चिन्मय पाटणकर

बरीच र्वष जाहिराती या क्रिकेट, क्रिकेटपटू आणि चित्रपट कलाकार यांच्यावरच केंद्रित झालेल्या होत्या. मात्र, गेल्या काही वर्षांत क्रिकेटखेरीज इतर खेळ आणि खेळाडूंचाही जाहिरातींमध्ये दबदबा निर्माण होऊ लागला आहे. क्रिकेटेतर खेळ आणि जाहिरातविश्व यांच्यात निर्माण झालेल्या या नव्या नात्याचा वेध..

सधन कुटुंबातल्या अथर्वला फुटबॉलची आवड असते. मात्र तो संघात निवडला जात नाही. तरीही तो खेळायचं थांबत नाही. प्रयत्न करत राहतो आणि एके दिवशी आईला सांगतो, की मी संघात निवडला गेलोय, आता मला बूट हवेत. आई त्याला बूट घेऊन देते. सामन्याच्या दिवशी आई मदानावर पोहोचते, तर अथर्व पाण्याच्या टाकीवर अनवाणी बसून संघाला उत्साहानं, बेभान होऊन चीअर करत असतो. आईला प्रश्न पडतो : अथर्व तर संघात नाहीए, मग त्याने नवे बूट का घेतले? इतक्यात एक गरीब वाटणारा मुलगा पळत येऊन अथर्वला त्याचे बूट परत देतो आणि ‘थँक्स’ म्हणतो. हे अथर्वची आई पाहते. ती अथर्वला त्याचं कारण विचारते. सूरजकडे बूट खरेदी करण्याएवढे पसे नसल्याने आपण असं केल्याचं अथर्व सांगतो. अथर्वला वाटतं, आता आपल्याला आई ओरडणार. पण होतं उलटंच. आईच्या डोळ्यांत पाणी येतं आणि आई ते बूट सूरजला देऊन टाकायला सांगते. अथर्व आणि सूरज दोघंही खूश होतात. आई कौतुकभरल्या नजरेनं त्यांचा जल्लोष पाहत राहते..

सर्फ एक्सेलची ही जाहिरात तुम्ही पाहिली असेल कदाचित. ही जाहिरात सामाजिकदृष्टय़ा संवेदनशील आहेच; पण खेळांच्या संदर्भात महत्त्वाचीदेखील आहे. कारण आपल्या देशात लोकांवर क्रिकेट आणि क्रिकेटपटूंचा प्रचंड प्रभाव असूनही फुटबॉलसारखा खेळ या जाहिरातीसाठी वापरला आहे, हे या जाहिरातीचं वैशिष्टय़.

भारतीयांच्या मनात धर्माइतकंच अढळ स्थान असलेल्या तीन गोष्टी म्हणजे- क्रिकेट, राजकारण आणि सिनेमा. स्वाभाविकपणेच या तीन गोष्टींचं प्रतििबब जाहिरातींमध्येही डोकावतं. जाहिरातींमधून राजकारण आणि देशातल्या परिस्थितीबद्दल परखड भाष्य केलं जात असलं तरी राजकारण्यांचा जाहिरातींमध्ये वापर केला जात नाही. जाहिरातींमध्ये मोठी मागणी असते ती चित्रपट कलाकार आणि क्रिकेटपटू यांनाच. मात्र, गेल्या काही वर्षांत क्रिकेटव्यतिरिक्त कबड्डी, बॅडिमटन, कुस्ती, बॉक्सिंग अशा वेगवेगळ्या खेळांतील खेळाडूही मोठय़ा प्रमाणावर जाहिरातींमध्ये दिसू लागले आहेत. सानिया मिर्झा, सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू, विजेंदर सिंग, सुशीलकुमार, अनुपकुमार, गीता फोगट, साक्षी फोगट, अभिनव बिंद्रा असे काही खेळाडू आता जाहिरातींसाठी कंपन्यांच्या टॉप लिस्टवर आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व खेळाडू मोठमोठय़ा कंपन्यांच्या उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये चमकत आहेत. या जाहिरातींमुळे क्रिकेटेतर खेळ आणि खेळाडूंची लोकप्रियता वाढत असल्याचं अधोरेखित होत आहे. म्हणूनच क्रिकेट, क्रिकेटेतर खेळ आणि बदलतं जाहिरातविश्व या सर्वाचा आढावा घेणं महत्त्वाचं ठरतं.

भारतात क्रिकेट आणि जाहिरात क्षेत्र यांचं नातं फार जुनं आहे. अ‍ॅड्-गुरू अलेक पदमसी यांनी १९८७ मध्ये विमल कंपनीसाठी रवी शास्त्री, अ‍ॅलन बॉर्डर आणि व्हिव रिचर्डस् यांना घेऊन जाहिराती केल्या होत्या. त्यानंतर सिन्थॉलच्या जाहिरातीमध्ये इमरान खान चमकले होते. सुनील गावसकर, कपिल देव यांनीही बऱ्याच जाहिराती केल्या होत्या. ९० च्या दशकात कॅडबरीची ‘असली स्वाद जिंदगी का!’ या प्रचंड गाजलेल्या जाहिरातीतही क्रिकेटचीच मॅच दाखवण्यात आली होती. अनेक क्रिकेटपटूंनी जाहिरातींमध्ये काम केलं असलं तरी भारतीय क्रिकेटच्या आजवरच्या इतिहासातला ‘आयकॉन’ ठरला तो सचिन तेंडुलकर! क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर या नावाचा दबदबा निर्माण झाल्यानंतर जाहिरात क्षेत्रही त्याच्यावरच केंद्रित झालं. पेप्सीसारख्या मोठय़ा ब्रँडचा सचिन ब्रँड अ‍ॅम्बेसेडर होता. २००१ मध्ये शंभर कोटींच्या मानधनाचा करार सचिननं केला होता. ‘ये दिल माँगे मोअर’सारखं कॅम्पेनही प्रचंड गाजलं होतं. सचिन तेंडुलकरशिवाय सौरव गांगुली, राहुल द्रविड, युवराज सिंग, हरभजन सिंग असे अनेक क्रिकेटपटू जाहिरातींसाठी लोकप्रिय होते. आदिदास, नाईके असे आंतरराष्ट्रीय ब्रँड्सही भारतात जाहिरात करण्यासाठी क्रिकेटपटूंनाच निवडत होते. आजच्या काळात विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी हे क्रिकेटपटू जाहिरातींसाठीची बडी नावं आहेत.

एकीकडे क्रिकेटकेंद्रित जाहिराती होत असताना टेनिसमध्ये महेश भूपती, लिअँडर पेस जागतिक स्तरावर दमदार कामगिरी करीत होते. विश्वनाथन आनंद बुद्धिबळासारख्या खेळातून विश्वविजेता बनला होता. त्याचीही लोकप्रियता वाढली होती. स्वाभाविकपणे त्यालाही जाहिराती करण्याची संधी मिळाली. सानिया मिर्झाच्या रूपानं भारतात ‘टेनिस सेन्सेशन’ निर्माण झालं. तिलाही बऱ्याच मोठय़ा ब्रँड्सनी करारबद्ध केलं. फॉम्र्युला वनमध्ये नरेन काíतकेयनचं नाव आलं. त्याला घेऊन कॅस्ट्रॉलनं जाहिराती केल्या. २००४ च्या ऑलिम्पिकपासून भारताला पदकं मिळू लागली आणि क्रिकेट व टेनिसशिवाय बाकी खेळांचीही चर्चा सुरू झाली. २००४ च्या ऑलिम्पिकमध्ये करनाम मल्लेश्वरी, राज्यवर्धनसिंग राठोड यांनी पदकं मिळवली. मात्र, त्यांना जाहिरातींमध्ये चमकण्याची संधी मिळाली नाही. २००८ च्या ऑलिम्पिकमध्ये अभिनव िबद्रानं सुवर्णपदक, बॉिक्सगमध्ये विजेंदर सिंग आणि सुशीलकुमारनं कुस्तीमध्ये सुवर्णपदक मिळवलं. २०१० मध्ये दिल्लीत कॉमनवेल्थ क्रीडास्पर्धेच्या रूपानं जागतिक स्तरावरील महत्त्वाची स्पर्धा आयोजित करण्याचा बहुमान भारताला मिळाला. कॉमनवेल्थ २०१० मध्ये भारताची कामगिरीही चांगली झाली होती. सर्वाधिक पदकं मिळवणाऱ्या देशांमध्ये भारत दुसऱ्या स्थानी होता. कृष्णा पुनिया (थाळीफेक), गीता फोगट (कुस्ती) या महिला खेळाडूंनी दमदार कामगिरी करत पदकं मिळवली. या सगळ्याचा परिणाम असा झाला की, भारतात क्रिकेटशिवाय अन्य खेळही खेळले जातात हे अधोरेखित झालं आणि तिथून भारतातल्या खेळांचं चित्र बदलत गेलं.

२००८ मध्ये आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीगच्या रूपानं क्रिकेटचा जल्लोष सुरू झाला. ‘भारतातल्या क्रीडाक्षेत्राचा टìनग पॉइंट’ असंही आयपीएलच्या बाबतीत नक्कीच म्हणता येऊ शकतं. कारण आयपीएलला मिळालेल्या यशामुळे अन्यही खेळांच्या लीग मॅचेस सुरू करण्याचा विचार सुरू झाला. त्यानुसार अल्पावधीतच बाकी खेळांच्याही लीग सुरू झाल्या. याची सुरुवात झाली प्रो कबड्डी लीग आणि हॉकी लीगनं. त्यापाठोपाठ बॅडिमटन लीग, इंडियन सुपर लीग, प्रीमियर फुटबॉल, सुपर बॉिक्सग लीग, प्रो रेसिलग लीग अशा वेगवेगळ्या खेळांच्या लीग सुरू झाल्या. या लीगच्या जाहिरातींमध्ये संबंधित खेळांतील खेळाडू चमकू लागले. या खेळांच्या जाहिराती सर्व माध्यमांतून केल्या जाऊ लागल्या. फिल्म स्टार्सही या लीगमध्ये मालक म्हणून किंवा ब्रँड अ‍ॅम्बेसिडर म्हणून सहभागी होऊ लागले. स्वाभाविकपणे या लीगनाही मोठा प्रतिसाद मिळू लागला. चॅनेल्सच्या टीआरपीचा विचार केल्यास जवळपास आयपीएलएवढाच टीआरपी प्रो कबड्डी लीगनं मिळवला होता. त्यावरून या खेळांच्या वाढत्या लोकप्रियतेचा अंदाज येऊ शकतो.

अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत स्पोर्टस् चॅनल्सची संख्या मर्यादित होती. स्टार स्पोर्टस्, ईएसपीएन, टेन स्पोर्टस्, डीडी स्पोर्टस्, निओ स्पोर्टस् हे चॅनेल्स होते. बहुतेक चॅनेल्सवर क्रिकेटच्याच मॅचेस दाखवल्या जायच्या. मात्र, आता चॅनेल्सची संख्याही वाढली आहे. स्टार स्पोर्टस्ने चॅनेल्सची संख्या वाढवत प्रादेशिक भाषांमध्येही प्रवेश केला. आजघडीला जवळपास १२ स्पोर्टस् चॅनेल्स उपलब्ध आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे या चॅनेल्सवर क्रिकेटशिवाय इतर खेळही दाखवले जातात. चॅनेल्सच्या वाढलेल्या संख्येनं वेगवेगळ्या लीगसाठी वेळ मिळू लागला आणि हे खेळ व खेळाडू प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. प्रो कबड्डी लीगच्या बाबतीत तर स्टार स्पोर्टस् या चॅनेलनेच पुढाकार घेतलेला आहे.

साधारणपणे आपल्याकडे २०११ पासून सोशल मीडियाचा प्रभाव वाढू लागला. मोबाइलवर इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्याही प्रचंड प्रमाणात वाढली. स्मार्टफोनमुळे ग्रामीण भागातही इंटरनेट पोहोचण्यास मदत झाली. त्याशिवाय नेटवर्कची सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांतील स्पर्धेमुळे इंटरनेट दरही बरेच कमी झाले. त्यातून भारतात डिजिटल क्रांती झाली. या डिजिटल क्रांतीचा फायदाही क्रिकेटेतर खेळ आणि खेळाडूंना  झाला. इतर खेळांतील खेळाडूंनी लक्षणीय कामगिरी करूनही त्याकडे वर्तमानपत्रे व टीव्ही चॅनेल्सनी दुर्लक्ष केल्यास त्याबाबतची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे येऊ लागली. त्यामुळे खेळाडूंविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली. आधी क्रिकेटपटू किंवा फिल्म स्टार्सना घेऊन टीव्हीवरच्या जाहिराती जास्त प्रमाणात केल्या जायच्या. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातूनही टीव्हीवरच्या जाहिरातींसारखाच नवा पर्याय उपलब्ध झाला. खास डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी शॉर्टफिल्म्सच्या रूपानं ब्रँड फिल्म्स केल्या जाऊ लागल्या. त्याही व्हायरल होऊ लागल्या.

इतर क्रीडास्पर्धामध्ये भारत चांगली कामगिरी करत असला तरी ऑलिम्पिक पदकं मिळवण्यात भारताला समाधानकारक यश मिळालेलं नाही. चार पदकांच्या पुढे भारताला मजल मारता आलेली नाही. १३० कोटी लोकसंख्या असलेल्या, वेगानं विकसित होणाऱ्या देशासाठी ही नक्कीच गौरवास्पद बाब नाही. परिणामी २०१२ पासून ऑलिम्पिकमध्ये जास्तीत जास्त पदकं मिळवण्यासाठी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यास सुरुवात झाली. त्यासाठी कॉर्पोरेट कंपन्यांनी पुढाकार घेतला. सोशल रिस्पॉन्सिब्लिटी म्हणून कंपन्या खेळाडूंना आíथक पाठबळ देऊ लागल्या. त्यातून खेळाडूंनाही प्रोत्साहन मिळू लागलं. २०१६ मध्ये रिओ ऑलिम्पिकसाठी तर अनेक कंपन्यांनी खेळाडूंना घेऊन कॅम्पेन केली होती. जेएसडब्ल्यू स्टीलनं ‘रुकना नहीं है’, टाटा सॉल्टनं ‘नमक के वास्ते’, अदानी ग्रुपनं ‘गर्व है’ अशी कॅम्पेन्स केली. ही कॅम्पेन्सही गाजली होती. तर सोनी लाइव्हसारख्या चॅनेलनं ऑलिम्पिकनंतर ‘हम हारे नहीं’ हे कॅम्पेन केलं. यातून खेळाडूंच्या कामगिरीला प्रोत्साहन दिलं. इतकंच नाही, तर विराट कोहलीनं ऑलिम्पिकसाठी भारतीय टीमला प्रोत्साहन देणारी जाहिरात केली होती. आता स्टार स्पोर्टनं खास आशियाई खेळांच्या निमित्तानं भारतीय खेळाडूंना पाठिंबा देणारं कॅम्पेन केलं.

क्रिकेटेतर खेळ आणि खेळाडूंना जागतिक स्तरावर मिळू लागलेलं यश पाहून मोठमोठय़ा ब्रँडस्कडूनही त्यांच्या जाहिरातींसाठी या खेळाडूंना मागणी येऊ लागली आहे.

एफएमसीजी (फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स), ऑटोमोबाइल, कॉस्मेटिक्स, इन्व्हेस्टमेंट अशा क्षेत्रांतील कंपन्यांकडून सानिया मिर्झाला स्कूटी पेप, पी. व्ही. सिंधूला मूव्ह पेनकिलर क्रीम आणि नोकिया मोबाइल फोन, मेरी कोमला टाटा सॉल्ट, कबड्डीतल्या अनुपकुमार आणि अन्य काही खेळाडूंना म्युच्युअल फंड्सच्या जाहिराती मिळाल्या. अलीकडेच बोर्नव्हिटानं कबड्डी, बॉक्सिंग, स्वीमिंग, अ‍ॅथलेटिक्स अशा खेळांना घेऊन जाहिराती केल्या होत्या. त्यामुळे मोठय़ा ब्रँड्सकडून इतर खेळ किंवा खेळाडूंची जाहिरातींसाठी निवड होणं ही नक्कीच मोठी गोष्ट आहे. त्यातून या खेळांचं आणि खेळाडूंचं वाढलेलं महत्त्व अधोरेखित होतं.

‘क्रिकेट, चित्रपट कलाकार यांना जाहिरातींसाठी आजही मागणी आहेच. मात्र, अन्य खेळ आणि खेळाडूंनाही जाहिरातींमध्ये प्राधान्य मिळू लागलंय ही वस्तुस्थिती आहे. त्याची कारणं अनेक आहेत. उदाहरणार्थ सांगायचं, तर आपल्याकडे इतर खेळांविषयी आता चांगल्या रीतीनं होत असलेली जागृती, क्रिकेटेतर खेळांनाही वाढत असलेलं फॅन फॉलोइंग, या खेळांच्या स्पर्धाना मिळणारा टीआरपी, खेळाडूंना मिळत असलेलं ग्लॅमर या सगळ्याचा विचार करून आम्ही उत्पादनांच्या जाहिराती करताना इतर खेळांचाही विचार करतो. ब्रँड कुठला, जाहिरातीचा आशय काय, हे निश्चित झाल्यावर त्यासाठी पूरक ठरणारा खेळ किंवा त्यातील खेळाडूंचा विचार केला जातो. जाहिरात जितकी साधी-सोपी असेल, तितकी ती जास्त लक्षात राहते. म्हणून जाहिरातींमध्ये दाखवल्या जाणाऱ्या गोष्टी या आपल्या भोवतालाशी संबंधित असतात. जाहिरातीवर आजूबाजूच्या वातावरणाचा प्रभाव असतो. फुटबॉल, कबड्डी, बॉिक्सग, बॅडिमटन असे खेळ जाहिरातीतून दिसणं हा त्याचाच परिणाम आहे. आज क्रिकेटेतर खेळांच्या लीगची लोकप्रियता वाढते आहे. या लीग सुरू होण्याचं कारणही आयपीएल आहे. आयपीएल यशस्वी झाल्यानंतर अन्य खेळांच्या लीग सुरू झाल्या. इतर खेळ आणि खेळाडूंना मिळणारी लोकप्रियता हे सुचिन्ह आहे. याचा फायदा ते खेळ आणि खेळाडूंना नक्कीच होईल,’ असं लिटास या प्रसिद्ध जाहिरात कंपनीत क्रिएटिव्ह डिरेक्टर असलेल्या सुशांत धारवाडकरनं सांगितलं.

क्रिकेटशिवाय इतर खेळ आणि खेळाडूंना मिळणारं महत्त्व आणि त्यांचा जाहिरातींमध्ये केला जाणारा वापर नक्कीच कौतुकास्पद आहे. त्यातून या खेळाडूंना प्रोत्साहन मिळत आहे. आतापर्यंत अमिताभ बच्चन, आमिर खान, सचिन तेंडुलकर अशा काहींनी सामाजिक जागृतीसाठी केल्या जाणाऱ्या जाहिरातींमध्येही सहभाग घेतला होता. आता त्यांची जागा या इतर खेळांतील खेळाडूंनाही मिळू लागली आहे. बॉक्सिंगपटू विजेंदरसिंगनं टॅक्स भरण्याचं आवाहन करणारी जाहिरात केली होती. आता हे प्रमाणही वाढू लागेल. इतर खेळांतील खेळाडूंना जाहिराती करायला मिळाल्याचा फायदा त्यांच्या प्रत्यक्ष खेळामधील कामगिरी उंचावण्यात आणि देशाला आंतरराष्ट्रीय स्पर्धामधील अधिकाधिक पदकं, अजिंक्यपदं मिळण्यात होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

lokrang@expressindia.com