|| श्रीनिवास हेमाडे

आपले संपूर्ण लेखन ज्ञानकेंद्री असावे; समाज- विशेषकरून भारतीय समाज.. त्यातही मराठीभाषक समाज ज्ञानकेंद्री व्हावा अशी तीव्र इच्छा बाळगून लेखन करणारे साहित्यिक म्हणून श्याम मनोहर यांचे साहित्यविश्वातील स्थान अबाधित आहे. ‘प्रेम आणि खूप खूप नंतर’ ही त्यांची २८९ पानांची कादंबरी पॉप्युलर प्रकाशनने प्रकाशित केली आहे. मुखपृष्ठ आणि कादंबरीची मांडणी संदीप देशपांडे यांची आहे.

Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
loksabha election 2024 Peoples issues banished from campaigning in Vidarbha
विदर्भात जनसामान्यांचे प्रश्न प्रचारातून हद्दपार
ग्रामविकासाची कहाणी
Loksatta kutuhal Scope of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीची व्याप्ती

या कादंबरीचे वेगळेपण तिच्या अंतरंगापासूनच जाणवते. तिला अनुक्रमणिका आहे. ती ‘अनुक्रमणिका’ या नावाने न येता ‘घटक’ या शीर्षकाने येते. घटकाची रचनाही वैशिष्टय़पूर्ण आहे. हे घटक क, ख, ग आणि ळ, क्ष आणि  ज्ञ व्यंजनांनी उपविभागले आहेत. त्या प्रत्येकालाही उपनामे आहेत.

बहुतेकांची जिंदगी ‘ळ’ (दुसरा मधुचंद्र) आणि ‘क्ष’ (गौरवग्रंथ) यांतच संपून जाते. त्यांच्या जीवनात ‘ज्ञ’ (तळमन)चा उदयच होत नाही. माणसाचे आयुष्य या व्यंजनांप्रमाणेच प्रवाहपतित होत राहते. कादंबरीचा घाट, कथावस्तू या अर्थाने कादंबरीतील पात्रांची अंतर्गत रचना व त्यांचे नातेसंबंध आहेत. त्यांतून कथन उलगडत जाते. कादंबरीत एक खुनाचा प्रयत्न होतो आणि दुसरा खुनाचा प्रयत्न यशस्वी होतो. ही माणसाची थोर शोकांतिका असते. ती होऊ नये याची काळजी राजकारणी, उद्योगपती, धोरणकत्रे घेत राहतात आणि हीच समाजाची शोकांतिका बनते.

कादंबरीत आधी एका ठिकाणी एका पाककृतीची चित्रे येतात, तर अखेरीस जगविख्यात गणिती श्रीनिवास रामानुजन यांचे चित्र आणि त्यांचे मित्र व गुरू जी. एच. हार्डीनी रामानुजन यांच्यावर दिलेल्या व्याख्यानाच्या पुस्तकाचे चित्र हा कादंबरीचा भाग बनल्याचे जाणवते.

‘‘प्रेम आणि खूप खूप नंतर’ या कादंबरीच्या शीर्षकाच्या मागून जायचे तर माणसात प्रेमभावनेचा उद्भव हे जीवनाचे मायामूळ असून, श्याम मनोहर प्रेमाचं महत्त्व जाणतात. कौटुंबिक प्रेमाला प्राधान्यही देतात. पण कौटुंबिक प्रेम पुरेसे नसते. प्रेम झालंच; पण पुढे काय? किंवा काय काय करायचं असतं? पुढचं प्रेम कुणावर, कशावर, किती आणि का करायचं असतं, याची जाणीव मात्र विकसित करावी लागते, यावर ते भर देतात. ते न केल्यामुळे सुजाण लोकांची स्वत:ची शोकांतिका कशी होते आणि इतरजन अजाणते शोकमग्न जगणेच सत्य कसे मानत जगतात, हे अधोरेखित करतात.

‘प्रेमाची गोष्ट’ (१९९८) हे नाटक आणि ‘होय ना!’ (२०१२) ही लघुप्रेमकथा यांची परिपूर्णता या कादंबरीत साधली गेली आहे असे दिसते.

दीपिका आणि नरेंद्र हे उत्साही तरुण प्रेमी जोडपे आहे. ते सधन, उच्चवर्गीय कुटुंबातले आहेत. त्यांचा मधुचंद्र केवळ शारीरिक पातळीवर होत नाही, तर उच्च बौद्धिक चच्रेच्या पातळीवर जातो. कर्तृत्ववान आणि प्रतिभावंत यांच्यातील फरकाची, तसंच बुद्धी आणि मानसिक सामथ्र्य यांनी माणूस काय काय करू शकतो याची प्रदीर्घ चर्चा ते करत असतात. प्रेम, वासना, सौंदर्य, कुटुंब, श्रीमंती, गरिबी, लोकशाही, बुद्धी, जिनियस, प्रतिभा, इंटय़ूशन, कर्तृत्व, जीवन, जीवनाचा अर्थ, शोध, श्रद्धेचे गुणधर्म, श्रद्धेचे प्रकार, श्रद्धावानांचे परस्पर संबंध, अध्यात्म, मेडिटेशन, ज्ञान, खूपज्ञ, कितीज्ञ, मधुचंद्राची शिबिरे अशा कितीतरी गोष्टींवर ते सतत चर्चा करतात, त्यामुळेच त्यांचा मधुचंद्र वैचारिक मधुचंद्र म्हणून गाजतो.

दोघेही बुद्धीच्या क्षेत्रात काहीतरी करायचे ठरवतात, पण नरेंद्र उच्च बुद्धी असूनही हॉटेलांची साखळी निर्माण करतो त्याच वेळी विद्यापीठेही काढतो. यातच दोघांचे उतारवय होते. ते दुसऱ्या मधुचंद्राला जातात. (‘ळ’). त्याचा गौरवग्रंथ निघू पाहतो (‘क्ष’). या साऱ्या प्रवासात दीपिकाची घुसमट होत जाते. हॉटेल आणि विद्यापीठे काढणारा नरेंद्र स्वत:ला ‘प्रतिभावंत’ समजून स्वत:चा ‘गौरवग्रंथ’ सजवू पाहतो. पण दीपिका नरेंद्राला तो ‘प्रतिभावंत’ नाही, असे सांगते. त्या क्षणाला खुनाचा एक प्रयत्न होतो. पुढे बऱ्याच घडामोडींनंतर नरेंद्राच्या गौरवग्रंथाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम होतो. त्या वेळी दुसरा खुनाचा प्रयत्न होतो आणि तो यशस्वी होतो.

दीपिका स्वत:ला प्रतिभावंत समजत नाही, पण तिला प्रतिभावंताबद्दल जगात अजून कुणी शोधले नाही, असा एखादा मुद्दा, किमान एखादे वाक्य शोधायचे असते. आजपर्यंत जगणे वायाच गेले आहे तर आता साठीनंतर ते शोधण्यात वाया घालवायचे, तसे झाले तर आयुष्य वाया जाणे नाहीए. आणि हेच विधान कादंबरीच्या आधी ध्येयविधान म्हणून आल्याचे वाचकाच्या लक्षात येते.

‘प्रेम आणि खूप खूप नंतर’ ही काही ढोबळ प्रेमकथा नाही, तर प्रेमविवाह केल्यानंतर प्रेमिकांनी काय केले पाहिजे, स्वत:चे प्रेम कुठे, कोणत्या कळसाला नेले पाहिजे, याचे एक ‘दर्शन’ आहे. सकृत्दर्शनी दीपिका-नरेंद्र या प्रेमी जोडप्याची कथा कथानकाच्या विकासात एका उच्च पातळीवर सामाजिक कथेत परिवर्तित होते. ही कादंबरी ‘मानवी प्रेम ते अलौकिक प्रतिभेचे प्रेम’ असा आणि ‘व्यक्तिगत खासगी प्रेम ते जगावरील प्रेम’ असा व्यापक पट मांडते.

निदान भारतीय समाजात कर्तृत्ववानालाच प्रतिभावंत समजले जाते, पण या दोघांच्यात नेमका फरक करणे आणि प्रतिभावंत त्या श्रेणीत उच्च दर्जाला आहे हे सांगणे, यावर कादंबरीत भर दिला आहे. श्याम मनोहर लिहितात, ‘सृष्टी काय आहे? जीवनाचा अर्थ काय? ही दोन मूलभूत कुतूहले माणसाला सर्व सजीवात उच्च दर्जाला नेतात. हे अज्ञातातलं शोधणं हेच अस्सल, प्रतिभावंताचं लक्षण आहे. आपण प्रतिभावंत नसलो तरी प्रतिभावंतावर प्रेम करून आपण ‘जगाचे होऊ’ शकतो. मग आपले प्रेम हे खासगी प्रेम उरत नाही, ते जगावरील प्रेम बनते, पण हीही संधी सोडली की समाजाची शोकांतिका कशी होत जाते, हा या कादंबरीचा गाभा आहे.

अति उच्च बुद्धिमान लोक क्षमता असूनही मानवी सभ्यतेत भर घालणारे नवे शोधत नाहीत, याचे धारदार अधोरेखन श्याम मनोहर त्यांच्या ‘अनावृत पत्र’ या ‘कळ’ कादंबरीतीमधील एका लेखानांशात करतात. जगातल्या काही प्रतिभावंतांशी किंवा अव्वल शास्त्रज्ञांशी तुमची मत्री असेल ना? त्यांच्या जगायची, कामाची पद्धत, त्यांच्या बौद्धिक व मानसिक जडणीची जाण तुम्हाला असेलच’ असे विचारून ‘शरदजी, तुमच्या सहवासातल्या कलावंत, शास्त्रज्ञ वगरेंचे आडवे प्रसारण होत नाही, त्यांची उभी-खोल वाढ होत नाही..  अटलजी, तुमच्या सहवासातल्या लोकांत खुद्द तुमची वाढ होत नाही, याबद्दल तुमचे मत कळवा’ असे लिहितात. या कादंबरीत त्या शोकांतिकेची जणूकाही सविस्तर मांडणी आहे.

श्याम मनोहर निरीक्षण नोंदवतात, की श्रीमंतांना पसा कसा वापरावा याची उमजच पडत नाही. परिणामी, ते भयानक श्रीमंत होतात, पण सभ्यतेच्या विकासात त्यांचा काहीच वाटा नसतो. त्यांचा पसा हा त्यांचा असतो, समाजाचा नसतो. समाजाचे जे असते ते अज्ञातातले शोधलेले ज्ञान असते आणि श्रीमंत शोध लावू शकत नसतात. ही त्यांची शोकांतिका असते. शिवाय, ही श्रीमंत कर्तृत्ववान माणसे ज्ञानक्षेत्रात घुसू पाहतात आणि त्यासाठी वाट्टेल त्या थराला जातात. उदाहरणार्थ, आपली आई, दीपिका आपल्या प्रगतीच्या आड येतेय असे वाटू लागल्यामुळे तिचा मुलगा वलय हा तिला थेट मनोरुग्ण ठरवण्याचा निश्चय करतो. तिच्या मृत्यूची इच्छा करतो आणि तिच्या मदतनिसाचा खून करण्याचा कट रचू पाहतो. मोठय़ा फॅमिलीत असे प्रकार अटळ असतात, अशी मखलाशीही तो करतो. हे सारे तो बापाबरोबर बोलतो.

धोरणकत्रे, राजकारणी हे कर्तृत्ववान असतात, पण संस्कृती निर्मितीत मात्र त्यांना ठार अपयश येते. भौतिक प्रगतीही भासमान असते, कारण सर्वसामान्यांना वंचितच ठेवले जाते. हीही शोकांतिका असते.

भारतीय कुटुंबव्यवस्था जातिव्यवस्थाग्रस्त तर आहेच, पण त्याचा एक मुख्य साइड इफेक्ट म्हणून ही कुटुंबव्यवस्था ज्ञानकेंद्री न होता करमणूकप्रधान कशी बनली आहे, करमणुकीच्या विखारी विळख्यातून अतिशय प्राचीन व पवित्र मूल्य असलेला धर्मसुद्धा कसा करमणुकीचा खेळ आणि व्यवसाय झाला आहे, याचे अतिशय भेदक चित्रण त्यांच्या या कादंबरीत करतात.

श्याम मनोहरांचे लेखन ही साहित्यातील विपश्यना आहे. लेखनकर्म ही विपश्यना असू शकते का? तसे केल्यास ते कसे असेल, याचे हे ठळक आणि ताजे उदाहरण म्हणावे. अगदी बारीकसारीक तपशील म्हणजे विपश्यी लेखन का? बरेच जण तसे लिहितातही. पण ती विपश्यना असेल असे नाही. मग विपश्यनालेखनाचे वैशिष्टय़ काय असेल, असते किंवा असावे? लेखन व वास्तव यांचा लेखनात एकास एक अनुबंध असला पाहिजे. वास्तव भौतिक असते तसे ते मानसिकही असते. त्याचा अनुबंध भाषेशी जोडणे म्हणजे भाषेतील सत्याची सुसंगतता. ती साधण्यासाठी विपश्यना हवी. ती श्याम मनोहरांच्या लेखनात जाणवते.

जनतेसाठी व सरकारसाठी निवेदन :                                                                                                           

१. तांत्रिक कौशल्ये शिकायची, त्यातील कामे करायची, पसे मिळवायचे आणि उरलेल्या वेळात करमणुकीच्या मागे लागायचे ही नागरिकांची जीवनशैली झालेली आहे.

२. करमणुकीचे प्रकार बेसुमार वाढले आहेत.

३. धर्मही करमणुकीच्या पातळीवरच गेलेला आहे.

४. स्पोर्ट्सही करमणुकीच्या पातळीवर गेलेले आहेत. खेळ हा करमणुकीचा मोठा धंदा झालेला आहे.

५. सरकारने टुरिझम वाढवून ठेवलाय. प्रवास हा करमणूक म्हणून केला जातो. सूर्योदय, सूर्यास्त करमणूक म्हणून बघायचे. चारशे वष्रे वयाचा वृक्ष पाहायचा, ते एन्जॉयमेंट म्हणून. पावसात भिजायचे ते एन्जॉयमेंट म्हणून. सृष्टी जणू एन्जॉयमेंटसाठी आहे.

६. माणसाचे सृष्टिरहस्याचे कुतूहल मेलेय.

७. करमणूक नाही, अशी वेळ आली की- येतेच अशी वेळ – लोक पडेल चेहऱ्याचे असतात. करमणूक होत नाही म्हणून उद्या नागरिक व्हायोलंटही होतील.

८. कौशल्याधारित कामे करून पसा कमावणे आणि करमणुकीच्या नादी लागणे यात माणसे कामजीवनही विसरताहेत. कामजीवन ही माणसाची नसíगक बाब आहे.

९. पन्नास टक्के माणसे तर केवळ पसा कमावणे, श्रीमंतांच्या यादीत नाव आणणे, हेच जीवनाचे सार्थक समजत आहेत.

१०. विद्यापीठातून मानव्यशाखा जवळजवळ बंद पडल्यात. काही ठिकाणी आहेत, त्या जवळपास शो म्हणून आहेत. तिथले विद्यार्थी, शिक्षक फ्रस्ट्रेटेड आहेत.

११. सर्व चांगले लेखक, कवी, कलावंत, तत्त्वज्ञ नोकऱ्या करून निर्मिती करताहेत. एकही लेखक, कवी, कलावंत, तत्त्वज्ञ पूर्ण निर्मिती करून जगू शकेल, अशी स्थिती पंतप्रधान देशात निर्माण करू शकले नाहीत, हे पंतप्रधानांचे फेल्युअर आहे. करमणूक करणारे कलावंतच फक्त पूर्ण वेळ कलावंत आहेत. सर्व शास्त्रज्ञांना तंत्रज्ञ बनवले गेलेय, किंबहुना तंत्रज्ञांनाच शास्त्रज्ञ म्हणायची पद्धत पडलीय.

१२. सृष्टिरहस्याचा वेध घेणे, जीवनाचा अर्थ शोधणे, माणूस काय आहे, हे शोधणे हे माणसाचे मूळ कुतूहल नष्ट झाले आहे.

१३. हे सर्व धोकादायक आहे.

‘लोक आणि कुतूहल’

मंद बुद्धीचे, सर्वसाधारण बुद्धीचे, उच्च बुद्धीचे, अतिउच्च बुद्धीचे, प्रतिभावंत आणि कर्तृत्ववान. यातील ज्ञानाशी संबंधित नसलेले ते कर्तृत्ववान, पण ते ज्ञानाचा उपयोग करून मोठय़ा प्रमाणावर भौतिक कामे उभी करतात. ते प्रथम अतिउच्च बुद्धीच्या लोकांचा सल्ला घेतात, त्या सल्ल्यानुसार भौतिक कामांची देखरेख करवून घेतात आणि सामान्यांकडून प्रत्यक्ष भौतिक कामे करून घेतात. अशी चालते सभ्यता. असा चालतो सभ्यतेचा विकास. पण तरीही विकासाचा मूळ पाया प्रतिभावंतच असतो.

कर्तृत्ववानाला विकासाची सर्वात जास्त फळे मिळतात. त्याचे स्वत:चे हेलिकॉप्टर असते. त्याला उच्च दर्जाचे ड्रिंक मिळते. अतिउच्च बुद्धीच्या लोकांना त्या खालोखाल फळे मिळतात. त्याच्याकडे दोन कार, दोन ड्रायव्हर, उच्च दर्जाचे ड्रिंक व जरुरीनुसार कर्तृत्ववानाचे हेलिकॉप्टर वापरायला मिळते. उच्च बुद्धिमत्तेच्या लोकांना त्या खालोखाल फळे, म्हणजे एक कार असते, ड्रायव्हर तो स्वत: किंवा त्याची बायको किंवा मुलगा. रोज रात्री व्हिस्की-रम; सुट्टीच्या दिवशी दुपारी बीअर. सामान्यांना विकासाची फळे मिळतीलच असे नाही; पण त्यांना ती मिळावीत, अशी सभ्यतेत मोठय़ा प्रमाणावर विचारसरणी असते. पण विचारसरणी आणि वास्तव यात बरेच अंतर असते.

  • ‘प्रेम आणि खूप खूप नंतर’- श्याम मनोहर,
  • पॉप्युलर प्रकाशन,
  • पाने- २८९, किंमत- ४५० रुपये.