17 December 2017

News Flash

शकुंतला परांजपे सांगोपांग!

शकुंतलाबाईंच्या सर्वव्यापी अनुभवविश्वाची ओळख ‘झलक परदेशवारीची’मधील दोन लेखांतून होते.

डॉ. स्वाती कर्वे | Updated: August 13, 2017 2:26 AM

‘निवडक शकुंतला परांजपे’,

मराठी वाङ्मय क्षेत्राबरोबर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात आपल्या कर्तृत्वाने विलक्षण व्यक्तिमत्त्वाची छाप उमटवणाऱ्या महत्त्वाच्या स्त्रियांमधील एक अपवादात्मक व्यक्तिमत्त्व होते- शकुंतला परांजपे! ‘रँग्लर र. पु. परांजपे यांची कन्या’ ही ओळख शकुंतलाबाईंना जन्मापासून मिळालेली असली तरी त्या ओळखीला ओलांडून त्यांनी स्वत:ची अशी स्वतंत्र ओळख निर्माण केली. आज आघाडीच्या ‘लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांची आई’ अशी दुसरी नवी ओळख त्यांना प्राप्त झाली असली तरी त्यांची स्वत:ची ‘लेखिका, समाजकार्यकर्त्यां शकुंतला परांजपे’ ही ओळख अद्याप विझलेली नाही, यातच त्यांच्या कार्याचे खरे मर्म आहे. ‘मंगलवाचन’ या पूर्वीच्या माध्यमिक स्तरावरील मराठीच्या पाठय़पुस्तकात गद्य विभागातील शेवटचा पाठ (धडा) कायम शकुंतला परांजपे यांच्या ‘भिल्लिणीची बोरं’ या पुस्तकातील असायचा. लेखिकेबरोबर सई, अप्पा, चिंगी, बोका सर्वाची नियमित भेट व्हायची. शकुंतलाबाईंचे व्यक्तिमत्त्व विलक्षण तसेच अनेक पैलूंनी युक्त होते. त्यांचे अनुभवविश्वही व्यापक होते. ब्रिज खेळण्याच्या व्यसनापासून (त्यांचाच शब्द!) मांजरांवर जीवापाड प्रेम करण्यापर्यंत अनेक धागे त्याला होते. केंब्रिजला शिक्षण घेऊन गणितातील उच्च पदवी मिळवण्यापासून ‘कुंकू’ चित्रपटात काम करण्यापर्यंत हे अनुभवविश्व सर्वव्यापी होते. ज्या काळात ‘संततीनियमन’ हा शब्द उच्चारणेही शक्य नव्हते, अशा काळात त्यांनी वीस वर्षे संततीनियमनाच्या प्रचार व प्रसाराचे कार्य अत्यंत धडाडीने केले. त्यांच्या या कार्याची पावती म्हणून त्यांना राज्यसभेचे सन्माननीय सदस्यत्व बहाल करण्यात आले. संपन्न व रसरशीतपणे जीवन जगणाऱ्या शकुंतला परांजपे यांना अत्यंत फटकळ वृत्तीबरोबरच मार्मिक, मिश्कील स्वभावाचीही देणगी लाभली होती. अशा या बहुपेडी व्यक्तिमत्त्वाने लेखनही विपुल व विविध प्रकारचे केले. मात्र, त्यांना अंत:प्रेरणेने लिहावेसे वाटले तेव्हाच त्यांनी लिहिले. अशा अपवादात्मक व्यक्तिमत्त्वाची सुखद पुनर्भेट ‘निवडक शकुंतला परांजपे’ या संपादित पुस्तकातून विनया खडपेकर यांनी घडविली आहे. शकुंतलाबाईंचे वैविध्यपूर्ण लेखन आणि व्यक्तिमत्त्वाची ओळख व्हावी यादृष्टीने त्यांनी पाच भागांत या पुस्तकाची मांडणी केली आहे. ललित निबंध (१२), व्यक्तिस्मरणे (९), झलक परदेशाची (२), कथा (४), अनुभवकथन (२) असे हे पाच विभाग असून चार परिशिष्टांची जोडही त्यास दिली आहे. शकुंतलाबाईंच्या लेखनाची वैशिष्टय़े स्पष्ट करणारी मोजकी, पण नेमकी अशी ‘राजहंसच्या दृष्टिकोनातून’ ही प्रस्तावना विनया खडपेकर यांनी लिहिली आहे.

पाच भागांमध्ये वेगवेगळ्या लेखनाची भेट होत असली तरी पहिल्या ‘माझी प्रेतयात्रा’ या ललित लेखापासून परिशिष्टातील शेवटच्या मुलाखतीपर्यंत शकुंतलाबाईंचे विलक्षण व्यक्तिमत्त्व सबंध पुस्तकात भरून राहिले आहे. ठसठशीतपणे ते सतत जाणवत राहते आणि वाचकाच्या मनावर प्रभाव टाकते. पुस्तक वाचून संपले तरी मनामध्ये दीर्घकाळ रेंगाळत राहतात त्या शकुंतलाबाईच. कारण हे सारे लेखन त्यांच्या उत्कट जगण्यातून, अंत:प्रेरणेतून झालेले आहे. आणि हेच या पुस्तकाचे अंगभूत वैशिष्टय़ ठरते.

ललितलेखांच्या विभागात जीवनाचा रसरसून आनंद घेत जगण्याच्या शकुंतलाबाईंच्या रसिक वृत्तीचा प्रत्यय येतो. ‘पावसाचा कोट’सारख्या लेखातून लहानसहान अनुभवांतून रमणारी त्यांची वृत्ती जाणवते. मार्मिक, मिश्कील स्वभावाचे तर सर्वच लेखांतून कवडसे पडलेले दिसतात. स्वत:कडे, स्वत:च्या गुणदोषांकडे अलिप्त,

तरीही खेळकरपणे बघणाऱ्या त्यांच्या मनोवृत्तीचे उदाहरण म्हणजे ‘माझी प्रेतयात्रा’ हा लेख होय. श्रद्धांजलीच्या निमित्ताने मामा वरेरकर, आचार्य अत्रे यांनी केलेली भाषणे म्हणजे लेखिकेने स्वत:च्याच व्यक्तिमत्त्वाचे, जीवनाचे केलेले मार्मिक मूल्यमापन ठरले आहे.

माणसांना समजावून घेण्याची, त्यांच्या गुणदोषांसकट ममत्वाने त्यांची शब्दचित्रे रेखाटण्याची त्यांची समतोल वृत्ती ‘व्यक्तिस्मरणे’मधून व्यक्त होते. गोपाळराव जोशी, वडील अप्पा, अप्पा कर्वे (र. धों. कर्वे), सुलभा पाणंदीकर, आजी इत्यादींची व्यक्तिचित्रे सरस उतरली आहेत. त्यांनी चितारलेले चिंगी मांजरीचे व्यक्तिचित्रणही वाचनीय आहे. प्रसंगी एका वाक्यात त्यांनी केलेली टिप्पणी बरेच काही सांगून जाते.

महर्षी कर्वे यांना चार मुलगे होते. मुलगी नव्हती. तेव्हा ‘अण्णांना मुलगी असती, तर..’ या लेखात अण्णांना मुलगी असती तर काय झाले असते, अण्णांच्या संकोची, भिडस्त स्वभावात फरक कसा पडला असता, याविषयी एक कल्पनाचित्र रंगवताना शकुंतलाबाई एक वाक्य लिहितात- ‘आणि मुलगी जर बायाच्या (आनंदीबाई कर्वे.. महर्षी कर्वे यांच्या पत्नी) वळणावर जाती तर अण्णांना संन्यासी होऊन हिमालयात पळून जाण्याची वेळ तर आली नसती ना?’ या एका वाक्यातून त्या जे व्यक्त करतात, ते कदाचित दोन पृष्ठे लिहूनही व्यक्त करता आले नसते.

शकुंतलाबाईंच्या सर्वव्यापी अनुभवविश्वाची ओळख ‘झलक परदेशवारीची’मधील दोन लेखांतून होते. फ्रान्स आणि ऑस्ट्रेलिया येथील वास्तव्यातील अनुभवांचे कथन या लेखांमध्ये आहे. या लेखांतून जाणवते ती त्यांची सूक्ष्म व अचूक निरीक्षणशक्ती. फ्रेंच माणसाची विनोदबुद्धी आणि ‘नवं जग’मध्ये ऑस्ट्रेलियातील जीवनमानाचे त्यांनी नेमकेपणाने वर्णन केले आहे.

संततीनियमनाच्या प्रचार व प्रसाराचे त्यांचे महत्त्वपूर्ण कार्य आणि राज्यसभेच्या सदस्य म्हणून त्यांनी केलेले काम ही शकुंतलाबाईंच्या सार्वजनिक कार्याची वैशिष्टय़े होत. तद्संबंधीच्या लेखांशिवाय या पुस्तकाला परिपूर्णता आली नसती हे ओळखून ‘आले वारे, गेले वारे। प्रजा वाढते हेच खरे।’ आणि ‘राष्ट्रपती नियुक्तीची सहा वर्षे’ या दोन महत्त्वाच्या लेखांची निवड ‘अनुभवकथन’ विभागात केली गेली आहे. शकुंतलाबाईंच्या व्यक्तिमत्त्वाची अतिशय महत्त्वाची बाजू या दोन्ही लेखांतून समोर येते. त्यांची कामाची तळमळ, कार्यातील समर्पित भावना, एकाच वेळी विविध स्तरांवर काम करण्याची वृत्ती, स्पष्टवक्तेपणा त्यातून व्यक्त होतो. खेडोपाडी संततीनियमनाचा प्रसार करताना बहुजन समाजातील अनुभवी व्यक्तींच्या अनुभवकथनाचा त्याकरता जास्त उपयोग होईल, हे हेरून त्यांनी संततीनियमनाची शस्त्रक्रिया करून घेतलेल्या स्त्री-पुरुषांना या प्रचार दौऱ्यांमध्ये सहभागी करून घेण्यात त्यांची चाणाक्ष व व्यावहारिक दृष्टीही दिसून येते. राज्यसभेच्या सहा वर्षे त्या सदस्य होत्या. एकंदर अनुभवाचे सार वर्णन करताना त्या लिहितात- ‘अशा उदात्त वातावरणात चमकणाऱ्या दिल्लीत मी १९६४ च्या एप्रिलमध्ये प्रवेश केला. ‘दुरून डोंगर साजरे’ या म्हणीचा कधी प्रत्यय आला असेल तर तो दिल्लीत गेल्यावर.’ आता तर दिल्लीचे डोंगर दुरूनही साजरे दिसत नाहीत. दिल्लीतील वातावरण, संसद सदस्यांची एकंदर वृत्ती इत्यादीवर त्यांनी केलेले भाष्य हे तिथल्या आजच्या परिस्थितीच्या उगमकाळाकडे निर्देश करते. हे दोन्ही लेख मुळातूनच वाचले पाहिजेत. परिशिष्टात म. वा. धोंड आणि विनया खडपेकर यांनी शकुंतलाबाईंच्या घेतलेल्या दोन महत्त्वाच्या मुलाखतींचा समावेश आहे.

संपादिकेने केलेली निवड उत्तमच आहे, परंतु एक-दोन बाबी जाणवतात. २००५-२००६ हे शकुंतलाबाईंचे जन्मशताब्दी वर्ष होते. त्या वर्षी पुस्तकाचे प्रकाशन होते तर ते अधिक सयुक्तिक ठरले असते. प्रत्येक लेखाच्या शेवटी पूर्वप्रसिद्धी देणे आवश्यक होते. तसेच त्यांच्या समग्र साहित्याची सूचीही द्यायला हवी होती. शकुंतलाबाईंनी हुजूरपागेत शिकत असताना ‘बालिकादर्श’मध्ये बरेच लेख लिहिले होते. त्यापैकी एखादा लेखही पुस्तकात शोभला असता. उदा. ‘आमच्या लाडक्या मांजरांचा इतिहास!’ अशा काही त्रुटी जाणवत असूनही या पुस्तकाचे महत्त्व बिलकूल कमी होत नाही. ज्येष्ठ वाचकांना पुनर्भेटीचा आनंद तर मिळेलच, परंतु आजच्या पिढीलाही हे पुस्तक वाचून निश्चितपणे समाधान मिळेल.

‘निवडक शकुंतला परांजपे’,

संपादक- विनया खडपेकर,

राजहंस प्रकाशन, पुणे,

पृष्ठे- २७३, मूल्य- ३०० रुपये.

डॉ. स्वाती कर्वे

First Published on August 13, 2017 1:10 am

Web Title: nivadak shakuntala paranjape book by vinaya khadapekar