मराठीत काही शब्दांमधील ‘च’, ‘ज’ आणि ‘झ’चे उच्चार वेगळे करणे अपेक्षित असते. परंतु बहुतेक जण या शब्दांचे चुकीचे उच्चार करतात. या शब्दांच्या योग्य उच्चारासाठी उर्दूतला नुक्ता वापरल्यास शब्दांतील वेगवेगळ्या छटा स्पष्ट होतील आणि त्या- त्या शब्दांचा नेमका उच्चार कसा करायचा, हेही समजेल.
‘मीलन’ सिनेमातलं ‘सावन का महिना पवन करें सोर’ हे गाणं आठवतं का? सुंदर कम्पोझिशन, नूतनचा अत्यंत नैसर्गिक अभिनय यामुळे तर ते गाणं लक्षात राहतंच; पण त्याहीपेक्षा ते जास्त लक्षात राहतं ते सुनील दत्त ‘शोर, नहीं बाबा! सोऽऽऽर, सोऽऽऽर’ असं म्हणून नूतनच्या उच्चाराची जी दुरुस्ती करतो, त्यामुळे. भाषेमध्ये उच्चाराला निश्चितच महत्त्व आहे यात शंका नाही.
माणसाच्या जगण्याच्या विविध गरजांमधली एक अत्यंत महत्त्वाची गरज व्यक्त होणे ही आहे. वेगवेगळ्या कलांचा जन्म हा त्यासाठीच झालेला दिसून येतो. चित्रकला, शिल्पकला, संगीत अशा अभिव्यक्तीच्या अनेकानेक माध्यमांमध्ये भाषा हे एक प्रमुख माध्यम आहे. नागराज मंजुळे यांची एक सुंदर कविता आहे. माणसाची व्यक्त होण्याची भूक किती तीव्र असते, हे त्यात फार ताकदीने आलं आहे..
‘माझ्या हाती
नसती लेखणी तर..
असती छिन्नी, सतार, बासरी.. अथवा कुंचला
मी कशानेही उपसतच राहिलो असतो
हा अतोनात कोलाहल मनातला..!’
भाषा हे अभिव्यक्तीचे, संवादाचे माध्यम आहे, तसेच ते स्वत:ला समजून घेण्याचेही माध्यम आहे. गणित, विज्ञान, इतिहास इत्यादी काहीही शिकायचे असेल तर आधी भाषा चांगली समजणे आवश्यक आहे. कारण कुठलाही विषय आपण भाषेच्या माध्यमातूनच शिकत असतो. त्यामुळे भाषेचे माणसाच्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे यात शंका नाही.
यादृष्टीने ज्या भाषेतून आपण शिक्षण घेतो, तिच्यात क्लिष्टता नसावी अशी अपेक्षा असते. भाषेमध्ये जेवढी स्पष्टता आणि सुलभता असेल, तेवढी ती भाषा विस्तारण्याची शक्यता अधिक. वर्षांनुवर्षांच्या विकासप्रक्रियेत प्रत्येक भाषेत काही ना काही गुंतागुंत आढळतेच. पण इथे आपण केवळ मराठीचा विचार करणार आहोत. वृत्तवाहिन्यांवरील मराठीचे उदाहरण घेऊ. यात बातम्यांचे वाचन करणाऱ्या निवेदकाचे उच्चार अचूक असणे गरजेचे असते. कारण समाज त्याच्याकडे भाषेसंदर्भात आदर्श म्हणून बघत असतो. आज मराठी वृत्तवाहिन्यांवरच्या वृत्तनिवेदकांच्या नावाने प्रचंड ओरड होताना दिसते. ती चूक आहे असे म्हणता येणार नाही. कारण केवळ उच्चारच नाही, तर वाक्यरचना आणि शब्दांच्या उपयोगासंदर्भातही अनेक चुका निवेदक करताना दिसतात. उदाहरणार्थ, ‘इथे पाणी प्रचंड संख्येने साचलेलं दिसून येतंय.’ यात केवळ या निवेदकांनाच दोष देता येणार नाही, तर त्याकरता शिक्षकांनाही जबाबदार धरावे लागेल. निवेदकांना मार्गदर्शनाची गरज आहे यात शंकाच नाही. कित्येकांची शिकण्याची तयारीही असते; परंतु दुर्दैवाने त्यांच्याकरता असे वर्ग वा कार्यशाळा होत नाहीत. जॉर्ज बर्नार्ड शॉच्या ‘स्पोकन इंग्लिश अँड ब्रोकन इंग्लिश’ या लेखात त्यांनी एकदा बीबीसी वर्ल्डने निवेदकांना आदर्श उच्चार ठरवून देण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती नेमल्याचे म्हटले होते. त्यादृष्टीने मराठी वृत्तवाहिन्यांसाठीही असा एखादा भाषातज्ज्ञ किंवा समिती नेमल्यास निवेदकांना ती मार्गदर्शक ठरेल.
मराठीत काही अक्षरांचे दोन प्रकारे उच्चार होताना दिसतात. जसे की ‘च’, ‘ज’ आणि ‘झ’ या अक्षरांच्या दोन तऱ्हेच्या उच्चारांमुळे अनेकदा खूप गोंधळ उडताना दिसून येतो. सरपंचातला ‘च’ हा ‘चिमणी’तला म्हणायचा की ‘चारोळी’तला, असा प्रश्न पडून गोंधळ होतो.
एक प्रसंग सांगावासा वाटतो. एकदा एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ‘जत्रा’ या शब्दातल्या ‘ज’चा उच्चार प्रमुख पाहुण्यांनी ‘जगा’तल्या ‘ज’प्रमाणे केला, तर प्रकाशकांनी आपण ‘जा’ हे क्रियापद म्हणताना जसा त्याचा उच्चार करतो तसा त्याचा उच्चार केला. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात जर मान्यवरांमध्येच हे द्वंद्व असेल तर मग सर्वसामान्यांची काय कथा!
अमेरिकेतील प्रसिद्ध ‘हिस्ट्री चॅनल’ काही काळ मराठीत आणण्याचा प्रयोग ‘नेटवर्क १८’ समूहाने केला होता. २०११ ते २०१३ च्या दरम्यानची ही गोष्ट आहे. मूळ इंग्रजीतल्या अध्र्या किंवा एक तासाच्या कार्यक्रमाचा मराठीत अनुवाद केला जात असे. तो अनुवाद योग्य झाला आहे अथवा नाही, हे तपासले जात असे. त्यानंतर त्याचा व्हॉइस ओव्हर केला जाई. मूळ इंग्रजी कार्यक्रमावर हा व्हॉइस ओव्हर लावून तो कार्यक्रम दाखवला जाई. मी तेव्हा ‘हिस्ट्री मराठी’साठी गुणवत्ता नियंत्रणाचे काम करत होते. म्हणजे मूळ इंग्रजीचा मराठी अनुवाद तसेच नंतर डब केलेल्या सीडीमधील उच्चार, व्हॉइस ओव्हर, पॅराडब हे नीट झालेले आहे की नाही, हे तपासणे. व्हॉइस ओव्हर म्हणजे टीव्हीवर दृश्यामागे त्या दृश्यासंबंधी माहिती सांगणारा आवाज, तर पॅराडब म्हणजे एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी त्या व्यक्तीला शोभेल अशा आवाजात रेकॉर्ड करून लावणे. या सीडीज् तपासताना असंख्य वेळा त्यात उच्चारांचा गोंधळ दिसून यायचा. ‘जतन’मधल्या ‘ज’चा उच्चार हमखास चुकत असे. तेव्हा ज्याबद्दल सामान्यत: गोंधळ होतो असे काही शब्द लक्षात आले. ते पुढीलप्रमाणे.. ‘जतन, जत्रा, जत्रेकरी, जारण, जंगल, जंत, मिरज, जागरण, जागर, गजर, चमचा, चाणाक्ष, चकली, चकणा, चपराक, चणा, चावी, चानी, चमडी, चक्काचूर, चाकू, चाचेगिरी, पंच, पंचनामा, सरपंच, झालर, झुंबर, झंकार, झकपक, झुमका..’ इत्यादी. आडनावांच्या बाबतीतही हा गोंधळ हमखास होतो. उदाहरणार्थ, ‘चव्हाण, महाजन, जाधव, पिचड’ इत्यादी.
एकदा एका बातमीपत्रात दोन निवेदक बातम्या देत होते. प्रमोद महाजनांसंदर्भात एक बातमी आली. बातमीतील वाक्य होतं की, ‘प्रमोद महा‘ज’न हे युतीचे शिल्पकार होते.’ दोघे निवेदक बातमी विभागून वाचत होते. दोघांनी ‘महाजन’मधल्या ‘ज’चा वेगवेगळा उच्चार केला. एकाने ‘महाजन’मधला ‘ज’ ‘जगा’तला ‘ज’सारखा उच्चारला, तर दुसऱ्या निवेदकाने तो ‘जा’ या क्रियापदाचा जो उच्चार आपण करतो, तसा केला.
आणखीन एक प्रसंग म्हणजे- वारीचा कार्यक्रम हल्ली सगळ्याच मराठी वाहिन्या सादर करतात. वारीवरच्या विशेष कार्यक्रमात एका निवेदकाने ‘विठुनामाच्या ‘गजरात’ अवघी पंढरी नाहून निघाली.’ या वाक्यात ‘गजरात’मधल्या ‘ज’चा उच्चार ‘जगरहाटी’तल्या ‘ज’ चा केला, तर तीच बातमी वाचताना दुसऱ्या निवेदकाने ‘ज’चा उच्चार ‘जरतारी’तल्या ‘ज’चा केला.
याशिवाय व्हॉइस ओव्हर करणारे ‘पूर्वज’ आणि ‘कवच’ हे दोन शब्द उच्चारताना तर हमखास अनेकदा चुकत. मराठीत दोन ‘श’ आहेत. ‘श’ शाळेचा आणि ‘ष’ षटकोनाचा. ‘श’चे हे दोन उच्चार दाखविण्यासाठी ‘श’ आणि ‘ष’ असे ते वेगळे लिहितात.
‘च’, ‘ज’ आणि ‘झ’ यांच्या योग्य उच्चारासाठी काय करता येईल असा विचार करताना उर्दूतला नुक्ता घ्यावा असे मनात आले. उच्चारस्पष्टतेसाठी आपण उर्दू भाषेमध्ये असलेला नुक्ता घेतला तर खूप सोपेपणा आणि स्पष्टता येईल असे वाटते. उर्दूमध्ये ‘फ, क, ख, ग, ज’ या अक्षरांखाली नुक्ता देतात. नुक्ता म्हणजे संबंधित अक्षराच्या खाली त्याच्या पायाशी एक टिंब देणे. त्यामुळे वाचणाऱ्याला त्या शब्दाचा उच्चार कसा करायचा, ते ध्यानात येते. उदाहरणार्थ, उर्दूतला ‘जिंदगी’ हा शब्द आहे. यातल्या ‘ज’चे दोन उच्चार होतात. एक ‘ज’- ‘जीवना’तला आणि एक ‘जवळ’ मधला ‘ज’चा होतो, तसा. पण ‘जिं’खाली नुक्ता दिल्याने हा उच्चार ‘जवळ’मधल्या ‘ज’सारखा करायचा, हे वाचणाऱ्याला ताबडतोब कळते आणि योग्य उच्चारच त्याच्याकडून होतो.
याशिवाय उर्दूमध्ये नुक्ता न दिल्यास शब्दाचा अर्थही बदलतो. उदाहरणार्थ, ‘ए अजल तू ही दे दे सहारा, जिंदगी डगमगाने लगी है..’ या शेरमध्ये ‘अजल’चा अर्थ ‘मृत्यू’ असा आहे. शायर म्हणतोय, ‘आयुष्य बेभरवशाचं झालंय.. मृत्यू, आता तूच आधार दे रे बाबा!’ यात विरोधाभास फार सुंदररीत्या व्यक्त झाला आहे. मात्र, ‘अजल’ या शब्दातल्या ‘ज’खाली चुकून नुक्ता दिल्यास त्याचा अर्थ ‘अनादिकाळ’ असा होतो आणि या बदललेल्या अर्थामुळे संपूर्ण शेरमधला विरोधाभासच नष्ट होतो.
परंतु आपल्या मराठीचे वैशिष्टय़ हे, की शब्दाचा उच्चार काहीही केला तरी त्याचा अर्थ बदलत नाही. मराठीने ‘च’, ‘ज’ आणि ‘झ’ या अक्षरांसाठी अशी नुक्त्याची व्यवस्था स्वीकारल्यास ते उच्चारस्पष्टतेच्या दृष्टीने फारच सोयीचे होईल. त्याकरता ‘आपण जसे लिहितो तसाच उच्चार’ अशा स्पष्टतेकडे जाणे आवश्यक आहे. भाषेच्या प्रमाणीकरणाच्या दृष्टीनेही ते लाभदायक ठरेल. शिवाय उच्चारांत सुसूत्रीकरण येईल, ते वेगळेच. इंग्रजी, संस्कृत, फ्रेंच, जर्मन आदी बहुतांश भाषांमध्ये उच्चाराला महत्त्व दिसून येते. गायक, वृत्तनिवेदक, सूत्रसंचालक, वक्ता, शिक्षक अशा अनेक क्षेत्रांमध्ये अचूक उच्चारांना खूप महत्त्व आहे. मुंबईचा प्रसिद्ध रेडिओ जॉकी जितू राज हा त्याच्या उच्चाराबद्दल इतका जागरूक आहे, की बोलताना त्याचा नुक्ता कधीच चुकत नाही. आपल्या मुलाखतीतसुद्धा त्याने उच्चारांवर मेहनत घेत असल्याचे सांगितले होते. सुप्रसिद्ध दिवंगत गझल- गायक मेहंदी हसन आणि जगजीत सिंग हे जसे त्यांच्या गझल-गायकीसाठी ओळखले जात तसेच त्यांच्या अचूक उर्दू उच्चारांसाठीही ते परिचित आहेत.
शिक्षकांचे उच्चार आधी तपासायला हवेत. कारण शिक्षकांच्या हाताखालून त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीत हजारो विद्यार्थी जात असतात. मराठी साहित्यात एम. ए. करणाऱ्या एका मुलीने ‘मी मराठी ‘वाडमया’त एम. ए. करते आहे,’ असे मला सांगितले. त्यात तिची चूक नव्हती. तिला मी ‘‘वाडमय’ हा चुकीचा उच्चार आहे,’ असे सांगितल्यावर ‘आमचे प्राध्यापक ‘वाडमय’ असेच म्हणतात,’ असे उत्तर तिने दिले.
बोलीभाषा आणि प्रमाणभाषा या वादात न अडकता भाषेमध्ये नियमांची सुसूत्रता आणणे आवश्यक आहे. ही एकवाक्यता आणि सुसूत्रता असेल तर परभाषक, तसेच विदेशी लोकही मराठी शिकण्याची शक्यता वाढेल. आपली भाषा जगात अधिकाधिक बोलली जावी, ती ज्ञानभाषा व्हावी यासाठी भाषा प्रवाही, लवचीक हवी, तसेच तिच्यात स्पष्टताही तितकीच आवश्यक आहे. भाषातज्ज्ञांनी आणि अभ्यासकांनी या सूचनेवर अधिक प्रकाश टाकावा असे वाटते.