भारतात ऑनलाइन मेडिसिन सुविधा सुरू होऊन फार वर्षे झालेली नाहीत. गेल्या चार-पाच वर्षांतच ही सुविधा देशात हळूहळू पाय रोवू लागली आहे. या सेवेकरता मूळात इंटरनेट सुविधा सार्वत्रिकरीत्या उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे या सुविधेच्या विस्ताराला सध्या तरी भारतात काही मर्यादा आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत आर्थिक उदारीकरण, मोबाइल तंत्रज्ञानाचा तळागाळातील लोकांपर्यंत झालेला विस्तार, वाढते शहरीकरण यामुळे ऑनलाइन खरेदीचे फॅड वाढत चालले आहे. अनेक वस्तू आता ऑनलाइन विकत घेण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. त्यात आता ऑनलाइन मेडिसिनची भर पडली आहे. वेगाने ही सुविधा पाय पसरते आहे. यामुळे ग्राहकांना  स्वस्तात औषधे मिळणे तसेच औषध कंपन्यांना मधली वितरणाची साखळी डावलून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे. त्यामुळे त्यांच्याही नफ्यात वाढ होत आहे.

यातही दोन प्रकार आहेत. एक म्हणजे ग्राहक आणि औषध दुकानदार यांच्यातील दुवा म्हणून या ऑनलाइन पुरवठादार कंपन्या काम करताहेत. दुसरे म्हणजे थेट औषध कंपन्यांकडून संबंधित औषधे ग्राहकांना पुरवणे. त्यामुळे मधले घटक गायब झाल्याने औषधे कमी दरात उपलब्ध होण्याची शक्यता वाढली आहे. हा फायदा लक्षात घेऊन ग्राहक आणि औषध कंपन्यांनाही ही सुविधा लाभदायी वाटू लागली आहे. अशा प्रकारच्या दोनशेच्या आसपास छोटय़ा-मोठय़ा ई-फार्मसी स्टार्टअपस् सध्या देशात अस्तित्वात आहेत.

अशा प्रकारे ऑनलाइन औषधे उपलब्ध करून देणारी काही मोबाइल अ‍ॅप्लिकेशन्स / संकेतस्थळे सध्या कार्यरत आहेत. www.medlife.com या संकेतस्थळावर अनेक औषधे मिळतात. मात्र, त्यासाठी डॉक्टरांनी दिलेल्या औषधचिठ्ठीचे (प्रीस्क्रिप्शन) छायाचित्र त्यांना पाठवावे लागते. त्यानुसारच ते औषधे देतात असा दावा या संकेतस्थळावर करण्यात आला आहे. प्रत्यक्ष औषधे पुरवतानाही ते मूळ औषधचिठ्ठीची पाहणी करतात. ‘मेडलाइफ’ नावाचे मोबाइल अ‍ॅपही कार्यरत आहे. www.shopclues.com या संकेतस्थळावर  गर्भपाताची आणि डॉक्टरांच्या औषधचिठ्ठीशिवाय मिळणारी कामोत्तेजक औषधे मिळत होती. मात्र, याबाबत काही माध्यमांत बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर या संकेतस्थळाने ही औषधे हटवली आहेत. त्याशिवाय हृदयासंबंधी आयुर्वेदिक औषधे, पक्षाघाताची औषधे, दारूचे व्यसन सोडवणारी औषधे या संकेतस्थळावरून मागवता येतात. www.practo.com या संकेतस्थळावरही औषधे उपलब्ध होतात. काही औषधांसाठी ते डॉक्टरांची चिठ्ठी मागतात. मात्र, काही औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवायही पुरवली जातात. क्रोसिन, इकोस्प्रिन, अस्थालिन इन्हेलर ही औषधे औषधचिठ्ठीशिवाय मिळतात. ‘प्रॅक्टो’ या अ‍ॅपवरूनही औषधांची मागणी करता येते. www.netmeds.com या संकेतस्थळावर प्रथमोचाराची औषधे मिळतात. याशिवाय बाम, मलम, आयुर्वेदिक औषधे, कामोत्तेजक औषधे तसेच विविध सौंदर्यप्रसाधनेही या संकेतस्थळावरून मागवता येतात. ‘नेटमेड्स’ हे त्यांचे अ‍ॅपही सक्रीय आहे. pharmeasy.in या संकेतस्थळावर औषधाचे नाव दिल्यास ती औषधे उपलब्ध असल्यास त्याबाबतची माहिती दिली जाते. आयुर्वेदिक औषधांबरोबरच मधुमेहावरील आणि नेहमीच्या आरोग्यविषयक समस्यांवरील उपयुक्त औषधे त्यावर मिळतात. प्रथमोपचार आणि सौंदर्यासंबंधित औषधेही त्यावरून मागवता येतात. ‘मायरा मेडिसिन्स’ (Myra Medicines) नावाचे एक मोबाइल अ‍ॅप उपलब्ध आहे. त्यावर मुंबई आणि बंगळुरू या शहरांमधूनच औषधे मागवता येतात. शक्य तितक्या लवकर औषधे घरपोच आणून दिली जातील असा दावा या अ‍ॅपवर करण्यात आलेला आहे.

1mg या अ‍ॅपवर ऑर्डर केलेली औषधे काही तासांतच आणून दिली जातात. येथे जेनेरिक औषधेही विकली जातात. ‘आमच्याकडे विविध विकारांवरील एक लाखापेक्षा अधिक औषधे उपलब्ध आहेत,’ असा दावा त्यांनी केला आहे. दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू, मुंबई, हैदराबादमध्ये या अ‍ॅपद्वारे औषधे मिळू शकतात. तसेच www.1mg.com या संकेतस्थळावरूनही औषधे मागवता येतात. कल्लं८ या अ‍ॅपवर औषधे मागवली तर ती ग्राहकाला दीड तासात  मिळू शकतात. मात्र, औषधे मागवताना डॉक्टरांच्या औषधचिठ्ठीचे छायाचित्र त्यांना पाठवणे आवश्यक असते.

एकुणात आता ऑनलाइन सुविधा हळूहळू विस्तारत आहेत. ग्राहकांचा प्रतिसादही वाढत आहे. तथापि या सुविधेबद्दलची जागरूकता मात्र लोकांमध्ये पाहिजे त्या प्रमाणात अद्यापि झालेली दिसून येत नाही.

संकलन : संदीप नलावडे