ज्येष्ठ नाटय़समीक्षक कमलाकर नाडकर्णी लिखित नाटकी नाटकंहे मराठी रंगभूमीचा धांडोळा घेणारे पुस्तक मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. या पुस्तकाला नाटककार रत्नाकर मतकरी यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतील संपादित अंश..

बहुरंगी, बहुढंगी अशा अत्यंत श्रीमंत मराठी रंगभूमीची बहुविध उपांगे या पुस्तकात मांडलेली आहेत. जुन्या- म्हणजे अगदी विष्णुदास भावे यांच्या नाटकांपासून ते ‘संशयकल्लोळ’पर्यंतची जुनी रंगभूमी आणि राज्य नाटय़स्पर्धामधील नाटके हे या पुस्तकाचे दोन प्रमुख भाग. असे असले तरी काही लेखांद्वारे का होईना, पण महाविद्यालयीन रंगभूमी, बालरंगभूमी, कामगार रंगभूमी आणि थोडी ‘एन. सी. पी. ए’ टाईप रंगभूमी यांची ओळख करून द्यायलाही कमलाकर नाडकर्णी विसरलेले नाहीत. मात्र, या पुस्तकाचे मराठी रंगभूमीला विशेष योगदान ठरावे ते त्यामधील ‘राज्य नाटय़स्पध्रेची रंगभूमी’ या विभागामुळे! हा लेखविभाग सर्वात दीर्घ आणि भरगच्च आहे. त्यातील तपशील दस्तावेज म्हणून इतका महत्त्वाचा आहे, की तसा तो खुद्द शासनाच्या दप्तरीही नसेल. (स्पध्रेच्या सुवर्ण- महोत्सवानिमित्त शासनाने प्रकाशित केलेल्या स्मरणिकेत काही प्रमाणात तो होता.) याचे कारण नाडकर्णी केवळ तपशील देऊन थांबत नाहीत, तर राज्य नाटय़स्पध्रेचा एकूण माहोल वाचकाला जाणवून देण्याचा प्रयत्न करतात. स्पर्धक म्हणून, निर्माते म्हणून, लेखक म्हणून, दिग्दर्शक म्हणून आणि या सगळ्यांपलीकडे जाऊन अत्यंत रसिक प्रेक्षक म्हणून नाडकर्णी स्पध्रेतील नाटकांविषयी भरभरून बोलतात. सातत्याने चाळीसेक वष्रे स्पध्रेचा मनापासून आनंद घेत एकेका नाटकाचे उत्साहाने स्वागत करणारा, प्रतिवर्षी नवीन काय येते याबद्दल सप्रेम कुतूहल असणारा असा दुसरा समीक्षक स्पध्रेला लाभला नसेल.

आणि ही नाटके तरी अशी जबरदस्त! आता विचार केला तर रंगभूमीवर हे असे अद्भुत पर्व कसे होऊन गेले याचे आश्चर्य वाटते. राज्य नाटय़स्पध्रेतील जवळजवळ सर्व महत्त्वाची नाटके मी पाहिली आहेत. तरी या पुस्तकात त्यांच्याविषयी एकत्रितपणे वाचताना- एका मोठय़ा कालखंडात गावोगावचे लोक इरेला पेटून नवनवे विषय (यात ‘ऑथेल्लो’पासून ‘धग’पर्यंतच्या साहित्यकृतीही आल्या.) हाताळून, अनेक आव्हाने पत्करून, वेगवेगळे प्रयोग करून (यात सूचक नेपथ्यापासून ते रंगमंचावर मोठमोठी वास्तववादी नेपथ्यं उभारणेही आले.), ४०-५० नटांच्या सामुदायिक हालचालींपासून ते एकांडय़ा अभिनयश्रेष्ठाच्या स्वगतापर्यंत सारे काही आपल्या कवेत घेऊन अनेक अनवट शैलीची नाटके (वेगवेगळ्या बोलीभाषा, अपारंपरिक वातावरण) सादर करू शकले.. आणि तेही एवढय़ा मोठय़ा संख्येने- या रंगभूमीवरील अघटिताने मी थक्क होऊन गेलो! स्पध्रेच्या उपक्रमाच्या या अचाट सामर्थ्यांचा प्रत्यय नाडकर्णीच्या लेखमालेतून उत्तम प्रकारे येतो. स्पध्रेतील सर्वच महत्त्वाच्या नाटकांचा (१९७५ पासूनच्या) परामर्श त्यांनी इथे घेतला आहे. तरीही निरनिराळ्या कारणांसाठी महत्त्वाची, वेगळा प्रयोग करू पाहणारी आणि स्पध्रेच्या पहिल्या फेरीत पहिला क्रमांक मिळवणारी ‘निखारे’ (१९६७), ‘प्रेमकहाणी’ (१९७२), ‘सप्तपुत्तुलिका’ (१९७५) अशी काही नाटके राहून गेली आहेत. कदाचित ती पाहण्याची संधी नाडकर्णीना मिळाली नसावी.

राज्य नाटय़स्पध्रेतील नाटकांविषयी असे एकत्रितपणे वाचताना एक विचार मनात आला- ही सगळी नाटके घडवणारे लेखक, दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्मितीसंस्था यांचे पुढील काळात काय झाले? यातील काहीजण निश्चितच नावारूपास आले. मधुकर तोरडमल, पुरुषोत्तम दारव्हेकर, गणेश सोळंकी, श्रीराम लागू, शरद भुथाडिया, विवेक आपटे, हेमू अधिकारी, दिलीप प्रभावळकर, रवी पटवर्धन, वसंत सोमण, स्वत: कमलाकर नाडकर्णी.. हे आणि आणखीही काही रंगकर्मी रंगभूमीच्या निरनिराळ्या क्षेत्रांत पुढे दीर्घकाळपर्यंत टिकून राहिले. परंतु याशिवाय इतर अनेक ताकदीचे रंगकर्मी- विशेषत: बाहेरगावचे- स्पध्रेनंतर कुठे दिसलेच नाहीत. स्त्री-कलावंत तर प्रकाशात मुळीच राहिले नाहीत. रंगभूमीचे हे केवढे मोठे नुकसान! सगळेच जण मुंबई-पुण्यासारख्या नाटय़केंद्रस्थळी येऊन स्थायिक होऊ शकले नाहीत, असे काही झाले का? काहीही असले तरी मराठी रंगभूमीवर ही अनेकांच्या कष्टांनी उभारली गेलेली इमारत टिकून राहायला हवी होती. ती तशी राहावी यासाठी शासनाच्या सांस्कृतिक विभागाचे प्रयत्न कमी पडले का? मराठी नाटय़ परिषदेसारख्या संघटनांनी पुरेशी आस्था दाखवली नाही, असे झाले का? काहीही असो. पण आज या नाटकांचे अस्तित्व नाडकर्णीच्या पुस्तकासारख्या प्रयत्नांमुळेच काही प्रमाणात तरी टिकून आहे. योग्य खतपाणी मिळाले असते तर आजच्या आपल्या मुख्य धारेतल्या रंगभूमीवरच्या जोडीने, कधी कधी वरचढ अशा स्वरूपात ही रंगभूमी अस्तित्वात राहिली असती; जशी अमेरिकी ब्रॉडवेच्या जोडीला तिला पोषक अशी ‘ऑफ ब्रॉडवे’ रंगभूमी आहे!

राज्य नाटय़स्पध्रेत चमकणाऱ्या जवळपास सर्वच संस्थांविषयी नाडकर्णीनी पुरेशा आपुलकीने लिहिले आहे. मात्र, स्वाभाविकपणेच त्यांनी स्वत:च्या ‘बहुरूपी’ या संस्थेविषयी अधिक माहिती दिलेली आहे. ते रास्तही आहे. कारण ‘बहुरूपी’ने जितकी नाटके सादर केली, तितक्या प्रमाणात तिची प्रसिद्धी झालेली नाही. या संस्थेने व्यावसायिक म्हणून शोभतील अशा नाटकांपासून पूर्णपणे प्रायोगिक अशा नाटकांपर्यंत सर्व प्रकारची नाटके स्पध्रेतील यशापयशाची पर्वा न करता धडाडीने, परिश्रमपूर्वक व दिमाखदार रीतीने सादर केली. नवे नट, लेखक, दिग्दर्शकांना वाव दिला. त्यांनी निर्मिलेले पीटर शेफर्सचे ‘ब्लॅक कॉमेडी’ (‘क.. काळोखातला’, रूपांतर : कमलाकर नाडकर्णी, दिग्दर्शन : हेमू अधिकारी) कधीही व्यावसायिक रंगभूमीवर येऊ शकेल. तर ‘हे समय उत्ताल समय’चे प्रयोग आजच्या ‘यादवी’च्या काळात समांतर रंगमंचावर झाल्यास ते समयोचित ठरेल. बादल सरकार यांच्या नाटकाच्या ‘जुलुस’ या रूपांतराच्या (दिग्दर्शक : अमोल पालेकर) निमित्ताने प्रथमच या संस्थेला एका वेगळ्या प्रकारच्या नाटकाचा अनुभव आला. या पहिल्या प्रेमाच्या नशेत नाडकर्णी इतके कायम मश्गूल राहिले, की तशा तऱ्हेची (सामाजिक आशय, नेपथ्याचा अभाव, समूहाचा वापर, कायिक अभिनयाचा जास्तीत जास्त उपयोग करणे, इत्यादी प्रकारची) जी तीन-चार महत्त्वाची नाटके आली, त्यांच्या लेखक-दिग्दर्शकांना बादलदांची नाटके न पाहताही स्वतंत्रपणे या रंगनिर्णयापर्यंत यावेसे वाटले असेल हे लक्षात न घेता ती सारी ‘जुलूस’नेच प्रेरित झाली असे नाडकर्णीना दीर्घकाळ वाटत राहिले.

काही अपवाद सोडल्यास नाडकर्णीचे एकूण लिखाण नि:पक्षपाती आहे. नाटकावरच्या प्रेमामुळे त्यात आपसूकच एक निर्मळपणा आलेला आहे. रंगभूमीवरचा इतिहास म्हणावा अशा या पुस्तकामध्ये अलीकडच्या मुख्य धारेतील नाटकांविषयी मात्र काहीही नाही. त्यासाठी नाडकर्णीचे ‘महानगरी नाटकं’ हे वेगळे पुस्तक असले तरीही ‘नाटकी नाटकं’च्या पद्धतीचा मुख्य धारेचा इतिहासही त्यांनी लिहायला हवा असे वाटत राहते.

‘नाटकी नाटकं’ हे पुस्तक अतिशय रंजक झालेले आहे. समीक्षाग्रंथ असूनही त्यात कसला अभिनिवेश नाही. कुठे उगाच परिभाषेचा वापर नाही की कुठे जडजंबाल शब्दयोजना नाही. हसतखेळत, आठवणीतल्या गमतीजमती सांगत, आख्यायिका सांगत, विनोदाची पखरण करत ही समीक्षा पुढे जाते. कुठेही आत्मगौरव नाही. स्वत:च्या अभिनयाविषयी सांगतानादेखील भूमिका केवळ माहिती देण्याची आहे. बऱ्याच वेळा तर स्वत:ची खिल्लीच उडवलेली आहे.

हे सारे, शिवाय भरपूर, तपशीलवार माहिती देणे कसे काय जमले असावे? तर त्यामागे आहे- रंगभूमीवरचे प्रेम! हे मला सर्वाधिक महत्त्वाचे वाटते. बरेच समीक्षक रंगभूमीवरचे प्रेम दाखवताना स्वत:चा मोठेपणा विसरत नाहीत. इथे नाडकर्णीना स्वत:पेक्षा रंगभूमी मोठी वाटते. तिच्याविषयी किती बोलू आणि काय बोलू असे त्यांना होऊन जाते. त्यातूनच त्यांची अपार माहिती, आठवणी इत्यादींनी भरलेली समीक्षा जन्माला येते. त्यामुळेच या समीक्षाग्रंथाचे स्वरूप ‘एका नाटकवेडय़ाचे आत्मकथन’ असे झालेले आहे. तरुण वयापासून उतारवयापर्यंत रंगभूमीचे जे जे दर्शन आपल्याला घडले, ते ते एका असोशीने ते वाचकांना घडवतात. तिच्यात त्यांचे राग-लोभ, ग्रह-पूर्वग्रह, नाटक पाहण्याची आणि कधी ते स्वत: उभारण्याची धडपड असे सारे काही दिसून येते. शिवाय या सर्वाना व्यापून उरते ती त्यांची रंगभूमीविषयीची कमालीची आसक्ती. त्या आसक्तीमुळेच हे ‘इतिहास अधिक आत्मकथन’ वाचकाविषयी आस्था दाखवते, त्याच्याशी मत्री करते व एकदा वाचायला सुरुवात केली की शेवटापर्यंत त्याला धरून ठेवते.