जीवनानुभवाकडे कलात्मकतेच्या नजरेने पाहण्याची एक अद्भुत शक्ती कवीकडे असते. तर्काच्या प्रकाशात तो प्रत्येक अनुभूतीला न्याहाळण्याचा प्रयत्न करतो. जीवनाचे अधिक दर्शन साहित्यामधून होत असते. चिंतनाने तथा सृजनाने भाषा आणि समाज सांस्कृतिकदृष्टय़ा समृद्ध होत असतो. साहित्य आणि जीवन वेगवेगळे नसते. राष्ट्रीय संकटापासून अभावग्रस्त समाजाच्या व्यथा वेदनांपर्यंत, वास्तवाच्या प्रगल्भ जाणिवांचे दर्शन आपल्या कलाकृतीतून व्हावे, याचे समग्र भान कलावंताला असणे अनिवार्य असते.

कवी, गझलकार सदानंद डबीर यांच्या निवडक गझला, कविता, गीते यांचा संग्रह ‘ग्रंथाली’ने प्रकाशित केला आहे. ‘छांदस’ असे संपादित संग्रहाचे शीर्षक आहे. त्यात ९७ गझला, २६ कविता आणि १३ गीते, ‘शब्दशलाका’ (छोटय़ा मुक्त कविता) आहेत. ‘लेहरा’, ‘तिने दिलेले फूल’, ‘खयाल’, ‘आनंदभैरवी’, ‘काळिजगुंफा’ या त्यांच्या पूर्वप्रसिद्ध संग्रहातील काही निवडक रचना ‘छांदस’मध्ये आहेत. काही नवीन रचनाही या संग्रहात आहेत.

उर्दू-मराठी गझलचे व्यासंगी अभ्यासक डॉ. राम पंडित यांनी हे पुस्तक संपादित केले आहे. सुरेश भटांच्या प्रभावातून डबीर गझल लेखनाकडे वळले. पुढे मात्र त्यांनी भटांचे बोट सोडून स्वतंत्र वाटचाल केली आणि दर्जेदार रचना लिहिल्या. समकालीन कवींपेक्षा डबीरांची अभिव्यक्ती पृथक आहे.

‘काळिजगुंफेमधला वारा, जरा हालला बहुधा

मनात माझ्या तुझा चेहरा, जरा तरळला बहुधा’

डॉ. राम पंडित म्हणतात, ‘डबीरांच्या गझलेत ‘खयाल’ या संग्रहापासून अलगदपणे शैलीत परिवर्तन घडत गेले. त्यांची गझल उत्तरोत्तर गंभीर, चिंतनात्मक आणि जीवनविषयक प्रश्नांचा मागोवा घेणारी होत गेली. आता ती काही जणांना कवितेच्या जवळ जाणारी वाटेलही; पण कविता आणि गझलेच्या सीमारेषा आधुनिक उर्दू गझलेतही पुसट होत आहेत, हे नमूद करायला हवे.’

डबीरांचे बरेचसे शेर जीवनाच्या वास्तवाचे तरल, संक्षिप्त वर्णन करतात. त्यांच्या काही कविता, गझला संक्षिप्त जरी असल्या तरी त्या वाचकाला जीवनाच्या विराट तपशिलातून फिरवतात. त्यांनी लिहिलेल्या एका गझलेतील पुढील शेर पाहा-

‘मी उन्हाचे घर असे गुलमोहराने झाकले

लालपिवळ्या पाकळ्यांचे अन् सडेही घातले’

किंवा

‘रुपया असून बंदा मी वाजलो कुठे?

गाजून मात्र गेले धेले कितीकदा’

डबीरांच्या अनेक गझलांमधून त्यांनी ‘स्वरकाफिया’चा वापर केला आहे. तरीही आशय, अभिव्यक्तीला त्यामुळे धक्का लागत नाही. अर्थगर्भ शब्दांमुळे आशयाची घनता वाढते. यमकानुगामी रचनेकडे डबीरांचा कल नाही हेही कळते.

डबीरांनी काही अर्थपूर्ण गीते, पुस्तकेही लिहिली आहेत. विधावैविध्य, विषयवैविध्य आणि विचारवैविध्य ही त्यांच्या रचनेची खासियत म्हणावी लागेल. गेयता आणि काव्यगुण यांच्या संगमातून निर्माण झालेले गीत म्हणजे उत्कृष्ट कविताच असते. गीतात काव्यमूल्ये विद्यमान असावी लागतात. आशयसंपृक्त गीते रसिकांच्या अंत:करणात विविध भावतरंग उठवतात. प्रत्येक कवीला असे गीतभान असतेच असे नाही. गीतातून तरल भावमयता, प्रासादिकता साधावी लागते.

श्रावणाचे ओले गीत ओठावर येण्यासाठी आसवांच्या पावसाने मनही भिजावे लागते. आयुष्याचे सारे श्वास खर्ची टाकून गझल जे जे मागेल ते ते तिला द्यावे लागते, अशी डबीरांची धारणा आहे. जगण्याच्या वळचणीला थांबलेले श्वास कवीला हाकारत असतात. कवी जेव्हा काळोख सोबत घेऊन जातो, तेव्हा सूर्यही ओशाळून त्याच्यामागे धावतो.

डबीरांनी चौफेर जीवन पाहिल्यामुळे बऱ्या-वाईट अनुभवांची प्रतिबिंबे त्यांच्या कवितेत उमटणे स्वाभाविक आहे. त्यांच्या रचना वाचून जाणिवांच्या कक्षा रुंदावतात, विस्तारतात. अनुभवांची समृद्धी वाढवतात. कवीने उपयोजिलेले अर्थगर्भ शब्द काव्यातील सुप्त अर्थवत्तेला अर्थघन करतात.

मानवी जीवनातील अपरिहार्य, सनातन प्रश्नांची सखोल जाण व्यक्त करणाऱ्या या कविता वाचकांनाही विचारप्रवृत्त करतात. कवीने उपस्थित केलेले प्रश्न अधिक समग्रतेने जीवनाला भिडू पाहतात. खरे तर जीवनाच्या पसाऱ्यातच कविता सापडते. याचे तीव्र भान कवीकडे आहे, हेही कळते. सृजनधर्मी काव्याला लावण्याचा स्पर्श झालेला आहे, याची प्रचिती येते. आयुष्यातल्या बऱ्यावाईट, व्यामिश्र अनुभवांची पुंजी जमा करीत कवी आजच्या वर्तमानाला भिडू पाहतो. जीवनविषयक जाणिवांचे ओझे शब्दांच्या पाठीवर कलात्मकतेने देतो. कलावंताचे जन्मप्रयोजन यासाठीच तर असते!

‘छांदस-

कवी सदानंद डबीर यांच्या निवडक रचना’,

संपादन- डॉ. राम पंडित,

ग्रंथाली प्रकाशन,

पृष्ठे- १७९, मूल्य- २०० रुपये.