भारतीय भाव-नाटय़-चित्रपट संगीतावर पाश्चात्त्य संगीताचा मोठा प्रभाव आहे. मात्र पाश्चात्त्य संगीत, त्यातील संकल्पना आणि संज्ञांविषयी नेमकी जाण अनेकांना नसते. पाश्चात्त्य संगीताविषयी बोलताना, लिहिताना मेलडी, हार्मनी, रिदम असे अनेक शब्द सैलपणे वापरले जाणे हे त्याचेच उदाहरण ठरावे. या संज्ञा-संकल्पनांविषयी मराठी भाषेत साक्षेपी माहिती देणाऱ्या परिपूर्ण संदर्भग्रंथाची उणीव ध्यानात घेऊन ज्येष्ठ संगीतशास्त्री डॉ. अशोक दा. रानडे यांनी तब्बल चार दशकांच्या संशोधन-व्यासंगातून पाश्चात्त्य संगीतसंज्ञा कोशया कोशाचे काम जवळजवळ पूर्णत्वास नेले होते. मात्र, तो प्रसिद्ध होण्याआधीच- २०११ साली त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्यानंतर त्यांचे शिष्य संगीतज्ञ चैतन्य कुंटे यांनी या कोशाचे संपादन पूर्ण केले. लवकरच पॉप्युलर प्रकाशनातर्फे हा ग्रंथ प्रसिद्ध होत आहे. मराठीतच नव्हे, तर एकूणच भारतीय भाषांतील पहिला ठरलेला आणि संगीत अभ्यासकांबरोबरच रसिकांसाठीही उपयुक्त ठरणारा हा कोश वाचकांपर्यंत पोहोचणे ही सांस्कृतिक गरज आहे, हे ध्यानात घेऊन या कोशाची लोकसत्ता संपादक शिफारससाठी निवड करण्यात आली आहे.

या संज्ञाकोशाचे संपादक चैतन्य कुंटे यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा संपादित अंश..

Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
freedom of artist marathi news
‘कलानंद’ हवा असेल तर ‘कलाकाराचं स्वातंत्र्य’ मान्य करता आलं पाहिजे…
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..

भारतीय कला आणि संस्कृतीचे अभ्यासक, भाष्यकार, प्रयोगशील संगीतकार, गायक, साहित्यिक आणि अध्यापक अशा विविध नात्यांनी आपली कारकीर्द घडवणारे संगीताचार्य अशोक दा. रानडे (२५ नोव्हेंबर १९३७ – ३० जुल  २०११) यांनी मुंबई विद्यापीठाच्या संगीत केंद्राचे पहिले संचालक (१९६८-८३), अमेरिकन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियन स्टडीज्च्या अर्काइव्हज् अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरचे साहाय्यक संचालक (१९८३-८४) आणि नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिग आर्ट्सचे उपसंचालक अशी जबाबदारीची पदे सांभाळली.

संगीत आणि अशोक दा. रानडे हे समानार्थी शब्द असावेत इतके रानडे सर संगीतमय होते. तेच त्यांचे जीवन होते, तोच त्यांचा ध्यास होता. लोकसंगीतापासून अभिजात शास्त्रीय संगीतापर्यंत आणि पाश्चात्त्य संगीतापासून हिंदी चित्रपट संगीतापर्यंत सर्व प्रकारच्या संगीतात त्यांनी केवळ रस घेतला असे नव्हे, तर त्यांचा विशेष अभ्यास केला. रानडे सरांचे वेगळेपण हे की, त्यांचे संगीतप्रेम केवळ आस्वादापुरते किंवा अभ्यासापुरते राहिले नाही. त्यांनी या सर्वाचे व्यवस्थित ‘डॉक्युमेंटेशन’ केले. या ‘डॉक्युमेंटेशन’ किंवा जतन करण्याच्या दृष्टिकोनातूनच त्यांच्या ‘संगीतविचार’, ‘हिंदी चित्रपटगीत : परंपरा आणि आविष्कार’ आणि लवकरच प्रकाशित होत असलेले ‘पाश्चात्त्य संगीतसंज्ञा कोश’ (संपादक : चतन्य कुंटे) या पुस्तकांची रचना झाली आहे. आवाजाची जोपासना कशी करावी याचे मार्गदर्शन करणारी ‘भाषणरंग : व्यासपीठ आणि रंगपीठ’ आणि ‘भाषण व नाटय़विषयक विचार’ ही दोन महत्त्वाची पुस्तकेही त्यांनी लिहिली.

डॉ. अशोक दा. रानडे यांचे संस्कृतीसंगीतशास्त्राच्या संदर्भातील योगदान भारतातच नव्हे, तर पूर्ण जगातील विद्वत्क्षेत्रात सर्वपरिचित, मान्यताप्राप्त आहे. त्यांनी संगीतशास्त्राचा अभ्यास सुरू केला तेव्हा त्यांना जाणवले की संगीतावर बोलता-लिहिताना फार ढोबळपणे शब्द वापरले जातात. त्या संज्ञांचा नेमका अर्थ, अर्थच्छटा, आशय व व्युत्पत्ती यांबाबत जागरूक असण्याविषयी एकंदरीतच उदासीनता दिसते व अशा परिस्थितीत सांगीत व्यवहाराचे भाषिक संप्रेषण लंगडे पडले तर नवल नाही! त्यामुळे डॉ. रानडे हे गेली चार दशके या विषयावर नियमितपणे अभ्यास करत होते. दर शनिवार-रविवारचा काही वेळ त्यांनी हिंदुस्थानी संगीत आणि पाश्चात्त्य संगीताच्या परिभाषा कोशांचे काम करण्यासाठी राखीव ठेवलेला असे. आपला व्यासंग विविध संदर्भग्रंथांच्या आधारे समृद्ध करत त्यांचे हे लेखन वर्षांनुवष्रे चालू होते. सातत्याने केलेल्या या संज्ञामंथनातून १९९० साली इंग्रजी भाषेतून ‘कीवर्ड्स अ‍ॅण्ड कॉन्सेप्टस् इन हिंदुस्थानी आर्ट म्युझिक’ हा हिंदुस्थानी संगीताचा परिभाषा कोश प्रकाशित झाला. २००६ मध्ये याची विस्तारित आवृत्ती ‘म्युझिक कॉन्टेक्स्टस् : अ कन्साइज डिक्शनरी ऑफ हिंदुस्थानी म्युझिक’ या नावाने प्रकाशित झाली.

पाश्चात्त्य संगीतसंज्ञांच्या परिभाषा कोशाचे काम त्यांनी जवळपास पूर्ण केले होते. त्यावर अखेरचा हात फिरवणे चालू असताना दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. डॉ. रानडे यांनी आजवर एकंदर बावीस ग्रंथांतून संगीत व नाटय़, पर्यायाने समग्र प्रयोगशील कलाविषयक व्यापक पट मांडला होता. या पटाची अजून अठरा पाने संकल्पित होती! या अठरा संकल्पित ग्रंथांपकी काहींचे लेखन पूर्ण होत आले होते, काही अपूर्ण, तर काही केवळ टांचणांच्या रूपात होते. सुदैवाने ‘पाश्चात्त्य संगीतसंज्ञा कोश’ हा बराचसा पूर्ण होता. डॉ. अशोक दा. रानडे यांच्या पत्नी- गुजराती आणि हिंदी भाषेतील विख्यात लेखिका हेमांगिनी रानडे यांनी हे काम पूर्ण करण्यासाठी वैयक्तिक दु:ख बाजूला ठेवले. त्या स्वत:ही सरांना या ग्रंथाच्या कामात मदत करत होत्या. सरांच्या निधनानंतर या कोशाचे काम पूर्ण करण्यासाठी त्यांनी मला निवडले, हा माझा बहुमान होता. त्यास पात्र ठरावे असे काम करण्याची जबाबदारीही होती आणि एक मोठे आव्हानदेखील होते. कारण रानडे सरांच्या कामास हात लावण्यासाठी काय दर्जाची विद्वत्ता हवी याची मला जाणीव आहे. मात्र तशी विद्वत्ता माझ्या ठायी नसूनही केवळ गुरुऋण फेडण्याच्या भावनेने ही जबाबदारी मी स्वीकारली. दर आठवडय़ातील एक दिवस मुंबईला सरांकडे जाणे, त्यांचे लेखन वाचून त्याचे संपादन करणे हा क्रम सुरू झाला. जसजसा खोल जाऊ लागलो तसतशी या विषयाची व्याप्ती कळू लागली. सरांनी केलेल्या कामाची गहराई लक्षात येऊ लागली आणि या कामातल्या खऱ्या आव्हानास सामोरा झालो.

हिंदुस्थानी कलासंगीताच्या पलीकडेही एक व्यापक सांगीत परीघ आहे याची जाणीव व ओळखही डॉ. रानडे यांनी आपल्या संगीतविषयक लेखनातून वाचकांना करून दिली. त्यांचा सहा संगीतकोटींचा सिद्धान्त तर संगीतशास्त्रास त्यांनी दिलेली मौलिक देणगी आहे. लोकसंगीताचे शास्त्र मांडणारे ते महाराष्ट्रातले पहिले संगीतशास्त्री होते. आपल्या लेखनातून भारतीय संगीतसंस्कृतीचा उत्तम परामर्श घेत असताना अन्य संगीतसंस्कृतींच्या अभ्यासाकडेही त्यांनी इशारा केला होता. संस्कृतीसंगीतशास्त्राच्या (एथ्नोम्युझिकॉलॉजी) अभ्यासकाने केवळ एकच संगीतसंस्कृती अभ्यासून चालत नाही, तर प्रत्येक संगीतकोटीतील किमान दोन संगीतप्रणाली समजून घेणे जरुरीचे आहे असे ते मानत. त्यानुसार त्यांनी स्वत: संगीतकोटींचा, अनेक संगीतप्रणालींचा अभ्यास केला होता. (किंबहुना अखेपर्यंत चालू ठेवला होता!)

‘स्ट्रॅविन्स्कीचे सांगीतिक सौंदर्यशास्त्र’ (१९७५) या ग्रंथातून पाश्चात्त्य संगीतातील सौंदर्यविचाराची ओळख मराठी अभ्यासकांना त्यांनी प्रथमत: करून दिली होती. त्याच क्रमाने, संगतीने आता हा ‘पाश्चात्त्य संगीतसंज्ञा कोश’ आपले सांगीतिक परिप्रेक्ष्य अधिक व्यापक, संपन्न आणि यथातथ्य करेल. या कोशात पाश्चात्त्य संगीतातील अनेक महत्त्वपूर्ण संज्ञा समाविष्ट झाल्या आहेत, कित्येक संकल्पना प्रथमच मराठीत मांडल्या आहेत आणि त्याद्वारे डॉ. रानडे यांनी संगीतविषयक मराठी परिभाषेस कित्येक नवीन संज्ञा बहाल केल्या आहेत. त्यामुळे या कोशाद्वारे मराठी भाषेतील कोशसाहित्यात आणि संगीतविषयक वाङ्मयात मौलिक भर होत आहे.

जगभरात आशियाई, आफ्रिकन, युरोपीय, इ. संस्कृतींत गेली अनेक शतके विकसित आणि प्रस्थापित झालेल्या कित्येक संगीतप्रणाली आहेत. आदिम- लोक- कला- धर्म- जन- संगम अशा सहा संगीतकोटींपकी केवळ लोकसंगीत आणि कलासंगीताचाच विचार करू लागलो तरी खुद्द भारतातच हिंदुस्थानी संगीत पद्धती आणि कर्नाटक संगीत पद्धतींसह एकंदर सात प्रणाली अस्तित्वात असल्याचा दाखला मिळतो. संगीतप्रणालींची ही विविधता हे एक अभ्यसनीय वास्तव असताना संगीताचे शिक्षण, विचार आणि प्रस्तुती याबाबतीत साचेबंदपणाचा अनुनय करत केवळ काही ठरावीकच सांगीत तथ्यांश आपणासमोर येतो. संगीताच्या व्यापक विश्वाकडे उघडय़ा कानांनी बघायचे झाले तर आपल्या संगीतसंस्कृतीखेरीज अन्य संगीतसंस्कृतींचाही अभ्यास करणे अगत्याचे- नव्हे आवश्यकच बनते. म्हणूनच या पाश्चात्त्य संगीतसंज्ञा कोशाचा पट मांडला आहे.

एकोणिसाव्या व विसाव्या शतकात युरोपीय देशांतील राज्यकर्त्यांनी नाना वसाहती स्थापून जगातील अन्य खंडांवर केवळ आर्थिक, राजकीयच नव्हे, तर सांस्कृतिक अधिसत्ता गाजवली. परिणामत: एतद्देशीय संगीतसंस्कृतींवरही युरोपीय संगीतसंस्कृतीचे एका तऱ्हेचे वर्चस्व गाजू लागले. आज विश्वभरात पाश्चात्त्य संगीतसंस्कृती ही एक प्रधान आणि प्रमाण संगीतसंस्कृती म्हणून संचरत असताना, भारतीय संगीत परंपरेचा सार्थ अभिमान बाळगूनही या संगीतपद्धतीचा व्यवस्थित अभ्यास करणे हे महत्त्वाचे ठरते. पाश्चात्त्य संगीताचा हा संज्ञाकोश बनवण्यामागची कारणमीमांसा ही अशी आहे.

एका संगीतप्रणालीचा संस्कार घेऊन नंतर अन्य प्रणालीचा अभ्यास करणाऱ्यांत सामान्यत: एक दोष आढळतो. तो असा की, त्या अपरिचित प्रणालीचा विचार हा परिचित प्रणालीशी तुलना करत करत आपल्याच चष्म्यातून केला जातो. या दोषास्पद भूमिकेमुळे त्या प्रणालीतील खरे तथ्य नजरेस पडत नाही, तर केवळ अर्धसत्यच समोर येते. या दोषास टाळून, त्या- त्या संगीतप्रणालीचा अभ्यास स्वतंत्र दृष्टिकोनातून करणे आवश्यक आहे. म्हणूनच या कोशात अनेक संकल्पनांचा उलगडा करताना शक्यतो भारतीय संगीतातील समांतर संकल्पनांचा संदर्भ देणे टाळले आहे. मात्र पाश्चात्त्य संज्ञांच्या यथातथ्य अन्वयाकरिता अर्थवाही असे प्रतिशब्द योजले आहेत.

हा संज्ञाकोश असल्याने यात पाश्चात्त्य संगीताच्या संदर्भातील संकल्पना, संगीतप्रकार, त्याचे प्रस्तुतिविशेष, वाद्यशास्त्र, संगीतालेख, इ. विषयांच्या अनुषंगाने प्रचलित असणाऱ्या इंग्रजीसह ग्रीक, लॅटिन, इटालिअन, फ्रेंच, जर्मन व अन्य भाषांतील संज्ञांचा परामर्श घेतला आहे. या कोशात व्यक्तिनामे, रचनानामे यांचा समावेश केलेला नाही- तो एका निराळ्या कोशाचा विषय आहे! तसेच संकल्पनांचा मूलार्थ व व्यावहारिक वापर यांवर भाष्य केले आहे, पण विस्तारभयास्तव त्यांची उदाहरणे नमूद केलेली नाहीत. हा पाश्चात्त्य संगीताचा परिचयात्मक ग्रंथ नाही, तर संज्ञाकोश आहे. अर्थातच कोशाच्या संकेतांनुसार अर्थविवेचन अल्पाक्षरी आहे. मात्र ‘ऑपरा’सारख्या काही नोंदी विषयाच्या अंगभूत व्यापकतेमुळे जराशा विस्ताराने मांडल्या आहेत. केवळ पाश्चात्त्य संगीताच्या अभ्यासकांनाच नव्हे, तर एकंदरच संगीताबाबत जिज्ञासा असणाऱ्या साऱ्याच वाचकांस या कोशाने लाभ मिळेल असा विश्वास वाटतो.