गेली ५० वर्षे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अथक संघर्ष करणाऱ्या संपतराव पवार  यांचे ‘मी लोकांचा सांगाती’ हे आत्मवृत्त समकालीन प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. या पुस्तकाला राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतील संपादित अंश..

आज पंचाहत्तरी पार केलेल्या संपतराव पवार यांच्या सुमारे ५०-५५ वर्षांच्या विविध राजकीय उद्योगांचा वृत्तान्त म्हणून या पुस्तकाकडे पाहता येईल. संपतरावांनी म्हटल्याप्रमाणे, हे काही त्यांचे आत्मवृत्त नाही. हा त्यांच्या कामाचा सविस्तर सार्वजनिक अहवाल आहे. आपल्यालाही एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याच्या गोष्टीपेक्षा त्यानिमित्ताने पुढे येणारे समाजाचे आणि एका कालखंडाचे आत्मवृत्तच जास्त महत्त्वाचे वाटायला हवे. कारण त्यातून समाजाच्या वाटचालीचा परिचय होतो; त्या समाजाच्या वकुबाची आणि मर्यादांची ओळख होते.

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
nashik, Fraud Case Registered Against Panjarpol , Nashik Panjarpol Sanstha Managers, Forged Letter, Allegedly Signed by Chief Minister, land acquisition panjrapole nashik, panjrapole nashik fraud, forged letter cm eknath shinde,
भूसंपादन प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीचे बनावटपत्र, श्री नाशिक पंचवटी पांजरपोळ पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा
shree ram mandir
१२वीच्या पुस्तकातून बाबरी पतनाचा उल्लेख गायब…
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन

संपतरावांच्या प्रत्यक्ष कामाचा काळ हा महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर सुरू होतो. शेतकरी कामगार पक्षाची विद्यार्थी संघटना, तालुक्यातील पक्षकार्य या गोष्टी तर त्यांनी केल्याच; पण स्थानिक लोकांना एकत्र करून रचनात्मक म्हणता येतील असे प्रयोग त्यांनी राजकीय दृष्टीने केले. शेती आणि शेतकरी हे त्यांच्या कामात मध्यवर्ती राहिले. पाण्याचे समन्यायी वाटप आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत ऊर्जा निर्माण करण्याचे प्रयत्न यांच्यावर त्यांचा भर राहिला. संपतराव पवार यांच्या कामाचा आणि प्रयोगांचा परीघ हा सांगली जिल्ह्यपुरताच मर्यादित राहिला. पण त्यांनी केले त्याच्या निम्म्याने किंवा त्याहून कमी काम करूनसुद्धा अनेकजण नेते बनले आणि राज्यपातळीवर वावरले अशी उदाहरणे दिसतील. संपतराव मात्र नेते बनले नाहीत. त्यांनी जिल्ह्यत स्वत:ला इतके गाडून घेतले, की आजही सांगली परिसराच्या बाहेर त्यांच्या कामाची आणि खुद्द त्यांचीसुद्धा कितपत ओळख असेल याची शंकाच आहे.

याची कारणे त्यांच्या प्रसिद्धीपराङ्मुख व्यक्तिमत्त्वात शोधता येतील, तसेच शेतकरी कामगार पक्षाच्या अंतर्गत राजकारणातही शोधता येतील. मुद्दा संपतरावांच्या प्रसिद्धीचा नाही; त्यांना मानमरातब मिळण्याचाही नाही. त्यांनी एका जिल्ह्यत दीर्घकाळ जे काम केले त्याच्या व्यापक संदर्भाचा मुद्दा जास्त महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी त्यांचे काम सर्वांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. या पुस्तकातील आठवणी आणि आत्मपर निवेदन यांच्याद्वारे स्वत:ला सतत घडवत गेलेल्या संपतराव पवार नामक एका कार्यकर्त्यांच्या अनुभवांची माहिती उपलब्ध होते आहे. अशी आत्मवृत्ते हा त्या- त्या काळाचा आणि परिसराचा आलेख असतो. त्यातून सामाजिक इतिहास समजून घेण्यास मदत होते; तसेच राजकीय-सामाजिक सत्तासंबंध कसे घडतात याचा काहीएक अंदाज बांधायला अशा लेखनाचा उपयोग होतो.

शिवाय या आत्मनिवेदनाला वर्तमानाचा थेट संदर्भ आहे. कारण हे काही काम थांबवलेल्या किंवा थकलेल्या माणसाचे भूतकाळात रमण्यासाठी केलेले निवेदन नाही. कोलमडणाऱ्या शेतीचे वास्तव नजरेआड करीत देश सुखवस्तू बनत चालल्याचे पोकळ हाकारे करण्यावर समाधान मानणाऱ्या आजच्या वर्तमानात तुमच्या-आमच्याप्रमाणेच स्वत: लेखकदेखील वावरतो आहे. त्याला आपल्या कर्तबगारीपेक्षा देशाच्या आजच्या अवघड परिस्थितीचे जास्त भान आहे. अशा परिस्थितीत सामान्य माणसाला कोणत्या हस्तक्षेपांचा उपयोग होऊ  शकेल याचा शोध घेण्याचा हेतू सदर कथनामागे आहे. आपण केलेल्या विविध प्रयोगांमुळे थेटपणे काही मोठा फरक पडू शकेल असा दावा संपतराव करीत नाहीत. आणि हे काही ते केवळ विनयापोटी म्हणताहेत असे नाही. त्यांच्या निवेदनात वास्तववाद आणि विनम्रता या दोन्ही गुणांचा प्रत्यय तर येतोच; पण त्याखेरीज अशा एका-एका गावातील, तालुक्यातील प्रयोग म्हणजे क्रांती नसते याची राजकीय जाणीव त्यांना आहे. अशा स्थानिक प्रयोगांना राजकीय पक्षांचे पाठबळ असायला हवे आणि त्यातून सार्वजनिक धोरणे बदलून ती लोकाभिमुख बनण्याची प्रक्रिया घडायला हवी, तरच आपल्या कामाचे सार्थक होऊ  शकेल हे स्पष्टपणे माहिती असलेल्या कार्यकर्त्यांचे हे निवेदन आहे. आणि त्यातच या निवेदनाची खरी ताकद दडलेली आहे. त्यामुळे हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर संपतरावांच्या कामाचा फुकाचा गौरव करण्यापेक्षा त्यांना राजकीय आणि शासकीय ताकद का मिळाली नाही, याचा अंतर्मुख होऊन विचार झाला तर आपण त्यांच्या कामाची खरी कदर केली असे होईल.

औपचारिक अर्थाने संपतराव हयातभर शेतकरी कामगार पक्षामध्ये (शेकाप) राहिले आहेत. शेकाप हे त्यांच्या राजकारणाचे मुख्य वाहन राहिले. स्वातंत्र्याच्या आगेमागे महाराष्ट्रात समाजवादी राजकारणाचे जे अनेक प्रयोग झाले त्यापैकी ‘शेकाप’ हा एक वैशिष्टय़पूर्ण प्रयोग होता. ग्रामीण महाराष्ट्रात समाजवादी राजकारण नेण्याचा तो प्रयोग होता. तो सुरू होता होताच गळाठला आणि त्याचे मुख्य कारण सैद्धान्तिक मुद्दय़ांवर नेतृत्वामधील अंतर्गत मतभेद हे मानले जाते. त्या प्रारंभिक धक्क्यातून सावरून दक्षिण महाराष्ट्रात आणि मराठवाडय़ात पक्ष बऱ्यापैकी उभा राहिला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमुळे त्याला उभारी मिळाली. त्यानंतर पुन्हा पक्षाला उतरती कळा लागली आणि १९७७-७८ चा अपवाद सोडला तर राज्याच्या राजकारणात पक्षाने फारसे कधीच डोके वर काढले नाही. एकुणात, नावाजलेले नेते आणि अदृश्य पक्ष अशीच शेकापची एकंदर गत राहिली.

मर्यादित यश लाभले असूनही हा पक्ष चर्चेत का राहिला? निवडणुकीतील यशापयशापेक्षा ग्रामीण परिसरात उभे राहण्याची जिद्द, वैचारिक बांधिलकी मानणारे कार्यकर्ते, सामूहिक चळवळींवर जोर देणारी राजकीय शैली, सत्यशोधकी-ब्राह्मणेतर परंपरेचा धागा जिवंत ठेवण्याचे प्रयत्न आणि कल्याणकारी राज्याच्या पलीकडे जाऊन प्रस्थापित हितसंबंधांना धक्का देण्याची भाषा अशा विविध कारणांमुळे शेकाप हा पत्रकार, अभ्यासक, पुरोगामी कार्यकर्ते अशा अनेक वर्तुळांमध्ये आकर्षणाचा विषय बनला. या पक्षात असणाऱ्या वैचारिक मतभेदांखेरीज ठिकठिकाणी नेते आणि कार्यकर्ते यांच्यात विसंवाद कसा राहिला आणि पक्षाला व्यापक राजकीय दिशा नसल्यामुळे कार्यकर्ते कसे वाऱ्यावर टाकले गेले, स्थानिक काम आणि पक्षाचे राजकारण यांच्यात सुसंवाद कसा राहिला नाही, अशा नानाविध पेचांचा गुंता अप्रत्यक्षपणे या पुस्तकातून आपल्यासमोर येतो. त्यात निवेदकाचा काही आग्रह नाही, विषाद नाही; पण राजकारण करणाऱ्यांनी कोणते धडे घ्यावेत, याचे दिग्दर्शन जरूर आहे.

शेकापची म्हणून वर जी वैशिष्टय़े सांगितली, ती संपतरावांच्या कामाचादेखील अविभाज्य भाग असल्याचे दिसून येते. आणि मग प्रश्न येतो तो असा की, शेकाप एका मर्यादेच्या पलीकडे का जाऊ  शकला नाही? त्यांच्या आत्मकथनात या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न थेटपणे केलेला नाही; पण त्यासाठीचे काही धागे जरूर सापडतात. पक्षाची विचारसरणी आणि पक्षाचा कार्यक्रम यांच्यात स्पष्ट दुवा नसणे, हे एक कारण चटकन् जाणवते. त्यामुळे पक्षाचे कार्यक्रम हे सुटे सुटे, स्थानिक, उत्स्फूर्ततेवर भर देणारे असे राहिले. दुसरीकडे या रीतीमुळेच संपतरावांसारख्या मनस्वी कार्यकर्त्यांला पुरेसा वाव मिळाला असेही म्हणता येईल. त्यांच्या आत्मवृत्तावरून दिसते ते असे की, आपल्या कामाच्या एका मोठय़ा कालखंडात त्यांनी पक्षाच्या सीमेवर राहून स्वत:च्या मगदुराने आणि स्वत:च्या संघटन कौशल्यावर विसंबून बऱ्याच धडपडी केल्या. म्हणजे पक्षाने त्यांना कार्यक्रम दिला नाही, आणि त्यांच्या कार्यक्रमांचा पक्षाने फारसा फायदाही करून घेतला नाही! त्यांना काम करण्याची स्वायत्तता मिळाली; पण स्थानिक कार्यक्रम, कार्यकर्ते आणि पक्षाचे राजकारण यांची साखळी मात्र तयार झाली नाही.

त्यामुळे पक्षाच्या यशापयशाच्या चर्चेत कार्यकर्त्यांना मोकळीक देण्याच्या, पण त्यांचे काम पक्षाशी जोडून न घेण्याच्या कार्यशैलीचा वाटाच जास्त दिसतो. हा मुद्दा भारतातल्या राजकीय पक्षांच्या संघटनांशी संबंधित आहे. ज्याला उदारमतवादी लोकशाही व्यवस्था असे ढोबळमानाने म्हणता येईल अशा समाजांमधील राजकीय पक्षांच्या कामाचा अनुभव वेगळा आहे. कारण तिथे पक्षाने एका मर्यादेच्या पलीकडे जनसंघटन करणे प्रचलितही नाही आणि अपेक्षितही नाही. भारतातले पक्ष निवडणुका लढवतात, सत्तेचे खेळ खेळतात; पण अगदी मोठय़ा पक्षांसह सगळ्याच पक्षांना जनसंघटनाची, आंदोलनांची, चळवळींची आणि राजकारणाद्वारे परिवर्तनाची परंपरा आहे. निवडणुकीचे राजकारण आणि हे चळवळींचे राजकारण यांचे संबंध नेमके कसे साकारायचे, हे सगळ्याच पक्षांपुढे असणारे कोडे राहिले आहे. शेकापसारखे जे पक्ष बदलाला आणि चळवळींना प्राथमिकता देतात त्यांच्या दृष्टीने हे कोडे जास्तच किचकट राहिले आहे.

परिवर्तनवादी पक्षांच्या दृष्टीने आधीच किचकट असलेला हा मुद्दा त्या पक्षांच्या- म्हणजे त्यांच्या वरिष्ठ नेत्यांच्या- कार्यपद्धतीमुळे जास्तच गंभीर बनतो. संपतराव जेव्हा त्यांची कहाणी सांगतात तेव्हा आपल्याला चटकन् आठवण येते ती त्यांच्यासारख्याच ‘लोकांचे सांगाती’ बनलेल्या कितीतरी पुरोगामी कार्यकर्त्यांची. या कार्यकर्त्यांना पक्षाच्या चौकटीबाहेर कसे राहावे लागले, पक्षात एखाद्या कोपऱ्यात कसे पडून राहावे लागले किंवा पक्षबा नावाच्या परिप्रेक्ष्यात का राहावेसे वाटले, याचा या आत्मकथनातून थोडा तरी खुलासा होऊ  शकेल. १९७० च्या आसपास भारतात आणि महाराष्ट्रात ‘पक्षबा’ राजकारणाची लाट आली. तिच्यातून महाराष्ट्रात युवक क्रांती दलासारख्या चळवळी उभ्या राहिल्या. त्यांचा पक्षीय आणि निवडणुकीच्या राजकारणावर विश्वास नव्हता. त्यांचे कार्यकर्ते आपापल्या कल्पनेप्रमाणे आंदोलने करीत राहिले. पण कम्युनिस्ट, आंबेडकरी, समाजवादी अशा विविध पक्षांच्या चौकटीमध्ये राहून एकाकीपणे आणि अबोलपणे काम करणारे कार्यकर्ते महाराष्ट्रात अनेक होते आणि आहेत. पक्षांवरचा लोकांचा विश्वास हा राज्यशास्त्रात नेहमी अभ्यासाचा एक विषय राहिला आहे. पण खुद्द राजकीय कार्यकर्ते आणि पक्षाचे अनुयायी यांचा पक्षावरचा विश्वास हादेखील एक अभ्यासाचा विषय आहे. विशेषत: पक्ष, सत्ता आणि राजकारण या गोष्टी कोणत्या तरी जास्त व्यापक राजकीय बदलाची हत्यारे आहेत असे मानणाऱ्या कार्यकर्त्यांची त्यांच्या पक्षात कोंडी का होते, याचा अभ्यास का आवश्यक आहे हे संपतरावांसारख्या कार्यकर्त्यांच्या अनुभवावरून दिसून येते.

म्हणूनच महाराष्ट्रात ‘पुरोगामी’ पक्षांचे राजकारण यथातथाच का राहिले, याच्या चर्चेत हे पुस्तक महत्त्वाची भर घालते. एक तर स्वत: संपतराव पवार म्हणतात त्याप्रमाणे, १९७७ नंतर पुरोगामी पक्षांचे राजकारण गळाठले. कारण त्यांचा थेट लोकांशी आणि लोकांच्या प्रश्नांशी असलेला संबंध क्षीण झाला आणि जनतेचे प्रश्न उठवणारे लोक वेगळे आणि निवडणुकीचे राजकारण करणारे वेगळे अशी विभागणी आकार घेत गेली. आणि त्याचवेळी खुद्द पक्षाच्या अंतर्गत ‘निवडणूक स्पेशालिस्ट’ पुढे आले आणि ‘चळवळ स्पेशालिस्ट’ चळवळीपुरते उरतात असे चित्र तयार झाले. आज कोणी जर संपतराव पवार यांच्या कामाच्या आधारे त्यांची वर्गवारी करायची ठरवले तर आपण अगदी स्वाभाविकपणे त्यांना ‘सामाजिक कार्य’ करणारे या वर्गवारीत बसवू. पण ते मात्र स्वत:ला राजकीय कार्यकर्ते मानतील. म्हणजे ते ज्याला राजकारण म्हणतात ते काम आपल्या लेखी फक्त सामाजिक कार्य असते. कारण आपली (आणि अनेक राजकीय पक्षांचीसुद्धा!) राजकारणाची कल्पना अगदी तोकडी असते. निवडणुकीचे राजकारण आणि चळवळीचे राजकारण यांच्यात देवाणघेवाण होत नाही. चळवळी आणि त्यांच्यातून उदयाला येणारी वैचारिक आणि व्यूहरचनात्मक ऊर्जा यांची औपचारिक स्पर्धेशी सांगड घातली जात नाही, ही पुरोगामी म्हणवणाऱ्या पक्षांची मर्यादा या पुस्तकातून ठळकपणे पुढे येते.