रशियाची सत्तासूत्रे आपल्या हातात घेतल्यानंतर रशियाला पुन्हा एकदा महासत्ता बनवण्याचा ध्यास घेऊन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी देशविदेशात उचललेली पावलं खूपच वादग्रस्त ठरली. राष्ट्रवादाचा मुलामा दिलेली त्यांची व्यक्तिकेंद्रित हुकूमशाही कशी टिकली, हा राजकीय निरीक्षकांची सत्त्वपरीक्षा पाहणारा महत्त्वाचा प्रश्न.

या कूटप्रश्नाची उकल करणारे गिरीश कुबेर  यांचे ‘पुतिन’ हे पुस्तक नुकतेच राजहंस प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झाले. आंतरराष्ट्रीय राजकीय इतिहासाचा वेध घेता घेता एका जगावेगळ्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देणाऱ्या या पुस्तकातील पुतिनपूर्व रशियाची पूर्वपीठिका कथन करणाऱ्या लेखातील संपादित अंश..

Kerala CPM Vadakara Lok Sabha constituency K K Shailaja teacher amma
केरळमधील ‘व्हायरल’ टीचर अम्मा आहे तरी कोण? काय आहे कम्युनिस्ट पक्षाची रणनीति?
Kangana Ranaut Vikramaditya Singh Himachal Pradesh Mandi Loksabha Election 2024
Celebrity Fight: कंगनासमोर राजघराण्यातील वंशजाचे आव्हान; सोनिया गांधींनी केली वाट बिकट
Mira Bhayander BJP office bearer enters Shiv Sena Thackeray faction
राज ठाकरेंच्या महायुतीच्या पाठिंबामुळे उत्तर भारतीय नाराज; मिरा भाईंदर भाजप पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडला
Muslim League, Hindu Mahasabha, coalition government, pre independence alliance
मुस्लीम लीग आणि हिंदू महासभेने मिळून स्थापली होती प्रांतिक सरकारे… स्वातंत्र्यपूर्व काळातील आघाडीबद्दल इतिहास काय सांगतो?

स्टालिन यांच्यानंतर रशियाची सूत्रं आली निकिता ख्रुश्र्चेव्ह यांच्याकडे. स्टालिन यांच्या काळात शेतीकडे मोठंच दुर्लक्ष झालं होतं. कारण स्टालिन यांना औद्योगिक उत्पादनात रस होता. ख्रुश्र्चेव्ह यांनी शेतीत प्रचंड गुंतवणूक केली. स्टालिन यांच्या निधनानंतर अवघ्या तीन वर्षांत ख्रुश्र्च्ोव्ह यांनी साडेतीन कोटी हेक्टर इतकी अतिरिक्त जमीन लागवडीखाली आणली. त्यांनी जमिनीच्या एकत्रीकरणाचीही मोहीम हाती घेतली. म्हणजे छोटय़ा छोटय़ा तुकडय़ांत विभागलेल्या शेतजमिनी एकत्र आणून त्यांची शेती करण्याला त्यांनी महत्त्व दिलं. त्याचवेळी त्यांच्या काळात खासगी शेती जवळजवळ बंद पडली. परिणामी रशियात कृषी उत्पादन प्रचंड प्रमाणावर झालं. १९५० ते ६० या एकाच दशकात रशियात फक्त गव्हाच्या उत्पादनात तब्बल ५० टक्के इतकी प्रचंड वाढ झाली. दुग्धजन्य पदार्थाचं उत्पादन ६९ टक्क्यांनी वाढलं, तर मांस-मटणाचं ८७ टक्क्यांनी.

ख्रुश्र्चेव्ह यांना कम्युनिझमच्या सैद्धान्तिक विजयात मोठा रस होता. म्हणजे अन्य कोणत्याही राज्यपद्धतीशिवाय कम्युनिस्ट अधिक यशस्वी होऊ शकतात, हे त्यांना जगाला दाखवून द्यायचं होतं. त्यामुळे त्यांच्या काळात उद्योगांतला सरकारी हस्तक्षेप टिपेला गेला. स्टालिन यांच्या काळात तेल, नैसर्गिक वायू, रसायन आदी क्षेत्रांकडे तितकं लक्ष नव्हतं सरकारचं. ख्रुश्र्चेव्ह यांनी ती चूक सुधारली. औद्योगिक उत्पादन, शेती आणि एकूणच अर्थव्यवस्थेचा आकार या सगळ्यांत बदल सुचवणारी सप्तवार्षिक योजना त्यांनी आखली. या सगळ्या उपायांमुळे त्यांच्या काळात देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात डोळ्यावर येईल अशी वाढ होत गेली. औद्योगिक गरजा आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू या दोन्हींच्या उत्पादनात वाढ झाल्यानं रशियनांचं जगणं सुधारलं. त्यांच्या काळात रशियन सर्वाधिक पौष्टिक अन्न खात होते असं म्हटलं जातं, त्यात तथ्य आहे ते यामुळे. या सगळ्याला विज्ञान आणि तंत्रज्ञानातल्या प्रगतीची जोड मिळत गेली. १९५७ साली रशियाचं स्पुतनिक यान अवकाशात झेपावलं. त्यानंतर तीन वर्षांत युरी गागारिन यांच्या रूपानं पहिल्यांदा मानवानं अवकाशात प्रवेश केला. ख्रुश्र्चेव्ह यांनी रशियन शहरांत मोठमोठय़ा इमारती उभारण्याचाही कार्यक्रम हाती घेतला. फ्रीज, टीव्ही, वॉिशग मशिन्स सर्रास घराघरांत दिसू लागली. सर्वाना महाविद्यालयीन शिक्षण मोफत झालं. वैद्यकीय सेवाही विनाशुल्क दिली जाऊ लागली. अर्थव्यवस्थेला अशी गती आली, की रशियातली बेकारी जवळजवळ नाहीशी झाली.

सोव्हिएत युनियन बघता बघता कल्याणकारी राजवटीचं मूर्तिमंत प्रतीक बनू लागली. रशियन व्यवस्था अनेकांना आदर्श वाटू लागली. वरवर पाहणाऱ्यांना भुरळ पडावी असाच रशिया दिसत होता. आता तो अमेरिकेच्या बरोबरीनं मोठा वाटू लागला होता. होताही तसा तो. ख्रुश्र्च्ोव्ह यांना तर आपण आता अमेरिकेलाही मागे टाकू शकतो असं वाटू लागलं. रशियाच्या चष्म्यातून जगाकडे पाहणारे आणि जगाची मांडणी करणारे खूप होते. त्या सगळ्यांनी रशियाला महासत्तापदाचा दर्जा देऊन टाकला. अमेरिकेच्या भांडवलशाही, शोषणावर आधारित व्यवस्थेला साम्यवादी, शेतकरी-कामकरी यांची सत्ता पर्याय देऊ शकते असा विश्वास अनेकांच्या मनात तयार होत गेला.

काही काळानंतर त्याला तडा जाणार होता. तसा तो जाऊ लागलादेखील. कारण ही प्रगती वरवरची होती. कळस चकाकतो म्हणून काही खालची इमारतही झळाळती असते असं नाही. रशियाची ती नव्हती. ख्रुश्र्चेव्ह यांच्या उत्तरार्धातच ते दिसून येऊ लागलं. मग ब्रेझनेव्ह यांची राजवट आली. ती तर बरीचशी पोकळ निघाली. भ्रष्टाचार शिगेला पोहोचला. साम्यवादी विचारसरणीलाही ठिकठिकाणी धक्के बसू लागले. त्यातूनच १९७९ साली अफगाणिस्तानात सैन्य घुसवण्याचा निर्णय ब्रेझनेव्ह यांनी घेतला. त्यात रशिया चांगलाच रक्तबंबाळ झाला. तसा तो होता होता साम्यवादी विचारसरणीलाही त्यानं जायबंदी केलं.

तरीही सोव्हिएत युनियनचा आकार आणि ताकद मोठीच मानली जात होती. वास्तविक रशिया आर्थिकदृष्टय़ा पोखरला गेला होता. ब्रेझनेव्ह यांच्यानंतरच्या मिखाइल गोर्बाचोव्ह यांनी हे पोखरलेपण मान्य केलं. आणि नकळतपणे का असेना, त्यांनी साम्यवादाचा पोलादी पडदा ओढून काढायला सुरुवात केली. असं करताना सोविएत युनियनचं विघटन होईल, ही शक्यता त्यांच्या गावीही नव्हती. पण तसं झालं खरं. नंतर बोरिस येल्त्सिन यांनी रशियाच्या ताकदीचा वर्ख स्वत:च्या कर्माने बऱ्यापैकी ओढून काढला. उरलीसुरली चकाकी व्लादिमीर पुतिन यांनी पुसून टाकली.

संमिश्र अशी ही रशियन अर्थव्यवस्था. काही धोरणात्मक क्षेत्रांत सरकारी मालकी योग्य मानणारी. खनिज तेल, नैसर्गिक वायूच्या उपलब्धतेनं सजलेली आणि समर्थ झालेली ही अर्थव्यवस्था आजही सक्षम आहे. कारण जगातल्या एकंदर नैसर्गिक साधनसंपत्तीपैकी सुमारे ३० टक्के साठे एकटय़ा रशियाच्या भूमीत आहेत. याच्या जोडीला स्टालिन आणि नंतरच्या सर्वानी विशेष लक्ष पुरवलेला शस्त्रास्त्र उद्योग रशियात आजही जोमानं सुरू आहे. अगदी अलीकडच्या आकडेवारीनुसार, रशियाचा एकटय़ा संरक्षण साधनांचा व्यापार साधारण १६०० कोटी डॉलर्स इतका आहे. आजही त्याची स्पर्धा आहे ती फक्त अमेरिकेशी. मारगिरी करणारी अद्ययावत विमानं, अवकाश सुरक्षा यंत्रणा, महाप्रचंड विमानवाहू नौका, आण्विक पाणबुडय़ा अशा अनेक क्षेत्रांत रशिया आघाडीवर आहे. क्रयशक्ती हा निकष लावला तर रशियाची अर्थव्यवस्था जगातली सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे.

पण दरम्यानच्या काळात रशियात बरंच काही घडलं. त्यातलं  काही जागतिक राजकारणाला आकार देणारं, तर काही जागतिक राजकारणामुळे आकार घेणारं. त्यातून जन्माला आली एक विचित्र व्यवस्था. म्हटलं तर ती महासत्ता आहे; पण तरी तिची सूत्रं आणि नियंत्रण मूठभरांच्याच हाती आहे. महासत्तापणाचे जे काही फायदे देशातल्या नागरिकांना मिळायला हवेत, ते रशियातल्या नागरिकांना मिळाले आहेत असं अजिबात म्हणता येणार नाही. आकडेवारी असं सांगते की, आजमितीला रशियाची ३५ टक्के आर्थिक ताकद फक्त ११० व्यक्तींच्या हाती एकवटलेली आहे. या व्यक्ती अर्थातच आहेत सर्वोच्च सत्तास्थानाच्या आसपास घुटमळणाऱ्या.

रशियाचं हे इतकं पतन झालं कसं? मानवी संस्कृतीस आदर्श भासणाऱ्या व्यवस्थेपासून मूठभरांनाच सर्व काही देणाऱ्या, जवळपास हुकूमशाही देशापर्यंत रशियाचा हा प्रवास झाला कसा? तो कोणत्या टप्प्यावर सुरू झाला? कोणी कोणी रशियाच्या या घसरगुंडीस हातभार लावला? या प्रवासातले निर्णायक असे टप्पे कोणते? त्याचा रंजक आढावा म्हणजे हे पुस्तक. ते दाखवून देतं.. महासत्तापद मिळवणं फारसं अवघड नाही. आव्हान असतं, ते त्या पदावर टिकून राहण्याचं. महासत्तापद राखण्यासाठी आवश्यक त्या व्यवस्था आसपास नसल्या की ते सत्तापद सांभाळणारी माणसं बघता बघता घसरतात. त्या घसरणीचा हा आलेख..