ट होते.

गांधीजींची श्रीनिवास शास्त्री प्रभृती भारत सेवक समाजाच्या सदस्यांशी जी खडाजंगी चर्चा झाली, तिचा तपशील वाचत असताना सुमारे पन्नास वर्षांपूर्वी अन्यत्र प्रकाशित एका लेखाची काही अभ्यासकांना आठवण होऊ शकते. ‘‘समाजाचे सेवक ३० रुपये विद्यावेतन घेऊ कसे शकतात?’’ असा गांधीजींचा प्रश्न होता आणि ‘‘नामदार गोखल्यांच्या आदेशवजा सल्ल्यानुसार आपण देशभर फिरून परिस्थिती न्याहाळली, तेव्हा सर्वसामान्य भारतीय माणसाचे- विशेषत: शेतकऱ्याचे- सरासरी उत्पन्न अवघे दोन रुपये असल्याचे आपल्याला आढळले. ‘भारत सेवक’ म्हणवून घ्यायचे असेल त्याने केवळ तेवढय़ा रकमेवरच समाधान मानले पाहिजे,’’ असे त्यांचे पुढचे ठाम प्रतिपादन होते. (‘भवन्स जर्नल’च्या ३ नोव्हेंबर १९६८ च्या अंकात प्रसिद्ध झालेला ‘गांधी- नॉट ए सर्व्हट ऑफ इंडिया’ हा आर. आर. दिवाकर यांचा लेख. पृष्ठ २७-२८)

गांधीजींच्या या टोकाच्या भूमिकेशी आधीपासून सदस्य झालेले सेवक सहमत होऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी गांधीजींना सभासद करून घेण्यास फारशी अनुकूलता दर्शवली नाही. महात्माजींनीही तो मुद्दा ताणून न धरता आपला सदस्यत्वाचा अर्जच मागे घेतला. ‘तसे करून आपण समाजाचे खरे सभासद झालो’ हे गांधीजींचे वाक्य लेखकाने उद्धृत केले आहे खरे; परंतु गांधीजी पुढे काँग्रेसचे सर्वेसर्वा झाल्यानंतर ते दरमहा केवळ २ रुपयांतच आपला वैयक्तिक खर्च भागवत होते का, या प्रश्नाचे स्वाभाविकपणे मिळणारे नकारार्थी उत्तर ‘भारत सेवक समाज’च्या एकूणच कार्यप्रक्रियेबाबत भले मोठे प्रश्नचिन्ह उभे करते, हेही तितकेच खरे!

चपळगावकरांच्या या पुस्तकाचा सर्वाधिक वैशिष्टय़पूर्ण भाग म्हणजे या संस्थेच्या कार्यात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या आणि तरीही फारशा प्रकाशझोतात न आलेल्या पाच सभासदांचा काहीशा विस्ताराने करून दिलेला परिचय. ‘समाज’च्या संघटनात्मक कामाची जबाबदारी गोखल्यांच्या मृत्यूनंतर सुमारे वीस वर्षे निष्ठेने आणि जिद्दीने पार पाडणारे गोपाळ कृष्ण देवधर.. ‘ज्ञानप्रकाश’मधील जाहिरात पाहून ‘समाज’च्या सेवेत तरुणपणी रुजू झालेले आणि कामगार क्षेत्रात भरीव कार्य करीत करीत आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताचे प्रतिनिधित्व करण्यापर्यंत मजल मारणारे नारायण मल्हार जोशी.. नामदार गोखल्यांच्या मृत्यूनंतर ‘समाज’चे अध्यक्ष म्हणून इतर सभासदांकडून एकमताने निवडले गेलेले आणि राजकीय/ राजनैतिक क्षेत्रात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरांवर भारताचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ नेते श्रीनिवास शास्त्री.. पददलितांच्या सर्वागीण उद्धारासाठी उभी हयात वेचणारे आणि गांधीजींच्या सत्याग्रहात ‘समाज’च्या र्निबधांमुळे भाग घेता न आल्यामुळे दारू दुकानासमोर पिकेटिंग करून तुरुंगात जाण्यात धन्यता मानणारे अमृतलाल ठक्कर उर्फ ठक्करबाप्पा.. नामदार गोखल्यांप्रमाणेच स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातही संसदीय क्षेत्रात विशेष लक्षणीय कर्तबगारी गाजवणारे हृदयनाथ कुंझरू – ‘भारत सेवक समाज’च्या या पाच समर्पित सदस्यांची प्रत्येकी दहा-बारा पृष्ठांमध्ये ओळख करून देण्याचे काम चपळगावकरांनी अत्यंत प्रभावीपणाने पार पाडले आहे. प्रत्येकाच्या आयुष्याचा वेध घेता घेता महत्त्वाच्या वाटावळणांचा उल्लेख करीत त्यांच्या कर्तृत्वाचाही आलेख रेखाटायचा, हे शब्दमर्यादा पाळून करायचे आणि एरवी अज्ञात राहिलेल्या वा अपुऱ्या प्रकाशझोतात आलेल्या त्या न्यायमूर्तीना न्यायही द्यायचा, हे सोपे काम नाही; तथापि असंख्य नेत्यांची वा कार्यकर्त्यांची व्यक्तिचित्रे रेखाटण्यात निपुण झालेली चपळगावकरांची लेखणी अगदी सहजपणे हे काम करू शकली आहे.

पुस्तक मौज प्रकाशनाचे असूनही वारंवार आढळणारे मुद्रणदोष आणि ‘समाज’चे अध्यक्ष दामोदर साहू यांच्या मनोगताप्रमाणेच लेखकाच्या निवेदनातही गोखल्यांच्या स्मृतिशताब्दीचा जन्मशताब्दी असा चुकीचा उल्लेख यांसारख्या काही बाबी जाणकार वाचकाला खटकतात, हे खरे; परंतु एका महान प्रयोगाचा ऐतिहासिक आढावा आपल्यासमोर येतो आणि मनात आदरभाव दाटून येत असतानाच अस्तित्ववाचक प्रश्नही उभे राहतात, हे निश्चित!

नामदार गोखल्यांचा भारत सेवक समाज

  • नरेंद्र चपळगावकर
  • मौज प्रकाशन,
  • पृष्ठे- १४२, मूल्य- २२५ रुपये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2018 5:24 am

Web Title: namaskar gokhalyanch bharat samaj sevak book by narendra chapalgaonkar
Next Stories
1 रहस्यमय स्त्रीप्रधान कथा
2 युद्धकैद्याचे युद्धानुभव
3 उदारहृदयी पुरातत्त्वज्ञ!
Just Now!
X