विजय पाडळकरांची ‘कवीची मस्ती’ ही कादंबरी वाचणे हा एकाच वेळी अस्वस्थ करणारा आणि समृद्ध करणारा अनुभव आहे. मीही एक कवी आहे आणि माझ्यासारख्या कवीला पाडळकरांनी त्यांच्या कादंबरीतून कवीची मस्ती काय असते याचे पुन्हा एकदा स्मरण करून दिले आहे. कुठलाही ग्रंथ आस्वादण्याचा प्रारंभ त्याच्या मुखपृष्ठापासूनच होतो. बाराहाते यांनी कादंबरीतील आशयाशी एकरूप होऊन अप्रतिम मुखपृष्ठ चितारले आहे. माझ्या पिढीत शबनम ही कवीच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग होती. हे प्रतीक कल्पकतेने चित्रकाराने मुखपृष्ठावर चितारले आहे.

ही कादंबरी आपण का वाचावी, तिच्यासाठी वेळ का द्यावा, आणि इतरांना तिच्याबद्दल सांगण्याचा खटाटोप का करावा, याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी पहिले कारण- तिचे शीर्षक हे आहे. ‘मस्ती’ या शब्दाला किती वेगवेगळे अर्थ देता येतात, हे या ग्रंथात शिरल्याशिवाय कळणार नाही. ही मस्ती कवीची असणे याला फार वेगळा आणि महत्त्वपूर्ण अर्थ आहे. मस्ती तर प्रत्येकाच्या अंगात असतेच. गावगुंडापासून पोलीस वा इतर अधिकाऱ्यांपर्यंत, राजकारण्यांपासून ते उद्योगपतीपर्यंत मस्तीची अनेक रूपे आपल्याला प्रत्यही अनुभवास येत असतात. पण कवीची मस्ती आणि समाजातील इतरांची मस्ती यांत एक मूलभूत फरक आहे आणि पाडळकरांनी तो समर्थपणे उलगडून दाखवला आहे. ज्याच्या वेगवेगळ्या पैलूंवर बोलता येऊ शकते, ज्याची विविधांगी समीक्षा केली जाऊ शकते असे हे विलक्षण लेखन आहे. या कादंबरीची रचना, तिचे तंत्र, लेखकाची शैली या सगळ्याचा स्वतंत्रपणे अभ्यास व्हायला हवा. जगातील पहिल्या आधुनिक कादंबरीच्या तंत्राशी मिळतीजुळती अशी शैली जाणीवपूर्वक लेखकाने यात निवडली आहे. आद्य कादंबरीकार सर्वातीस आणि त्याची प्रसिद्ध जोडगोळी डॉन किहोते आणि सांचो पांझा यांचा आपल्या जडणघडणीवर फार मोठा प्रभाव आहे, असे पाडळकरांनी अर्पणपत्रिकेत नोंदविले आहे. ही कादंबरी थेट ‘डॉन किहोते द ला मान्चा’शी नाते सांगते. या कादंबरीच्या प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीस पाडळकरांनी इंट्रो वापरले आहेत. हे इंट्रो टूम म्हणून नव्हे, तर आशयाची गरज म्हणून त्यांनी योजले आहेत. पूर्वीचे कथाकार गोष्ट सांगताना श्रोत्यांचे औत्सुक्य वाढावे म्हणून ज्या शैलीचा वापर करीत तीच लेखकाने येथेही वापरली आहे.
ह. ना. आपटे यांची ‘उष:काल’ ही कादंबरी ज्यांनी वाचली असेल त्यांच्या हे ध्यानात येईल, की लेखकाने त्यांच्या शैलीचेदेखील पुनरुज्जीवन केले आहे. ‘आपला कथानायक आता काय करतो आहे ते बघू..’ अशी विधाने कादंबरीत अधूनमधून येतात. ही केवळ एक क्लृप्ती नव्हे. हे ब्रेख्तचे ‘एलिनेशन टेक्निक’ आहे. एखादी कलाकृती अनुभवत असताना आपण त्या आभासी वास्तवात पूर्णपणे रममाण होऊन जातो- न जातो तोच ब्रेख्त आपल्याला जमिनीवर.. वास्तव जगात आणून ठेवतो. हे टेक्निक तंत्राचा कुठलाही बडेजाव न करता, आपण नवीन काहीतरी करीत आहोत असा आव न आणता कादंबरीत समर्थपणे वापरले गेले आहे.
पाडळकरांचा सिने-माध्यमाचा आणि जागतिक कथा-साहित्याचा फार मोठा अभ्यास आहे. त्याचा या कादंबरीत आपल्याला दृश्यात्मक असा सुंदर प्रत्यय येतो. ज्याला फ्रेम टू फ्रेम सिनेमा कसा पाहावा हे माहीत आहे अशा कलाकाराचे हे लेखन आहे. त्याला आपल्या माध्यमाचे पूर्ण ज्ञान आहे. माध्यमभान सुटल्यामुळे मराठी साहित्याचा दर्जा, त्याची गुणवत्ता यावर फार मोठा परिणाम झाला आहे ही गोष्ट सहसा विसरली जाते. या कादंबरीत जी वर्णने आहेत ती आपल्यासमोर नेमके व सुस्पष्ट दृश्ये उभी करतात. आपल्याला तो कवी दिसतो, ती माणसे दिसतात. असे वाटते की, आपण त्या पात्रांना स्पर्श करू शकू. इतकेच नव्हे तर प्रसंगांतील ते गंध आपल्या मनात दरवळत राहतात. ते आवाज आपल्याला ऐकू येतात. सिनेमाच्या व्याकरणाचा या कादंबरीत अत्यंत अप्रतिम उपयोग पाडळकर यांनी करून घेतला आहे. ही कादंबरी वाचताना एखादा जागतिक दर्जाचा, सार्थक, अभिजात सिनेमा पाहतो आहोत अशी सतत जाणीव होत राहते. विविध कलांचा आणि त्यांच्या आंतरसंबंधाचा अभ्यास कलाकृतीला किती समृद्ध बनवतो याचे हे उत्तम उदाहरण आहे.
या कादंबरीतील जो नायक आहे त्याला नाव नाही. तो कोणताही कलावंत असू शकतो. ही कादंबरी नायकप्रधान आहे, तरी तिचे अत्यंत महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे नायकाच्या जीवनातील घटना व प्रसंग म्हणजे ही कादंबरी नव्हे. लेखक घटना अत्यंत ठळकपणे मांडतो, पण त्याचवेळी त्याला घटनांच्या पलीकडले विश्व दाखवायचे असते. कादंबरीची सुरुवात मराठवाडा साहित्य संमेलनातील कवी संमेलनाच्या तपशीलवार वर्णनाने होते. या संमेलनाच्या निमित्ताने अनेक कवींचे, संचालनकर्त्यांचे, श्रोत्यांचे, रसिकांचे वागणे आपल्याला पाहावयास मिळते. येथेही केवळ संमेलनातील घडामोडींचे वर्णन करणे हा लेखकाचा हेतू नाही. इतरांचे हे वागणे आणि त्यावरील नायक कवीची प्रतिक्रिया यांतून कवीचे व्यक्तिमत्त्व साकार होत जाते. फार कमी कादंबऱ्यांत नायकाचे व्यक्तिमत्त्व या पद्धतीने खुलविले गेले आहे. भ्रम आणि वास्तव यांतील द्वंद्व हा या कादंबरीचा मूळ गाभा आहे. तेच तिचे प्रमुख आशयसूत्र आहे. हे कवीचे चरित्र नाही, त्याचा जीवनप्रवास नाही, ही कहाणी नाही.. ही गोष्ट आहे. पाडळकरांनी ‘गोष्ट’ हा फार चांगला शब्द वापरला आहे. समोर घडते आहे ती एक गोष्ट आहे हे वाचकाने विसरू नये, कारण सांगितली जाणारी प्रत्येक गोष्ट ही सत्य आणि कल्पिताचे मिश्रण असते असे लेखकानेच सुरुवातीला विधान केले आहे. हे फार सुंदर आणि सरळ समीकरण आहे. या गोष्टीत नायकाचा मित्र डॉक्टर देशमुख हे एक पात्र आहे. तो कदाचित आदर्श मित्र वाटेल; पण तो तसा आहे म्हणूनच कवीचा प्रवास पुढे सरकतो आहे. हा कवी पेशाने शिक्षक आहे. त्याचे सहकारी शिक्षक, मुख्याध्यापक, वर्गातील मुली, शिकविण्यात पूर्णपणे गुंतून जाण्याची कवीची धडपड, कवीला जवळची वाटणारी मृणाल ही मुलगी, तिच्या निमित्ताने वर्गातील इतर मुलींचा जमलेला गट, शिक्षकांनी केलेले किळसवाणे राजकारण, त्यात होणारी कवीची फरफट, त्याची चौकशी आणि त्यांतून सोडविण्यासाठी मित्राने केलेले प्रयत्न, कवी आणि कविता यांचे नाते, कवीचा स्वभाव, त्याचे चरित्र, त्याचे चारित्र्य हे सारे अत्यंत वेगवान घटनांतून आपणासमोर उलगडत जाते. कथानक इतके वेगवान व प्रवाही आहे, तरी लेखकाचे वैशिष्टय़ हे, की कुठलाच प्रसंग लांबत नाही की कमी पडला असेही वाटत नाही. इतके टोकदार, इतके नेमके लेखन मराठीत फार कमी वेळा झालेले आढळते.
तरीही सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे ही घटनाप्रधान कादंबरी नाही. अनेक मूलभूत प्रश्नांची मांडणी या कादंबरीत लेखकाने केली आहे. कलाकृतीची निर्मितीप्रक्रिया आणि कलावंत यांच्या संदर्भातील हे प्रश्न अत्यंत मोलाचे आहेत. नायक पूर्ण कवितामय आहे. ‘मी कवी म्हणूनच जगेन..’ असा त्याचा आग्रह आहे. आपली निर्मिती श्रेष्ठ दर्जाची आहे असा सार्थ अभिमान त्याला आहे. कलावंताचे हे एक वेगळे जग आहे. वास्तव जगातच; पण त्याहून अलग असणारे. कवी ज्या पद्धतीने जगू पाहतो आहे, जसे त्याला जगावेसे वाटते, तसे जग त्याला जगू देत नाही. पण हळूहळू आपल्या मनातील कल्पना हे सारे भ्रम आहेत हे त्याच्या ध्यानात येऊ लागते. आता समोर प्रश्न येतात ते असे : माणूस भ्रमात आहे असे आपण म्हणतो. पण भ्रमात राहणे- न राहणे माणसाच्या हातात असते का? भ्रमात न राहता जगता येते का? मनात भ्रम का निर्माण होतात? कसे निर्माण होतात? श्रेष्ठ कलाकृती हातून घडावी हे कलावंताचे स्वप्न असते. पण ती घडणे हे माणसाच्या हातात नाही. ठरवून श्रेष्ठ कलाकृती घडू शकत नाही. अशी कलाकृती घडण्यासाठी कलावंताची ‘निवड’ व्हावी लागते असे म्हटले जाते. मग कवीच्या मनात असा प्रश्न निर्माण होतो की, त्या निवड करणाऱ्या शक्तीने माझी का निवड केली नाही? सर्जनशीलतेसंबंधात अत्यंत महत्त्वाचे असे मूलभूत प्रश्न येथे मांडले गेले आहेत. ते उपरे नाहीत. लेखकाच्या ते मनात आहेत म्हणून काही ते कादंबरीत येत नाहीत; तर या प्रश्नांनी कवीला आयुष्यभर छळले आहे म्हणून येतात.
कवी आपल्यातच गर्क आहे. मस्तीत मस्त आहे. त्याला समाजाशी काही देणेघेणे नाही का, त्याला सामाजिक बांधीलकी नाही का, असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. पण लेखकाने ज्या परिवेशात आपल्या लेखनव्यूहात ते घेतले आहे, त्याची नैसर्गिक वाढ झाली आहे की नाही हे पाहणे महत्त्वाचे आहे. वाचकाने आपल्या अपेक्षा त्यावर लादू नयेत. तसे पाहू जाता ही कादंबरी सामाजिक वास्तवाचेच दर्शन घडवते. कारण महत्त्वाचा प्रश्न असा निर्माण होतो की, कवीच्या मनात आपल्या कलाकृतीविषयी ज्या अपेक्षा निर्माण होतात त्या त्याला कुणी दिल्या? भोवतालच्या समाजानेच! कवी ज्या प्रश्नांची उत्तरे शोधतो आहे ते आजच्या समकालीन साहित्यव्यवहारातील कळीचे प्रश्न आहेत आणि ते या कादंबरीशिवाय इतरत्र इतक्या प्रभावीपणे आणि ठामपणे; तरीही नम्रपणे व्यक्त झालेले नाहीत.
ज्या संयतपणे लेखक हा जीवनव्यवहार मांडतो त्याचेही मोठे मोल आहे. या संपूर्ण पुस्तकात फक्त एक शिवी आली आहे आणि तीही अर्धी! मराठीत पाडळकरांची ही रचना आगळीवेगळी आहे. या आगळेपणाचे एक कारण हेही आहे की, पाडळकर यांच्यावर समकालीन मराठी साहित्याचा कसलाच प्रभाव नाही. त्यांच्यावर प्रभाव आहे तो अभिजात जागतिक साहित्याचा व चित्रपटांचा. इथल्या मातीत मुळे असणारी, तरी विश्वात्मक असणारी ही कलाकृती आहे. म्हणूनच या कादंबरीचे तंत्र, शैली, निवेदन, लेखनव्यूह, नैसर्गिक विकास आणि तीत उभे केलेले प्रश्न हे सहसा मराठी लेखकाला पडणारे प्रश्न नाहीत. कारण बहुसंख्य मराठी लेखकांजवळ या प्रश्नांची तयार उत्तरे आहेत. पाडळकरांजवळ उत्तरे नाहीत, कारण अंतिम उत्तरे मिळत नसतात हे त्यांना ठाऊक आहे.
ही कादंबरी जिथे संपते तिथून पुढे सुरू होते. कादंबरीतील शेवटच्या प्रकरणाचे नाव लेखकाने ‘प्रकरण शेवटून पहिले’ असे दिले आहे. कवी स्वत:ला डोहात झोकून देतो. आयुष्य संपल्यावर तो ईश्वराकडे जातो. ईश्वराला म्हणतो, की त्याचे प्रश्न पूर्वीच्या जगात सुटले नाहीत. हे ईश्वरा, तूच त्या प्रश्नांची उत्तरे दे. आणि दयाघन परमेश्वर म्हणतो, ‘मी प्रयत्न करीन. पण मानवाच्या साऱ्याच प्रश्नांना मजजवळ उत्तरे आहेत असे तू समजू नकोस.’ कवी परत फिरतो.
कवी परत फिरला याचा अर्थ या प्रश्नांचा आणि जीवनाचा हा जो व्यूह आहे तो तेथे संपत नाही. पुढेही अनेक कलावंत या जगात येत राहणार, असेच जगणार, असेच त्यांचे भ्रम असणार, असेच त्यांचे भ्रमनिरास होत राहणार, ते असेच प्रश्न विचारणार, आणि त्यांची उत्तरे शोधण्यात त्यांची यात्रा संपून जाणार..
वाचकाची कलात्मक जाण वाढवणारा हा ग्रंथ आहे. तो वाचणारा वाचकसुद्धा सुबुद्ध, सुजाण, साहित्याची जाण असणारा असावा अशी अपेक्षा आहे. ज्या पद्धतीने पाडळकरांनी हे विश्व उभे केले आहे ते विश्व आजचे सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, जीवनविषयक, अस्तित्वविषयक असे वास्तव आहे आणि त्या वास्तवाची ही कादंबरी आहे. या पद्धतीची रचना मराठीत येणे ही अत्यंत दुर्मीळ गोष्ट आहे. अशा अभिरुचीचे जतन करणे ही काळाची गरज आहे.

‘कवीची मस्ती’- विजय पाडळकर,
मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई,
पृष्ठे-२६४ , किंमत- ३२५ रुपये.