ज्येष्ठ पत्रकार अनंतराव भालेराव यांच्या ‘कावड’ लेखसंग्रहातील जातीपाती आणि धर्माभिनिवेश यांचा रसाळ ऊहापोह करणारा लेख..

किर्र रात्री वाळवंटातून जात असता आपल्या हातातील सुई अगर टाचणी हरवावी, लगेच विजेचा गडगडाट व्हावा आणि विजेचा प्रकाश नेमका हरवलेल्या त्या सुईवर अगर टाचणीवर पडून ती सापडावी.  आपल्या आयुष्यातील अनेक छोटे छोटे अनुभव, सामान्य घटना एखाद्या सुईइतक्याच किरकोळ असतात. एरवी त्यांना काही महत्त्व नसते. परंतु आपल्या आयुष्यावर त्यांचाही परिणाम झालेला असतो. अशीच एखादी छोटी घटना अवचित आठवते तेव्हा वाळवंटात हरवलेली सुई सापडल्याचा आनंद होतो.

हल्ली धर्माच्या नावावर आणि खोमेनींच्या कृपेने जगभर ज्या गोष्टी चालल्या आहेत त्या बघून अशाच काही जुन्या गोष्टी स्मृतिरूपाने डोळ्यांसमोर तरळू लागतात. सुमारे पन्नास-पंचावन्न वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. संस्थानात तेव्हा धर्मातराची एक लाट येऊन गेली. धर्मातराची ही मोहीम मुस्लीम आणि ख्रिश्चन अशा दोन्ही धर्मानी उभारली होती. तिचा मारा मात्र एकटय़ा हिंदुधर्मीयांना सहन करावा लागत असे.

एके दिवशी आमच्या वर्गात (सहाव्या/ सातव्या) मुख्याध्यापक आले. त्यांच्याबरोबर आमच्याच वर्गातला एक मुलगा आणि मुलाचा बाप होता. मुख्याध्यापकांनी वर्गात येऊन सांगितले की, इत:पर या मुलाला आम्ही सगळ्यांनी ‘लुकस’ म्हणून हाक मारावी. त्याच्या जुन्या नावाने बोलावू नये. असे याआधी कधीच झाले नव्हते. कशामुळे मुलगा आपले नाव बदलीत आहे हे आम्हा मुलांना काही समजले नाही. शाळा सुटल्यावर त्या मुलाला गाठले आणि त्याला विचारले तेव्हा तो म्हणाला की, माझ्या सर्व घराने धर्मातर केले आहे. मी आता किरिस्ताव झालो आहे. (तेव्हा ‘ख्रिश्चन’ या शब्दाचा उच्चार ‘किरिस्ताव’ असाच करीत असत.) मुलाने त्याच्या परीने खुलासा केला. परंतु नेमके काय झाले? धर्मातर झाले म्हणजे काय झाले? हे आम्हा मुलांच्या लक्षात आले नाही. शाळेत मास्तर मंडळींत आणि गावात थोडी खळबळ उडाली असावी.

काही दिवसांनंतर गावातील बरीच हिंदू मंडळी धर्मातर करून मुसलमान झाली. गावात त्यामुळे गडबड माजली आणि ती हलक्याशा प्रमाणात आमच्यापर्यंत येऊन पोचली. मुसलमान झालेल्यांपैकी एक वीस-बावीस वर्षांचा तरुण आमच्या शाळेत चपराशी म्हणून आला. त्याचा रुबाब कोणाच्याही डोळ्यांत भरण्यासारखा होता. मुसलमानी पद्धतीचा पायजमा, वर दहा-पाच गुंडय़ांची जोरदार शेरवानी, डोईवर तेव्हा रूढ असलेली फुन्नेदार रूमी टोपी. असा हा चपराशी आला आणि शाळेतले आणि गावातले वातावरण हळूहळू बदलू लागले. खरे म्हटले तर या दोन्ही धर्मातरांमुळे प्रत्यक्षात काय झाले होते आणि कोणाचे काय नुकसान झाले होते, हे आमच्यापैकी कोणालाच उमजू शकलेले नव्हते. गावात काही ठिकाणी गुप्त बैठकी झाल्या. दोन-चार प्रतिष्ठित मंडळींची आलटूनपालटून भाषणे झाली. बहुधा प्रत्येक वक्त्याने आपल्या भाषणातून भगवद्गीतेतील ‘स्वधर्मे निधनं श्रेय: परधर्मो भयावह:’ या श्लोकार्धाचा वारंवार उच्चार केला. त्यावरून आमच्या मनावर ठसले ते एवढेच, की काही झाले तरी आपला धर्म चांगला आणि इतरांचा धर्म वाईट. काही मंडळी त्यावेळी जवळच्या आर्य समाजाकडे आणि मसुराश्रमाच्या मसूरकर महाराजांकडे गेली. धर्मातर केलेल्यांपैकी काही परत हिंदू धर्मात आल्याचे गावात लोक सांगू लागले. धर्मातर केलेल्या लोकांत गरीब लोकांचाच भरणा होता. ते पिढय़ान् पिढय़ा दारिद्रय़ाच्या रौरव नरकात खितपत पडून होते, हे आजवर कोणाच्याच लक्षात आले नव्हते. शिवाय या लोकांना बरोबरीच्या नात्याने कोणीच वागवीत नसे. जातिप्रथा आणि अस्पृश्यता यामुळे या

लोकांना कसलेच अधिकार नव्हते. त्यांना कुठलेच स्थान नव्हते. धर्मातराच्या लाटेने हिंदू धर्माच्या तुडुंब भरलेल्या सागरावर थोडेबहुत तरंग उठले, इतकेच.

मग एक दिवस शाळेतील हिंदू मुलांनी हरताळ केला. म्हणजे असे की, आषाढी (किंवा कार्तिकी) एकादशीला मुख्याध्यापकांनी सुट्टी न दिल्यामुळे आम्ही मुले शाळेत न येता नजीकच असलेल्या गंगथडीच्या गावी गेलो. आमच्याबरोबर काही हिंदू शिक्षकही होते. वस्तुत: त्यांनीच आम्हाला शाळेवर बहिष्कार टाकण्याची फूस दिली होती. दुसऱ्या दिवशी शाळेत बराच धुमाकूळ झाला. संबंधित मास्तरांची नावे आम्ही कोणी सांगितली नव्हती, परंतु हेडमास्तरांना त्यांचा संशय पूर्वीपासूनच होता. त्यांनी वर लिहून या मास्तरांची दूरवर बदली केली. वस्तुत: धर्माविषयीच्या अभिनिवेशापेक्षा आमच्या या शिक्षकांनी आम्हा मुलांच्या मनात प्रथमत: देशभक्तीची भावनाच निर्माण केली होती. उन्हाळ्याच्या सुटय़ा लागल्यावर आम्ही आपापल्या गावी जात असू.

उन्हाळ्याच्या एका सुट्टीमध्ये एक छोटीशी, परंतु विचित्र घटना घडून आली. गावचा आठवडी बाजार भरत असे. आम्ही काही मुले सहज चक्कर टाकावी आणि बाजार कसा काय भरलाय हे बघावे म्हणून बाजारात गेलो. बाजाराच्या एका टोकाला एका झाडाच्या सावलीत तिन्हीकडून मोकळे असणारे एक पाल टाकलेले होते. पांढरा सूट आणि त्यावर ख्रिस्ती पाद्री मंडळी घालतात तसा पांढरा गाऊन घातलेला एक माणूस गळ्यात पेटी (हार्मोनियमला त्याकाळी बाजाची अगर वाजवायची पेटी म्हणत असत.) अडकवून काही गाणी म्हणत होता. भोवती पाच-पंचवीस लोक जमून ऐकत होते. गाणे संपले की हा माणूस भाषण केल्यासारखे  काही बोलत असे. सगळे झाल्यावर या माणसाने जमलेल्या लोकांना मराठीत छापलेली पुस्तके आणि काही पत्रके वाटली. बालसुलभ वृत्तीने आम्हीही रेटारेटी करून ती पुस्तके आणि पत्रके हस्तगत केली. घरी येऊन पुस्तके चाळली तेव्हा लक्षात आले की, ती पुस्तके ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणारी आणि हिंदू धर्मावर टीका करणारी होती. घरच्या पालकांनी ती पुस्तके घरात कशाला आणली म्हणून खडसावले आणि ती बाहेर फेकून देण्यास भाग पाडले.

दुसऱ्या आठवडी बाजाराच्या दिवशी मोठी गंमत झाली. आम्ही सर्व मुले नेहमीपेक्षा जास्त घोळका जमवून त्या प्रचारकाच्या जागेकडे गेलो. ठरल्या क्रमाने गाणी आणि भाषण वगैरे झाले. तो प्रचारक पुस्तके वाटू लागला. आम्ही मुलांनी पुस्तके तर घेतली, परंतु ती तेथेच हवेत उधळून दिली आणि ‘पुंडलिक वरदा हाऽऽरी विठ्ठल.. श्री ज्ञानदेव तुकाराम’ असे जयघोष लगावण्याचा सपाटा चालू केला. तो प्रचारक तसाच तेथे बसून राहिला. नंतर त्याने आम्हाला विचारले की, ‘लेकरांनो, तुमचे काम आटोपले का? मी आता माझ्या सामानाची आवराआवर करू का?’ आम्ही नंतर एकेक करून तेथून निघालो. उन्हाळ्याची सुट्टी संपेपर्यंत आमचा हा कार्यक्रम बिनबोभाट चालू होता.

सुटय़ा संपल्यावर आम्ही परत अभ्यासाला लागलो. शाळेच्या गावी गेलो. नंतर चार-पाच वर्षे अशीच निघून गेली. झालेला सर्व प्रकार आमच्या स्मरणातून सपशेल निघून गेला होता. एके दिवशी गावी आलो असता सहज चौकशी केली की, तो पाद्री गावात आहे काय? आणि तो आठवडी बाजारात पूर्वीसारखा प्रचार करीत असतो काय? तेव्हा असे समजले की, या पाद्रय़ाचे नाव केवळ गावातच नव्हे, तर सर्व टापूत पसरले असून तो आता खेडोपाडीही जात असतो. मात्र तो ख्रिस्ती धर्माचा प्रचार करतो असे कोणी मानीत नाही. झाले असे की, आम्ही मुलांनी त्या प्रचारकाची रेवडी उडविण्याकरिता जी शक्कल काढली होती ती पुढे- म्हणजे आजतागायत चालू आहे. प्रचारकाचे ‘लोखंडे मास्तर’ हे नाव आता सर्वपरिचित झाले आहे. प्रचाराचे काम संपले की लोखंडे मास्तरच जमलेल्या समुदायाला ‘आज ‘पुंडलिक वरदा’ नाही का?’ म्हणून विचारी. कोणी तयार नसेल तर तो स्वत:च तसा जयघोष करीत असे. लोखंडे मास्तरच्या या वर्तनाचा परिणाम असा झाला की त्याच्याविषयी सहानुभूती निर्माण झाली आणि लोखंडे मास्तर ‘पुंडलिक वरदा’ म्हणू लागला तर जमणारे लोक ‘येशू भगवान की जय’ म्हणू लागले.  दोघांच्या मनातून उभय धर्माविषयीचे अभिनिवेश नाहीसे झाले. अहंकार आणि द्वेष यांची जागा प्रेमादराने घेतली. परिणामी लोखंडे मास्तरांनी आता हिंदू धर्मावर टीका करणारी पुस्तके वाटण्याचे बंद केले. सर्वसाधारण वारकऱ्याच्या निरूपणाप्रमाणे ते आपले प्रचारकार्य करू लागले. गावचा आणि टापूचा तो जिवाभावाचा मित्र झाला.

लोखंडे मास्तरांचे हे प्रकरण ऐकून मला मोठे आश्चर्य वाटले. तेव्हा मला गांधीजींच्या प्रार्थनासभेत घडलेली अशीच घटना माहीत नव्हती. खूप उशिरा ती मी ऐकली आणि लोखंडे मास्तरांविषयीचा माझ्या मनातील आदर आपोआपच वाढला. गांधीजी १९४७-४८ साली दिल्लीत येऊन राहिले होते. त्यांची हत्या होण्याच्या काही दिवस आधी त्यांच्या प्रार्थनेच्या सभेत एका हिंदू तरुणाने कुराणातील आयत म्हणण्याला आक्षेप घेतला. गांधीजींनी त्यापुढची प्रार्थनाच बंद केली. पुढे दररोज ते या आयतीपर्यंत येत व मग विचारीत, ‘‘कोणाचा आक्षेप आहे काय?’’ तो तरुण उठून उभा राही. असे बरेच दिवस चालले. शेवटी तो तरुणच थकला आणि हरला. तो म्हणाला, ‘माझा आक्षेप आता उरला नाही. तुम्ही नेहमीसारखी संपूर्ण प्रार्थना म्हणा.’ लोखंडे मास्तरांना गांधीजींचे नाव तेव्हा माहीत होते का नाही कोण जाणे? ते स्वत: गांधीवादी वगैरे तर अजिबातच नव्हते. धर्माविषयी त्यांना फारसे काही कळत होते अशातलाही भाग नव्हता. त्यांना जेमतेम लिहिता-वाचता येत असे. परंतु लोखंडे मास्तरांना मोठय़ा माणसाचे विशाल आणि उदार मन लाभले होते. त्यांचा धर्म माणसाची कदर करणारा होता. म्हणूनच ते ख्रिस्ती असतानाच हिंदू, मुस्लीम, बौद्ध असे सर्वच धर्माचे होते. आणि म्हटले तर कोणत्याच धर्माचे नव्हते. लोखंडे मास्तर गावाच्या एका टोकाला जुन्या महारवाडय़ाच्या शेजारी राहत असत. त्यांचे घर म्हणजे एक छोटेसे झोपडेच. झोपडीपेक्षा पडवी ऐसपैस. अंगण खूप मोठे. शेणाने स्वच्छ सारवलेले. कडेने काही फुलझाडे लावलेली. मधोमध स्वत:च बांधलेले एक तुळशी वृंदावन. त्याच्या चारही बाजूला ज्ञानेश्वर-तुकारामादी चार संतांच्या तसबिरी. वरच्या बाजूला क्रुसावरचा भगवान येशू आणि त्याच्या शेजारी माता मेरी यांच्या दोन तसबिरी. दिवसभर फिरून लोखंडे मास्तर घरी येत. सायंकाळी भजनासाठी मंडळी जमत. दिवसभर घरात कोणी ना कोणी येऊन थांबलेले असायचे. लोखंडे मास्तरांचे झोपडे सर्वासाठी सदैव खुले असे. कोणीही यावे आणि गरजेप्रमाणे थांबून निघून जावे. यात सर्व जातिधर्माच्या गरीब लोकांचाच भरणा असे. रात्रीच्या भजनाचा एकूण साज प्रामुख्याने वारकरी संप्रदायाचा असे. मात्र त्याला थोडीशी जोड हार्मोनियमची, कबीरपंथी भजनाची, मीराबाईच्या पदांची. लोखंडे मास्तर म्हणत, ‘मला ज्ञानेश्वर, तुकारामांत येशू ख्रिस्तच दिसतो. या सर्व सत्पुरुषांत मला काही भेदच आढळत नाही. कारण या सर्व संतांचा लोकांनी सारखाच छळ केला. त्यांची दु:खे सारखीच होती.’

हा त्यांचा केवळ दिखाऊपणा नव्हता, तर जसजसे ते व्यापक बनत गेले तसतसे ते गावातल्या आणि टापूतल्या सर्व धार्मिक उत्सवांत, सणासुदीच्या समारंभांत सामील होऊ लागले. एवढेच नव्हे तर पुढे चालून गावातल्या एकूण एक सार्वजनिक समारंभांत लोखंडे मास्तरांची हजेरी अनिवार्य ठरू लागली.

मास्तरांचा शेवट केव्हा झाला ते समजले नाही. परंतु गावातले मित्र सांगतात की, अशी प्रेतयात्रा आणि इतका शोकविव्हल समाज आजवर कोणी बघितला नाही. मास्तर तसे अचानक गेले. एके दिवशी असेच कुठून तरी फिरून आले. सूट काढून दोरीवर टाकला. नेहमीचा पेहराव म्हणजे धोतर आणि कोपरी घातली आणि अंगणात थोडे आडवे झाले. संध्याकाळ झाली.  भजनासाठी मंडळी जमली. भजन सुरू झाले. मास्तरांनी आज पेटी मोठय़ा तन्मयतेने वाजवली. भजन संपल्यावर ते थोडे विसावले. अंग थोडे कसकसत होते. मंडळी म्हणाली, ‘मास्तर आज तुमच्या अंगात कोण संचारले होते? येशू का आणखी कोणी? काय पेटी वाजवली!’ मास्तर म्हणाले, ‘खरे आहे, गडय़ांनो! आज मला येशूला क्रुसावर ठोकले तो प्रसंगच आठवत होता. येशू असा हात लांब केलेला. त्याची मान थोडी कललेली. सर्वत्र निरव शांतता. फक्त आवाज  खिळे ठोकण्याचा. जणू मृत्यूची जागलच. मधूनच येशूची घनगंभीर हाळी घुमायची. थांबा- मी टेकडीच्या खाली उतरत आहे. प्रभूचा पुत्र गेला नाही. तो तुमच्यातच आहे. मानवाने निर्माण केलेले मंदिर तीन दिवसांत जमीनदोस्त होणार आहे आणि तेथे प्रभूने तयार केलेले अविनाशी मंदिर उभे राहणार आहे!’ मास्तर सांगू लागले, ‘येशू दृष्टीसमोरून गेला की तुकोबा दिसायचे. त्यांची गाथा इंद्रायणीतून बाहेर येत आहे. तुकोबा सदेह वैकुंठाला निघाले आहेत. जनसागर हेलावला आहे. तुकोबा अंतर्धान पावतात- न पावतात तोच ज्ञानोबा समाधिस्थ होत असताना दिसतात. कधी नेवाशाच्या गरुडखांबाला टेकून बसले आहेत आणि सच्चिदानंद बाबा ज्ञानेश्वरी लिहून घेत आहेत. तर कधी आळंदीला समाधीत उतरत आहेत.’ मास्तरांच्या तोंडून हे सर्व ज्यांनी ऐकले ते उमजले की, मृत्यूच समीप आला आहे. कोणी म्हणाले, त्यांना भ्रम झाला आहे. गावात तेव्हा डॉक्टर नव्हता. वैद्य वगैरे होते. त्यांना बोलवावे, असा विचार जमलेले लोक करू लागले- न लागले तोच मास्तर म्हणाले, ‘गडय़ांनो, घाबरू नका. मी ठीक आहे. नेहमी करतो तसेच हे निरूपण होते. ते संपले. कोणी ‘पुंडलिक वरदा’ म्हणणार आहे का?’ घोषणा झाली. मास्तरांनी ‘ज्ञानदेव.. तुकाराम’ म्हटले आणि समुदायाने भगवान येशूचा जयजयकार केला. त्याच क्षणी मास्तरांची जीवनज्योत मालवली.

लोखंडे मास्तर कोण होते? ते ख्रिश्चन तरी खरोखरीच होते काय? कुठले राहणारे? त्यांचे कोणी सगेसोयरे, मुलेबाळे, नाव-गाव? लोखंडे मास्तर हे नाव तरी खरे कशावरून? एवढे खरे, की कसलाच तपशील माहीत नसलेला हा माणूस कोण होता, हे लोकांना कळले नसले तरी तो कसा होता, हे त्यांना पूर्णपणे समजले होते. भूमितीत दोन बिंदूंना मिळवणाऱ्या सरळ रेषेची व्याख्या करण्यात आली आहे. सरळ रेषेला रुंदी नसते. फक्त लांबी असते. मास्तर सरळ रेषेत जगले आणि सरळ रेषेतच गेले. धर्माचे अभिनिवेश आणि धर्मश्रद्धांचे अहंकार त्यांच्या धर्माला दूषित करू शकले नाहीत. म्हणून मास्तर तुकोबाप्रमाणेच आकाशाएवढे होते.

(११ मार्च १९८९ रोजीचा हा लेख ‘कावड’ या अनंत भालेराव यांच्या ऋतु प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकातून साभार.)

अनंतराव भालेराव आणि हमीद दलवाई