|| पी. विठ्ठल

p_vitthal@rediffmail.com

500 Years Later Surya Grahan Collides With Rarest Chaturgrahi Yog
५०० वर्षांनी सूर्य ग्रहणाला अद्भुत दुर्मिळ योग; ८ एप्रिलपासून ‘या’ राशींच्या नशिबात अमाप श्रीमंती, नशीब चमकणार
CJI DY Chandrachud
केंद्रीय तपास यंत्रणांना सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा मोलाचा सल्ला; म्हणाले, “राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित…”
winners of patra chawl
पत्राचाळीतील ३०६ विजेत्यांची घरांची प्रतीक्षा संपेना, भोगवटा प्रमाणपत्र न मिळाल्याने ताबा प्रक्रियेस विलंब
Cooking Competition in Mumbai on the occasion of Loksatta Purnabraham publication Mumbai
‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ प्रकाशनानिमित्त आज मुंबईत पाककला स्पर्धा

‘पेरुगन मुरुगन’ ही वर्जेश ईश्वरलाल सोलंकी यांची नवी रचना. खरे तर साहित्याच्या नेमक्या कोणत्या प्रकारात या साहित्यकृतीचा समावेश करावा असा संभ्रम असल्यामुळे ‘रचना’ असा शब्द वापरला आहे. म्हटले तर ही एक दीर्घकथा आहे, म्हटले तर ही लघुकादंबरी आहे, किंवा कवी, लेखक, कलावंत वा संवेदनशील आणि जागरूक असणाऱ्या कुठल्याही व्यक्तीची ही एक आत्मकथाही म्हणता येईल. आकृतिबंधाचा आणि साहित्यप्रकाराचा मुद्दा बाजूला ठेवून ‘पेरुगन मुरुगन’ या रचनेचा आपण विचार करू या. मुळात वर्जेश सोलंकी हे कवी म्हणून परिचयाचे असले तरी ‘दीडदमडीना’ या त्यांच्या पुस्तकानेही असाच एक धक्का वाचकांना दिला होता. म्हणजे काहीतरी ठरवून लेखनात प्रयोग करायचे आणि त्याला ‘प्रयोगशील’ वगैरे म्हणायचे हा भाग वेगळा. कारण अशी प्रयोगशीलता ही ओढूनताणून आणलेली असल्यामुळे त्यात ‘प्रयोग’ अभावानेच आढळतो. मात्र, अभिव्यक्तीचे असे कोणतेच आडाखे मनात न योजता वर्जेश सोलंकी यांनी जो प्रयोग गद्यलेखनात केला तो बराच धाडसी म्हणायला हवा. कारण आपल्याकडे साहित्याचा विचार हा खूप साचेबद्ध किंवा प्रवाहकेंद्री पद्धतीने केला जातो. अशा वेळी कोणत्याच प्रवाहात आणि प्रकारात न बसणारी रचना दुर्लक्षिली जाण्याचा मोठा धोका असतो. मात्र, सोलंकी यांच्या बाबतीत असे घडलेले नाही. त्यांच्या कवितेची जशी चर्चा झाली, तशीच त्यांच्या गद्य आविष्काराचीही नोंद घेतली गेली. याचे मुख्य कारण सोलंकी यांच्या लेखनातला सहजपणा आणि वाचकांना दमवून टाकणारा प्रवाहीपणा. खरे तर तास-दीड तासातच वाचून होणारी एखादी कथा वाचकाला कशी काय दमवते, असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक असले तरी सोलंकी यांच्या लेखनातून हे घडते एवढे मात्र नक्की!

‘पेरुगन मुरुगन’ हा सोलंकी यांच्या लेखणीचा नवा आविष्कार आहे. साहित्य आणि सांस्कृतिक जगताशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकाला पेरुमल मुरुगन हे नाव माहीत आहे. जिवंतपणीच दंतकथा बनलेला हा माणूस आपल्या लेखनसंन्यासाची घोषणा करतो काय नि लेखक म्हणून स्वत:चा मृत्यू जाहीर करतो काय; या सगळ्याच गोष्टी चक्रावून टाकणाऱ्या आहेत. त्यांनी केवळ लेखनसंन्यासच घेतला असता तर या लेखकाची तेवढीशी चर्चाही झाली नसती; परंतु त्यांनी स्वत:ची प्रकाशित पुस्तके मागे घेण्याची आणि लेखक म्हणून आपण मेल्याची घोषणा केल्याने एकूणच भारतीय सांस्कृतिक विश्वाचे त्यांच्या या कृतीकडे लक्ष वेधले गेले. याचं कारण सामाजिक दबावाचे ते बळी ठरले होते. सारेच सहनशीलतेच्या पलीकडे गेल्यानंतर मुरुगन यांनी स्वत:चा लेखक म्हणून पराभव स्वीकारला. किंबहुना, ते प्रतिगामी व्यवस्थेला शरण गेले. फेसबुकवर नोंद लिहून त्यांनी लेखणी बंद केली. या घटनेचे पडसाद देशपातळीवर उमटले. त्यांच्या ‘त्या’ कादंबरीची पुन्हा नव्याने चर्चा झाली. मुरुगन हे एका प्रथेविषयी बोलू पाहत होते. पण त्यांचे बोलणे म्हणजे एका समुदायाची बदनामी आहे असा प्रचार केला गेल्याने त्यांना त्याची किंमत चुकवावी लागली. न्यायव्यवस्थेने या घटनेत हस्तक्षेप केल्यानंतर लेखक म्हणून मुरुगन यांचे पुनरुज्जीवन झाले.

हा मुद्दा केवळ एका व्यक्तीच्या संदर्भात नव्हता तर त्यास अभिव्यक्तिस्वातंत्र्य, असहिष्णुता असे सामाजिक पैलूही जोडलेले होते. म्हणजे आपल्याला काहीतरी सांगायचंय आणि ते सांगण्याची भीती वाटतेय, किंवा ते सांगितल्यानंतर त्याविषयी तीव्र संताप व्यक्त केला जातो- असे आपल्याकडे सतत घडत असते. त्याचे एक प्रतीक म्हणून या लेखकाकडे पाहता येईल.

वर्जेश सोलंकी या समविचारी लेखकाला म्हणूनच पेरुमल मुरुगन जवळचे वाटतात. साहित्यिक म्हणून ते सोलंकी यांना आपल्या वंशाचे वाटतात आणि म्हणूनच सोलंकी यांनी या प्रतीकाशी नामसाधम्र्य असणारी ‘पेरुगन मुरुगन’ ही साहित्यकृती लिहिली आहे.

‘पेरुगन मुरुगन’ हा अशा माणसाचा आत्मोद्गार आहे, जो लोकशाही राष्ट्रातला एक नागरिक आहे. पण तरीही कुठल्या तरी अदृश्य भीतीने तो ग्रस्त आहे. या भीतीचे स्वरूप खूप तऱ्हेवाईक आहे. म्हणजे बोलण्याची भीती (अभिव्यक्ती) हा त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा. परंतु त्याचबरोबर अनेक प्रकारच्या सामाजिक र्निबधांच्या सावलीखाली आपले लेखकपण गुदमरत चालले आहे, आपल्याला जे करायचे आहे ते करता येत नाही, किंवा काही गोष्टी केल्या तर त्यावर तात्काळ प्रतिक्रिया उमटतात.. अशा वेळी सामान्य माणूस म्हणून जी ससेहोलपट होते, त्या जगण्याचे हे एक प्रातिनिधिक चित्र आहे. या चित्राला स्वत:ची अशी स्वतंत्र भाषा आहे, ध्वनी किंवा आवाज आहे. महत्त्वाचे म्हणजे हे चित्र आजच्या वर्तमानाचा पुष्कळ अंशी ‘खरा’ चेहरा आहे. अर्थाच्या अनेक शक्यता अनेक आवाजांसह या गद्यचित्रात सामावलेल्या आहेत. सर्वानाच त्या सर्वमान्य होतीलच असे नाही; परंतु किमान या पेरुगनचे ‘सांगणे’ आपण नीट वाचले तर आपण त्याच्यापेक्षा फार काही वेगळे आहोत असे वाटत नाही. हे या कलाकृतीचे यश आहे.

वर्तमानकाळ हा अनेकार्थाने गोंधळलेला, संभ्रमित झालेला आणि त्याचबरोबर सार्वत्रिक स्वरूपाच्या तांत्रिक गतिमानतेने वेढलेला काळ आहे. जात, धर्म, प्रदेश, भाषा यांविषयीचे जे काही सार्वकालिक प्रश्न असतात ते या काळातही आहेत. परंतु त्यांचे स्वरूप मात्र खूप तीव्र आहे. या तीव्रतेने वेढलेला हा पेरुगन आपल्या सामाजिक आणि सांस्कृतिक व्यवस्थेचे अत्यंत टोकदार असे ‘सर्जिकल स्ट्राइक’ करतो. माणसं, फाइली, टेबल-खुच्र्या, शेती, माती आणि भूखंडांचे धंदे, अस्तित्व, स्मगलिंग, जागतिकीकरणाने ढवळून काढलेले महानगर आणि गावगाडय़ाच्या अप्रिय आठवणी, अत्याचार, टुरिझम, शासन, ऑनलाइन भक्तगण या साऱ्यांचा असा काही तिरकस वेध पुस्तकात घेतला गेला आहे, की माणसांच्या झुंडींना वारंवार स्वत:ची पुनर्तपासणी करण्याची वेळ येते. जेमतेम सव्वीस तुकडय़ांत आणि चाळीसेक पानांत पसरलेला हा पेरुगन आपल्याला डोके वर काढूच देत नाही. एकामागून एक अशा असंख्य घटना-घडामोडी तो सांगत राहतो. सगळ्याच गोष्टींना खूप अर्थ आहे असेही नाही; परंतु त्या आपल्याला निर्थकही ठरवता येत नाहीत.

‘त्याने आपला फोन स्विच ऑफ केला’ ते ‘पेरुगन क्लीन बोल्ड’ या दोन ओळींत सामावलेला पेरुगन नामक व्यक्तीचा हा अनुभव अनिश्चित स्वरूपाच्या काळाने भरलेला आहे. लेखक या काळाला ‘मर्यादापुरुषोत्तम जग’ असे म्हणतो. हे जग सर्वार्थाने रसहीन आहे. अशा जगात व्यक्ती म्हणून, कलावंत म्हणून जो एक संकोच वाटय़ाला येतोय त्या संकोचाची ही गोष्ट आहे. संताप, फसवणूक, भ्रष्टता, अनैतिकता, दहशत अशा एकात एक गुंतलेल्या व्यवस्थेची ही चिकित्सा आहे. वर्तमानाचा विद्रूप चेहरा दाखवतानाच लेखक मधेच आटपाट नगरातली एखादी आधुनिक कथा समोर ठेवतो. ‘वन्स अपॉन अ टाइम’ म्हणत गजबजलेल्या, पण दूषित अशा सांस्कृतिक व्यवहाराची खपली काढतो. भ्रामक गैरसमजुतीने पछाडलेल्या अनेकांची पोलखोल करतो. हे सगळं करत असताना तो समकालाचेच संदर्भ देतो, हे महत्त्वाचे. लेखकाची निरीक्षणे त्याच्या सर्जनशीलतेला प्रगल्भ बनवतात. छोटय़ा छोटय़ा गोष्टींच्या नोंदी खूप काही सांगून जातात. सत्तेकडून लादल्या जाणाऱ्या गोष्टी असोत की समाजातल्या विवेकी माणसांच्या हत्या असोत, इंग्रजी शाळांचे गजबजलेपण असो की धर्माचा बाजार करणारे भक्तगण असोत.. पेरुगनच्या तावडीतून एकही गोष्ट सुटत नाही. उदाहरण म्हणून पुढील काही अवतरणे बघा : ‘खूप वर्षांपूर्वी आपलं अ‍ॅपेन्डिक्सचं झालेलं बारकंसं ऑपरेशन त्याला आठवलं. ते बारकं होतं, पण डॉक्टरने ते मोठं केलं. बारक्याचं मोठं करणं ही तर त्यांची सिद्धहस्त कलाच..’ किंवा ‘गोंगाटाचं पण एक मस्त असतं. तोही आस्ते कदम शांत होतो. जखमेवर खपली येते. हवेत धुरळा होताच तो तरंगत तरंगत आम आदमीच्या कॉलरखालचा मळ झाला. घामाच्या नदीतून होडी होऊन वाहत गेला..’ अशा छोटय़ा छोटय़ा वाक्यांतून पेरुगनचे सांगणे फुलत जाते. ‘अस्तित्वाचा कोंबडा खुराडय़ात झाकून ठेवायचा’, ‘आत्मसंवादाची खिडकी झडप बंद करून ठेवायची’, ‘आजी नावाचा जीव’, ‘सायलेन्ट झोनचा सायरन’ अशा कवितेसारख्या ओळी या कथनाला व्यापून आहेत. तसेच ‘अब का गवरमेंट बहुत चौकन्ना हो गया है’, ‘चष्मेबद्दूर गुले गुलजार’, ‘नीतीसमोर कोणीही गडकरी नाही’, ‘ह्य़ा राज्यात जीव रमत नाही’, ‘बकबक केली तर एकदम शूटआऊट लोखंडवाला’, ‘विश्वाच्या एका बिंदूवर एवढे पेरुमेरु’ अशा विधानांतला उपहास या लेखनाचा केंद्रबिंदू म्हणता येईल. अनेक किस्से आणि पात्रांद्वारे व्यक्त होणारे समूहमानस ही या अभिव्यक्तीची गरज आहे. त्यांच्या एकत्रीकरणातून पेरुगनच्या घटनाक्रमाची साखळी तयार होते आणि वर्तमानातले अभिव्यक्तीच्या संकोचासह कित्येक प्रश्न ऐरणीवर येतात. राजन गवस यांच्या शब्दांत सांगायचे तर, ‘कोणत्याही संवेदनशील माणसाला गरगरून टाकणारे हे लेखन आहे.’ अनेक सामाजिक संकेतांना आणि जाणिवेच्या अनेक स्तरांना स्पर्श करणारे हे लेखन म्हणूनच महत्त्वाचे वाटते.

  • ‘पेरुगन मुरुगन’- वर्जेश ईश्वरलाल सोलंकी,
  • लोकवाङ्मय गृह प्रकाशन,
  • पृष्ठे- ४४, मूल्य- ६० रुपये.