08 August 2020

News Flash

आयुष्याचा तळ शोधणाऱ्या कविता

अंजली कुलकर्णी हे नाव मराठीतील विचारगर्भ कवितेच्या प्रांतात सुपरिचित आहे.

अंजली कुलकर्णी हे नाव मराठीतील विचारगर्भ कवितेच्या प्रांतात सुपरिचित आहे. ‘मी एक स्त्रीजातीय अस्वस्थ आत्मा’, ‘संबद्ध’, ‘बदलत गेलेली सही’ या संग्रहांनंतरचा त्यांचा नवा काव्यसंग्रह- ‘रात्र, दु:ख आणि कविता’! संग्रहाच्या शीर्षकातच कवितांचे विषय आणि आशय स्पष्ट आहे. तीन विषयांत विभागलेला हा संग्रह वाचकाला सोबत घेऊन त्याच्याच जगण्यातले बिंब, कवडसे दाखवत अंतर्मुख करतो. वरवर पाहता साध्या वाटणाऱ्या या अभिव्यक्तीमध्ये सखोल, आर्त, शब्दातीत असे जीवनानुभव अनुस्यूत आहेत. ‘काव्याचा आत्मा ध्वनी हा होय’ या आनंदवर्धनाच्या म्हणण्यानुसार अंजली कुलकर्णी यांच्या कवितांमध्ये ध्वन्यार्थ, लाक्षणिक अर्थ तसेच गर्भितार्थ दडलेला असतो. कवितेत शिरलं की तो आतला अर्थही झळाळून निघतो. कवितेमध्ये अहर्निश रममाण झालेल्या या कवयित्रीचं झपाटलेपण कसं आहे पाहा-
‘मंत्र म्हटल्याप्रमाणे कवितेचे उच्चारण
चालू राहते
मनातल्या मनात, स्वप्नातल्या स्वप्नात
झोपेतल्या झोपेत
मी निद्रेतही सावध होते; मी जाणते
ती कविता आहे..’
माणसाची जडणघडण करणारी एक सार्वकालिक नि सार्वत्रिक त्रिसूत्री कवयित्रीने मनोगतात मांडली आहे. त्यानुसार आपल्या सभोवताली पसरलेला विराट निसर्ग, जमीन, नद्या, वातावरण हे सारं आपल्याला घडवत असतं. जगण्याच्या दुसऱ्या पातळीवर असतात- माणसं, घर, नातलग, समाज, मित्र, शत्रू, जग. त्यांच्यातील संबंधांतून एक बंध तयार होतो आणि तो बंधही आपल्याला घडवत राहतो. तिसऱ्या पातळीवर असतं- आपलं स्वत:चं मन. भोवतालासोबतचा ताल नि तोल सांभाळत हे आपलं मन आपल्यासाठी आपल्याशी संबद्ध असतं. निसर्ग, समाज आणि आपलंच मन या तीन स्तरांवर समांतर, तरीही एकसंधपणे आपण जगत असतो. त्यातील आनंद, तरंग, लहरी, रोमांच, दु:ख, घाव, चरे, दंश, ओरखडे यांच्याकडे विचारहीन धावपळीत पाहायला फुरसत मिळत नाही. पण शांत, मऊ रात्रीच्या प्रहरी या सगळ्या सुख-दु:खांकडे निरखून बघता येते नि त्या निरखण्यातून उमटत राहतात अंजली कुलकर्णी यांच्या भावगर्भ कविता!
‘रात्र’ या पहिल्या भागात कवयित्रीने रात्रीचे विविध रंगढंग शब्दांकित केले आहेत. कवी ग्रेस यांना संध्याकाळचं गूढ असं आकर्षण वाटतं. ते आकर्षण, ती आसक्ती ग्रेस यांनी कवितेत सातत्याने मांडली आहे. अंजली कुलकर्णीना गूढ, धूसर रात्रीची आसक्ती वाटते. त्या रात्रीचा काळा झिरझिरीत पदर सतत त्यांना ओढ लावतो नि त्यातूनच उमटतात ‘रात्र’-कविता! दिनचक्राच्या धामधुमीत आणि दुनियादारीच्या धुमश्चक्रीत आत आत शिरून जगण्याचा शोध घेणं अवघड होऊन बसतं. मग रात्रच बहाल करते एक अथांग, अंधारा पट.. ज्यावर रेखाटता येतात कवितांच्या ओळी मनसोक्त. ही रात्र एकांतगुहेत ध्यानस्थ बसलेल्या जटाधारीला दु:खाचं अटळपण शिकवते. रात्र ही एकांताचं, शृंगाराचं, मीलनाचं आदिम प्रतीक असते, तशीच ती गूढ-रम्यतेची, रिकामपणातील तात्त्विक चिंतनाची, निखालस आध्यात्मिकतेचीसुद्धा रूपक म्हणून कवयित्रीला मोहित करते. काममोहित क्रौंचमिथुनातील एकाला विद्ध केल्याने दुसऱ्याला सोसाव्या लागलेल्या विरहदु:खातून जसं आदिकाव्य झरलं, त्याच रूपकात रात्रीला पाहताना कवयित्री लिहिते-
‘जग झोपलंय नििश्चत दुनियादारीच्या अरण्यात
वारुळातून फुटते आहे अनुष्टुभ दु:खाची पहाट..’
रात्रीचा मिट्ट काळोख हेच जणू धुंद करणारं मद्य आहे- दिवसाच्या कोलाहलाला नि हलाहलाला शांत करत निजवणारं! कवयित्री लिहिते-
‘घुटक्या-घुटक्यानं रिचवताना काळोखाचं मद्य
ती विसरते वर्तमानाची निराशा, दु:ख
ती विसरते तिचं चाकोरीला फेऱ्या घालणं
अन् जगते तिचं मन:पूत जगणं..’
‘रात्र’ ही दिवसाच्या युद्धानंतर कवयित्रीला मन:पूत चिंतनासाठीचा काळाभोर अवकाश देते. शिवाय ती आदिम उगमाकडे जाण्यासाठीची काळी तुकतुकीत पोकळीही बहाल करते. ती आदिम शृंगाराची पृष्ठभूमीही असते. काळ्याकभिन्न रात्रीच्या मोहमयी पात्रात गात्रांच्या बेहोशीचे तरंग, लाटा उसळत राहतात. हा निर्मितीचा प्रदेश गर्भकाळोखासारखा. ‘रात्रीच्या कॅनव्हासवर’, ‘काळ्या रात्रीची राणी’, ‘जादूगारीण’, ‘अंधाराचा सर्प’, ‘सृजनोत्सव’ अशा साऱ्या ‘रात्र-कवितां’मधील ध्वन्यार्थ विलक्षण आहे. ‘क्लायमॅक्स’ या कवितेत शेवटी असे शब्द आहेत..
‘उसळू लागतात रक्तलहरी तिच्या सर्वागातून
अवघ्या देहाची लेखणी बनून टपटपू लागतात स्वर्गातले शब्द
अधिऱ्या लयीत अंधाराशी एकांत अनुभवताना
गाठला जातो नकळत कवितेचा क्लायमॅक्स..’
‘दु:ख’ हे निर्मितीच्या कळांचं प्रतीक असून या विभागातील कविता जगण्याचा तळ ढवळून ओंजळीत वास्तवाचा ताजा, टपोरा आशय ठेवतात. दु:खाच्या नाना तऱ्हा, नाना रूपं नि नाना विभ्रमही असतात. वैयक्तिक दु:खाचे व्यावहारिक गाऱ्हाणे मांडण्यात कवयित्रीला मुळीच तथ्य वाटत नाही. तिच्या कवितेत पाझरणारं दु:ख व्यापक होत होत इतक्या उंचीवर जातं, की त्या दु:खाचीही गोडी वाटावी. ‘दु:ख दडपलं गेलं की कुठूनतरी वाट शोधतं..’ या साध्याच, पण सखोल अर्थाच्या ओळी. कवयित्री मग आपले सोलून निघालेले अंत:सत्त्वतेचे थर पाहत, आतलं उद्ध्वस्त उत्खनन निरखत राहते. ती दु:खालाच सप्रेम आमंत्रण देते-
‘ये, ठरल्या वेळेवर
आयुधांसकट
करू नकोस उशीर
प्रहर संपायच्या आत
प्रहार कर
ये लवकर ये..’
वेदनेची नदी युगांपासून शाश्वताचं जुनंच पाणी वाहत नेत असते. अप्राप्याच्या ध्यासापायी झुरणंसुद्धा जुनंच असतं. दु:खाच्या प्रवाहात आपण फक्त नवे असतो. म्हणून आपली त्याबद्दलची अभिव्यक्तीही व्यक्तिपरत्वे वेगळी असते असं कवयित्रीला वाटतं. अख्खं आभाळ कवेत घ्यायचं स्वप्न असताना तुकडय़ा-तुकडय़ाने केवळ चतकोरच हाती येतो नि त्याचा समंजसपणे स्वीकार करावा लागतो तेव्हा कवयित्री लिहिते-
‘शेवटी शेवटी समंजस असण्याच्या मागणीचा
कळस इतका, की समंजस असण्याची
हिंस्र जबरदस्तीच सुरू होते स्वत:वर
नि त्याचं भलं अजस्र प्रेशर छातीवर..’
माणसाच्या सुखाच्या कल्पना फार ऐहिक झाल्यात आजकाल. पैसा, यंत्र, तंत्र, मॉल, हॉटेल, संगणकीय आभासी जग हे उणावलं तर माणूस दु:खी होतो. टूथपेस्टने सुरुवात होणारा दिवस चूल, घर, माणसं, अपेक्षा, सेक्स, कर्तव्य, पूजा, व्रतं, वाहणारे रस्ते, नोकरी, तिथले ताण, मॉल, खरेदी, सिनेमे, दारू, लग्न, बारशी, डोहाळे जेवणं.. या सगळ्यात त्या- त्या वेळी रमत असूनही कश्शानेच समाधान पावत नाहीये माणूस. सुखाच्या शोधात दु:खाचाच साक्षात्कार होत राहतो. दु:खाकडेही कवयित्री बघते- कवितेच्या निर्मितीच्या वेणांच्या रूपात. दु:खाचा जन्म होतो तसंच त्याचं निधनही होतं! जन्मणाऱ्या दु:खाला उत्पत्ती-स्थिती-लयाच्या चक्रातून जावं लागतं..
‘दु:ख मरतं
माणसाबरोबर निष्ठेने सती जातं
समजून उमजून जगण्या-मरण्याचा
स्वीकार करत
नि:संगतेच्या काठावर
दु:ख देह ठेवतं..’
‘कविता’ या तिसऱ्या भागात निर्मितीच्या, सर्जनाच्या, काव्यजगतातील भल्याबुऱ्या गोष्टींच्या कविता आहेत. डॉ. नीलिमा गुंडी यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘कविता विभागातील कविता हे तिच्या सर्जनशील जगण्यातील श्रेयस आहे.’ हा आत्मशोध आहे. काहीतरी शब्दबद्ध करण्याची निकड, निकराचा शोध असं काहीसं अस्वस्थ करणारं पकडण्याचा हा प्रयत्न. कवितेचा निर्मितीचा क्षण बेफाम, बेभान असतो. लौकिकाच्या कुठल्याच कसोटीत न सापडणारी ती हवीहवीशी तळमळ ‘तळ्यात-मळ्यात’मध्ये चपखल उतरलीय..
‘केव्हाही समाधी लागू शकेल
अशा तंद्रावस्थेत तरंगत असतं अस्तित्व
मन लागतं संज्ञाप्रवाही धारेला
सुटून जातात व्यवहाराचे लगाम हातातून..’
कवितेतलं रमणं, त्यातलं भारावलेपण, झपाटलेपण, तिचा दंश आणि तिचाच उतारा असा सारा मामला आहे. ‘प्रत्येक कविता म्हणजे तुकडय़ा-तुकडय़ाने आत्महत्या..’ असं म्हणत कवयित्री मांडत राहते- ‘कविता लिहिणं असं आयुष्य ओढून घेईल असं वाटलं नव्हतं,’ असं कबूल करत म्हणते-
‘तिनं भाषेच्या नजरेला नजर देत
पचवलं काळजातलं काळंकुट्ट जहर
भणाण वाऱ्यात, तुफान माऱ्यात
कविता डचमळली प्रहर- दो प्रहर
आणि सरसर करत पुढच्या क्षणी कापत निघाली
जिवाशिवाचं अंतर..’
पण बऱ्याचदा हवी तशी उतरत नाही कविता. तिला भय असतं- आपल्याच व्यक्तित्वाचं, संस्कारांचं, परंपरांचं, मुक्त अभिव्यक्तीचं, टीकाकारांचं. मग ती कविता होते सोज्वळ, वरवरची, भूमिका नसलेली. म्हणून कवयित्री आशयाचं टोक काढायचं म्हणते. भूमिकेचं भरभक्कम भान आणायचं म्हणते. स्पष्ट नि निधडं व्हावं म्हणते. ‘छापून आली की कविता सर्वाची असते, तरी कवयित्री नवऱ्यापासून, मुलापासून लपवून ठेवते आपल्या कविता..’ हा लौकिकातला दुखरा विरोधाभास. दु:ख देणारी कविता कवयित्रीला साद घालते, तशीच ‘कवितेमधून स्वत:शी बोलणं जमत नाही आताशा..’ म्हणत खंतावते. ‘माझी भाषा’ ही कविता इतर अनेक कवितांप्रमाणे सामाजिक विषण्णतेवर रोखठोक भाष्य करते. शतकानुशतकांची वळणं घेत आलेली, सळसळणारी आपली भाषा साऱ्या छोटय़ा-मोठय़ा प्रवाहांना पोटात सामावून वाहत राहते. तरी त्या भाषेवरून दंगे होतात, राजकारण होतं. त्यावेळी-
‘भाषा विषण्ण होते, सुरकुतते क्षणभर
पण पुन्हा मोठय़ा मायेनं विशाल होते
क्षुद्र हेवेदावे, स्वार्थ, मग्रुरी, दुजाभाव
भाषेच्या उदरात सारंच काही सामावलं जातं
सारं काही पचवून भाषेचं पाणी
दोन्ही तीर सांधत
स्वच्छ निर्मळ वाहतच राहतं..’
कवी जरी अलौकिक अशा प्रतिसृष्टीत विहरत असला तरी व्यवहारी लौकिकापासून तो दूर राहू शकत नाही. साहित्याच्या क्षेत्रातील अपप्रवृत्ती, चांगल्या गुणांची उपेक्षा, हारतुऱ्यांत हरवलेले कार्यक्रम, मॅनेज केलेले पुरस्कार असं सारं काही कवीला बेचैन करतं. स्वत:ला सतत मिरवत ठेवण्याची कला काही सगळ्यांकडे नसते. ‘आपल्याला नाही गाजवता येत स्मार्ट कवित्व..’ असं म्हणणाऱ्या कवयित्रीची कविता साहित्य-संस्कृतीच्या इव्हेंट्समध्ये आक्रसू इच्छिते.
पण संवेदनशील आणि भावसमृद्ध रसिक वाचकांना मात्र अंजली कुलकर्णी यांची कविता जाणिव-नेणिवेच्या विराट प्रदेशातील वास्तवाचे लखलखीत कवडसे दाखवते. चिंतनशील काव्याकाशातील ही त्रिबंधात्मक काव्यांजली जगण्याचा तळ ढवळून काढते. कवयित्रीला (वाचकांसह) जायचंय शब्दांच्या पलीकडे! त्यासाठी पुन्हा कविताच शब्दबद्ध होते-
‘मला सुटायचंय या शब्दांच्या क्रूर पिंजऱ्यातून
नि पोहोचायचंय जीवघेण्या कवितेच्या पलीकडे
भाषेपूर्वीच्या निरभ्र आभाळात..’

‘रात्र, दु:ख आणि कविता’
– अंजली कुलकर्णी, पद्मगंधा प्रकाशन, पुणे, पृष्ठे- ११८, किंमत- १२० रुपये.
ashleshamahajan@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2015 12:25 am

Web Title: poems on life meaning
Next Stories
1 प्राणिजीवनाचा निखळ, गोड आरसा
2 मनस्वी शिक्षकाची कहाणी
3 डिलीट झालेल्या भुईची गोष्ट
Just Now!
X