अमेरिकेतील येत्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे अंतिम उमेदवार कोण, हे फेब्रुवारी ते जूनदरम्यान निश्चित होईल. ही प्रक्रिया सध्या सुरू आहे. रिपब्लिकन पक्षातर्फे डॉनाल्ड ट्रम्प हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. आपल्या बेफाट आणि बेफाम वक्तव्यांनी सध्या ते सर्वत्र खळबळ उडवून देत आहेत. कोण आहेत हे ट्रम्पमहाशय? अमेरिकी जनता कितपत गांभीर्याने त्यांच्याकडे पाहते? या प्रश्नांची उत्तरे शोधणारा अमेरिकास्थित लेखिकेचा लेख..
राजकारणावर तज्ज्ञ व्यक्ती अभ्यासपूर्णरीतीनं लिहितात, बोलतात. तसंच सर्वसामान्य माणसंही या विषयावर जिव्हाळ्यानं आणि हिरीरीनं मत प्रदर्शित करत असतात. बहुतांशी सर्वाचंच राजकारणाबद्दल स्वतंत्र आणि ठाम असं मत असतं आणि प्रत्येकाला ते हक्काने मांडायलाही आवडतं. अगदी हेच सध्या अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीतील उमेदवारांच्या बाबतीत सुरू आहे. बराक ओबामांची आठ वर्षांची कारकीर्द आता संपणार आहे. ८ नोव्हेंबर २०१६ ला अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष निवडून येतील. रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षीय निवडणुकीतील अंतिम उमेदवार कोण, हे फेब्रुवारी ते जूनदरम्यान निश्चित होईल. सध्या अमेरिकेतील विविध राज्यांतील उमेदवारांमध्ये होणाऱ्या चर्चासत्रांतून कोणता उमेदवार कोणत्या राज्यात पुढे आहे याची चाचपणी सुरू आहे. सुरुवातीला डेमोक्रॅटिक पक्षातून हिलरी क्लिंटन निवडणुकीला उभ्या राहणार की नाही, याबद्दलची प्रचंड उत्सुकता जनमानसात होती. त्यांनी तो निर्णय घेतल्यावर इतर उमेदवारांतून अंतिमत: त्यांची निवड होईल का, या प्रश्नाची चर्चा व्हायला लागली. आणि अचानक सर्वाचा रोख वळला तो रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डॉनल्ड ट्रम्प यांच्याकडे.
रिपब्लिकन पक्षातून जेब बुश (माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांचे बंधू) यांच्यासह ११ उमेदवार या चुरशीत सामील झाले आहेत. हिलरी क्लिंटन यांच्याविरुद्ध यांच्यापैकी कोण समर्थपणे उभा राहू शकेल, याबद्दल उलटसुलट मतप्रदर्शन होत असतानाच डॉनल्ड ट्रम्प यांनी उमेदवारीच्या रिंगणात उडी ठोकली. त्यांनी ही उडी घेतली ती बहुधा मैदान गाजवण्याच्या इराद्यानेच. विरोधात असला, तरीही डेमोक्रॅटिक पक्ष डॉनल्ड ट्रम्पवर खूश आहे. कारण? डॉनल्ड ट्रम्प तोंड उघडतात ते चौफेर फटकेबाजी करण्यासाठीच. त्यामुळे रिपब्लिकन पक्षातील इतर उमेदवारांकडे कुणाचं लक्षच जात नाही. त्यांची मतं, योजना जनतेच्या मनात फार काळ रेंगाळत नाहीत. कारण डॉनल्ड ट्रम्प सनसनाटी विधानं करून स्वत:कडे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होतात. या चौफेर फटकेबाजीतील ताजं उदाहरण म्हणजे बेकायदेशीररीत्या मेक्सिकन लोकांनी अमेरिकेत प्रवेश करू नये म्हणून सीमेवर भिंत बांधण्याची त्यांनी केलेली घोषणा! या घोषणेनं अमेरिकेत खळबळ माजली. मेक्सिकन जनतेत अर्थातच असंतोष पसरला. काहीजण खूश झाले, तर काहींना डॉनल्ड ट्रम्प हे तारे तोडताहेत असं वाटलं. प्रत्येकाला या भिंतबांधणीबद्दल आपलं मत व्यक्त करावंसं वाटायला लागलं. अगदी प्राथमिक शाळेत जाणारा एक विद्यार्थीही या घोषणेनं पेचात पडला. या मुलानं लिहिलेला निबंधच त्याच्या शिक्षिकेनं प्रसिद्ध केला आहे. हा छोटा मुलगा म्हणतो- ‘मला स्वप्न पडलं की डॉनल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होणार नाहीत. पण ते झाले तर आशियाई, मेक्सिकन आणि आफ्रिकन लोकांना त्यांच्या देशांत परत जावं लागेल. या देशात फक्त १२,००० लोक राहतील. बरेच भारतीय अभियंते (इंजिनीअर) आहेत. ते इथे नसतील तर तंत्रज्ञान नसेल. आणि तंत्रज्ञान नसेल तर नेटफ्लिक्स नसेल. अशा देशात आवडेल राहायला तुम्हाला? अर्थात नाही!’ गमतीचा भाग सोडला तरी डॉनल्ड ट्रम्प ही वल्ली चर्चेचा विषय होण्यात यशस्वी झाली आहे.
कोण आहेत हे ट्रम्प? यशस्वी उद्योजक आणि करोडपती! वाहिन्यांवरच्या त्यांच्या ‘अ‍ॅप्रेंटिस’ या कार्यक्रमामुळे ते घराघरांत पोचले. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी १६ ते १८ व्यावसायिक
या कार्यक्रमात भाग घेतात. प्रत्येक भागाच्या शेवटी ट्रम्प त्यातील एकाला काढतात तेच- ‘यू आर फायर्ड’ म्हणत. हे त्यांचं वाक्य खूप प्रसिद्ध झालंय. तसाच त्यांचा ‘एक घाव- दोन तुकडे’ हा खाक्याही. निवडणुकीच्या रिंगणातही ते मांडत असलेली विधानं लोकांकरिता एकाच वेळी खळबळजनक, धक्कादायक तशीच मनोरंजकही आहेत.
ट्रम्प त्यांच्या बोलण्यानं लोकांची करमणूक करतात, त्याचवेळी एखाद्या समाजगटाला नाखूशही. मेक्सिकन लोकांनी अमेरिकेत प्रवेश करू नये म्हणून सीमेवर भिंत बांधायचं जाहीर करूनच ते थांबले नाहीत, तर त्याचबरोबर ‘मेक्सिकन लोक अमली पदार्थ या देशात आणतात, त्यांच्यामुळे या देशातले गुन्हेगार वाढतात, ते बलात्कारी आहेत..’ असंही त्यांना वाटतं. काही मोजकेच सभ्य मेक्सिकन या देशात आहेत, असं म्हणून त्यांनी मेक्सिकन लोकांचा रोष ओढवून घेतला आहे. मेक्सिकन जनतेनंतर ते मुसलमानांवर ताशेरे झोडतात. ‘जोपर्यंत अमेरिकन नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधांतरी आहे तोपर्यंत मुसलमान लोकांना अमेरिकेत येण्यास बंदी घालावी..’ या विधानाने अमेरिकेत तर खळबळ माजलीच; पण ब्रिटिश सरकारलाही ट्रम्पना ब्रिटनमध्ये प्रवेश करण्यास बंदी आणावी की काय, असं वाटून गेलं. देशाच्या भविष्याच्या बाबतीत त्यांच्या योजना या अशा आहेत. पण त्या पूर्णत्वाला कशा जातील, याबाबतचा निश्चित आराखडा मात्र त्यांच्याकडे नाही. त्यामुळे वास्तवापासून फारकत घेतल्यागत त्यांची योजना आणि विधानं आहेत असं मानलं जातं. हे कमी झालं म्हणून की काय, रिपब्लिकन पक्षातर्फे उभे असलेले ट्रम्प राजकारणातील व्यक्तींना आपण वेळोवेळी पैसे दिल्याचं अभिमानाने सांगतात. आणि त्यांना पाहिजे ती कामंदेखील या व्यक्ती त्यामुळे करतात याचा दाखला देतात. हिलरी क्लिंटनना पैसे दिल्याचे ते मान्य करतात तेव्हा ट्रम्प यांचं कोणतं काम हिलरींनी केलं असेल, असा साहजिकच प्रश्न मनात येतो. त्यावर ते सांगतात की, ‘मी हिलरींना लग्नाला हजर राहण्याचं आमंत्रण दिलं आणि विरुद्ध पक्षातील असूनही हिलरी ते नाकारू शकल्या नाहीत.’
हल्लीच आयोवा येथील रिपब्लिकन पक्षाच्या वादविवाद सभेत सहभागी होण्याचं नाकारत त्यांनी मोठा जुगार खेळला आणि तो जिंकलाही. आयोवा येथील वादविवाद हा उमेदवारांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. कारण तेथील प्राथमिक निवडणूक जिंकणारा उमेदवार राष्ट्राध्यक्ष होतो असा बऱ्याचदा आलेला अनुभव. पण इथे येण्याचंच त्यांनी नाकारलं ते मेगन केली या स्त्री-वार्ताहरामुळे. आधीच्या एका वादविवादात मेगनने त्यांच्याशी संवाद साधताना म्हटलं की, ते राजकीय व्यक्तींप्रमाणे तोलूनमापून न बोलता त्यांना जे वाटतं ते बोलतात. त्यामुळे ते लोकप्रिय आहेत. पण कधी कधी हे बोलणं हीन पातळीकडे झुकतं. हे स्पष्ट करताना त्यांचे स्त्रियांबद्दलचे उद्गार मेगननी त्यांना ऐकवले. त्यांनी स्त्रियांना डुक्कर, कुत्री आणि आळशी म्हटल्याची मेगननी त्यांना आठवण करून दिली. त्याला प्रत्युत्तर देताना डॉनल्ड यांनी प्रसार माध्यमांतील रोझी ओडानल्डबद्दल आपण तसं म्हटलं आहे, असं सांगितलं. पण ते खरं नाही. आणि सर्वच स्त्रियांबद्दल त्यांचं तसं मत असल्याचं मेगन यांनी ठामपणे सांगितल्यापासून डॉनल्डनी मेगन यांच्याशी कोणत्याही पद्धतीने संपर्क येऊ न देण्याचं ठरवलं. त्याचीच परिणती म्हणून आयोवामध्ये पुन्हा एकदा मेगन केलीच प्रश्नकर्त्यां असणार, हे समजल्यावर या चर्चासत्राला हजर न राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला. ट्रम्प यांच्या अनुपस्थितीत आयोवा येथील रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांचा वादविवाद किती लोक पाहतील? ट्रम्पनी ते नसल्याने लोकांचा या वादविवादामधला रस नाहीसा होईल असं म्हटलं. आणि प्रत्यक्षात तसंच झालंही. गेल्या उन्हाळ्यात रिपब्लिकन पक्षातील उमेदवारांचं वादविवाद सत्र २४ दशलक्ष लोकांनी पाहिलं. तर आयोवातील वादविवाद सत्र फक्त १३ दशलक्ष लोकांनी! कहर म्हणजे आयोवातील ही वादविवाद सभा जिंकली कुणी, या प्रश्नाचं उत्तर पाहता निवडणूकपूर्व गोष्टी किती मनोरंजक आहेत याची खात्री पटते. सर्वसामान्यांच्या मते, हा वादविवाद खऱ्या अर्थी जिंकला तो मेगन केलींच्या कृत्रिम पापण्यांनी!
ट्रम्प हे इतकं वादग्रस्त व्यक्तिमत्त्व असूनही ते लोकप्रियतेच्या शिखरावर सातत्याने का आहेत? आणि खरंच ते राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात असं किती जणांना वाटतं? ते लोकप्रिय आहेत ते त्यांच्या वक्तव्यांमुळे. लोकांची प्रचंड करमणूक त्यांच्या उद्गारांनी होत असल्यामुळे आता ट्रम्प काय बोलणार, या प्रतीक्षेत लोक असतात. राजकारणाशी काडीचाही संबंध नसताना ते राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात, असंही मानणारे असंख्य आहेत. त्यांना पाठिंबा असणाऱ्यांच्या मते, ते उत्तम व्यावसायिक आहेत, त्यामुळे व्यवस्थापनाचा उत्कृष्ट अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. डॉनल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाले तर सीमेवर नुसतीच भिंत बांधणार नाहीत, तर त्याचा खर्चही मेक्सिकन सरकारकडून घेण्याचा त्यांचा मानस आहे. यामुळेही जनता खूश आहे. ते व्यावसायिक असल्याने नोकऱ्या निर्माण करण्याचा त्यांचा दांडगा अनुभव देशाचा कारभार हाकताना नक्कीच कामी येईल, या देशात नोकऱ्यांची उपलब्धता वाढेल अशी खात्री अनेकांना वाटते आहे. त्यांच्या कंपनीचं अनेक वेळा दिवाळं निघूनही त्यातून ते बाहेर आले याचाच अर्थ ते पुनर्बाधणी करू शकतात. ते राष्ट्राध्यक्ष झाले तर व्हाइट हाऊसमधील कामात गर्क होतील आणि वेळेच्या अभावी त्यांचा आता कंटाळवाणा झालेला ‘अॅप्रेंटिस’ कार्यक्रम बंद करावा लागेल अशी स्वप्नं पाहणारेही काहीजण आहेत.
घोडामैदान फार दूर नाही. रिपब्लिकन पक्ष त्यांना राष्ट्राध्यक्षपदासाठी उमेदवारी देतो की नाही, ते लवकरच कळेल. आठ वर्षांपूर्वी रिपब्लिकन पक्षातील सारा पेलन नावाच्या वादळाने देशात खळबळ माजवली होती. याच सारा पेलन नुकत्याच डॉनल्ड ट्रम्प यांना पाठिंबा देत त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत. एका वादळाची दुसऱ्या वादळाला साथ मिळतेय. आता डॉनल्ड ट्रम्प नावाचं हे वादळ आणखी कोणाकोणाला झोडपतं ते पाहत राहायचं. दुसरं काय?
मोहना प्रभुदेसाई-जोगळेकर – mohanajoglekar@gmail.com

PMC pune municipal corporation
रस्त्यावर फेकलेल्या कचऱ्यातून पत्ते शोधून दंडाची वसुली; मोटारीतून कचरा फेकणाऱ्यांचा पाठलाग करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई
personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
Sharad pawar on loksatta agralekh
“मी फक्त लोकसत्ताचा अग्रलेख वाचला”, अजित पवारांच्या ‘त्या’ पत्रावरून शरद पवारांचा खोचक टोला, काय लिहिलंय अग्रलेखात?
parental anxiety parents concern about drug addict children
अधोविश्व : अमली पदार्थांमुळे पालकांमध्ये चिंता