आज (२१ फेब्रुवारी) मातृभाषा दिन! येत्या आठवडय़ात (२७ फेब्रुवारीला) मराठी राजभाषा दिनही येतो आहे. या दिनांचे औचित्य साधून मराठी भाषेतून हरवत चाललेल्या म्हणी आणि वाक्प्रचारांच्या खजिन्याचा मागोवा घेणारा लेख..

आज (२१ फेब्रुवारी) मातृभाषा दिन! आणि येत्या आठवडय़ात (२७ फेब्रुवारी) मराठी राजभाषा दिनही येतो आहे. मातृभाषेचा हा गौरव मराठी माणसाला अभिमान वाटावा असाच आहे. मराठी भाषिकांनी तो उत्साहाने, आत्मीयतेने साजरा करणे स्वाभाविकच.
मात्र, आजच्या मराठी भाषेच्या स्वरूपासंबंधी विचार करताना प्रामुख्याने जाणवते ते तिचे झपाटय़ाने बदलत चाललेले रूप. मराठी माणसे- विशेषत: तरुण पिढी ज्या प्रकारचे मराठी बोलते किंवा लिहिते, ते इतके प्रदूषित असते, हिंदी-इंग्लिशमिश्रित असते, की मराठी भाषेचे भविष्यात काय होईल अशी चिंता वाटते. मराठी भाषेचा अभिमान बाळगणाऱ्यांनी, तिच्यावर नितांत प्रेम करणाऱ्यांनी तिच्या रक्षणाचा आणि तिचे पावित्र्य राखण्याचा कसोशीने प्रयत्न केला पाहिजे, तरच आपल्या मातृभाषेचे सौंदर्य व सौष्ठव तिला पुन्हा प्राप्त होईल आणि मराठी मातृभाषा दिन खऱ्या अर्थाने साजरा झाला असे म्हणता येईल.
मराठी भाषा संपन्न आहे. मराठीची शब्दसंपत्ती समृद्ध आहे. सूक्ष्मातिसूक्ष्म आशय व्यक्त करण्याची ताकद या भाषेत आहे. पण आज जाणवते ते असे- की मराठी भाषेतून अनेक शब्द, वाक्प्रचार, म्हणी लुप्त होत चालल्या आहेत. परिणामी भविष्यात आपली भाषा दरिद्री तर होणार नाही ना, या विचाराने मन अस्वस्थ होते. म्हणूनच आज मी इथे विचार मांडू इच्छिते तो मायमराठी भाषेतून नष्ट झालेल्या म्हणींचा आणि वाक्प्रचारांचा.
म्हण म्हणजे लोकपरंपरेने स्वीकारलेले त्या- त्या समाजातील नीती-अनीती, रूढी-परंपरा, मानवी स्वभाव, उपदेश, उपहास, विनोद इ.चे सुटसुटीत पद्धतीने केलेले दृष्टान्तस्वरूप विधान. म्हणी या सामान्यपणे कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त आशय व्यक्त करणाऱ्या असतात. म्हणीतील एका किंवा अधिक वाक्यांत एक प्रकारची लय असते. यमक-अनुप्रासयुक्त असल्याने म्हणी चटकन् स्मरणात राहू शकतात. त्यांचा योग्य ठिकाणी वापर करणे सामान्य माणसालाही सोपे जाते. मोजक्या शब्दांत मोठा आशय व्यक्त करणाऱ्या म्हणी म्हणजे भाषेतील अत्यंत अमूल्य असा खजिनाच.
त्यांचे जतन व्हावे, त्या भाषेतून नाहीशा होऊ नयेत असे आपल्याला कितीही वाटले तरी काळ बदलतो, समाजजीवनात बदल होतात, तसे भाषेचे स्वरूपही बदलत जाते. नव्या पिढीला पूर्वीचे विचार पटत नाहीत. सत्य-असत्याच्या निकषांतही फरक पडत जातो. अशा अनेक कारणांनी अनेक म्हणीही कालबाह्य़ होतात. त्यांचा वापर हळूहळू कमी कमी होत पुढे त्या नष्टही होतात. वानगीदाखल पुढील म्हणी पाहा..
– असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी
– काशीस जावे नित्य वदावे
– दाम करी काम, बिबी करी सलाम
– चमत्कारावाचून नमस्कार नाही
– नकटे व्हावे, पण धाकटे होऊ नये
– एकटा जीव सदाशिव
– गरजवंताला अक्कल नसते
या सर्वच म्हणी आज कालबाहय़ झाल्या आहेत.
म्हणींचे कर्ते नेमके कोण आहेत, हे आपल्याला माहीत नाही. म्हणूनच त्या ‘अपौरुषेय’ आहेत असे मानतात. त्यांचा कर्ता जरी सांगता आला नाही, तरी बऱ्याच म्हणी पुरुषप्रधान संस्कृतीच्या द्योतक आहेत. त्यामुळे काही म्हणी स्त्रियांवर अन्याय करणाऱ्या आहेत, त्यांची अप्रतिष्ठा करणाऱ्या आहेत यात तीळमात्र शंका नाही. उदाहरणार्थ-
– बाईची अक्कल चुलीपुरती
– बायकांच्या तोंडात तीळ भिजत नाही
– नवऱ्याने मारले आणि पावसाने झोडपले, त्याची तक्रार कोणाकडे?
– पतिव्रता नार, रात्री हिंडे दारोदार
– सकाळी सौभाग्यवती, संध्याकाळी गंगाभागीरथी (वेश्या)
– पुरुष कळसूत्री, तर बायका पाताळयंत्री
अशा कित्येक म्हणी मराठी भाषेतून नष्ट झाल्या आहेत याचे मात्र समाधान वाटते.
काही जातिवाचक म्हणीही आज सामाजिक जीवन बदलल्यामुळे कालबाहय़ झाल्या आहेत. उदा.-
– ब्राह्मणाची बाई काष्टय़ावाचून नाही
– ब्राह्मण झाला जरी भ्रष्ट, तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ
– भटाची चाकरी आणि शिळ्या भाकरी
– भटाला दिली ओसरी, हळूहळू हातपाय पसरी
– सोनार, शिंपी, कुलकर्णी अप्पा, यांची संगत नको रे बाप्पा
पूर्वीपेक्षा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता अधिक पुरोगामी झालेला आहे. माणसाचे आयुष्यमान वाढले आहे. सर्व क्षेत्रांत प्रगती झाली आहे. त्यामुळे काही म्हणी आज अर्थशून्य वाटतात. उदा.-
– साठी बुद्धी नाठी
– हात ओला तर मित्र भला
– चढेल तो पडेल
– ताकास जावे आणि भांडे का लपवावे?
– छडी लागे छमछम, विद्या येई घमघम
– जितके मोठे, तितके खोटे
– खाण तशी माती, देश तसा वेष
आपल्या काही म्हणींमध्ये अर्धसत्य असते, तर काही उपदेशपर असतात. उदा.-
– जो दुसऱ्यावरी विश्वासला, त्याचा कार्यभाग बुडाला (अर्धसत्य)
– दिसतं तसं नसतं, म्हणून तर जग फसतं (अर्धसत्य)
– जित्याची खोड मेल्यावाचून जात नाही (अर्धसत्य)
– गोरा गोमटा कपाळ करंटा (असत्य)
उपदेशपर म्हणींमध्ये नेमके कसे वागावे म्हणजे लाभ होईल याचे दिग्दर्शन असते. अशा म्हणींची जपणूक व्हावी असे वाटते. उदा.-
– खटासी खट, उद्धटासी उद्धट
– ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये
– आपुले रे हाती आपुले प्राक्तन
– निंदकाचे घर असावे शेजारी
– अनुभवासारखा शिक्षक नाही
– पुढच्यास ठेच, मागचा शहाणा
– मन चिंती ते वैरी न चिंती
– अंथरूण पाहून पाय पसरावे
– दु:ख सांगावे मना, सुख सांगावे जना
– मेल्या म्हशीला मणभर दूध
– दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते, स्वत:च्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही
म्हणींच्या संदर्भात एक विचार करायला हवा. सर्वच म्हणींचा शब्दश: अर्थ घ्यायचा नसतो, तर त्यातून सूचित होणारा आशयच लक्षात घ्यायला हवा. उदा.-
‘बाजारात तुरी, भट भटणीला मारी’ या म्हणीचा अर्थ जी वस्तू अजून हाती पडली नाही, किंवा मिळवू शकलो नाही, त्यासाठी दुसऱ्याला दोष देणे (डाळ अजून का शिजवली नाहीस, म्हणून बायकोला मारणे) असा आहे. किंवा ‘भटाला दिली ओसरी, हळूहळू हातपाय पसरी’ या म्हणीचा अर्थ ब्राह्मणावर टीका करण्याचा नसून, गरजू किंवा निर्धन माणूस आपण केलेल्या उपकाराचा कसा फायदा घेतो, हे सूचित करण्याचा आहे.
माझ्या कानावर काही नव्या म्हणी अलीकडे पडल्या आहेत. उदा.-
– जात नाही ती जात
– वाचाल तर वाचाल
मलाही एक म्हण सुचवावीशी वाटते..
– सगळ्या धर्माचे एक नाव- सर्वधर्मसमभाव
शेवटी असे म्हणावेसे वाटते की, काही म्हणी जरी कालबाह्य़ झाल्या असल्या, लुप्त झाल्या असल्या तरी आजच्या समाजजीवनातील बदल लक्षात घेऊन अशा काही नव्या म्हणी निर्माण व्हायला हव्यात. जुन्या नष्ट झालेल्या म्हणींची जागा अशा नव्या म्हणींनी घेतली तर मराठी भाषेच्या वैभवात भर पडेल आणि नव्या आशयाचा आविष्कार झाल्यामुळे मराठी भाषा अधिक समृद्ध, आशयसंपन्न व आकर्षक होईल यात काहीच शंका नाही.
हल्ली मराठी भाषेतून नाहीशा होत चाललेल्या वाक्प्रचारांबद्दल लिहिताना मन अस्वस्थ होते. म्हणींप्रमाणे वाक्प्रचारही अर्थवाही असतात. त्यांच्यामागील संदर्भ माहीत नसल्यामुळे त्यांचा वापर कमी होत असावा असे वाटते. पुढील काही वाक्प्रचार पाहा-
१) चौदावे रत्न, जुलमाचा रामराम, ताकापुरती आजीबाई, ताटाखालचे मांजर, काळ्या दगडावरची रेघ, कुंभकर्णाची झोप, द्राविडी प्राणायाम, एका माळेचे मणी.
२) दाताच्या कण्या होणे, पोटात गोळा उठणे, कोपराने खणणे, माशी शिंकणे, (एखाद्याचे यश) डोळ्यात खुपणे, कान फुंकणे, हात मारणे, पाचावर धारण बसणे, हात दाखवणे, हात मिळवणे, डोळे उघडणे, आकाशपाताळ एक करणे, एखाद्याच्या तालावर नाचणे, घरचे खाऊन लष्करच्या भाकरी भाजणे (दुसऱ्याच्या संसारात नाक खुपसणे), सोनाराने कान टोचणे, आकाश फाटणे, वाऱ्यावर सोडणे, एखाद्याच्या वाटेला जाणे (वाटय़ाला नव्हे!), वाट पाहणे, कानाडोळा करणे, चांभारचौकशा करणे, इत्यादी.
यातील बरेचसे वाक्प्रचार आजच्या मराठी भाषेतून नष्ट झाले आहेत. काही नवे वाक्प्रचार तरुणांच्या तोंडी ऐकायला मिळतात. उदा. पंगा घेणे, एखाद्याचा पोपट होणे, लोच्या होणे, वगैरे.
या व अशा नव्या वाक्प्रचारांचा भाषेत नक्कीच स्वीकार होईल. आणखीही वाक्प्रचारांची यापुढच्या काळात त्यांत भर पडेल. त्यांचे स्वागत व्हायला हवे.
शेवटी एकच सुचवावेसे वाटते, की मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्यांनी आपली भाषा कमजोर होऊ नये, स्थूल आशय व्यक्त करणारीच राहू नये, ती अधिकाधिक समृद्ध, अर्थवाही आणि सौष्ठवपूर्ण व्हावी म्हणून प्रयत्न करावेत. तिची दुर्दशा कदापि होऊ नये, हीच इच्छा.

when is Ram Navami
Ram Navami 2024 : १६ की १७ एप्रिल; कधी आहे रामनवमी? जाणून घ्या शुभ मुहूर्त
rajkaran gela Mishit marathi movie on April 19 in theaters
‘राजकारण गेलं मिशीत’ १९ एप्रिलला चित्रपटगृहात
balmaifal story for kids why we celebrate gudi padwa as a new marathi year
बालमैफल: नवचैतन्याचा पाडवा
The central government fiscal deficit reached Rs 15 lakh crore at the end of February
वित्तीय तूट १५ लाख कोटींवर; फेब्रुवारीअखेर वार्षिक उद्दिष्टाच्या तुलनेत ८६.५ टक्क्यांवर