11 December 2017

News Flash

इतिहासाचा अरुंद आरसा

यापूर्वी १९८८ साली बॉम्बे आर्ट सोसायटीच्या शताब्दीनिमित्त असंच एक मोठं प्रदर्शन झालं होतं.

अभिजीत ताम्हणे | Updated: February 12, 2017 3:46 AM

भारतीय उपखंडातले अनेक महत्त्वाचे कलावंत आपापल्या उमेदीच्या काळात जिचं पारितोषिक मिळवून नामवंत ठरले, अशी ‘द बॉम्बे आर्ट सोसायटी’ ही संस्था! मुंबईत या संस्थेच्या १८९४ ते २०१६ या काळातल्या प्रदर्शनांचा मागोवा घेणारं एक मोठं प्रदर्शन भरलं आहे. त्यानिमित्तानं महाराष्ट्रीय रसिकांशी चित्र-संवाद साधण्याची ही सुरुवात..

मुंबईच्या रीगल सिनेमासमोरचा चौक. मधोमध या महानगरातलं सर्वात जुनं ‘वेलिंग्टन फाऊंटन’ हे कारंजं. त्याकडे पाठ करून बोरीबंदरच्या दिशेनं निघालं की एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (पूर्वीचं ‘प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम’), तर दुसऱ्या बाजूला ‘राष्ट्रीय आधुनिक कला-संग्रहालय’- म्हणजेच ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’ किंवा ‘एनजीएमए’ असं कलावैभव लाभलेला हा चौक येत्या २६ मार्चपर्यंत निराळ्याच कारणानं महत्त्वाचा ठरणार आहे.. बॉम्बे आर्ट सोसायटीचा तीन शतकांत पसरलेला इतिहास यंदा प्रथमच १८९४ पासून २०१६ पर्यंतच्या प्रत्येक वर्षीच्या किमान एक-दोन चित्रांमधून साकार होणार आहे. प्रदर्शन महत्त्वाचंच आहे, यामागचं एक प्रमुख कारण म्हणजे ही चित्रं पाहणाऱ्या कु-णा-ला-ही चित्रकलेच्या इतिहासाच्या इथं दिसणाऱ्या वाटचालीबद्दल एखादा तरी प्रश्न पडेल! बाकी कारणंही आहेतच. ती आधी पाहू..

‘बॉम्बे आर्ट सोसायटी’ ही भारतीय उपखंडात एकोणिसाव्या शतकापासून आजतागायत टिकून राहिलेल्या चार जुन्या संस्थांपैकी एक. बॉम्बे आर्ट सोसायटीच्या आधी कोलकाता आणि मद्रासची सरकारी कला-महाविद्यालयं तसंच मुंबईचे ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’ स्थापन झाले. आणि या चारही संस्था आजही सुरू आहेत. त्याखेरीज १८७१ सालची ‘सिमला आर्ट सोसायटी’ आणि १८७३-७४ सालापासून पुण्याची ‘पूना आर्ट सोसायटी’ या संस्थासुद्धा होत्या; पण त्या मध्येच कधीतरी बंद पडल्या. दरवर्षी देशभरातल्या चित्रकारांना आपापली कामं पाठवण्याचं खुलं आवाहन करून, त्यातल्या निवडक चित्र-शिल्पांचं प्रदर्शन भरवणाऱ्या या आर्ट सोसायटय़ांमध्ये ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’ची भर पडली १८८८ सालच्या डिसेंबरात. मग लगेचच १९८९ च्या फेब्रुवारीत या सोसायटीनं पहिलं वार्षिक प्रदर्शन भरवलं. त्यात ‘जे. जे.’च्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी भाग घेतला. आज कलाक्षेत्रावर ‘पेज थ्री- पार्टी कल्चर’ची जी टीका केली जाते, ती तेव्हाही करता आली असती, कारण १८९० च्या- म्हणजे दुसऱ्या वार्षिक प्रदर्शनाच्या पूर्वसंध्येला ‘कॉन्व्हर्साझिओन’ (संभाषणे) असत. मंद संगीताच्या साथीने ही संभाषणे चालत. त्याचा वृत्तान्त तेव्हाच्या एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिला आहे. नलिनी भागवत यांनी बरीच र्वष अभ्यास करून अखेर १९८३ साली पूर्ण केलेल्या ‘डेव्हलपमेंट ऑफ कन्टेम्पररी आर्ट इन् वेस्टर्न इंडिया’ या पीएच. डी. प्रबंधात या ‘संभाषणां’चा उल्लेख आहे आणि ‘त्या’ वृत्तान्ताची १५ मार्च १८९० ही तारीखही. पण आपल्यासाठी महत्त्वाचं असं की, तेव्हा राजा रविवर्मापासून अनेक गाजलेले, नावाजलेले चित्रकार या प्रदर्शनांमध्ये सहभागी होत होते. बॉम्बे आर्ट सोसायटीनं १८९४ पासून सुवर्णपदकं आणि गव्हर्नर (बॉम्बे प्रेसिडेन्सीचा ब्रिटिश राज्यप्रमुख) पारितोषिक अशी दोन सर्वोच्च बक्षिसं देण्यास सुरुवात केली. तेव्हापासून ते २०१६ पर्यंत विविध बक्षिसांची संख्या वाढतच गेली आहे. मानाचे समजले जाणाऱ्या ‘बेन्द्रे-हुसेन अभ्यासवृत्ती’, ‘रूपधर (कारकीर्द गौरव) पुरस्कार’ अशांची महत्त्वाची भर या बक्षिसांच्या यादीत पडली आहे. सुवर्णपदक किंवा गव्हर्नर पारितोषिक मिळवलेल्यांचं किंवा ‘बेन्द्रे-हुसेन’, ‘रूपधर’ मानकऱ्यांचं एक तरी चित्र/ शिल्प लोकांना दिसण्याची सोय असलेलं एक प्रदर्शन १२५ व्या वर्षी तरी असावं, अशी बॉम्बे आर्ट सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचीच नव्हे, तर चाहत्यांचीसुद्धा इच्छा होती. चित्रकार, चित्रकलेचे माजी प्राध्यापक आणि अभ्यासक सुहास बहुळकर यांनी त्यांची सर्व आयोजन कौशल्यं वापरल्यामुळे ती पूर्ण होते आहे. बहुळकर हे सध्या ‘एनजीएमए’च्या मुंबई समितीचे प्रमुख आहेत. ही ‘गुड ऑफिसेस’ बॉम्बे आर्ट सोसायटीसाठी वापरून अक्षरश: अशक्य ते शक्य करण्याचं काम बहुळकरांनी केलं आहे.

यापूर्वी १९८८ साली बॉम्बे आर्ट सोसायटीच्या शताब्दीनिमित्त असंच एक मोठं प्रदर्शन झालं होतं. पण तेव्हा चित्रांना एक तर लिलावांचे वगैरे पाय फुटले नव्हते. ‘दिल्ली आर्ट गॅलरी’सारख्या एकेका दिवंगत गतकालीन चित्रकाराची सर्वच्या सर्व चित्रं-रेखाटनं एकगठ्ठा विकत घेणाऱ्या गॅलऱ्या नव्हत्या. ‘माझ्याकडली चित्रकलेबद्दलची कागदपत्रं हवी असल्यास अडीच लाख रुपये मोजा..’ म्हणणारे चित्रकारांचे वारसदार नव्हते (नसावेत). चित्रं काही दिवसांकरिता मांडायला देण्यासाठी अवाच्या सवा विमा-रक्कम मागण्याची प्रथा संग्रहालयांमध्ये तेव्हा रुजलेली नव्हती. आणि मुख्य म्हणजे चित्रकारही तोवर बॉम्बे आर्ट सोसायटीला महत्त्व देत होते. राज्याचे माजी कलासंचालक बाबूराव सडवेलकर यांनी तेव्हा त्या प्रदर्शनाचं नियोजन केलं होतं. त्या प्रदर्शनाची पुण्याई अभ्यासरूपानं कुठेच उरली नसल्यामुळे २५ वर्षांनी पुन्हा अभ्यास करावा लागला, अशी आपल्या कलाक्षेत्राची स्थिती आहे. त्यातही शोचनीय बाब अशी की, १९८८ नंतर बक्षीस वा पदक मिळवणारी चित्रं जमवताना सर्वाधिक मेहनत करावी लागली. त्यामुळे काही विजेत्यांची ‘ती’- बक्षीसपात्र चित्रं इथं आलेलीच नसून त्याऐवजी ‘तसंच दुसरं’ चित्र लावलेलं आहे, हेही यंदाच्या प्रदर्शनातून दिसेलच. दहा-पंधरा गुणी चित्रकार या पारितोषिकांपासून वंचित राहिले होते, त्यांचीही चित्रं इथं आवर्जून आहेत.

या सगळ्या गोष्टींना ‘कलाबाह्य़’(?) म्हणून बाजूला सारून समजा फक्त प्रदर्शनाकडेच पाहिलं तर काय काय दिसेल? तो अनुभव कसा असेल? मुळात आधी इथं काय काय दिसू शकेल याची यादी करू. मग जे दिसलं त्याचा परिणाम काय होऊ शकतो याची चर्चा करता येईल. ती यादी अशी : (१) जुनी, ‘त्या काळातलं जग’ दाखवणारी चित्रं, (२) मानवाकृती चितारण्यातल्या कौशल्याचं लोभस दर्शन घडवणारी, मुंबईच्या ‘अकॅडमिक शैली’च्या सुवर्णकाळातली चित्रं आणि शिल्पं, (३) स्वातंत्र्याची वाट पाहणारी आणि लघुचित्रांवर आधारलेल्या ‘भारतीय शैली’चा शोध घेणारी चित्रं, (३ अ) भारतीय संस्कृतीचं दर्शन पाश्चात्त्य तंतोतंत मानवाकृतींतून घडवणारी चित्रं, (४) मानवाकृतीचा किंवा निसर्गदृश्यांचाही नवा- ‘आधुनिकतावादी’ कलाविचार अंगी बाणवू पाहणारी नवचित्रं, (४ अ) या आधुनिकतावादी रूपरेषांत भारतीय प्रतीकांचं मिश्रण करून सर्जनशोध जिवंत ठेवणारी काही चित्रं, (५) पाश्चात्त्य अमूर्तीकरणवादी आणि व्यक्तिनिष्ठ चित्रपद्धतींना ‘भारतीय तत्त्वज्ञानातल्या अमूर्त विचारा’तून एक उत्तर देऊ पाहणारी, त्यासाठी व्यक्तिनिष्ठतेच्या पुढे जाऊन नवी ‘अमूर्त शैली’ घडवण्याचा प्रयत्न करणारी थोडीफार चित्रं, (६) पुन्हा मानवाकृतीच रंगवायच्या, पण पद्धत मात्र नवीन आणि अगदी आपली स्वत:ची (व्यक्तिनिष्ठ) वापरायची, अशा प्रयत्नांतली चित्रं, (७) ‘कॉम्पोझिशन’ अर्थात रचनाचित्रं आणि त्यांची बदलत गेलेली पद्धत, (८) अलीकडल्या काळातली- जगापासूनचं तुटलेपण व्यक्त करणारी चित्रं, (९) अलीकडल्याच काळातली, पण ज्यापासून आपण सर्वच जण तुटून एकेकटे उरलो, त्या जगाशी काही आकर्षक दृश्यांमधून नातं जोडू पाहणारी चित्रं, (१०) या सर्व चित्रांखेरीज जुन्या काळाचा साक्षात् प्रत्यय देणारी काही कागदपत्रं, माहितीफलक, वगैरे.

ही यादी ‘दिसणं, पाहणं आणि त्याचा परिणाम म्हणून इतर दृश्यांचीही सांधेजोड होऊन चित्राबद्दल काहीएक कल्पना तयार होणं’ या क्रियेशी संबंधित आहे. त्यामुळे ती आणखी कितीही वाढवता येईल. ‘एनजीएमए’ कलादालनाला पाच मजले आहेत. त्यांतून या दहापैकी नऊ वैशिष्टय़ांतलं  एक तरी, किंवा एका वेळी दोन वैशिष्टय़ं असलेली चित्रं दिसत राहतील. उदाहरणार्थ, अमृता शेरगिल यांच्या १९३७ च्या सुवर्णपदकविजेत्या चित्रात (त्याचा प्रिंटच इथं असला तरी) क्रमांक ३ आणि ४ या वैशिष्टय़ांचा संगम दिसेल. यादीतल्या क्रमांक १ ची वैशिष्टय़ं पाश्चात्त्य चित्रकार मारी हेन्डरसन, कर्नल ई. ए. होड्बे, तसंच रावबहादूर धुरंधर आणि काही प्रमाणात एस. एल. हळदणकर यांच्या चित्रांमधून दिसतील. १९२० ते १९४० ही दोन दशकं ‘अकॅडमिक शैली’तील कौशल्यपूर्णतेच्या पराकोटीला पोहोचली होती, हे या प्रदर्शनातून उमगेल. आणि त्यानंतरच्या आधुनिकतावादी चित्रांशी मात्र ‘आपला काही चित्रकलेशी संबंध नाही बुवा!’ म्हणणाऱ्या रसिकांना (ते एरवी रसिकच असले तरी) दुरावा वाटेल.. हा दुरावा उदाहरणार्थ, २००५ सालचं राज्यपाल पारितोषिकविजेत्या राहुल वजाळे यांच्या एका चित्रासमोर अगदी पराकोटीला जाऊ शकतो. (अशी चित्रं बरीच आहेत, पण उदाहरण वजाळे यांचं घेतलं.) आणि मग ‘आपल्याला ही चित्रं का आवडत नाहीत?’ असा प्रश्न कोणालाही- अगदी कोणालाही पडू शकतो.

हा प्रश्न समजा पडला, तर ते या प्रदर्शनाचं मोठंच यश.

आपण मराठी वाचणारे, मराठी भाषेत विचार करू/ समजून घेऊ शकणारे- महाराष्ट्रीय. आपल्या राजधानीतली एक जुनी संस्था. तीही कशी? तर केरळच्या रविवर्मा यांच्यापासून ते लाहोरमध्ये राहू लागलेल्या अमृता शेरगिलपर्यंत किंवा कोलकात्याच्या हेमेन मजुमदारांपर्यंत आणि १९५० च्या दशकात दिल्लीकर चित्र-शिल्पकारांचा ‘दिल्ली ग्रुप’ स्थापणाऱ्या शंखो चौधुरींपासून ते बडोदे-अहमदाबाद न सोडणाऱ्या अलीकडल्या हिंडोल ब्रह्मभट्टपर्यंत अनेक बिगर-महाराष्ट्रीयांनाही जिथं बक्षीस मिळवावंसं वाटलं- अशी संस्था! म्हणजेच भारतातली एक प्रतिष्ठित कलासंस्था. शिवाय जुनीसुद्धा. ती आपल्या भूमीवर होती. अगदी ‘जहांगीर आर्ट गॅलरी’तच गेली सुमारे ५० र्वष तिचं ठाणं होतं. आता तर वांद्रे इथं ‘रंगशारदा’च्या समोरच तिचं देखणं मुख्यालयही आहे. अशी संस्था काय करते आहे, कोणाला बक्षिसं देते आहे, आणि ती बक्षिसं का मिळताहेत, याकडे कधीही पाहावंसं आपल्याला वाटलं नसणार. म्हणूनच आज या प्रतिष्ठित संस्थेनं गेल्या ३०-४० वर्षांत पारितोषिकप्राप्त, सन्मानप्राप्त ठरवलेल्या चित्रांनाही आपण नाकं मुरडतो.

‘आपल्याकडे चित्रं पाहण्याचं कल्चरच नाही..’ अशी हाकाटी काही लब्धप्रतिष्ठित करत असतात. बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनांमधून गेल्या काही वर्षांत भंडारा, रिसोड, खटाव इथं मूळ असलेल्या चित्रकारांचीही चित्रं लागलेली आहेत. बॉम्बे आर्ट सोसायटीनं युद्धकाळाचा अपवाद वगळता प्रदर्शन भरवण्यात हयगय केली नाही; पण आपण मात्र प्रदर्शन पाहण्यात केली.

ते आता तरी थांबावं, यासाठी हे प्रदर्शन. आणि त्यात आपल्यापैकी अनेकांना पडू शकणारा प्रश्नसुद्धा महत्त्वाची भूमिका बजावेल. अगदी आपल्याच कलेचा, इथल्या प्रादेशिक, ‘स्थानीय’ कलेचा हा आरसा आहे. जागतिक कलेच्या इतिहासात तो आरसा अरुंदच भासणार, यात शंका नाही. पण या आरशात जे दिसतंय ते नेमकं काय आहे, हे तरी आपण पाहणार की नाही?

शिल्पकार बी. व्ही. तालीम यांचे ‘टकळी’ हे शिल्प (१९३२), चित्रकार ए. एच. मुल्लर यांचे ‘प्रिन्सेस डोनेटिंग इयरिंग्ज टु ब्राह्मीन बॉय’ (१९११),ए. एक्स. त्रिन्दाद कृत, पत्नी फ्लोरेंटिना यांच्या चित्राचा अंश (१९२०), राहुल वजाळे यांचे राज्यपाल-पदकविजेते चित्र (२००५), अमृता शेरगिल यांचे ‘थ्री गर्ल्स’ (१९३७), एस. एल. हळदणकर यांनी जलरंगांत केलेल्या एका व्यक्तिचित्राचा अंश आणि शिल्पकार वि. पां. करमरकर यांची ‘मत्स्यकन्या’ (१९३०) 

अभिजीत ताम्हणे abhijit.tamhane@expressindia.com  

First Published on February 12, 2017 3:46 am

Web Title: painting exhibition by the bombay art society