‘गुरु हा संतकुळींचा राजा..’

गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांनी गायलेली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांची ही रचना. किशोरीताई माझ्यासाठी काय आहेत, हे सांगण्यासाठी मला पुन्हा त्यांनी गायलेल्या रचनेचाच आधार घ्यावासा वाटतो यातच सर्व काही आले. देवाने म्हणा किंवा नशिबाने मला त्यांच्यापर्यंत पोहोचवले आणि माझ्या आयुष्याचे सोने झाले. मी किशोरीताई यांच्याकडे २० वर्षे गाणे शिकलो ही काही फार मोठी गोष्ट नाही. अशी २०-२० वर्षे किमान चार-पाच वेळा दिली तरच त्यांचे गाणे मला थोडेफार समजू शकेल. किशोरीताई यांच्याबरोबर २० वर्षे असणे ही माझ्यासाठी ‘स्वर्गाची नोकरी’ होती. मी नावालाच पणशीकर. माझे नाव ‘रघुनंदन किशोरीताई आमोणकर’ आहे, असे बाबा (प्रभाकर पणशीकर) नेहमीच म्हणायचे. इतका मी किशोरीताईंशी एकरूप झालो होतो. माझे स्वतंत्र असे अस्तित्व उरलेच नाही. ‘रघ्या’ अशी नुसती हाक मारली तरी ताईंना काय हवे, हे मला अगदी बरोबर समजायचे आणि मी ते पूर्ण करायचो.

father beaten
वसई : मुलीचे अपहरण केल्यानंतर पित्याला बेदम मारहाण, नया नगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा
Pramod Patil, Vaishali Darekar
मनसेतून बाहेर पडलेल्या गद्दारांना कल्याण लोकसभेत मदत नाही, आमदार प्रमोद पाटील यांचा वैशाली दरेकरांना इशारा
Kishore Jorgewar
खळबळजनक..! आमदार किशोर जोरगेवार यांचे फेसबुक व ट्विटर अकाऊंट हॅक, हॅक केल्यानंतर पोस्ट…
three year old boy dies after balloon gets stuck in throat in Ichhalkaranji
फुगा घशात गेल्याने चिमुकल्याच्या मृत्यू; इचलकरंजीतील घटना

दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर मी ‘नाटय़संपदा’ संस्थेचे काम पाहावे असे ठरवले होते. नाटय़संपदेचे ‘तुझी वाट वेगळी’ हे रणजित देसाई यांचे नाटक येणार होते. त्याला किशोरीताई संगीत देणार होत्या. माझी काकू मीरा पणशीकर यांची त्यात भूमिका होती. किशोरीताई यांच्याबरोबर राहणे एवढेच माझे काम होते. त्यांची स्वररचना ध्वनिमुद्रित करणे आणि त्यांना ऐकवणे, एवढेच काम करायचो. मात्र, गुरुगृही राहून शिकणे महत्त्वाचे, हे काका दाजी पणशीकर यांनी माझ्यावर िबबवले. संगीतमरतड पं. जसराज आणि पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांच्याकडे मी गाणे शिकण्याचा प्रयत्न केला. पण किशोरीताई यांच्याकडेच शिकायचे, हे माझ्यासाठी विधिलिखित होते. १९७८-७९ मध्ये एका गुरुवारी त्यांनी माझ्या हाती तानपुरा देत गाणे शिकवायला सुरुवात केली. एकदा त्या एका शिष्याला शिकवीत असताना त्यांनी सांगितलेले त्या शिष्याच्या गळ्यातून बाहेर येत नव्हते. ‘तू गाणारा आहेस ना? मग म्हणून दाखव..’ ही ताईंची आज्ञा मी पडत्या फळासारखी मानली आणि गायलो. ते ताईंना आवडले. ‘मुलाच्या आवाजामध्ये दर्द आहे,’ असे किशोरीताई त्यावेळी म्हणाल्याचे मला आठवते. एका अर्थाने ‘गुरूने बोलावलेला विद्यार्थी’ असे भाग्य मला लाभले.

ताईंकडे गाणे शिकताना सुरुवातीला मला त्रास झाला. स्त्रियांचा आवाज हा निसर्गदत्त उंच स्वरांचा असतो. ताईंचा स्वर काळी पाचचा होता आणि माझा काळी दोनचा. त्यामुळे त्यांचा मंद्र मी उंच स्वरात गात उत्तरार्ध काळी पाचमध्ये गात असे. त्यांनी शिकवलेले जे कळले ते मला माझ्या सुरात करून बघावे लागत असे. एक-दोन वर्षांत हळूहळू हे जमायला लागले. त्याचा फायदा असा झाला की, गाताना काही चुकले तर मुलींना ताई रागवायच्या, पण मला कधीच रागवायच्या नाहीत. माझे शिक्षण राग पद्धतीने नाही, तर थाट अंगानेच झाले. ‘माझ्या गळ्यातून जे येते ते तसेच्या तसे तुझ्या गळ्यातून आले पाहिजे’ हे त्यांचे गुरुवाक्य. त्याचे मी तंतोतंत पालन केले. ‘यमन’, ‘शुद्धकल्याण’ अशा थाटांचा अभ्यास त्यांनी माझ्याकडून करून घेतला. मग ‘काफी’, ‘भैरव’ आणि ‘भैरवी’ शिकवताना खुला रियाझ करून घेतला. रागाला असते तसे थाटाला बंधन नसते. त्यामुळे लवचीकता आली आणि कल्पनाशक्तीला वाव मिळाला. साचेबद्ध नाही, हेच ताईंच्या गाण्याचे वैशिष्टय़ होते. किशोरीताई गुरू म्हणून लाभल्या हे माझे आणि नंदिनी बेडेकरचे भाग्यच म्हणावे लागेल. त्यांच्या बुद्धिमत्तेची झेप इतकी अफाट आहे, की ताईंनी पायाने मारलेली गाठ आम्हाला १५ वर्षांनी उलगडेल. शिकवताना त्यांना कोणाला काय बोलले तर त्याच्याकडून चांगले निघू शकेल याचे भान होते. सरळ व्यक्तीशी ताई अगदी सरळमार्गी होत्या. त्यांनी अनेकांना भरभरून मदत केली आहे.

अनेक प्रतिभावंतांच्या ताईंबरोबर होणाऱ्या कलात्मक गप्पांचा मी साक्षीदार आहे. ज्येष्ठ कवी बा. भ. बोरकर यांच्या तोंडून ‘गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले’ ही कविता ऐकण्याचे भाग्य मला लाभले आहे. किशोरीताई आणि मी- आम्हाला एकमेकांची इतकी सवय झाली होती की ताई कोठेही गेल्या की लोक ‘रघू कोठे आहे?’ असे विचारायचे. एकदा ताईंनी घरी दूरध्वनी करून ‘रघू कोठे आहे?’ असे विचारले. ‘रघू जाणार कोठे? चुकला फकीर मशिदीतच असेल की!’ असे बाबांनी ताईंना उत्तर दिले होते. जेथे ताई, तेथे रघू असलाच पाहिजे, असे समीकरण झाले होते. त्यांची प्रवासाची तिकिटे काढणे, त्यांचे हिशेब पाहणे, पत्रव्यवहार हे सारे मीच पाहायचो. हे मी का करू लागलो, याचे उत्तर नाही. पण ताईंच्या व्यक्तिमत्त्वाचा पगडा माझ्यावर बसला. मोगुबाई आजारी असताना आम्ही दोघेही रुग्णालयात असायचो. गाडी चालवणे, तंबोरे-स्वरमंडल जुळवणे यासाठी मी असायचो. देशात आणि परदेशात प्रवास करताना मीच बरोबर असायचो. त्या गात असताना मी नोटेशन- म्हणजे स्वरलेखन करायचो. माझ्यामागे काही पाश नव्हते. पैसे कमवायचे नव्हते की घराकडे बघायचे नव्हते. त्यामुळे ताईंबरोबर असणे हीच माझी ‘स्वर्गाची नोकरी’ होती. माझ्यासाठी ‘सूर सुरांत लावणे’ हाच आनंद होता.

किशोरीताई प्रयोगशील होत्या. कोणी त्यांच्या गाण्याविषयी टीकेचा सूर लावला तरी त्या कधी रागावल्या नाहीत. त्याचा सकारात्मक अर्थ काढून पुन्हा नवनवीन प्रयोग करण्यासाठी त्या तयार असत. मी त्यांच्याकडून ५० मराठी आणि हिंदूी भजने आणि २५ गजल शिकलो आहे. ‘तोची भावू सुस्वरू जाहला’ या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या रचनांवर आधारित आणि ‘मगन हुई मीरा चली’ या संत मीराबाई यांच्या रचनांवर आधारित अशा दोन कार्यक्रमांची त्यांनी निर्मिती केली. त्या कार्यक्रमांसाठी त्यांनी स्वत:ला वाहून घेतले होते. या कार्यक्रमांमध्ये मी संवादिनीवादन करीत असे. अर्थात, मी काही संवादिनीवादक नाही, पण गाण्याला आवश्यक तेवढे मला वाजविता येते.

मी गुरूसमोर माती होऊन गेलो. किशोरीताईंनी मला त्यांना हवा तो आकार दिला. त्यामुळे माझे असे काहीच नाही. जे आहे ते त्यांचेच श्रेय आहे. त्यांना हवे तसे मी मला घडवू दिले, इतकेच माझे म्हणावे लागेल. किशोरीताईंची १२ वर्षे सेवा करणे आणि गाणे शिकणे, हेच खरे तर माझे उद्दिष्ट होते. माझ्या डोक्यावर एक गुंतागुंतीची शस्त्रक्रिया झाली तेव्हा ताई बेचैन झाल्या होत्या. एका गुरुवारी त्यांनी मला राघवेंद्र स्वामी यांच्या मंत्राची विधिवत दीक्षा दिली. त्यांच्या इच्छाशक्तीतूनच मी बरा झालो. आणि रघुनंदन गायक होऊ शकला. ‘रघूने पैसे नाही मिळवले तरी चालेल, पण आयुष्यात काय करायचे हे त्याला कळले, हेच माझ्यासाठी आनंदाचे आहे,’ असे बाबा सांगत असत. किशोरीताई नाही, तर माझी आईच मला सोडून गेली याचे दु:ख वाटते.

रघुनंदन पणशीकर