News Flash

‘गोवा हिंदू’चा श्वास

‘धि गोवा हिंदू असोसिएशन’ या संस्थेचे रामकृष्ण नायक आणि संस्थेचं अगदी आतडय़ाचं नातं आहे.

रामकृष्ण नायक आणि कुसुमाग्रज

‘धि गोवा हिंदू असोसिएशन’ या संस्थेचे रामकृष्ण नायक आणि संस्थेचं अगदी आतडय़ाचं नातं आहे. दोघांना परस्परांपासून वेगळं करताच येणार नाही, इतकं. त्यांनी तन, मन आणि धनच नव्हे, तर आपलं अवघं आयुष्य अर्पून ‘गोवा हिंदू’ची आजवर नि:स्वार्थी आणि समर्पितभावानं निरलस सेवा केली आहे. आणि आज वयाच्या नव्वदीतही ते तरुणाईच्या उत्साहानं संस्थेसाठी झोकून देऊन काम करीत आहेत. ‘गोवा हिंदू’च्या आजवरच्या प्रदीर्घ वाटचालीत त्यांनी एका पैशाचेही मानधन न घेता संस्थेसाठी मानद सेवा दिली असून, संस्था हा जणू त्यांचा श्वास आणि ध्यास आहे. माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर मराठी संगीत नाटक आणि नाटय़संगीत क्षेत्रात आज मी जो कुणी आहे त्याचं सर्व श्रेय रामकृष्ण नायक यांनाच आहे. नायक यांनी मला वेळोवेळी ‘गोवा हिंदू’च्या नाटकांतून संधी आणि महत्त्वाच्या भूमिका देऊ केल्या आणि त्यातूनच नाटय़क्षेत्रात माझं नाव झालं.

१९५६ साली माझा धि गोवा हिंदू असोसिएशनमध्ये प्रवेश झाला. आणि आजच्या घडीला वयोपरत्वे मी नाटय़क्षेत्रातून निवृत्ती पत्करली असली तरीही संस्थेशी आणि नायक यांच्याशी माझं नातं कायम आहे आणि यापुढेही ते तसंच राहील. १९५६ साली राज्य नाटय़स्पर्धेसाठी संस्थेनं ‘संगीत संशयकल्लोळ’ हे नाटक बसवलं होतं. या नाटकासाठी मला विचारणा करण्यात आली आणि ‘भेटायला या,’ असा निरोप पाठविण्यात आला. त्याप्रमाणे संस्थेच्या मुंबईतील लॅमिंग्टन रोड येथील कार्यालयात मी गेलो. नाटकाचे दिग्दर्शक गोपीनाथ सावकार आणि संगीत दिग्दर्शक गोविंदराव अग्नी यांनी मला गाणं म्हणायला सांगितलं. गाणं ऐकून माझी निवड केल्याचं अग्नीबुवा म्हणाले. मला वाटलं होतं की नाटकातील अश्विनशेठची भूमिका मला मिळेल. परंतु नाटकातील साधूच्या छोटय़ा भूमिकेसाठी माझी निवड करण्यात आली. त्या भूमिकेत मला एक नाटय़पद गायचं होतं. मोठी भूमिका न मिळता छोटी भूमिका मिळाली म्हणून मी नाराज झालो आणि ‘मला नाही हे काम करायचं नाहीए,’ असं सांगून तिथून मी निघून आलो. घरी आल्यावर मोठय़ा भावाला घडलेला वृत्तान्त सांगितला तेव्हा त्याने माझीच खरडपट्टीच काढली आणि ‘उद्याच्या उद्या तिकडे जा आणि जी भूमिका करायला दिली आहे ती करायची तयारी असल्याचं सांग,’ असं त्यानं मला बजावलं. त्याच्या म्हणण्याप्रमाणे मी तिथं गेलो आणि ‘तुम्ही दिलेली भूमिका मी करेन,’ असं त्यांना सांगितलं. प्रत्यक्ष प्रयोगाच्या वेळी मी ‘हृदयी धरा हा बोध खरा’ हे नाटय़पद गायलो आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. संस्थेतील त्या पहिल्या भूमिकेसाठी रामकृष्ण नायक यांनी माझं तोंडभरून कौतुक केलं. यातून त्यांचा आणि माझा स्नेह जुळला तो कायमचाच. पुढे १९५८ सालात  राज्य नाटय़स्पर्धेसाठीच संस्थेने ‘संगीत शारदा’ हे नाटक बसवलं. यावेळी मात्र नाटकातील मुख्य भूमिकेसाठी माझी निवड करण्यात आली. संस्थेच्या कलाविभागाचे सचिव या नात्यानं नायक यांनी माझ्या या निवडीला हिरवा कंदील दाखवला होता. त्या नाटकासाठी मला गायनाचं पहिलं बक्षीस मिळालं. राज्य नाटय़स्पर्धेत तोपर्यंत गायनासाठीचं वेगळं पारितोषिक नव्हतं. परंतु परीक्षकांनी केलेल्या विशेष शिफारसीमुळे मला ते देण्यात आलं. मला मिळालेल्या या पारितोषिकामुळे नायक यांनाच खरं तर खूप आनंद झाला होता. त्यांनी मला शाबासकी देऊन माझी पाठ थोपटली. त्यानंतर १९६० मध्ये राज्य नाटय़स्पर्धेसाठी संस्थेनं ‘संगीत मृच्छकटिक’ हे नाटक बसवलं. त्यातही माझी मुख्य भूमिका होती.

धि गोवा हिंदू असोसिएशनमध्ये मी आता रुळलो होतो. १९६४ मध्ये संस्थेनं वसंत कानेटकरलिखित आणि पं. जीतेंद्र अभिषेकी यांनी संगीत दिग्दर्शित केलेलं ‘मत्स्यगंधा’ हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आणायचं ठरवलं. या नाटकातील पराशराची भूमिकाही मला रामकृष्ण नायक यांच्यामुळेच मिळाली. मराठी संगीत रंगभूमीवर या नाटकानं पुढे इतिहास घडविला. त्याचे साडेपाचशेहून अधिक प्रयोग झाले. राज्य नाटय़स्पर्धेपासून माझा ‘गोवा हिंदू’ या संस्थेबरोबरचा प्रवास सुरू झाला आणि त्यातूनच मला संस्थेच्या व्यावसायिक संगीत नाटकांतून काम करण्याची संधी मिळाली. ‘मत्स्यगंधा’नंतर संस्थेच्या ‘धन्य ते गायनी कळा’, ‘मीरा मधुरा’ या नाटकांतूनही मी काम केलं. ‘मीरा मधुरा’ हे नाटक फारसं चाललं नाही. तेव्हा मा. दत्ताराम यांनी ‘हे नाटक मी दिग्दर्शित करतो. आपण पुन्हा नव्यानं ते सादर करू या,’ अशी इच्छा रामकृष्ण नायक यांच्याकडे व्यक्त केली होती.  पण त्यामुळे नाटकाचे मूळ दिग्दर्शक मो. ग. रांगणेकर यांना वाईट वाटेल, ते दुखावले जातील असा विचार करून ते नाटक चालत नसूनही रामकृष्ण नायक यांनी मा. दत्ताराम यांना नकार दिला. हा खरोखरच नायक यांच्या मनाचा मोठेपणा आहे.

‘धि गोवा हिंदू’सारख्या मातब्बर संस्थेत काम करायला मिळाल्यामुळे मलाही ओळख मिळाली, नाव झालं. अर्थात या सगळ्याचं श्रेय रामकृष्ण नायक यांनाच आहे. संस्थेच्या कला विभागाचे सचिव या नात्यानं त्यांचं संस्थेच्या सगळ्या कारभारावर बारकाईनं लक्ष असतं. कोणत्या व्यक्तीत काय गुण आहेत, हे ते बरोब्बर हेरतात. त्यानुसार त्या- त्या व्यक्तीला योग्य ती जबाबदारी ते देतात. त्यांनी केलेली ही निवड अचूक ठरते. संस्थेनं सादर केलेली अनेक नाटकं यशस्वी झाली. काही नाटकं तर मराठी रंगभूमीवरील मैलाचा दगड ठरली. या सगळ्यात रामकृष्ण नायक यांचं महत्त्वाचं योगदान आहे. त्यांना प्रेक्षकांची नस बरोबर ओळखता येते. विविध क्षेत्रांतील मोठमोठय़ा व्यक्तींशी त्यांचे घनिष्ट संबंध आहेत. त्यातल्या अनेकांशी त्यांचे व्यक्तिगत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. पण या संबंधांचा उपयोग त्यांनी फक्त आणि फक्त संस्थेसाठीच करून घेतला. स्वत:च्या व्यक्तिगत लाभासाठी या ओळखींचा त्यांनी कधीच वापर केला नाही. जी गोष्ट करायची ती उत्तम आणि बिनचूकच झाली पाहिजे यावर त्यांचा नेहमी कटाक्ष असतो. ते स्वत: शिस्तीचे अत्यंत भोक्ते आहेत. त्यामुळे ते स्वत: शिस्त पाळतातच; पण अन्य कोणी जर बेशिस्तीने वागले तर ते त्यांना अजिबात खपत नाही. त्यामुळे संस्थेच्या कारभारातील शिस्त आणि काटेकोरपणा यासाठी ते कायम आग्रही असतात. त्यासाठी प्रसंगी ते अत्यंत कठोरही होतात. हा अनुभव माझ्यासह अनेकांनी वेळोवेळी घेतला आहे. त्यांचा स्वभाव थोडासा तापट असला तरी तो राग योग्य कारणासाठी आणि तात्कालिक असतो. संस्थेचं भलं व्हावं हाच उद्देश त्यामागे असतो. काही वेळेस त्यांचे आणि इतरांचे वादही होतात. माझा आणि त्यांचाही प्रसंगी वाद झाला आहे. पण तो तेवढय़ापुरताच. आम्ही दोघंही पुढे ते विसरून गेलो. माझ्यासह सर्वाशीच त्यांचे सलोख्याचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. रामकृष्ण नायक मनमिळाऊ आणि दयाळू वृत्तीचे आहेत. गोवा हिंदू असोसिएशनतर्फे निराधार तसंच अतिविकलांग वृद्धांसाठी गोव्यात ‘स्नेहमंदिर’ ही संस्था सुरू करण्यात, तिची चोख घडी बसवण्यात आणि ती नावारुपास आणण्यात नायक यांनी अत्यंत मोलाची आणि महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.

रामकृष्ण नायक यांना संगीताची चांगली जाण आहे. त्याचं प्रतिबिंब संस्थेनं सादर केलेल्या विविध नाटकांतून पाहायला मिळतं. काम करताना काही अडचण आली, संकट उभं ठाकलं तर खचून न जाता त्याला धैर्याने कसं तोंड द्यायचं, त्या परिस्थितीतून कसा मार्ग काढायचा आणि ती गोष्ट तडीस कशी न्यायची, हे नायक यांच्याकडून शिकावं.

२००९ मध्ये बीड येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनाचा मी अध्यक्ष होतो. आपल्या संस्थेतील एका कलाकाराला नाटय़-संमेलनाध्यक्षपद मिळालं याचा त्यांना खूप आनंद झाला. या नाटय़संमेलनासाठी आणि माझं कौतुक करण्यासाठी ते गोव्याहून बीडला आवर्जून उपस्थित राहिले होते. नाटय़संमेलनाध्यक्ष असल्याने माझे खास निमंत्रित म्हणून त्यांची उत्तम व्यवस्था नाटय़ परिषदेकडून होऊ शकली असती, पण नायक यांनी ती नाकारली आणि ते स्वखर्चाने बीड येथे राहिले. यावर कडी म्हणजे नाटय़-संमेलनाध्यक्ष म्हणून माझ्या व्यवस्थेत काही कमतरता तर नाहीए ना, याकडेही त्यांनी स्वत: जातीनं लक्ष पुरवलं. असा हा मोठय़ा मनाचा माणूस आहे.

रामकृष्ण नायक हे निरलस सेवावृत्तीचे, तळमळीनं, ध्येयानं आणि पदराला खार लावून काम करणारे एक निष्ठावान, नि:स्वार्थी कार्यकर्ते-नेते आहेत. धि गोवा हिंदू असोसिएशनचे ते भूषण आहेत. त्यांच्या नव्वदीच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा. त्यांना त्यांच्या विहित कार्यासाठी दीर्घायुरारोग्य लाभो, हीच सदिच्छा.

– रामदास कामत

शब्दांकन- शेखर जोशी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2017 2:51 am

Web Title: ramakrishna nayak and the goa hindu association
Next Stories
1 संतांच्या अमृतवाणीची भावस्पर्शी अनुभूती
2 माऊंट रशमोर : अद्भुत पर्वतशिल्प
3 ‘जाने भी दो यारो’ आज अशक्य..
Just Now!
X