पालटतच असतात ऋतू त्यांना नेमून दिलेल्या आखणीनुसार. चुकत नाहीत नेम त्यांचे. जसे सरत्या महिन्याच्या अखेरच्या दिवशी वा नव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पालटतो आपण भिंतीवर फडफडणाऱ्या दिनदर्शिकेची पाने, तसेच उलटत जातात ऋतू, महिने आपले आपण. या पालटातील एक ऋतू.. पावसाळा. त्याचा तसा नियतकाल साधारण चार महिन्यांचा. हा ऋतू सावळ्या मेघांचा. हा ऋतू चिंब धारांचा. हा ऋतू इंद्रधनूचा. हा ऋतू भिजल्या धरणीचा. हा ऋतू हिरव्या उगवाईचा. आणि हा ऋतू कवितांचाही..

कधी सुचली असेल माणसाला पहिली कविता पावसावरची? काय असेल त्या कवितेमध्ये? आदिम भय.. उदासी.. एकाकीपणा.. की उत्फुल्लता.. अनादि आनंद? ठाऊक नाही. पण पाऊस जेवढा प्राचीन आहे, तेवढीच प्राचीन आहे त्या पावसावरची कविता. आपल्यासाठी त्याचे जुने दाखले मिळतात ते अगदी संतसाहित्यापासून. संतसाहित्यातील, अभंगांतील, विराण्यांमधील पावसाची जातकुळी निराळी. संतांच्या शब्दांना अध्यात्म अगदी बिलगून असलेले. त्यांच्या शब्दांतील पावसाचे संदर्भ हे अगदी वेगळे. खरे तर पावसाचा ऋतू हा त्यांच्यासाठी एक केवळ निमित्त. म्हणूनच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर जेव्हा..

Mahavikas Aghadi, Kapil Patil,
महाविकास आघाडीतील विसवंदामुळे भिवंडीत कपिल पाटील यांना कठीण पेपर सोपा?
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
raju shetty allegations against dhairyasheel mane over development work
खासदारांचे विकासकामात गौडबंगाल, इतरांची कामे आपल्या नावावर खपवली; राजू शेट्टी यांचा धैर्यशील माने यांच्यावर आरोप
dhairyasheel mane criticizes raju shetty
“पाठिंब्यासाठी दुसऱ्याच्या पायऱ्या का झिजवत आहेत?”, खासदार माने यांची राजू शेट्टी यांच्यावर टीका

‘घनु वाजे घुणघुणा, वारा वाहे रुणझुणा..’

असे शब्द योजतात, तेव्हा ते निव्वळ वर्णनासाठी नसतात. भवतारक कान्हा वेगी भेटावा यासाठीची त्यांच्या मनातील जी ओढ आहे, अस्वस्थता आहे, ती उतरते त्या शब्दांमधून. संतमंडळींसाठी पंढरीची वारी म्हणजे आनंदनिधान. या वारीचा काळ ऐन आषाढाचा. त्यामुळे वारीचे अनेक अभंग डोईच्या सावळ्या ढगांतून बरसणाऱ्या धारांमध्ये भिजलेले.

ही भिजल्या शब्दांची ओढ कवींसाठी अनिवार. आणि त्यासाठीच्या पावसाची ओढही तशीच अनिवार. तप्त उन्हाळ्याने समस्त सृष्टी कासावीस झालेली. जीव तहानलेला. अशावेळी चिंब धारांची विनवणी करण्याखेरीज पर्याय उरत नाही. मग केशवसुतांसारखा कवी लिहून जातो..

‘ग्रीष्माने तपली धरा, करपली ही काय की, वाटते

चारा व्यर्थ गुरे पहा हुडकती, नेत्री धुळी दाटते..’

अशा स्थितीत मग-

‘ऐशी होऊनिया दशा दिवस ते झाले बहु, पावसा

ये आता तर तू, त्वरा करुनिया लंकेवरूनी असा.

झंझावात यावरी बसुनिया या पश्चिमाब्धीवरी

लाटा झोडित, गर्जना करित ये, बा मेघराजा, तरी..’

अशी गळ पावसाला घातली जाणारच.

ही गळ पावसाने ऐकली आहे असे वाटण्याजोगे आकाश सावळे होत जाते. त्या सावळ्या आकाशाला आता कुठल्याही क्षणी पान्हा फुटेल असे वाटत राहते. मात्र, ते हटवादी. मग आरती प्रभूंसारखा विलक्षण प्रतिभेचा कवी लिहून जातो..

‘जमतें आहे ढगांत पाणी,

अजुन परंतू ढगचि फुटेना,

आणि विजेचा जराजराही

त्या पाण्यांतुन देठ तुटेना..’

आणि हटवादी आकाश पालवल्यानंतर काय होते? ना. घ. देशपांडे यांच्या शब्दांत..

‘चिंब झाली पावसाने भोवती रानोवने

वर्षती येथे सखीची पावसाळी लोचने..’

हाच पाऊस बा. भ. बोरकरांसारख्या आनंदयात्रीला दिसतो, तो असा..

‘मल्हाराची जळांत धून

वीज नाचते अधुनमधून

वनात गेला मोर भिजून

गोपी खिळल्या पदीं थिजून

घुमतो पांवा सांग कुठून?’

बोरकरांचेच समानधर्मी कवी मंगेश पाडगांवकर यांनादेखील पाऊस दिसतो.. भावतो तो बोरकरांसारखाच. आणि मग तो भावलेला पाऊस शब्दांत उतरतो तो..

‘कोसळली सर दक्षिण उत्तर

घमघमलें मातींतुनि उत्तर

अष्टदिशांतुन अभीष्टचिंतन, घुमला जयजयकार

पहिल्या हिरव्या तृणपात्याचा आज असे सत्कार..’

ना. धों. महानोर यांच्या कित्येक कविता नखशिखांत पावसात बुडून गेलेल्या. त्या पावसाचे, त्या कवितेचे रंग निरनिराळे. कधी..

‘लपक झपक झाडांतुन हिरव्या

किलबिल ओली- बोली,

पाण्यातुन घनगर्द सावनी

सरकत नभ बिथरोनी..’

असे कंच हिरवे, तर कधी..

‘पाऊस रात्रीचा

कभिन्ह-माध्यान्ही

धसमुसता, काळा, वैऱ्यासारखा..’ असे गडदरंगी.

पद्मा लोकूर यांच्या कवितेतला हा पाऊस हलका, उदास सूर लावणारा..

‘उदास पागोळ्या

टपटप थेंब

उमटे पुसटे

कसलेंसें बिंब..’

तर, अरुणा ढेरे यांना दिसलेला पाऊस हिंस्र..

‘पाऊस झोडपतोय हिंस्र आवेगाने

पिळवटलेल्या मातीला

वस्तीत खोलवर घुसतोय वेदनामय

अंधार अमानुष थकलेला’

इंदिरा संत यांच्या कवितेतून दिसते ते पावसाचे अत्यंत साधेसुधे रूप. हे रूप कमालीचे घरगुती आणि स्नेहल.

‘बाई पाऊस पाऊस

कोसळतो एकचित्त,

खमंग लोणच्याशी

हवा वाफेचाच भात,

 

बाई पाऊस पाऊस

कसा निवांत कोसळतो,

सुखावल्या घरटय़ाला

कसा कुशीमध्ये घेतो.’

कवयित्री पद्मा यांच्या कवितांमधील पाऊस वेगवेगळ्या मिती दाखविणारा..

‘आषाढातील पाऊस उंच लयीत पडणारा

कोसळणारा, झोडपणारा, कधी हळूच कुरवाळणारा,

आषाढातला पाऊस तापली धरती निववणारा

तडकणाऱ्या खडकांना सचैल स्नान घालणारा..’

पावसावरच्या कवितांचा आठव आहे आणि ग्रेस यांच्या कवितेची आठवण होणार नाही, असे होणे नाही.

‘हा श्रावण गळतो दूर

नदीला पूर

तरूवर पक्षी,

घन ओलें त्यांतुन

चंद्र दिव्यांची नक्षी..’

असे गाणे ग्रेस कधी गाऊन जातात, तर कधी..

‘पाऊस आला पाऊस आला

गारांचा वर्षांव,

गुरे अडकली रानामध्ये

दयाघना तू धाव..’

असा धावा करतात.

कलंदर कवी सुरेश भट यांच्या कवितेतला पाऊस त्यांच्याचसारखा कलंदर. मग त्यातून..

‘काळ्याकाळ्या मेघांआडुन

क्षणभर चमकुन गेली बिजली

जणू मोकळ्या केसांमधुनी

पाठ तुझी मज गोरी दिसली..’

असे शब्द सुचतात.

या सगळ्याच कवींच्या कवितांमधून रिमझिमणाऱ्या, बरसणाऱ्या, कोसळणाऱ्या पावसाचे विभ्रम निरनिराळे. त्यांचे शब्द वेगळे, भाव वेगळे, अर्थ वेगळे. तरीही त्यांतून एक आंतरिक सूत्र दिसतेच दिसते. या कविता तशा आत्ममग्नतेच्या. भोवतालचा पाऊस अंतरी अधिक भोगणाऱ्या. या कवितांत भोवतालच्या पावसाचे अंतरीचे पडसाद अधिक दिसून येतात. सोपाच आणि रूढ शब्द वापरायचा झाला आणि एखाद्या रकान्यात बसवायचेच झाले या कवितांना.. तर त्या रकान्यास नाव- ‘रोमँटिसिझम’!

प्रत्येक कवीचा, साहित्यिकाचा असतोच अनुभव घेण्याचा स्वत:चा असा एक धर्म. आणि त्यालाच बिलगून असतो- तो अनुभव मांडण्याचाही स्वत:चा धर्म. त्यात कुणास दोष देण्याचे कारण नाही आणि कुणाची भलामण करण्याचीही गरज नाही. ही केवळ वृत्तीनिहाय केलेली विभागणी. याच विभागणीला अनुसरून दिसते पावसाच्या कवितांचे एक वेगळे रूप. या कवितांचा भाव अंतर्मुख नाही असे नाही. मात्र, त्यांची व्यक्त होण्याची रीत निराळी. या कवितांत अनेकदा पाऊस हे तर केवळ निमित्त.

‘जारे जारे पावसा

तुला देतो पैसा

वादळी सामुद्रिकात शरणावत झोपडय़ांची करवंदी कलेवरे

पावसाला पोळवा पावसाला भाजवा विस्तव आणा विस्तव पाडा..’

ही ओळ नामदेव ढसाळ यांच्या कवितेमधली. या कवितेतला पाऊस वाचणाऱ्यावर रिमझिमणारा नाही.. तो तोंडावर फाटकन् सपकारे मारतो.

पावसानंतर आलेला महापूर प्रफुल्ल शिलेदार यांना दिसतो, तो असा..

‘या महापुरानं

आपण जगत आलेल्या

पिढीजात त्रिज्येतल्या आपल्या भूगोलाचा

चिखल चिखल केलाय

पुन्हा मातीचा गोळा आकारहीन..’

तर नारायण सुर्वे पावसाशीच बोलतात जरा दरडावून..

‘तुझा उन्मत्त गडगडाट

हाकवित आणतोस किरमिजी, राखी रंगाचे

गुबगुबीत कळप

ओढताना आसूड कडाडतोस

उगारतोस गिलोटीन विजेचे,

दुभंगतात तेही, खालचे रस्ते.’

कवी श्रीधर तिळवे हे बोरकर, महानोर, पाडगांवकर यांच्या पावसाळ्यांना नम्र श्रद्धांजली वाहून प्रश्न विचारतात..

‘म्हणणारे म्हणतात

ढग ही परमेश्वराची दया असते

पण

दुष्काळात ढग हरवतात तेव्हा

त्याची दया कुठल्या सुकाळात गुंतलेली असते?

की परमेश्वर आंधळा असतो

पाण्याइतकाच?’

गणेश विसपुते यांच्या कवितेतला पाऊस पावसाचे दिवस नसताना आलेला..

‘त्या पावसानं

शहरावर अख्खा गंजच चढवला

झाडंच्या झाडं उभ्या झडून गेली

आणि माणसंही

एकेक करून करपत गेली

आवाज न करता..’

तर, अशोक कोतवाल यांच्या आठवणीतला पाऊस..

‘भयानक गर्जत लख्ख विजांसह

धो-धो पाऊस पडे..

तेव्हा माझी आई चिमणीची काच

राखेनं स्वच्छ करीत म्हणे

‘रे चांडाळा! माणूस घरी येऊ  दे

मग पड कितीबी..’

आणि दि. पु. चित्रे यांच्या कवितेतून पाऊस भेटतो तो..

‘पाऊस पाऊस पाऊस

थेंबांचे तुटले ऊस

उघडा झाला माझा गळा

उफराटा उगवला मळा..’

असा विकल करणारा..

या वरच्या सगळ्याच ओळींमधला पाऊस स्वत: हळवा नाही आणि त्यात भिजणाऱ्यालाही हळवा करणारा नाही. ढसाळांपासून ते सुर्वे यांच्यापर्यंत, गणेश विसपुते यांच्यापासून दि. पु. चित्रे यांच्यापर्यंत.. यांच्या कवितेतला पाऊस त्या अर्थाने रोमँटिक नाही. रोमांचित करणारा नाही. हा पाऊस पदरात घालतो एक कुंद, नकोनकोसा, घुसमटून टाकणारा अनुभव. या कवितांमध्ये धुंद करणाऱ्या नव्हे, तर भर पावसातही वास्तवाची चर्र्र जाणीव करून देणारा निसर्ग भेटीस येतो. येथे निसर्गापुढे लीनतेचा भाव दिसत नाही, तर दिसते- त्यास जाब विचारण्याचे धारिष्टय़. याच नव्हे, तर अनेक कवींच्या साधारणत: नव्वदीनंतरच्या पावसाच्या कवितांमध्येही दिसते ती एक प्रकारच्या परात्मतेची भावना. त्यात भाबडय़ा भिजलेपणाचा पूर्ण अभाव. अर्थात, ज्यांना रोमांचित शैलीच्या पाऊसकविता म्हणता येतील तशा कविता आजही मोठय़ा प्रमाणावर लिहिल्या जात आहेतच. पण त्याचबरोबर वर उल्लेख केलेल्या धाटणीच्या कवितांचे प्रमाण वाढते आहे.

काय असावीत त्यामागील कारणे?

कुणीही काहीही म्हटले तरी कवी अवकाशातून अवतरलेला नसतो आणि जगतही नसतो अवकाशात. इच्छा असो वा नसो; भोवतालाशी संबंध राखावेच लागतात त्याला. हा भोवताल कधी पसंतीचा, कधी नापसंतीचा. नापसंतीच्या भोवतालाशी एकतर शांतपणे जुळवून घेणे वा मग संघर्ष करणे, हे पर्याय. त्यातील पहिला पर्याय बाद ठरला की दुसऱ्या पर्यायाची वाट उरते. या संघर्षांच्या वाटेवर लौकिक अर्थाने यश मिळणे खूपच कठीण. मग मनाचा कोंडमारा ठरलेला. या अशा कोंडमाऱ्याचा उद्गार नव्वदीनंतरच्या अनेक कवींत आढळतो. असे काय झाले या काळात? तर- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक धोरणांच्या पातळीवर झालेली उलथापालथ. त्याच्या जोडीला सामाजिक व राजकीय आघाडय़ांवरदेखील झाली फार मोठी घुसळण. या सगळ्याच गोष्टींचा दट्टय़ा पडून कवितांचा भाव बदलणे हे अपरिहार्य होते. आणि ते तसेच झाले. कवितांमधील पावसाने हळवे, रिमझिम रूप सोडून सपकारे मारणारे रूप धारण करणे ही त्याचीच परिणती!

तरीही..

रूप बदलेल पाऊस.. पण बरसतच राहील तो शब्दांमधून, कवितांमधून. पावसाची ताकदच तेवढी मोठी. ही ताकद सृजनाची. हे सृजन शब्दांचे. कवितेमधला हा भिजलेला शब्द खूपच प्राचीन. भाषाही जेव्हा विकसित झाली नव्हती तेव्हा गुहेत, रानावनांत राहणाऱ्या आदिम माणसाला पावसाकडे पाहून जे वाटले असेल, जे त्याच्या मनात उगवले असेल- अगदी तेव्हापासूनचा प्राचीन. तोच शब्द आजही तितकाच तरलताजा. हा शब्द जुना झाला नाही, शिळा झाला नाही. जोवर पाऊस आहे तोवर हा भिजलेला शब्द तसाच तरलताजा राहणार. पावसाला पूर्णविराम नाही.. म्हणूनच या भिजल्या शब्दालाही!

rajiv.kale@expressindia.com

=============

काटेरी कुंपणाची तार धरून

किती कोसळतोय हा पाऊस

गिधाडय़ा घाट तर

ढासळून पडलाय

आमच्या जाण्यायेण्याच्या

एकमेव रस्त्यावर

गढूळ पाण्याच्या

लालतुडुंब पुरात

ही झाडं वाहत चाललीयत

निरोपाच्या ओल्या

फांद्या हालवत

बांध फुटलेल्या ओढय़ाजवळ

आमची बस तरंगलीय

कागदाच्या होडीसारखी

रस्त्यावरल्या पाण्यातून आम्ही पायी निघालोय

आमच्या भेगा पडलेल्या

आश्रमशाळेकडे

जिथं उपाशी मुलं

ओली पांघरूणं कवटाळून

लोखंडी पेटीवर बसलीयत

आश्रमशाळेच्या ओल्या

भिंती गदगद हालत आहेत

ही मुलं तर

स्थलांतरित केली पाहिजेत

गावातल्या एकमेव मंदिरात

आश्रमशाळेच्या

काटेरी कुंपणाची तार धरून

काही मुलं बसलीयत

ओल्या वेळूत भिजून गेलेल्या

चिंब पाखरांसारखी

त्यांचे.. माझे

उपाशी डोळे

काठोकाठ भरून आले

गढूळ.. गढूळ

लालतुडुंब ओढय़ासारखे.

– अनिल साबळे

चीतपट 

मुक्या माजाचा काळा ढग

गाभन रालाय धुरानं,

थेंबानी मारली पलटी पोटात त्याच्या

आन मपल्या दंडातला ढेकूळ आल्डाय.

कृत्रिम पावसाचं ईमान जातं वावरातून रोज

पोरं करतेत तेला टाटा,

तिसऱ्या पहारा आता

दावणीतले वासरंबी पाहतेत वर तोंड करू करू.

कह्यतच कई नई

तरीबी आज्जा लागवडी करून घ्या म्हणून वरडतो,

मधलीच्या टायमाला टुकडं काढावं लागन वाटतं.

साखरसम्राटांचा हराभरा मतदारसंघय ो

सहकार! सहकार! सहकार!

बॉयलर पेटीतानाच्या कार्यक्रमात

आन जिल्हा बँकेच्या नावातला सहकार

– मपल्या घरी मळीच्या वासातून संत्रा बनून येतो.

यफआरपी, शेर, प्यानेल, डायरेक्टर..

एवढी बाराखडी आम्हाला पाठहे,

तरीबी फायनल घेताना

आम्ही अडाणीच राहतो.

गणथडीचा पाटीलहे मी

तेच्यामुळ आत्महत्याबी करता येत नई,

ऊसाच्या आन कपाशीच्या कुस्तीत

मला धोबीपछाड देऊन

मरणानंबी चीतपट केलंभो.

 स्वप्निल शेळके

 

लवकरच पाऊस येईल म्हणून..

भिंतीच्या पोपडय़ांतून

उडणाऱ्या परांच्या मुंग्या

सडासारवणात

वळवळणारे किडे

शेणाचे गोळे हवेत वाहून नेणारे भुंगे पाहत

सुखावते माय

 

चिमण्यांची धुळांघोळ

गायी-वासरांचं उडय़ा मारणं

धुरकट डोंगरालगत नाचणारे मोर पाहून

धुंदावतो बाप

 

कागदावरून पसरलेली शाई

पाणथडावर जमलेली काजव्यांची शाळा

चंद्राची सावली दिसल्यावर

शहारतो मी

 

लवकरच पाऊस येईल म्हणून

कसं उधाणतं घर

– नामदेव कोळी

 

हे काळेकुट्ट नशिले ढग

वशीकरणाच्या घनघोर पावसाळ्यात

भिजून गेलाय जनताजनार्दन

द्वेषाचा चिखल माजलाय

बुद्धीच्या पटलावर सगळीकडे

 

या चिखलात माखलेला जमाव

हिंडतोय गल्लोगल्ली बीफ बीफ ओरडत

दीक्षाविधीत वाटप झालेले त्रिशूल आहेत हातात

आणि जीव घेणं तर इतकं सोप्पंय

की जणू खुपसणी खुपसणी खेळताहेत गोरक्षक

 

व्हच्र्युअल समुद्रावरून येणारा

शत्रुत्वाचा खरा वारा

घेऊन येतो सोबत अफवांची वाफ

शोधत असतो विश्वासाच्या कमी दाबाचे पट्टे

मग पाऊस कोसळतो जबरदस्त हिंसेचा

शांतीनगरात, जाम मोहल्ल्यात

 

तुफान तणकट माजलंय

रेप्टाईल कॉम्प्लेक्सचं

जे नेणिवेत ठाण मांडून होतं बीजरूपात

 

देशभक्त पावसांत आणि चांगल्या दिवसांत

धुऊन निघणार होते ना भ्रष्टाचाराचे पाप?

मग? या मान्सूनच्या ठेकेदारांना

कुणीच विचारत नाहीये जाब

 

स्मृतिभ्रंशाचा गारवा

तर इतका दाटून राहिलाय हवेत

की जणू झालीच नव्हती

नोटबंदीची अवकाळी ढगफुटी

 

आशेचा जाड रेनकोट एकात्मतेचा

मला सापडत नाही हरवलेला.

अन् छत्रीच्या आत्मविश्वासाची

दांडी कुणी खुडून नेलेली.

 

संमोही हिरवळ दाटलीये चोहीकडे

अन् सेवकावताराच्या स्तवनाचे

हे काळेकुट्ट नशिले ढग

संपत नाहीत की हटत नाहीत

मायावी मीडियाच्या आभाळातून

 – सत्यपालसिंग आधारसिंग राजपूत

 

कित्येक क्यूसेक पाऊस

माझ्या फ्लॅटमध्ये आहे

लॅपटॉप, कपाट, कपडे, डास,

बायका, उंदीर, पोकेमॉन, क्रॉक्स

आणि बाहेरून येणारे आवाज

यातलं काहीही कधीही येऊ शकतं अंगावर

पण मी काहीच नाही करू शकत

गप्पच राहतो

बहुतेक हे सगळं मनातूनच आलंय माझ्या

जे कधीच थांबत नाही

पळत राहतं, येत-जात राहतं

रात्री तर झोपेच्या छाताडावर येऊन बसतं

 

बसल्या बसल्या सोफ्यावर

पाहतो वर

तर गरगरणारा पंखा.

पंख्याच्या पात्यांकडे पाहिलं

कॉन्सन्ट्रेशन करून तर

मेटामॉरफॅसिस.

फिरत राहतो ढवळत वारा

आदळतो स्लाइडिंग विंडोजवर

मग पुस्तकाच्या पहिल्या काही पानांच्या टोकावरून

फ्लॉवरपॉटमधल्या फुलावर टपली.

मी म्हणजे वाऱ्याची गिरणीये

मला जमीन वाळवण्यापुरतं नाहीये राहायचं-

जे मागच्या महिन्याभरात काय केलं

विचारल्यावर आठवणारही नाही.

मी फिरून फिरून दमून गेलोय, घरघरतोय

 

देवदारच्या शेंडय़ावरून सूर्याची किरणं येतील

आणि गारेगार बर्फ झालेल्या माझ्या अंगावर सांडतील

ज्यांना असेल चिकाचा गंध

त्यात गुरफटून झोप निवांत.

वितळत जाऊन शेवटी समुद्रात शिरण्याचं स्वप्न

तडकतं फटकन्

स्वप्नं कचकडय़ाची असतात

आणि मला तर

आता कविता जगणंच शक्य नसतं

पावसाच्या धुंवाधार आवाजात

 

मी तप्त पृथ्वी असतो तर

पावसाला दिलाही असता प्रतिसाद

पण मी तापली माती नसल्याचं

सांगू शकत नाही कुणाला.

आणि सांगावं लागलंच,

तर मला भेदून जावं लागेल

शब्दांच्या कोअरला

ज्यात येईलही कदाचित मरण

पण मी पाहिलेलं नाहीये

प्रेत कसं दिसतं ते

मला मृत्यू न शिवलेल्या घरातून

तांदूळ आणण्याची कथा माहितेय

ती कथा मी जगू शकत नाही

आणि मी मेलोच जर,

तर मला प्रेत पाहण्याची संधीही मिळू शकत नाही

 

मी कविता जगू शकत नाही

तेवढी ताकद माझ्यात नाही

माझ्या फ्लॅटमध्ये आहेत वस्तू

ज्या तयारेत माझ्यावर डोळे वटारून

आणि फरश्यांमधून हळूहळू

शेवाळाचं जंजाळ येतंय उगवून

त्याला पायाने दाबून ठेवल्यावर

खिडकीवरच्या हाताची शक्ती कमी होतेय

ज्यांच्याबाहेर थांबून राहिलाय

कित्येक क्यूसेक पाऊस.

– प्रणव सखदेव

rajiv.kale@expressindia.com