कुठलाही अभिनिवेशी पवित्रा न घेता महानगरीय जाणिवा प्रभावीपणे आपल्या कवितांमधून मांडणारे कवी तुळसी परब यांचे अलीकडेच निधन झाले. मराठी साहित्यातील त्यांचे वेगळेपण नमूद करणारा हा लेख..
‘चळवळ’ आणि ‘साहित्य’ या तशा परस्परांशी तितक्याशा संबंध नसलेल्या संकल्पना आहेत, हे एक विधान झाले. परंतु येथे ‘चळवळी’ची आपण कोणती व्याख्या करतो यावर हा संबंध जोडता येतो किंवा नाकारताही येतो. यातूनच साहित्याची चळवळ होऊ शकते का, किंवा चळवळीचे साहित्य होऊ शकते का, असे प्रश्नही उद्भवू शकतात. किंबहुना, गेल्या ५० वर्षांत मराठी साहित्य आणि व्यवहार याच दोन प्रश्नांच्या उत्तरांचा पाठलाग करताना दिसून येतो. यासंदर्भात काहींना त्यांची उत्तरे सापडली, काहींनी तसा आव आणला, तर काहीजण अजूनही त्यांचा पाठलाग करताहेत. ही उत्तरे शोधणारी किंवा हे प्रश्न निर्माण करणारी एक सशक्त पिढी मराठी साहित्यजगतात एकेकाळी वावरत होती. त्या पिढीचे एक शिलेदार कवी तुळसी परब अलीकडेच निवर्तले. त्यांच्या जाण्यानंतर माध्यमांनी आणि साहित्यजगताने घेतलेली त्यांची दखल आणि उमटलेल्या काही मोजक्याच व क्षीण प्रतिक्रियांमधून उपरोक्त दोन प्रश्नांची आजच्या काळातील उत्तरे आपण मिळवू शकतो. पण ते असो. खुद्द तुळसी परब यांनी स्वत: मात्र अशी उत्तरे आपल्याला मिळाल्याचा दावा कधीही केला नाही. किंबहुना, या प्रश्नांच्या जंजाळातच ते अडकले नाहीत असेही म्हणता येईल. त्याचे कारण- त्यांची कविता!
मुंबईतील चाळ नावाच्या व्यवस्थेमध्ये बालपण गेलेल्या तुळसी परब यांनी भाषाशास्त्रात एम. ए. केले. पुढे सचिवालयात काही काळ नोकरीही केली. परंतु या नोकरीत त्यांचा जीव फार काळ रमणारा नव्हता. तत्कालीन वाङ्मयविश्वात नव्या दमाच्या पिढीने प्रवेश केला होता. त्यात दिलीप चित्रे, अरुण कोलटकर, नामदेव ढसाळ, मनोहर ओक, वसंत गुर्जर, राजा ढाले, सतीश काळसेकर आदी तरुणांनी नव्या दृष्टीचे साहित्य प्रसवायला सुरुवात केली होती. तुळसी परबही त्यांना येऊन मिळाले. बंडखोरी हा या पिढीचा स्थायीभाव. लघुनियतकालिकांची चळवळ त्यातूनच जन्माला आली. ‘सत्यकथा’ या वाङ्मयीन मासिकाची प्रतीकात्मक होळी करून या तापसी तरुणांनी प्रस्थापिततेला असलेला आपला कडवा विरोधही त्यातून जाहीर केला. त्यावेळी काढण्यात आलेल्या पत्रकात ज्या मोजक्या जणांची नावे होती, त्यातले एक नाव तुळसी परबांचेही होते. पुढेलघुनियतकालिकांतून परबांच्या कविता येऊ लागल्या. याच काळात त्यांचा ‘हिल्लोळ’ हा पहिला कवितासंग्रह १९७३ मध्ये प्रकाशित झाला. एका बाजूला अनियतकालिकांच्या चळवळीतून येणारा बंडखोरीचा आवाज, त्याचवेळी दलित साहित्यातून येणारी नकार आणि विद्रोहाची अभिव्यक्ती अशी प्रभावक्षेत्रे आजूबाजूला असतानाही त्यांच्या या संग्रहातील कवितांमध्ये आकांती विद्रोह आढळत नाही. महानगरीय जीवन, प्रस्थापित व्यवस्था, अव्यवस्था, मानवी स्वातंत्र्य यांचे तत्कालीन वास्तव त्यांच्या ‘हिल्लोळ’मधील कवितांतून प्रकर्षांने उमटले आहे. यानंतरच्या काळात त्यांनी काही वर्षे धुळे जिल्ह्य़ातील शहादा येथे शेतमजूर व आदिवासींसाठी चाललेल्या चळवळीत काम केले. त्यात स्थानिक दांडग्या जमीनदारांचे हितसंबंध दुखावल्याने गुंडांकरवी त्यांना जबर मारहाणही सोसावी लागली. पुढे आणीबाणीविरोधी लढय़ात परबांनी काही महिने ‘मिसा’ कायद्याखाली कारावास भोगला. कारावासात लिहिलेल्या कवितांचा ‘धादांत आणि सुप्रमेय्य मधल्या मधल्यामधल्या कविता’ हा कवितासंग्रहही तेव्हाच आला. कवीची राजकीय जाणीव आणि त्याची स्वप्ने यांच्यातील काव्यात्म अंतर्विरोधांचा प्रभावी उच्चार त्यांच्या या कवितांमध्ये झालेला आहे. ‘हिल्लोळ’मधील कवितांपेक्षा या कविता खूपच प्रगल्भ झालेल्या दिसून येतात.
यानंतरचा त्यांचा पुढचा कवितासंग्रह ‘कुबडा नार्सिसस’ हा सुमारे २५ वर्षांनी प्रकाशित झाला. आयुष्याच्या एवढय़ा मोठय़ा कालखंडात भवताल व स्वत:तही झालेले बदल त्यांनी या संग्रहातील कवितांमध्ये टिपले आहेत. जागतिकीकरण, अस्मितांचे आरोपण, दिवसेंदिवस गतिमान होत जाणारे महानगरीय जीवन अशा स्थित्यंतरांमध्ये स्वप्न आणि कार्यकर्तेपण यांच्यातील वाद-संवाद आणि त्यातून उभा ठाकलेला अस्तित्वाचा पेच असा आशयाचा मोठा पैस या कवितांनी व्यापलेला आहे. मराठीतील राजकीय भानाच्या कवितेच्या प्रवाहात मोलाची आणि ठोस भर घालणारा हा कवितासंग्रह आहे. परबांचे कवी म्हणून असलेले मोठेपण सांगायला हा एकच कवितासंग्रह पुरेसा आहे. त्यानंतर अगदी अलीकडे ‘हृद’ हा त्यांचा नवा संग्रहही प्रकाशित झाला आहे. अजूनही त्यांच्या अनेक कविता संग्रहरूपात यायच्या बाकी आहेत. याशिवाय ‘पाब्लो नेरुदांच्या कविता’ तसेच चंद्रकांत पाटील यांच्यासह ‘मनोहर ओकच्या ऐंशी कविता’ या संग्रहांचेही त्यांनी संपादन केले आहे.
मुंबई नावाच्या महानगरात वाढलेल्या परबांचा प्रवास कवितेच्या साहाय्याने कसा झाला हे त्यांच्या प्रकाशित कवितासंग्रहांवरून ध्यानात येईलच; पण त्यांच्यातील कार्यकर्त्यां कवीला आयुष्याच्या पूर्वार्धात पडलेल्या स्वप्नांच्या प्रवासाचे काय? त्यांच्या पहिल्या संग्रहापासूनच ही स्वप्ने व त्यावर वास्तवाचे होणारे कलम हा पेच ते आपल्यासमोर कायम मांडत राहिले. साहित्यात जसा या पेचाचा शोध त्यांनी घेतला, तसाच तो वेळोवेळी परिवर्तन चळवळींत सहभागी होऊनही घेतला. त्यामुळेच साहित्य की चळवळ, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला नाही. परिणामी या प्रश्नाचे उत्तर शोधण्याच्या फंदातही ते पडले नाहीत. त्यांनी आपले हे कवीपण, कार्यकर्तेपण आणि महानगरीय जीवन, त्यातील सौंदर्य व कुरूपतेसहित आपलेसे केले. परंतु प्रश्न आहे तो- येथील चळवळ तसेच साहित्य कंपूवाल्यांनी आणि या उघडय़ावागडय़ा महानगराने त्यांची व त्यांना उमगलेल्या पेचांची किती दखल घेतली, याचा. मार्क्‍सवादी व महानगरीय संवेदना व्यक्त करणारा कवी म्हणून मराठीजगताने नारायण सुर्वेना सहानुभूतीपूर्वक डोक्यावर घेतले. परंतु सुर्वेमास्तरांच्या कवितेच्या परंपरेतील पुढच्या कवींचे काय झाले, हा प्रश्न आपण विचारणार आहोत की नाही? आता तरी तो विचारला जाईल अशी अपेक्षा आहे. शहरीकरण, जागतिकीकरण, उदारीकरण आणि आधुनिकीकरणानंतरच्या या काळात सर्व व्यवस्थांची नासधूस होत असताना येणाऱ्या असंगततेशी भिडण्यासाठी तुळसी परबांनी नव्यांना एक पूल बांधून दिला आहे.. तेही पूर्णपणे नामानिराळे राहून! त्यांनीच एका कवितेत म्हटल्याप्रमाणे-
‘संकल्पसिद्धींचा सोहळा
मोकळा गळा
मी गातोय माझा भाव
भोळाभाळा,

नि आयुष्यव्यापावर विस्तारला मी जो डोळा
तो रालाय अद्याप नामनिराळा..

conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
lokmanas
लोकमानस: दांभिक नवनैतिकवाद्यांकडून अपेक्षा निरर्थक
cetcell latest marathi news, pune cetcell fee, one thousand fee cet cell marathi news
सीईटी सेलचा मोठा निर्णय : उत्तरतालिकांतील प्रश्नोत्तरांवर आक्षेप नोंदवण्यासाठी एक हजार रुपये शुल्क
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips
यूपीएससीची तयारी :  भूगोल (भाग २)

तो झालाय
एक निरामय वाळवंट
तो झालाय
माझ्या विस्तारीत
आलापीतला सुरवंट

आता मी घेणारेय
फक्त एकाच
बोटावर ढोका
झटकन मी होणारेय
कबुतराएवढं मोठ्ठं फुलपाखरू..’
प्रसाद हावळे – prasadhavale@expressindia.com