|| विजय तरवडे

‘कलेसाठी कला’ ही भूमिका मांडणारे साहित्यिक प्रा. ना. सी. फडके आणि ‘जीवनासाठी कला’ या मताचे आचार्य प्र. के. अत्रे यांच्यात गतशतकाच्या मध्यात झालेला वाद साहित्यिक वर्तुळात बराच गाजला. या वादातून नेमके काय निष्पन्न झाले, याचा वेध घेणारे हे टिपण..  ४ ऑगस्ट रोजी ना. सी. फडके यांची शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती आहे. त्यानिमित्ताने..

Narendra Modi, Karad, public meeting,
नरेंद्र मोदींची कराडमध्ये ३० एप्रिलला जाहीर सभा, उदयनराजेंच्या प्रचारार्थ आयोजन
ram navami, shobha yatra, akola, vishwa hindu parishad, ram navami in akola, ram navami shobha yatra, ram navami vishwa hindu parishad, marathi news, ram navami news, akola news,
अकोला : रामनवमीनिमित्त राजराजेश्वरनगरी भगवामय; शोभायात्रेची ३८ वर्षांची परंपरा
mumbai gudi padwa celebration
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण, शिवराज्याभिषेकाचे प्रतिबिंब; गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढवण्यावर भर
Aditya Thackeray
‘एप्रिल फुल’ दिवस ‘अच्छे दिन’ म्हणून साजरा; आदित्य ठाकरे यांची भाजपवर टीका

अत्रे-फडके वाद हा गेल्या शतकातला साहित्यिक वर्तुळात गाजलेला वाद. ‘जीवनासाठी कला’ अशी अत्रे यांची आणि ‘कलेसाठी कला’ अशी फडकेंची भूमिका असल्याचे अनेक ठिकाणी उल्लेख असले तरी हा वाद अंतिमत: वैयक्तिक पातळीवरच गेला, हे सत्य आहे. या वादात भाग घेणाऱ्या व्यक्ती आणि त्यांची पिढी आता अस्तंगत झाली आहे. या वादातून नेमके काय निष्पन्न झाले? अत्रे, फडके, दोघांचे वाचक आणि एकूण मराठी साहित्याला या वादातून नेमके काय मिळाले? याविषयी मनात कुतूहल आहे. त्याबद्दल..

१९४० साली रत्नागिरी येथे झालेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. ना. सी. फडके यांची निवड झाली. अत्रे (‘कऱ्हेचे पाणी’- खंड तिसरा) आणि फडके (‘माझ्या साहित्यसेवेतील स्मृती’) या दोघांच्या म्हणण्यानुसार, अत्रे-फडके वादाला या संमेलनापासून आरंभ झाला. रत्नागिरी संमेलनापूर्वी अत्रेंनी अनेकदा फडकेंचे ज्येष्ठत्व, शिक्षण, साहित्यातली कामगिरी यांची दखल घेतलेली आहे. ‘कऱ्हेचे पाणी’च्या पहिल्या खंडातल्या एका प्रकरणात ते म्हणतात- ‘ना. सी. फडके हे त्याच वर्षी सेकंड क्लास ऑनर्समध्ये बी. ए. पास झाले होते. त्यांच्या आणि माझ्या वयात चार वर्षे अंतर आहे.’

दुसऱ्या खंडात कोल्हापूरच्या संमेलनाचा उल्लेख आहे. त्यावेळी फडके तिथेच राजाराम कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. परंतु त्यांनी संमेलनावर बहिष्कार घातला. संमेलनानंतर शंकरराव किर्लोस्करांनी काही साहित्यिकांना मेजवानी दिली. तिला फडके हजर होते. मात्र, पार्टीनंतरच्या हुरडा पार्टीला ते न थांबता एका मैत्रिणीबरोबर निघून गेले.

याच खंडात ‘नाटय़लेखनाचा आरंभ’ या प्रकरणात अत्रे म्हणतात, ‘खांडेकर आणि फडके यांनी लिहिलेल्या पहिल्या नाटकाला अपयश आल्यावर खांडेकरांनी नाद सोडला. पण फडके पडले मुलखाचे हट्टी. फडक्यांनी आणखीन पाच-सहा नाटके लिहून मराठी रंगभूमीचे अक्षरश: वस्त्रहरण केले.’ याच परिच्छेदातले अत्रेंचे स्वत:बद्दलचे वाक्य : ‘फडके-खांडेकरांसारख्या मोठमोठय़ा लेखकांचा ज्या नाटय़क्षेत्रात निभाव लागला नाही, तिथे आपला काय पाड लागणार आहे?’

१९२६ साली अप्पासाहेब गोखलेंनी ‘रत्नाकर’ हे मासिक फडके यांच्या संपादकत्वाखाली सुरू केले. त्यावर लिहिताना अत्रेंनी केलेली स्तुती.. ‘‘रत्नाकर’तून क्रमवार प्रसिद्ध होणाऱ्या प्रो. ना. सी. फडक्यांच्या कादंबऱ्यांनी तर महाराष्ट्राला वेड लावले.’

मात्र, अप्पासाहेब गोखले यांनी ‘बाबी’ नावाच्या कोणा स्त्रीला फडक्यांनी लिहिलेली प्रेमपत्रे अत्र्यांना दाखवली. ती बघण्यास अत्र्यांनी नकार दिला.

अत्रे-फडके वादाचा प्रारंभ झाला त्या रत्नागिरी साहित्य संमेलनात नेमके काय झाले?

‘कऱ्हेचे पाणी’तील उल्लेखानुसार, फडकेंची अध्यक्षपदी निवड झाली तेव्हा अत्रेंनी संमेलनाआधी त्यांना ‘नवयुग’ कार्यालयात बोलावले. दोघांचा एकत्र फोटो काढला. घरी नेऊन आमरस-पुरीची मेजवानी दिली. ५ मे १९४० रोजी फडकेंच्या सन्मानार्थ ‘नवयुग’चा खास अंक प्रकाशित केला. त्यात कमला दीक्षित, ग. त्र्यं. माडखोलकर आणि अत्रेंनी लेखन केले. इतर कुणीही फडकेंसाठी असा अंक काढला नाही. परंतु ‘माझ्या साहित्यसेवेतील स्मृती’मध्ये फडके म्हणतात की, ‘संमेलन ४ मे रोजी सुरू झाले. त्या सुमारास एकूण एक मराठी साप्ताहिकांनी खास अंक काढून माझं गुणवर्णन केलं आणि माझे फोटो छापले.’

अत्रेंच्या तक्रारीनुसार, अध्यक्षीय भाषणात फडकेंनी ‘नवयुग’वर टीका केली. भाषणातील दोन पाने ‘नवयुग’वर टीका होती. या टीकेला उत्तर देणारा ‘प्रो. फडके म्हातारे झाले!’ हा लेख ‘नवयुग’मध्ये लिहून अत्रेंनी त्यास उत्तर दिले. ‘माझ्या साहित्यसेवेतील स्मृती’मधील नोंदींनुसार, ‘नवयुग’, ‘चित्रा’ आणि ‘विविधवृत्त’ या तिघांनी फडक्यांवर हल्ले केले.

ज्या भाषणामुळे अत्रेंनी फडकेंशी थेट वैर जाहीर केले त्या भाषणाबद्दल फडके म्हणतात, ‘ज्या माझ्या अध्यक्षीय भाषणात मराठी वृत्तपत्रात वैपुल्यानं दिसून येणाऱ्या हीन अभिरुचीच्या लिखाणाचा मी निषेध केला होता, त्या माझ्या भाषणातच आरंभी त्यापूर्वीच्या कोणत्याही अध्यक्षानं केलेला नव्हता असा वृत्तपत्रांचा गौरव मी असंदिग्ध शब्दांत केला होता. वृत्तपत्रीय साहित्य म्हणजे एकंदर साहित्याचं एक अत्यंत प्रभावी आणि मोलाचं अंग आहे, असं मी प्रतिपादलं होतं.’

‘नवयुग’ला उत्तर देण्यासाठी फडकेंनी ‘झंकार’ हे साप्ताहिक सुरू केले. त्यातून त्यांनी अत्रेंच्या टीकेला प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली. मात्र, ते स्वत:च म्हणतात की, ‘मी ‘झंकार’ काढला नसता तर रत्नागिरीच्या संमेलनातील माझ्या अध्यक्षीय भाषणावरील वादळ दोन-चार महिन्यांत खलास झालं असतं. परंतु मी साप्ताहिक काढल्यामुळे विरोधकांना मुदतवाढ मिळाल्यासारखं झालं आणि माझ्यावरील टीकेची त्यांची मोहीम चालूच राहिली. मी रत्नागिरी येथील अध्यक्षीय भाषणात ज्याचा कडकडून निषेध केला होता त्याच तऱ्हेचं लिखाण करण्यास मीच प्रवृत्त झालो. आणि ‘झंकार’ सुरू करताना आपल्या नव्या साप्ताहिकाचं धोरण वैयक्तिक टीकेपासून सर्वस्वी अलिप्त अशा उंच पातळीवर ठेवण्याचं जे ध्येय मी डोळ्यांपुढे ठेवलं होतं त्यापासून मी च्युत झालो. हा माझा अगदी उघड उघड पराभव होता.’

१९४१ साली दोघांमधला वाद विकोपाला गेला. त्याने पातळी ओलांडली. तेव्हा वा. रा. ढवळे, माधव मनोहर, दि. वि. आमोणकर आणि डॉ. अ. ना. भालेराव यांनी जाहीर पत्रक काढून दोघांना वाद मिटवण्याची विनंती केली. १७ ऑगस्ट १९४१ रोजी मुंबई व उपनगर मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने वामन मल्हार जोशी, अनंत काणेकर, वा. दा. गोखले आणि डॉ. अ. ना. भालेराव यांनी पुन्हा वाद मिटवण्याची विनंती केली. फडकेंनी ती मान्य केली. अत्रेंनी ती मान्य करण्यापूर्वी ‘नवयुग’मध्ये ‘गच्छ सूकर भद्रं ते’ हा जहाल अग्रलेख लिहिला आणि वादावर पडदा टाकला. मात्र, खऱ्या अर्थाने वाद संपला नाहीच. तात्यासाहेब (न. चिं.) केळकर यांचे निधन झाले तेव्हा त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जी सभा भरली, त्यात व्यासपीठावर हे दोघे एकत्र होते. आपल्या भाषणात अत्रेंनी फडकेंना दोन वेळा अकारण कोपरखळ्या दिल्यासारखे वाटते. सुरुवातीला ते म्हणाले, ‘माझे मित्र.. म्हणू का हो त्यांना माझे मित्र?.. हो म्हणतोच. माझे मित्र ना. सी. फडके आणि मी आपापला विरोध विसरून साहित्यसम्राटांना आदरांजली वाहण्यास एकत्र आलो आहोत.’

या प्रसंगी झालेल्या अ. बा. गजेंद्रगडकर आणि अत्रे यांच्या भाषणांमुळे श्रोत्यांमध्ये हशा पिकला आणि श्रद्धांजलीचे गांभीर्य नष्ट झाले. याबद्दल फडके यांनी खेद व्यक्त केला आहे. ते म्हणतात, ‘अत्रे आपलं भाषण करताना पुन्हा पुन्हा माझ्याकडे वळून पाहत होते. पण मी मात्र व्याख्यानाच्या आवारातल्या एका झाडाकडे दृष्टी लावून बसलो होतो.’

अत्रेंचे भाषण झाल्यावर फडके बोलले. परंतु आपल्या भाषणात त्यांनी वरीलपैकी कशाचाही उल्लेख न करता श्रद्धांजलीपर भारदस्त भाषण दिले. या भाषणाच्या वृत्तान्ताच्या अखेरीस फडकेंनी स्नेह आणि शत्रुत्व यांच्या सुंदर व्याख्या दिल्या आहेत. ते म्हणतात, ‘स्नेहाला पावित्र्य असावं, शत्रुत्वाला दृढता असावी. या गोष्टी नसतील तर कशालाच काही अर्थ उरणार नाही.’

१९५० साली बेळगाव येथे पत्रकार संमेलन भरले. अत्रे त्या संमेलनाच्या अध्यक्षपदी होते. संमेलनात बोलताना पां. वा. गाडगीळ म्हणाले, ‘अत्रे लिहायला बसले म्हणजे एकटाकीसारखी १०० पाने लिहितील. तथापि अत्रे चांगले वक्ते आहेत असे मला वाटत नाही. त्यादृष्टीने फडके सरस वक्ते आहेत असे माझे मत आहे.’

फडकेंची ही स्तुती अत्रेंनी ‘कऱ्हेचे पाणी’मध्ये जशीच्या तशी छापली आहे. अंमळनेरमध्ये अत्रे आणि फडके पुन्हा एका व्यासपीठावर आले. त्याची अत्रेंनी ‘कऱ्हेचे पाणी’मध्ये नोंद केली आहे. ती अशी- ‘माझे आणि प्रा. ना. सी. फडके यांचे- अशी दोघा ‘मित्रांची’ एकाच व्यासपीठावरून झालेली भाषणे.. जवळजवळ दीड तास प्रा. फडके यांचे व्याख्यान अत्यंत अस्खलितपणे चालले होते. विचारासाठी किंवा शब्दांसाठी कुठे त्यांना अडचण पडल्यासारखे वाटले नाही. तरीही त्यांच्या व्याख्यान-पद्धतीत फार दोष होते. ते नुसते सिद्धान्ताचे ढोबळ निरुपण करीत होते.. दुसऱ्या दिवशी प्रा. फडके माझ्या व्याख्यानाला सहकुटुंब हजर होते, याचे श्रोत्यांना नवल वाटले.’

अत्रेंनी आपल्या भाषणात पुन्हा फडकेंना डिवचले आहे : ‘फडके आणि मी येथे एकत्र आल्यासारखे आपणाला दिसत असेल, पण आम्ही ‘जवळ’ मात्र मुळीच आलो नाहीत. त्यांच्यातले आणि माझ्यातले अंतर होते तसेच अद्याप कायम आहे.’

अत्रेंनी अनंत काणेकरांच्या निमित्ताने काढलेली खोडी ही बहुधा शेवटची असावी. ‘कऱ्हेचे पाणी’च्या पाचव्या खंडात त्यांनी केलेले विधान असे आहे- ‘अनंत काणेकर लघुनिबंधाच्या क्षेत्रात उतरेपर्यंत प्रा. फडके यांच्या ‘गुजगोष्टी’ हे तोपर्यंत आदर्श लघुनिबंध समजले जात होते. पण लघुनिबंधाच्या खऱ्या कसोटीला फडक्यांच्या गुजगोष्टी फारशा टिकू शकणाऱ्या नाहीत.’

हा वाद कसा मिटला, याचे तपशील आणि संदर्भ उपलब्ध आहेत. परंतु त्यावर इथे चर्चा करण्याचे प्रयोजन नाही. उपरोक्त वादाकडे अत्रेंच्या बाजूने बघताना जाणवते, की त्यांच्या मनात फडकेंबद्दल आदर होता आणि तरीदेखील खोडी काढण्याची ऊर्मी होती. इंग्रजीत ‘लव्ह-हेट’ भावना म्हणतात तशी! मात्र, यात राग किंवा असूया नसावी. ते मनस्वीपणे खोडय़ा काढीत राहिले. मधूनमधून फडकेंचे मोठेपण स्वत:शी किंवा जाहीरपणे मान्य करीत राहिले. दुसरीकडे फडके यांनी सुरुवातीला एक चांगला पवित्रा घेतला. त्याचेही इंग्रजीतच वर्णन करावेसे वाटते- ‘प्ले इट कूल’! मात्र, तो पवित्रा त्यांनी शेवटपर्यंत जपला नाही.

दोघांतल्या वादाला आरंभ झाला त्या कारणाबद्दल असलेल्या दोघांच्या नोंदींवरून वादाचे खरे कारण उलगडत नाही. अत्रेंच्या म्हणण्यानुसार, त्यांनी एकटय़ानेच फडकेंच्या गौरवाप्रीत्यर्थ ‘नवयुग’चा खास अंक काढला आणि फडकेंनी मात्र अध्यक्षीय भाषणात दोन पानभर ‘नवयुग’वर टीका केली. फडकेंच्या म्हणण्यानुसार, त्यावेळी अनेक साप्ताहिकांनी त्यांच्या गौरवाप्रीत्यर्थ अंक काढले होते. आपल्या भाषणात ‘नवयुग’वर त्यांनी केलेल्या टीकेचे नेमके कारण आपल्याला ठाऊक नाही.

फडके यांनीच नोंदवलेल्या प्रांजळ मतानुसार, ‘मी ‘झंकार’ काढला नसता तर रत्नागिरीच्या संमेलनातील माझ्या अध्यक्षीय भाषणावरील वादळ दोन-चार महिन्यांत खलास झालं असतं.’

समजा, खरोखरच तसे घडले असते तर काय झाले असते? ज्या काळाच्या चौकटीत हे घडले ती चौकट आणि सामाजिक स्थिती आज नाही; परंतु आपण कल्पना करू शकतो.

कदाचित अत्रेंनी आणखी एक-दोनदा फडकेंची खोडी काढली असती आणि प्रत्युत्तर मिळत नाही म्हटल्यावर कंटाळून नाद सोडून दिला असता का? हा वाद टळला असता तर अत्रेंचं नुकसान किंवा फायदा काय झाला असता? किंवा स्वभावानुसार त्यांनी आणखी कोणाशी तरी वाद खेळला असता!

फडकेंनी काय केलं असतं? ‘झंकार’मध्ये त्यांची जी मानसिक ऊर्जा खर्च झाली असेल ती वाचली असती. कदाचित त्यांच्याकडून आणखी एखादी सशक्त कलाकृती निर्माण झाली असती.

येथे पु. ल. देशपांडे यांची आठवण येते. पुलंनाही वाद घालण्याची आणि जिंकण्याची सवय असली तरी काही प्रसंगी त्यांनी समोरच्याला पूर्णपणे अनुल्लेखाने मारले आहे. हा अनुल्लेखदेखील समोरच्याला खूप घायाळ करणारा असतो. असो.

सर्वात शेवटी महत्त्वाचा प्रश्न उरतो तो असा- या वादातून आपल्याला काय मिळाले? अत्रे यांच्या इतर साहित्यिक-राजकीय वादांमधून काही चांगल्या नाटय़कृती आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला योगदान मिळाले. फडके आणि आनंद यादव यांच्यात लघुनिबंधांच्या जनकत्वावरून झालेल्या वादात फडकेंकडून लघुनिबंधाच्या आकृतिबंधाबाबत काही चांगले विवेचन मिळाले.

परंतु ‘अत्रे-फडके’ या वादातून आपल्याला दोघांकडून काय मिळाले?

vijaytarawade@gmail.com