|| शाहीर हेमंतराजे मावळे

महाराष्ट्रात लोककला आणि लोकसंस्कृतीची जुनी परंपरा आहे. अगदी जात्यावरच्या ओव्यांपासून सुरू झालेली ही लोकपरंपरा समाज जीवन व मराठी मनाच्या जडणघडणीतील एक महत्त्वाचा दुवा आहे. या लोकपरंपरेत कीर्तन, अभंग, भारूड, गोंधळ, पोवाडा, लावणी, तमाशा यांचं स्वत:चं असं स्थान या लोककलांनी निर्माण केलं. समाजाला काही सांगण्याचं, वेळ पडल्यास उपदेश करण्याचं काम लोककलांनी व लोककलावंतांनी केलं. शाहिरी हे या लोकसंस्कृतीतील मानाचं पान. या शाहिरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रभावित झालेल्या जलशांचा लेखाजोखा ‘पुरोगामी मराठी शाहिरी’ या पुस्तकाच्या रूपाने डॉ. बजरंग कोरडे यांनी केला आहे.

Actor Makrand Anaspure
महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीवर मकरंद अनासपुरेंचं परखड भाष्य, “आम्हा मतदारांची फसवणूक…”
Dombivli Crime News
डोंबिवली : शालेय विद्यार्थ्यांना ड्रग्ज विकणाऱ्या ६५ वर्षाच्या महिलेला अटक
Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र
Loksatta Lokrang Maharashtra Foundation is recognized in Maharashtra for awards in literary and social fields
पंचम देणे सामाजिक जाणिवेचे !

संत, पंत आणि तंत कवींनी मराठी वाङ्मय समृद्ध आणि व्यापक केले आहे. महाराष्ट्राला तंत कवींची मोठी परंपरा लाभलेली आहे. शाहिरीचा विचार करता रसात्मक तीन प्रकार पडतात. भक्तिरस प्रधान भेदीक शाहिरी, वीररस प्रधान पोवाडा आणि शृंगार रसावर आधारित लावणी-तमाशा. याशिवाय, दांगटी शाहिरी व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वसा व वारसा घेऊन आलेली शाहिरी म्हणजे जलसा.

विसाव्या शतकात महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घेऊनच जलशांची निर्मिती झाली. सामाजिक परिवर्तनाचा आशय घेऊन नव्या रूपात तमाशा सादर झाला. लोकजागृती, लोकशिक्षण, लोकप्रबोधन, लोकसंघटन असा लोककल्याणाचा हेतू घेऊन इतर लोककलांप्रमाणेच जलसा आकाराला येत होता. १९१० ते १९३० या काळात सत्यशोधक जलसे पाहायला मिळतात व १९३१ पासून आंबेडकरी जलसे दिसतात. दलित व उपेक्षित समाज घटकाला एकत्र करून त्याचे मन- परिवर्तन करण्यासाठी जलशांनी मोठी भूमिका बजावली. डॉ. आंबेडकरांच्या स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक न्याय या विचारांची प्रेरणा घेऊन शाहिरी गीत, वग, फार्स लिहिले गेले व सादर झाले. सामान्य माणसांच्या बोलीभाषेत अत्यंत साध्या व सोप्या पद्धतीने लोकसंगीताचा वापर करून जलशांची निर्मिती झाली व त्यांनी परिवर्तनवादी चळवळीत आपले मोलाचे योगदान दिले. या काळात अनेक शाहिरांनी आपल्या साध्या, सोप्या तरीही आक्रमक बोलीभाषेतून दलित ऐक्य व सामाजिक अधिकाराची जाणीव करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्या काळात ती एक प्रकारे बंडखोरीच होती. अगदी सोप्या शब्दात सांगायचे तर, जलसा म्हणजे अस्पृशांच्या माणुसकी हक्कांचा साद्यंत इतिहासच आहे. दलित जनांच्या जगण्यासाठी आणि स्वाभिमानी माणूस म्हणून जगविण्यासाठी जलसा चळवळ जन्मली.

महाराष्ट्रातील या पुरोगामी मराठी शाहिरीच्या अभ्यासपूर्ण लेखांच्या संकलनाचे काम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. बजरंग कोरडे यांनी या पुस्तकाच्या रूपाने केलेले आहे. पुरोगामी चळवळीला वाहिलेल्या सत्यशोधकी, विशेषत्वाने आंबेडकरी जलशाचे स्वरूप, त्याचा साद्यंत इतिहास, जलसाकार शाहिरांचे योगदान, शाहिरांचे साहित्य व या लोकपरंपरेचा दलित समाज मनावर झालेला सकारात्मक दूरगामी परिणाम याचा चिकित्सक विचार पुस्तक रूपाने आपल्या पुढे येतो. या पुस्तकाच्या निमित्ताने स्वत: संकलक डॉ. बजरंग कोरडे यांच्यासह सतरा संशोधक व लेखक यांनी विद्यापीठ स्तरावर सादर केलेले शोधनिबंध व लेख यात समाविष्ट करण्यात आलेले आहेत. पुरोगामी शाहिरीचे स्वरूप, इतिहास, मांडणी, शाहिरांचे साहित्य व त्यांचे सादरीकरण या सर्वाचा दलित व दलितेतर समाजावर होणारे दूरगामी परिणाम यावर पुस्तकाच्या निमित्ताने प्रकाश टाकण्यात आला आहे. डॉ. दत्ता भगत, डॉ. कृष्णा किरवले, डॉ. भगवान ठाकूर अशा अनेक मान्यवरांच्या लेखांचे संकलन जलशा व आंबेडकरी चळवळीतील शाहीर यावरील विश्लेषणात्मक रूप समोर आणते.

जलशांचा सखोल विचार करीत असताना पुरोगामी शाहिरी चळवळीचा आढावा या पुस्तकात घेतलेला दिसतो. भाऊ फक्कड, भीमराव करडक, राजानंद गडपायले, अण्णा भाऊ साठे, अमर शेख, जंगम स्वामी, पांडुरंग वनमाळी, वामनदादा कर्डक, विठ्ठल उमप या ज्येष्ठ शाहिरांनी आंबेडकरी विचारांचा मांडलेला आकृतिबंध व त्याची परिणामकारकता, त्यांची समृद्ध शाहिरी व परिवर्तनाच्या चळवळीतील सक्रिय योगदान यावरील ऊहापोह यानिमित्ताने मांडला आहे. आंबेडकरी विचारांचे खंदे पुरस्कर्ते व कार्यवाहक म्हणून दलित शाहिरीचा विचार सर्वानाच करावा लागतो आहे. आंबेडकरी विचारांनी प्रेरित झालेल्या या दलित शाहिरांनी नवा सामाजिक आशय सोप्या व बोलीभाषेत आपल्या शाहिरी कवनांतून आविष्कृत केला आहे. पारंपरिक गण, गवळण या रचनांना फाटा देऊन गौतम बुद्ध, कबीर, डॉ. आंबेडकरांच्या विचारांचे जागरण करण्याचे काम या नवविचारांच्या शाहिरांनी केले. परिवर्तनाच्या चळवळीच्या इतिहासात ही पुरोगामी मराठी शाहिरी व ती गाणाऱ्या शाहिरांचा विचार केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही, हे नक्की.

जलसा ही समतावादी, प्रबोधनकारी व बांधिलकीची रंगभूमी आहे. दलित मनाचा हुंकार व उत्कट असा स्वानुभवावर आधारित कलाविष्कार म्हणजे जलसा आहे. या जलशांचे व जलशाकार शाहिरांचे यथायोग्य मूल्यमापन महाराष्ट्रात केले गेले नाही, हे सत्य नाकारता येत नाही. ‘पुरोगामी मराठी शाहिरी’ या पुस्तकाच्या निमित्ताने पुरोगामी शाहीर, त्यांची शाहिरी म्हणजे जलशांवर प्रकाशझोत मात्र नक्कीच पडला आहे.

  • ‘पुरोगामी मराठी शाहिरी’,
  • संपादक- डॉ. बजरंग कोरडे,
  • स्नेहवर्धन प्रकाशन,
  • पृष्ठे- १६४, किंमत १८०