कविवर्य मंगेश पाडगांवकर यांचं चतुरस्र कवी तसंच एक मिश्कील, खटय़ाळ व्यक्तिमत्त्व म्हणून अतिशय आरसस्पानी रूप जवळून न्याहाळायला मिळालेल्या भाग्यवंतांपैकी एक असलेल्या त्यांच्या सुहृदाचं हे उत्कट, रसीलं मनोगत..
कविवर्य मंगेश पाडगांवकरांची कविता-गीतं म्हणजे मोगऱ्याची टपोरी फुलं. नियतीने पाडगांवकरांच्या प्रतिभेला कधीही धोका दिला नाही. त्यांचा हात सतत लिहिता ठेवला. आपल्या कवितेतली, गीतांतली आशयघनता सातत्याने टिकवलेला हा श्रेष्ठ कवी!
अभिजात कविता, गीतं, बालगीतं, संगीतिका, बोलगाणी, वात्रटिका असे नाना प्रकार पाडगांवकरांनी फार समर्थपणे हाताळले. पाडगांवकर संस्कारक्षम वयात प्रा. वा. ल. कुलकर्णी, कविवर्य बा. भ. बोरकर, रावसाहेब पटवर्धन, अच्युतराव पटवर्धन यांच्या संगतीत मनोमन सुखावले. प्रा. वा. ल. कुलकण्र्यानी त्यांना कविता आणि गीत यांच्यातला सूक्ष्म फरक समजावून सांगितला. कविवर्य बा. भ. बोरकरांनी त्यांच्या बाळमुठीत समर्थ शब्दकळेचा एक केशरी तुरा दिला. पटवर्धन बंधूंनी शब्दांच्याही पलीकडे एक सामर्थ्यांचा पल्ला असतो याचं भान दिलं. असल्या खानदानी संस्कारांत पाडगांवकरांची राजमुद्रा तयार झालेली होती. गीत गाण्याचं प्रयोजन सांगताना मंगेश पाडगांवकरांनी म्हटलं आहे :
अपुल्या हाती नसते काही हे समजावे
कुणी दिले जर हात अपुले हाती घ्यावे
कधीच नसतो मातीवरती हक्क अपुला
पाण्याने जर लळा लाविला रुजून यावे
भिरभिरणाऱ्या फुलपाखरा नसे नकाशा
विसावले जर ओंजळीचे फूल करावे
नको याचना जीव जडवूनी बरसातीची
मेघच जर जाहले अनावर भिजून घ्यावे
नको मनधरणी अर्थाची नको आर्जवे
शब्दांनी जर मिठी घातली गाणे गावे..
पाडगांवकर मिठी घालावी असे शब्द गाण्यातून देऊन गेले.
एकदा पाडगांवकर ‘कधी बहर, कधी शिशिर, परंतु दोन्ही एक बहाणे.. डोळ्यांमधले आसू पुसती ओठावरले गाणे’ या त्यांच्या गीताच्या ध्वनिमुद्रणाची आठवण सांगत होते.. ‘सुधीर फडक्यांनी केलेले शब्दांचे उच्चार ही एक थरारून टाकणारी गोष्ट होती. शब्द माझेच होते. त्यामुळे मला तरी त्या शब्दांचं नावीन्य नव्हतं. पण सुधीर फडक्यांच्या आवाजात ते ऐकताना माझेच शब्द आता मला नव्याने भेटत होते. ‘बहर धुंद वेलीवत यावा’ या ओळीतील ‘बहर’ आणि ‘धुंद’ या शब्दांतून व्यक्त होणारी तारुण्यातल्या फुलण्याची धुंदी.. ‘हळूच लाजरा पक्षी गावा’ या ओळीतील पक्ष्याच्या गाण्यातून व्यक्त होणारं कोणाचंतरी ते कोवळं लाजरेपण.. ‘आणि अचानक गळून पडावी विखरून सगळी पानं’ या ओळीतील निराशा आणि आधीच्या दोन ओळींतील विरोधाचं नातं- हे सारं सुधीर फडके इतक्या विलक्षण उत्कटतेनं प्रकट करत होते, की त्यांच्या गायनातून माझी कविता नव्याने जन्म घेत आहे असं मला वाटलं.’ एका प्रतिभावंत कवीने तितक्याच प्रतिभावंत गायकाला दिलेली ती उत्स्फूर्त दाद होती.
मंगेश पाडगांवकर रेडिओवर असतानाची त्यांची सतत चाललेली धावपळ पाहून सोपानदेव चौधरी यांनी पाडगांवकरांवर केलेली ही कविता-
हे टेबल तुज नसे सुटेबल
तू एबल जरि अन् केपेबल

तू सायनचा सायंतारा
अंतरात तव काव्यपसारा
नभोवाणी परि तुज हो स्टेबल- हे टेबल

chaturang article, mazhi maitrin chaturang
माझी मैत्रीण : जिवाभावाची…
rajan vichare
भाजप आमदार संजय केळकर राजन विचारेंच्या भेटीला…
Raj Thackerey teaser
VIDEO : राज ठाकरे- अमित शाह यांच्या बैठकीत काय ठरलं? शिवतीर्थवरून मिळणार उत्तर, पाहा पाडवा मेळाव्याचा टीझर!
Harsha Bhogle's reaction to Hardik Pandya
IPL 2024 : ‘त्याची चूक काय…’, हार्दिकवर होणाऱ्या टीकेवर दिग्गज समालोचक संतापला, टीकाकारांना दाखवला आरसा

ज्या श्वासाची व्हावी अक्षरे
तेच उसासे बनती सारे
सदा धावपळ अन् तारांबळ- हे टेबल
फीचर- भाषण अथवा गाणे
तुझ्या ध्वनिफितीवर तया फितविणे
तुझ्या यशाला हेच काय बळ? – हे टेबल

सरस्वती सारस्वत सविता
ऐसी प्रभावी सुंदर कविता
यातच रे तव साठविले बळ – हे टेबल
अनुभूतीच्या भरल्या गाडय़ा
शब्दांनाही फुटल्या दाढय़ा
शब्दांचे हनुवटीला लेबल- हे टेबल
चराचरातील दळते सुज्ञा
जगण्याची मग कुणा प्रतिज्ञा
मर्ढेकरही झाले हतबल- हे टेबल
(पाडगांवकरांनी त्यांच्या वैयक्तिक संग्रहातून मला दिलेली ही कविता आहे.)
padgoankar01
पाडगांवकर अतिशय मिश्किल होते. कविवर्य वसंत बापटांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त दादर-माटुंगा कल्चरल सेंटर येथे पाडगांवकरांनी आणि विजया राजाध्यक्ष यांनी बापटांची प्रकट मुलाखत घेतली. त्या मुलाखतीत झालेला हा संवाद..
पाडगांवकर : बापट, तुम्ही अभिजात कविता, गीतं, पोवाडे, लावणी, सवाल-जवाब, समाजवादी पक्षासाठी प्रचारकी गाणी सगळं लिहिलंत. ‘समाजवादी साथी गाती एका आवाजात’ असं तुमचं एक गाणं आहे. त्यात तुम्ही केलेली छंदाची गंमत खूप छान आहे. पण समाजवादी मंडळींची सध्याची परिस्थिती बघता ‘समाजवादी साथी गाती एका आवाजात’ इतकं धाष्टर्य़ाचं विधान तुम्ही कसं काय करू शकलात?
वसंत बापट : मी जेव्हा ‘समाजवादी साथी गाती एका आवाजात’ हे गीत लिहिलं तेव्हा समाजवादी साथी एका आवाजात गातील असं मला वाटलं होतं. पण आज जर मला हे गाणं लिहायला सांगितलं तर मी लिहीन-
‘समाजवादी साथी गाती साती आवाजात.’
पाडगांवकर : हे जास्त बरोबर आहे!
एकदा पाडगांवकरांना कार्यक्रम चालू असताना ‘‘नीज माझ्या नंदलाला नंदलाला रे’ या अंगाईगीतात आलेला जीवघेणा ‘रे’ तुम्हाला कसा काय सुचला?’ असं विचारलं. त्यावर ते म्हणाले, ‘लहान मुलाचा पाळणा झोका दिल्यानंतर एक क्षणभर पलीकडे थांबतो आणि परत येतो. ते जे क्षणभर थांबणं आहे तो ‘रे’ आहे.’ पाडगांवकरांच्या या सांगण्याने त्या अंगाईगीताकडे पाहण्याची दृष्टीच बदलून गेली.
पाडगांवकर सांगत होते, ‘मी माझ्या कवितेत कोणाच्या सांगण्यावरून कधी बदल करत नाही. पण एकदा मात्र माझ्या मुलाच्या सांगण्यावरून एक शब्द बदलावा लागला. ‘दिवस तुझे हे फुलायचे.. झोपाळ्यावाचून झुलायचे’ या गीतात एक चरण आहे- ‘माझ्या ह्य घराच्या पाशी, थांब ना गडे जराशी!’ माझा मुलगा म्हणाला, ‘बाबा, या चरणातला ‘ना’ हा शब्द बदला. तुम्ही म्हणताना ‘ना’चा पॉझ व्यवस्थित घेत आहात. पण गायक मंडळी अनवधानाने या गीताचं वस्त्रहरण करून टाकतील.’ त्यानंतर मी लिहिलं- ‘माझ्या ह्य घराच्या पाशी, थांब तू गडे जराशी!’
पाडगांवकर एका गाण्याच्या कार्यक्रमाचं निवेदन करत होते. समोर लता मंगेशकर बसल्या होत्या. गायक अरुण दात्यांचे भाऊ रवी दाते तबल्याच्या साथीला होते. पाडगांवकर सांगत होते : ‘येणारं माझं गाणं लता मंगेशकरांनी म्हटलं आहे.’ मी त्यांची स्तुती करत होतो. तेवढय़ात रवी दाते त्याच्या जागेवरून ओरडला- ‘पाडगांवकर, हे सगळं कवितेत सांगा.’ तेव्हा मी दोन ओळी तिथल्या तिथे रचून म्हटल्या-
‘ऐकता गाणे गायकांचे वानितो त्यांच्या स्वराला
ऐकता गाणे लताचे मानितो मी ईश्वराला!’
पाडगांवकर एकदा सांगत होते- ‘गीताचा चांगला मुखडा सुचताना कधी कधी त्रास होतो. एकदा माझी पत्नी न्हायल्यानंतर गच्चीमध्ये कपडे वाळत घालत होती. तेव्हा वाऱ्याने तिचे ओले केस उडत होते. ते दृश्य बघून मला गीताचा मुखडा सुचला-
‘जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा
माझा न राहतो मी हरवून हा किनारा..’
‘त्याचप्रमाणे ‘श्रावणात घननिळा बरसला’ हे गीत मी निसर्गात जाऊन वगैरे लिहिलेलं नाही. एका अत्यंत विसंवादी वातावरणात ते लिहिलेलं आहे. हार्बर लाइनच्या सायन स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर मी मुखडा लिहिला. घरातून स्टेशनवर येईपर्यंत घामाने ओलाचिंब झालो होतो. त्या चिकचिकाटातून एरउअढए मिळावा म्हणून हा मुखडा मी लिहिला. ट्रेनमध्ये श्रीनिवास खळ्यांकडे त्या गीताचा मुखडा दिला. तो वाचून खळे एकदम गप्प झाले. व्ही.टी.ला उतरल्यावर खळे मला म्हणाले, ‘‘मुखडय़ाची चाल तयार आहे. उरलेलं गाणं केव्हा देता?’’ मी म्हटलं, ‘‘लिहिलंय कुठे?’’ पुढे मी चार दिवस खळ्यांना एक- एक कडवं देत होतो आणि खळे त्याला चाल लावत होते. अशी चार दिवसांत चार कडवी दिली. प्रत्येक कडव्याची चाल वेगळी आहे; पण सम तीच आहे.’
पाडगांवकरांबरोबरचे दिवस अत्यंत सुखात गेले. एक खराखुरा प्रतिभावंत जवळून न्याहळता आला. त्याबद्दल मी नियतीशी कृतज्ञ आहे. माझा मित्र अशोक बापट याच्या शब्दांत पाडगांवकरांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो..
वर्षांच्या शेवटी जाता जाता दु:ख देऊन गेलात तुम्ही पाडगांवकर काका!
आम्ही तुम्हाला विसरूच शकत नाही!
तुम्ही आम्हाला ‘शतदा’ प्रेम करायला शिकवलंत!
तुम्ही आम्हाला ‘तुमचं आमचं प्रेम सेम असतं’ हे शिकवलंत!
तुम्ही आम्हाला ‘झोपाळ्यावाचून’ झुलायला शिकवलंत!
तुम्ही आम्हाला ‘स्मृति’ देऊनी जाणारी पाखरं दाखवलीत.
तुम्ही आम्हाला ‘भातुकली’च्या खेळामधली राजा आणि राणी दाखवलीत.
पण शेवटी तुम्ही अध्र्यावरती डाव मोडून निघून गेलात.
पुन्हा एकदा कविश्रेष्ठाला सलाम!