मुलांच्या आत्महत्यांचे प्रमाण हल्ली वाढताना दिसते आहे. त्यामागची कारणे अनेक असली, तरीही मुले हा टोकाचा निर्णय घेण्यास कशी धजावतात, सामाजिक-कौटुंबिक वातावरणाचा त्यात किती वाटा आहे, या सगळ्याचा एका मानसोपचारतज्ज्ञाच्या दृष्टिकोनातून केलेला ऊहापोह..

दोन-तीन दशकांपूर्वी ‘मुलं आत्महत्या करू शकतात का?’ या प्रश्नाचं उत्तर प्रौढ व्यक्ती (मग ते पालक असोत वा शिक्षक) ठामपणे ‘नाही’ म्हणून देत असत. आज मात्र तसं ठामपणे ‘नाही’ म्हणण्याजोगी परिस्थिती उरलेली नाही. मुलांच्या आत्महत्यांचे प्रमाण लक्षात येण्याइतपत जाणवायला लागले आहे. मुलांच्या आत्महत्यांचे प्रमाण पाश्चात्त्य देशांत खूप आढळते. या आत्महत्या साधारणपणे वय वर्षे पाच ते चौदापर्यंतच्या गटातल्या असतात. मुलींपेक्षा मुलांमध्ये आत्महत्येचे प्रमाण थोडे जास्त दिसते. तर आत्महत्येची कल्पना किंवा विचार मुलींमध्ये जास्त प्रमाणात आढळतात. आत्महत्येचे हिंसक विचार व पद्धती मुलांमध्ये मुलींपेक्षा जास्त प्रमाणात दिसतात. सर्वसामान्यपणे चौदा-पंधरा वर्षांपर्यंत मुले अन्न, निवारा, सुरक्षितता व इतर सामाजिक मूलभूत गरजांसाठी आपल्या पालकांवर अवलंबून असतात. मुलांचं हे पालकांवर अवलंबून असणं लहानपणी त्यांच्या सुरक्षिततेसाठी गरजेचे आहे. त्यात प्रेम, आवश्यक स्वातंत्र्य, खेळाचे स्वातंत्र्य व इतर मुलांबरोबर मिळून-मिसळून राहायची संधी याही गोष्टी गरजेच्या आहेत. या साऱ्यातून मुलांची वैयक्तिक व सामाजिक जडणघडण होते. हळूहळू त्यांना घरटय़ातून बाहेर येता येता आपले पंख कसे बळकट करावेत हे कळेल, इतक्या सहजतेने या गोष्टी शिकवायला लागतात. आजच्या आधुनिक जगात व शहरीकरणामुळे संगोपनातील ही सहजता लोप पावली आहे.
पूर्वी एकत्र कुटुंबात आजी-आजोबा, काका-काकू व इतर मोठी भावंडे यांच्यावर शिस्तीची भिस्त असे. या गोष्टी मुलांच्या आपोआप अंगवळणी पडत असत. आज मुलांनाच नाही, तर पालकांनाही या शिस्तीची डोकेदुखी झाली आहे. उधळणाऱ्या घोडय़ाचा लगाम कधी आवळायचा आणि कधी सल सोडायचा, हे व्यवस्थित कळले तर घोडय़ाचा योग्य वेग राखता येतो. शिस्तीचाही असाच लगाम ठेवला पाहिजे.. सतत आवळून न ठेवता वा सतत सलही न सोडता!

satej patil
“बारक्यांनी नादाला लागू नका, कोणाला कधी चितपट करायचं…”, सतेज पाटलांचा महायुतीला इशारा; म्हणाले, “या चौकात काठी घेऊन…”
pregnant, sister, Nagpur,
पाहुणी म्हणून आली अन् गर्भवती झाली! बहिणीच्या संसारालाच सुरुंग…
Virat Kohli's video goes viral
IPL 2024: गौतम गंभीरच्या गळाभेटीवर विराटने सोडले मौन; चाहत्यांना म्हणाला, ‘तुमचा मसाला संपला म्हणून तुम्ही…’, पाहा VIDEO
second wife of an invalid marriage may not complain of harassment but of dowry
अवैध लग्नाची दुसरी पत्नी छ्ळाची नाही, पण हुंड्याची तक्रार करू शकते

मुलांना मानसिक तणाव का असावा? आम्ही तर सगळी काळजी घेतोच आहोत असं पालकांना वाटतं. परंतु आज पालकांबरोबर वावरतानाही मुलांना प्रचंड तणाव येतो, ही वस्तुस्थिती आहे. याची बरीच कारणे आहेत. पण यापैकी प्रमुख कारण म्हणजे मुले आणि पालकांमध्ये साधासुधा, मोकळा संवाद वा सुसंवाद कमी झालेला आहे. जो काही ‘संवाद’ आहे तो जास्तकरून ‘विसंवाद’चा आहे. अभ्यास, शाळा व मार्क्‍स या विषयांपुरताच मर्यादित संवाद आज त्यांच्यामध्ये आढळतो. पालक स्वत:देखील आजच्या जीवघेण्या स्पर्धेचे बळी आहेत. शिक्षण क्षेत्रात आज प्रचंड स्पर्धा आहे. त्यात आपलं मूल टिकेल की नाही, या चिंतेने ते स्वत:च बिथरलेले आहेत. मुलांच्या ताणतणावांत त्यांचं कुटुंब, शिक्षक व अभ्यास या तीन घटकांचा विचार प्रामुख्याने होणं आवश्यक आहे. कारण या ताणतणावांचे मुलांच्या मानसिक आरोग्यावर दूरगामी परिणाम होत आहेत. मुलांच्या आत्महत्येची समस्या कमी-जास्त प्रमाणात यातूनच निर्माण होत असते. अशा काही घटना पाहू या.

१) परीक्षेत चांगले गुण मिळत नाहीत म्हणून तेरा वर्षांचा अजय शाळेत जायलाच नकार देऊ लागला होता. आई खूपच मागे लागली म्हणून त्याने आजीच्या झोपेच्या गोळ्या खाल्ल्या.

२) रवींद्र गृहपाठ नीट करत नाही म्हणून शिक्षक त्याला रागावत. त्याच्या आई-वडिलांना बोलवीत असत. शेवटी तो ऐकत नाही म्हणून बाबांनी त्याला बदडून काढायला सुरुवात केली. शिक्षक आणि पालकांच्या रागाने त्याने हातावर चाकूचे वार करून घेतले.

३) सुमीत अजिबात अभ्यास करीत नाही म्हणून त्याला बाहेरगावी हॉस्टेल शाळेमध्ये दाखल केले गेले. तिथेही तो राहायला तयार नव्हता. एकदा सुटीसाठी त्याला घरी आणले तर पुन्हा तिथे जायचे नाही म्हणून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला.

४) प्रियाच्या बाबांनी आपल्या आर्थिक स्थितीला साजेसा एक साधा मोबाइल तिला केवळ संपर्क साधण्यासाठी म्हणून दिला होता. गेले एक-दोन महिने स्मार्ट फोन हवा म्हणून तिने हट्ट धरला होता. शेवटी बाबांनी अमुक दिवशी फोन देतो असे सांगितले. त्या दिवशी त्यांना यायला काहीसा उशीर झाला म्हणून तिने आत्महत्येचा प्रयत्न केला.

५) अमीरचा लहान भाऊ केवळ तीन वर्षांचा होता. अमीर त्याच्यापेक्षा सात वर्षांनी मोठा. परंतु आता अम्मा धाकटय़ा भावालाच जास्त सांभाळते, आपल्यावर प्रेम करत नाही म्हणून त्याने घरातली औषधे खाल्ली.

या विविध उदाहरणांतून मुलांच्या अवाजवी मागण्या व परिस्थिती समजून न घेण्याची वृत्ती दिसून येते. त्याचवेळी त्यांच्या पालकांवर त्याच्या शिक्षणासंबंधी असलेले दडपणही दिसून येतं. यात कुठंतरी पालकांचा संवाद कमी पडल्याचंही जाणवतं. बरेच पालक असं सांगतात, की आम्ही आधी मुलगा लहान आहे म्हणून खूप लाड केले. त्याचे सगळे हट्ट पुरवले. आता तो मोठा होतो आहे.. त्यानं अभ्यास नाही केला तर त्याचं भवितव्य कठीण होईल म्हणून थोडी शिस्त लावायला सुरुवात केली. त्यासाठी त्याला थोडं रागावतोही. पण तो आमचं अजिबात ऐकत नाही. उलट उत्तरं देतो. अर्थात मुलांच्या बिनविरोध स्वातंत्र्यावर असं अचानक काबू आणल्यामुळे ती बेकाबू व्हायला लागतात, बंड करायला लागतात, आक्रमक होतात. आत्महत्या हा या सगळ्या गोष्टींचा परिपाक असतो. यासाठी मुले आणि पालकांतील विसंवाद वेळीच ओळखून तो दुरूस्त केला गेला पाहिजे.

कुटुंबाच्या अचानक बदललेल्या कठोर पवित्र्यामुळे मुलं बऱ्याचदा गोंधळतात. अनेकदा आई-बाबांमध्येसुद्धा मुलांसंदर्भात विसंवाद आढळतो. आई-बाबांच्या भूमिकेत अशी अस्थिरता आढळली की मुलं गडबडतात. त्यांना पालकांनी शिक्षा केलेली, प्रत्येक गोष्टीसाठी सतत प्रश्न विचारलेले आवडत नाही. आधी अगदी लाडावून ठेवले असल्याने ते तेव्हा चांगले पालक होते, पण आता ते रागावतात म्हणजेच ते निष्ठुर झाले आहेत. त्यांना आता आपण आवडत नाही असे मुलांना वाटायला लागते. आपण आई-वडिलांना अपेक्षित असलेल्या गोष्टी करू शकत नाही, याबद्दल मुलांना अपराधी वाटत असते. या सगळ्या विविध पातळ्यांवरच्या भावना मुलांमध्ये प्रौढ अनुभव व शहाणपणा नसल्याने त्यांना हाताळता येत नाही. दुर्दैवाने, आपण या जगात नसलो तरी आपल्या आई-वडिलांना काहीच वाटणार नाही, असा त्यांचा समज होतो. तेव्हा मग ते आत्महत्येचा प्रयत्न करतात. अशा कुटुंबांतून मुलांच्या मानसिक विकासात अडथळा आणणाऱ्या काही गोष्टी दिसून येतात. या कुटुंबांतील सदस्यांची नाती भक्कम नसतात. त्यांच्यात एकमेकांबद्दल ओढ नसते. ते एकमेकांची पर्वा करताना दिसत नाहीत. बहुधा अशा कुटुंबांमध्ये वडिलांना व्यसन असते. त्यामुळे कुटुंबात तणाव असतो. आई-वडिलांचे एकमेकांशी पटत नाही. घरगुती िहसा होत असते व मुलांनासुद्धा त्याचा त्रास होतो. ही कुटुंबं मुलांना कोणत्याही बाबतींत प्रोत्साहन देत नाहीत. मानसिक आधार देत नाहीत. कुटुंबात मुलांमध्ये भेदभाव केला जातो. भावंडांमध्ये परस्परांशी चढाओढ व द्वेष दिसतो. घरात एखादं मूल बळीचा बकरा असतं व कुठल्याही चुकीच्या गोष्टीसाठी त्यालाच जबाबदार धरलं जातं. अशा घरांतली मुलं भावनिकदृष्टय़ा अस्थिर राहतात, खूप भावुक होतात. ताणतणावांत ती स्वत:ला सांभाळू शकत नाहीत.

आत्महत्येची प्रवृत्ती असलेल्या मुलांची विचार करण्याची शैली अपरिपक्व वा बालिश असते. त्यामुळे त्यांना कठीण प्रसंगी प्रगल्भ विचार करायला जमत नाही. अशांना अवतीभोवतीच्या समस्या व्यावहारिक दृष्टिकोनातून समजत नाहीत. परीक्षेत नापास होणे म्हणजे आयुष्यातही अपयशी होणे नसते, हे त्यांना कळत नाही. वातावरणाशी जुळवून घेणे त्यांना जमत नाही, म्हणून मग इतर मुलांशी किंवा मोठय़ांशी झालेले त्यांचे छोटे-मोठे वाद विकृत स्वरूप धारण करतात. मामाच्या मुलांशी जमत नाही म्हणून अमितने त्यांना झोडपले होते. त्याची विधवा आई जेव्हा त्याला त्याबद्दल रागावली तेव्हा त्याने तिला सरळ आत्महत्येची धमकी दिली. त्यामुळे तिला भावाचा एकमेव आधारही तोडावा लागला. या मुलांमध्ये त्यांच्या वयाच्या इतर मुलांच्या तुलनेत उथळपणा जास्त असतो. एखाद्या गोष्टीचा स्वत:ला सावरून विचार करायला ही मुले तयार नसतात. त्यांच्यात मानसिक लवचीकता किंवा रेझिलियन्स लहानपणापासूनच कमी दिसतो.

उदय व राजूला त्यांची आई जिवापाड कष्ट करून सांभाळत असे. त्यांचे वडील अट्टल दारुडे होते. कामधंदाही करत नसत. उदयचे आईवर खूप प्रेम होते. खेळ सोडून तो आईला कामांत मदत करीत असे. त्याच्या आईला वडील खूप शिवीगाळ करीत. बेदरकारपणे मारीत. उदय आईचा हा छळ पाहून खूप चिडत असे. वडिलांचा राग राग करी. या सगळ्या ताणामुळे पाच-सहा वर्षांच्या उदयने स्वत:च्या हातावर चाकूने वार केले. अशा तऱ्हेने कुटुंबातील भांडकुदळ व अस्वस्थ वातावरणाचा मुलांवर होणारा मानसिक परिणाम हा खूप गंभीर असतो.

शिल्पा सातवीपर्यंत अभ्यासात खूप हुशार होती. पण हळूहळू अभ्यासात ती कमी पडू लागली. इतर मुलांमध्ये खेळायला जायची थांबली. घरात एकटीच बसू लागली. स्वत:च्या कोशात हरवून गेली. तिच्या चेहऱ्यावर कुठलेही भाव दिसेनात. अचानक एके दिवशी तिने उंच मजल्यावरच्या घरातून उडी मारायचा प्रयत्न केला तेव्हा बहिणीने ते पाहिले आणि तिला वेळीच पकडले म्हणूनच ती वाचली. तिला मानसिक तपासणीसाठी आणले असता लहान वयात सुरू झालेला स्किझोफ्रेनिया लक्षात आला. मुलांमध्ये अनेक प्रकारचे मानसिक रोग आढळतात. पालकांनी ते आजार आपल्या पाल्याला झाले आहेत हे स्वीकारून त्यांच्यावर उपचार करणे आवश्यक असते. कुठल्याही वयातल्या मानसिक आजारांमध्ये आत्महत्येचे प्रमाण अधिक आढळते.

आत्महत्येस प्रवृत्त होणाऱ्या मुलांमध्ये मानसिक दृष्टिकोनातून पुढील महत्त्वाच्या गोष्टी आढळतात.

१) ही मुले स्वत:ला दोषी मानतात. २) त्यांच्यात स्वत:बद्दल आत्मविश्वास कमी असतो. ३) त्यांना सतत उगाचच अपराधी वाटते. ४) या मुलांना सतत धिक्कारले जाते. त्यांचा सतत अपमान केला जातो. ५) ही मुले एकेकटी राहतात. ६) या मुलांना भविष्य अंध:कारमय दिसते. आशेचा किरण दिसत नाही. ७) या मुलांचा स्वत:च्या आयुष्यावर वा इतर कुणावर विश्वास नसतो. ८) या मुलांना इतरांकडे आपल्या भावना व्यक्त करता येत नाहीत.

आजकाल मुलांचं विश्व वास्तव दुनियेपेक्षा सोशल मीडिया, मोबाइल व इंटरनेटमध्ये गुंतलेले आढळते. मुलांच्या भावनाही यांत्रिक होऊ लागल्या आहेत, कारण त्यांचा मानवी संपर्क तुटत चालला आहे. मीडियातील सनसनाटी आत्महत्येच्या बातम्यांचा प्रभाव मुलांवर पडत असतो. जेव्हा या मुलांच्या समस्या आत्महत्या केलेल्या मुलांच्या समस्येसारख्याच असतात तेव्हा हा प्रभाव जास्त दिसतो. आत्महत्येच्या बातम्यांत जेव्हा एखाद्या आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या मुलाच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रामुख्याने उल्लेख होतो आणि त्यास खूप प्रसिद्धी दिली जाते तेव्हा ‘कॉपी-कॅट’ किंवा नक्कल केलेल्या आत्महत्या मुलांमध्ये विशेषत्वाने आढळतात. प्रसारमाध्यमांत आपले मूल कुठल्या गोष्टींचा पाठपुरावा करते आहे याचा अदमास पालकांनी वेळोवेळी घेतला पाहिजे व त्यांनी मुलांना वेळीच मार्गदर्शन केले पाहिजे.

बारा-तेरा वर्षांची विनीता व सुदर्शन आत्महत्या करण्यासाठी कुठल्याशा डोंगरावर गेले होते. तिथे काही लोकांनी त्यांना पाहिले व पोलिसांच्या स्वाधीन केले. ती इतकी लहान आहेत, आणि तरी प्रेमबिम कसलं करतात म्हणून त्यांच्या पालकांनी त्यांना चांगलंच खडसावलं. पालकांच्या जाचाला कंटाळून, चिडून त्यांना ‘एक दुजे के लिये’ स्टाईलने आत्महत्या करून अजरामर व्हायचे होते असे त्यांनी सांगितले. आपण नक्की काय करतो आहोत, ते किती गंभीर आहे याची जाणीवही त्यांना नव्हती. आज प्रेमात पडायचे वय कमी व्हायला लागले आहे. प्रेमात लवकर पडायची फॅशन वाढली आहे.

आज शैक्षणिक क्षेत्रात ज्याबद्दल ‘मौनम् सर्वार्थ साधनम्’ अशी भूमिका घेतली जाते, ती म्हणजे दांडगट, समाजविध्वंसक मुलांनी दुर्बल मुलांचा (ही दुर्बलता मानसिक वा शारीरिकही असू शकते.) केलेला छळ व दादागिरी! ज्याला आपण ‘बुली’ म्हणतो. या छळाबद्दल शोषित मुलांना नीट व्यक्त होता येत नाही. आतल्या आत घाबरून ही मुलं कुढत राहतात. आणि अगदीच सहन झालं नाही तर आत्महत्येचा मार्ग पत्करतात. या मुलांना वेळीच मदत केली गेली पाहिजे. त्यांना भावनिक आधार दिला पाहिजे. नाहीतर हा भावनोद्रेक त्यांना आयुष्यभर त्रासदायक ठरू शकतो. शाळांमधूनही आत्महत्येच्या अनुषंगाने ही जागृती होणे आवश्यक आहे. पालकांइतकीच शिक्षकांची भूमिकाही यासंबंधात महत्त्वाची आहे. मुलांची शाळेतली वागणूक व भावनिक अस्थिरता शिक्षकांनी वेळीच ओळखणे आवश्यक आहे.

आत्महत्येस प्रवृत्त होणारी मुले कशी ओळखायची?

१) अशा मुलांच्या वागणुकीत लक्षात येण्याजोगा बदल होतो. एरव्ही शांत असलेली मुले अचानक आक्रमक होताना दिसतात. २) त्यांच्या मानसिक स्थितीत बदल दिसतो. ती अस्थिर वाटतात. त्यांना भ्रम व भास होतात. ३) त्यांना झोप येत नाही किंवा जास्त झोप येते. ४) त्यांची भूक कमी झालेली किंवा वाढलेली दिसते. ५) ही मुलं मृत्यूबद्दल बोलतात वा त्यासंदर्भात लिहितात. त्यांच्यात आनंद घ्यायची क्षमता कमी होते. ६) ती मित्रमत्रिणींपासून दूर जातात. एकटीच राहतात. ७) दारू-चरससारख्या व्यसनांच्या अधीन होतात. त्याच नशेत राहतात. ८) सदैव कंटाळलेली, अस्वस्थ वाटतात.

मुलांच्या आत्महत्येपूर्वीच हे सिग्नल वेळीच ओळखून पालक व शिक्षकांनी जागरूक राहणे आवश्यक आहे. आपल्या घरात वा शाळेत आत्महत्या होणार नाहीत हा आपला गैरसमज ठरू शकतो. आत्महत्येस प्रतिबंध करायचा तर पालक-शिक्षक सुसंवाद महत्त्वाचा ठरतो. मुलांना होणारा भावनिक त्रास- मग तो घरी वा शाळेत असो- पालकांनी व शिक्षकांनी जाणून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांना भावनिक आधार देणे महत्त्वाचे आहे. त्यांना सुरक्षित ठेवण्याकरता आपल्या नजरेखाली ठेवले पाहिजे. मुलांची कुवत ओळखून त्यांना मार्गदर्शन केले पाहिजे. मुलं आपल्या समस्यांबद्दल कसा विचार करतात हे जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्यापलीकडे दुसरा पर्याय नाही. वेळोवेळी पालकांनी आपल्या मुलांबरोबरच्या नात्यात येणाऱ्या चढउतारांचं काळजीपूर्वक स्वयंपरीक्षण करणे गरजेचे आहे. शिवाय मुलांनी आत्महत्येचा प्रयत्न केला तर पालकांनी स्वत:च्या भावनांचा प्रक्षोभ होऊ न देता भविष्यात ही गोष्ट टाळण्याकरता पुढे काय करायला हवे, याचा सारासार विचार करून तातडीने निर्णय घ्यायला हवेत; जेणेकरून संभाव्य आत्महत्या टाळता येईल. शिक्षकांची भूमिका व पालकांचे वागणे या काळात खूप महत्त्वाचे ठरते. महत्त्वाचे म्हणजे या घडीला व्यावसायिक मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेतली पाहिजे. त्यांच्याकरवी मुलाचा मानसिक आजार वेळीच जाणून घ्यायला हवा.

डॉ. शुभांगी पारकर pshubhangi@gmail.com