नासिरा शर्मा हे समकालीन हिंदी साहित्यातील एक महत्त्वाचे नाव आहे; परंतु हिंदी साहित्य वर्तुळातल्या प्रस्थापितांच्या परिघाबाहेरचे. हिंदी साहित्यात ‘नई कहानी’ या आंदोलनाबरोबरच लेखिकांना जणू आकाशात झेप घेण्याचे स्वातंत्र्य मिळाले. अनेक लेखिका कथेच्या माध्यमातून आपल्या संवेदना व्यक्त करू लागल्या. उषा प्रियंवदा, कृष्णा सोबती, मन्नु भंडारी, मैत्रेयी पुष्पा, प्रभा खेतान, नासिरा शर्मा इत्यादी लेखिकांनी कथेच्या क्षेत्रात जणू क्रांती घडवून आणली. या लेखिकांनी स्त्रीसंवेदना व्यक्त करणाऱ्या पुरुष साहित्यिकांच्या वर्चस्वाला जणू आव्हान दिले. स्त्रीला स्त्रीचे प्रश्न जास्त चांगले समजतात या विचाराने प्रेरित होऊन स्त्री अस्तित्वाशी जोडलेले प्रश्न चर्चिले जाऊ लागले.

या सगळ्या लेखिकांमध्ये नासिरा शर्मा यांनी वेगळीच वाट चोखाळली. त्यांच्यावर प्रेमचंद, मंटो यांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. त्यांनी फाळणी, इराण क्रांती, जातीय दंगे, तसेच विदेशी पाश्र्वभूमीवर अनेक कथा लिहिल्या आहेत. यातील बहुतेक कथांच्या केंद्रस्थानी स्त्री आहे. धर्म, सत्ता आणि राजकारण यांच्याद्वारे होणारे स्त्रीचे शोषण नासिरा यांनी कथांमधून चित्रित केले. त्यांनी मुस्लीम स्त्रीच्या दुर्दशेवर फार गंभीरपणे लिहिलेले आहे. अर्थात् त्यांच्या कथांमधून केवळ स्त्रीचेच दु:ख कथन केले जाते असेही नाही. मानवी जीवनातील जटिल प्रश्नांनाही त्यांचे लेखन कवेत घेणारे आहे.

नासिरा शर्मा या स्वत:ला स्त्रीवादी लेखिका मानत नाहीत. त्यांनी ‘औरत’ या शीर्षकाचे एक पुस्तक लिहिले आहे. त्यात कामगार स्त्रीच्या दु:खाचे चित्रण केले आहे. ज्या काळात त्यांच्या समकालीन लेखिका मध्यमवर्गीय स्त्रीचे दु:ख आपल्या कथांमधून मांडत होत्या, त्याच काळात नासिरा तळाच्या वर्गातील, कामगार महिलांच्या प्रश्नांवर आपले लक्ष केंद्रित करीत होत्या.

अशा या लेखिकेच्या कथांचा ‘निद्रित निखारे’ हा प्रमोद मुजुमदार यांनी अनुवादित केलेला संग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. या संग्रहात नासिरा यांनी केलेला एक रिपोर्ताज आणि त्यांच्या सात कथांचा समावेश आहेच; शिवाय इराणी लेखक समद बहरंगी यांच्या कथांचा नासिरा यांनी हिंदी अनुवाद केला होता, त्यातील दोन कथांचा मराठी अनुवाद आणि नासिरा यांची एक मुलाखतही यात वाचायला मिळते.

नासिरा यांनी इराणविषयी खूप लिखाण केले आहे. तेच लिखाण त्यांना इतरांपासून वेगळे ठरवते. याविषयी त्या मुलाखतीत म्हणतात, ‘‘लग्नानंतर तीन वर्षे मी स्कॉटलंडमध्ये राहिले. मात्र स्कॉटलंडविषयी कसलेही ललित लिखाण मला करावेसे वाटले नाही. परंतु मी इराणच्या भूमीवर पाऊल ठेवले आणि माझ्या सृजनात्मक लिखाणाला पूर आला.’’ याचे कारण नासिरा यांनी त्या काळात इराणमधील शहा राजवटीविरुद्ध आवाज उठवणाऱ्या क्रांतिकारी कवींशी आणि लेखकांशी संवेदनशील नाते जपले हेच असावे. मुलाखतींच्या निमित्ताने त्यांनी इराक, अफगाणिस्तान, सीरिया, पाकिस्तान आणि भारतातील राजकीय पुढारी आणि प्रसिद्ध बुद्धिजीवींच्या भेटीगाठी घेतल्या. त्यावेळी इराणच्या शहाला विरोध करण्याची कुणाची हिंमत नव्हती. पण नासिरा यांनी इराणच्या शहाविरोधात लिखाण केले. ‘लेखकाने आपले लिखाण किती गांभीर्याने घ्यायला हवे हे मी त्या काळात शिकले,’ असे त्या म्हणतात.

‘निद्रित निखारे’ या संग्रहात ‘सन्दल से माँग, बच्चोंसे गोदी खाली रहे’ हे नासिरा यांनी केलेले वार्ताकन कथा म्हणूनच प्रकाशित करण्यात आले आहे. हे रिपोर्ताज पद्धतीचे लेखन आहे. याचा फॉर्म कथेचा नसला तरी त्यातून प्रकट होणारा आशय वाचकांचा थरकाप उडवायला पुरेसा आहे. इराण-इराक युद्धात इराकनं पकडलेल्या आठ-दहा वर्षांच्या अडीचशे बालसैनिकांविषयीचे हे प्रकरण आहे. त्याकाळी इराणमधल्या प्रत्येक लहान मुलावर युद्धात शहीद होण्याचे भूत स्वार झाले होते. लहान लहान मुले स्वत:ला योद्धा समजायला लागली होती. इराणचा खोमेनी नमाजापूर्वीच्या प्रवचनात पालकांना धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी आपल्या पाल्यांना युद्धात ‘लढण्या’साठी प्रेरित करावे, असे आवाहन करी. खोमेनीने या युद्धाला धर्मयुद्धाचा रंग देऊन जिहादच्या नावाखाली आठ-दहा वर्षांच्या मुलांना युद्धावर पाठवले होते. त्यातील २५० लहान मुलांना ‘बालसैनिक’ म्हणून इराकने पकडले होते. या बालसैनिकांचा वापर खोमेनी करत असल्याचा प्रचार इराकच्या सद्दाम हुसेनने आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यमांत केला होता. हे नेमके काय आहे हे शोधण्यासाठी फ्रेंच टी.व्ही.च्या पत्रकारांबरोबर नासिरा बगदादच्या त्या छावणीत पोहोचल्या होत्या. पत्रकारांच्या तुकडीत फक्त नासिरा यांनाच फारसी भाषा अवगत होती. त्यामुळे त्या मुलांशी नासिरा संवाद साधू शकल्या होत्या. हे बालसैनिक खरोखरच ‘इराणी’ आहेत, हे त्यांनी सिद्ध केले. त्याचा चित्तथरारक वृत्तान्त नासिरा यांनी कथन केला आहे.

‘एक फिरस्ता इराणी’ ही या संग्रहातील दुसरी कथा इराणमधून विस्थापित झालेल्या एका डॉक्टरविषयी आहे. एका मद्यालयात त्याची एका भारतीय डॉक्टरशी गाठ पडते. तिथे दोघांचा संवाद होतो. त्या दोघांच्या संवादातून ही कथा उलगडत जाते. आपल्याला अशी पात्रं अगदीच अपरिचित असतात. कारण अशा प्रकारचे विस्थापन आपण भोगलेले नसते. डॉ. बोरहान यांचे उद्ध्वस्त झालेले कुटुंब आणि त्यांच्यावर लादले गेलेले एकटेपण आपल्याला सुन्न करते. जागतिक पातळीवरच्या उलथापालथीचे परिणाम मानवी जीवनावर कसे आणि किती खोलवर होतात याचे अगदी वेगळेच चित्र वाचकांसमोर उभे राहाते.

‘सीमेच्या या बाजूलाच!’ या शीर्षकाची एक कथा आहे. त्या कथेचा नायक रेहानभय्या हा काहीसा वेडा आहे. ‘भारत माझा देश आहे..’ ही प्रतिज्ञा आपण शाळेत म्हणत असू; ती तो प्रत्यक्षात जगायचा प्रयत्न करतो. आपली माणसे पिढय़ान्पिढय़ा याच मातीत गाडली गेली आहेत यावर त्याचा विश्वास आहे. त्याचे या देशावर, इथल्या माणसांवर प्रेम आहे. हिंदू-मुस्लीम दंग्यामध्ये तो मुस्लीम तरुणांच्या तावडीतून एका हिंदू मुलीची सुटका करतो. पदव्युत्तर शिक्षण घेऊनही बेकार असलेल्या रेहानभय्याच्या प्रेयसीने पाकिस्तानी तरुणाबरोबर लग्न केले आहे. उत्तर प्रदेशातील मुस्लीम तरुणांच्या मनांतील अंतर्विरोध मांडणारी ही कथा आहे.

संग्रहातील पुढची कथा आहे- ‘मुका आसमंत’. अफगाणिस्तानातील एक मुजोर लष्करी अधिकारी आणि त्याच्या चार बायका यांची ही कहाणी. या चारही बायका परस्परांवर प्रेम करतात आणि त्या मुजोर लष्करी अधिकाऱ्याच्या अत्याचाराला मिळून कसे तोंड देतात हे या कथेत दाखवलेले आहे. एक प्रकारे सत्तेविरुद्ध बंड करणाऱ्या स्त्रियांची ही कहाणी केवळ अफगाणी स्त्रियांपुरतीच न राहता ती वाचकांना वैश्विक पातळीवर घेऊन जाते.

संग्रहातील ‘इमामसाहेब’ ही कथा एका असाहाय्य इमामाचे भावविश्व रेखाटणारी आहे. तर ‘रंग सुगंधाचे’ ही एक प्रेमकथा असून नासिरा यांनी ती त्यांच्या शैलीत कथन केली आहे. इराणमधील एका अनाम क्रांतिकारकाच्या प्रेयसीने आपल्या प्रियकराच्या प्रतीक्षेत व्यतीत केलेल्या एकाकी आयुष्याची ही कहाणी जगातील राजकीय संघर्षांत सापडलेल्या कुणाचीही कथा असू शकते. यानंतरच्या ‘वारसा’ आणि ‘निद्रित निखारे’ या कथाही नासिरा यांच्या लेखनातील सर्व वैशिष्टय़े घेऊन अवतरल्या आहेत.

या संग्रहातील पुढच्या दोन कथा या इराणी साहित्यिक समद बहरंगी यांच्या आहेत. नासिरा यांनी त्यांचा हिंदी अनुवाद केला होता. त्या दोन्ही कथांचा मराठी अनुवाद या संग्रहात वाचायला मिळतो. पुस्तकात समद बहरंगी यांच्याविषयी छोटेखानी टिपण दिले आहे, त्यावरून ते इराणमधील पुरोगामी विचारवंत होते हे ध्यानात येते. जगभर पुरोगामी विचारवंतांना जे जे भोगावे लागते ते ते समद बहरंगी यांनाही भोगावे लागले आहे. त्यामुळेच त्यांचे साहित्य आणि विचार त्यांच्या मृत्यूनंतरही अनेकांना प्रेरणा देत राहिले आहेत.

सम-विषम परिस्थितीतही पात्रांचे सजीव होत जाणे हे नासिरा यांच्या लेखणीचे कौशल्य आहे. कथेतून मनोवैज्ञानिक विश्लेषण येत असूनही या कथा कधीही बोजड होत नाहीत. उलट कथेतील पात्रांबद्दल वाचकांच्या मनात एक जिज्ञासा जागृत होते. पात्रांची निवड, त्यांची भाषा, त्यांच्या जगण्याची रीत यावर नासिरा यांची बारीक नजर असते. त्यामुळेच शिक्षित-अशिक्षित स्त्रियांच्या सामाजिक, मानसिक आणि आर्थिक दु:खांना शब्दरूप देण्यात त्या यशस्वी होतात. या कथा सामाजिक, धार्मिक बंधनातून बाहेर पडून वर्तमानात येण्यासाठी स्त्रीवर्गाला आवाहन करतात. या कथा नवीन काही सांगत नाहीत, पण नासिरा यांच्या लेखणीची वीण त्यांना नवे रूप प्रदान करते.

नासिरा यांच्या ‘परिजात’ या कादंबरीला २०१६ चा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांच्या स्त्री पात्रांची मने शक्यतांनी भरलेली आहेत. त्या स्त्रिया आपले आयुष्य इतरांसारखे जगू पाहतात. खुल्या अवकाशात भरारी घेऊ इच्छितात. पण जुन्या पिढीचे संस्कार आणि धर्म हा त्यांच्या मार्गात अडथळा बनून उभा असतो. त्यांची सगळी स्वप्नं वाळूच्या किल्ल्याप्रमाणे ढासळतात. असे हे ‘निद्रित निखारे’. त्यावरची राख उडवून अनुवादक प्रमोद मुजुमदार यांनी त्यांची धग वाचकांपर्यंत पोहोचवली आहे.

  • ‘निद्रित निखारे’ – नासिरा शर्मा,
  • अनुवाद- प्रमोद मुजुमदार,
  • डायमंड पब्लिकेशन्स,
  • पृष्ठे- १५४, मूल्य- २०० रुपये.

– चंद्रकांत भोंजाळ