ज्येष्ठ-श्रेष्ठ इतिहास संशोधक, ललित लेखक तसेच लोकाभिमुख सनदी अधिकारी असलेल्या कै. सेतुमाधवराव पगडी यांनी मराठी व इंग्रजीत प्रचंड लेखन केले. त्यांच्या दुर्मीळ समग्र मराठी साहित्याची द्वितीय आवृत्ती हैदराबाद साहित्य परिषदेतर्फे प्रकाशित करण्यात येत आहे. पुण्यात १९ मे रोजी होणाऱ्या या प्रकाशन सोहोळ्यानिमित्ताने..

भाषा, साहित्य व संस्कृती संवर्धनाच्या कक्षा विशिष्ट भौगोलिक सीमांशी निगडित नसतात. आम्ही महाराष्ट्राबाहेर राहत असलो आणि तेलुगु, कानडी, उर्दू या भाषाभगिनींच्या सदैव सहवासात असलो तरी ‘माझी मराठी, मराठाच मीही’ या कवी नांदापूरकरांच्या ओळी मनात सदैव रेंगाळत असतात. हैदराबादच्या मराठी साहित्य परिषदेने याच भूमिकेतून गेल्या साठ वर्षांत सातत्याने मराठीला आवश्यक, पण दुर्मीळ अशी साहित्यरत्ने मायमराठीला अर्पण केली. सेतुमाधवराव पगडी यांचे दुर्मीळ बनत चाललेले अक्षरधन पुन्हा प्रकाशात आणताना, समग्र पगडी साहित्याची दुसरी आवृत्ती काढताना आजही परिषदेने विचार केला आहे तो मराठी भाषा आणि इतिहास-संस्कृतीचा अमूल्य ठेवा जतन करण्याचा!

अन्य भाषा आणि प्रांतांशी संपर्क ठेवून प्रगमनशील साहित्याची जाण विकसित करण्याचा प्रयत्न साहित्य परिषदेने जसा सातत्याने केला, त्याच धोरणाशी सुसंगत, संस्कृतीविकासाला पूरक- नव्हे आवश्यक असे कार्यच सेतुमाधवराव पगडींनी आयुष्यभर केले. सतत लेखन, संशोधन, अभ्यास आणि संचार या चतु:सूत्रीच्या आधारे त्यांनी भारतीय आदर्शाचे सूक्ष्मपणे निरीक्षण व परीक्षण केले. या सर्वाचे फलित म्हणजे सेतुमाधवरावांनी लिहिलेले ५६ मराठी ग्रंथ आणि १४ इंग्रजी ग्रंथ. त्यामधून इतिहास, समाजजीवन आणि संस्कृतीचा पट उलगडून त्यांनी भावी पिढय़ांसाठी ठेवलेला वारसा म्हणजेच हा ‘समग्र सेतुमाधवराव पगडी ग्रंथ प्रकल्प’! सेतुमाधवरावांचे समग्र साहित्य- सुमारे ८००० पृष्ठे मराठी आणि २००० पृष्ठे इंग्रजी- डबल क्राऊन आकाराच्या आठ ग्रंथांमध्ये समाविष्ट करून, हैदराबाद साहित्य परिषदेने पगडी यांच्या जन्मशताब्दी दिनाच्या पूर्वसंध्येला- २६ ऑगस्ट २०१० रोजी ते मराठीजनांसाठी उपलब्ध केले. इतिहासाच्या अभ्यासकांनी, जाणकार वाचकांनी, उर्दू भाषाप्रेमींनी या समग्र पगडी साहित्याचे भरघोस स्वागत केले. पहिली आवृत्ती संपली. गेल्या सहा वर्षांत संपर्क- साधनांमुळे जग अधिक जवळ आले आहे. त्याचबरोबर जातीय भावनांना खतपाणी घालणाऱ्या विचारधारा अधिक तीव्र झाल्या आहेत. म्हणूनच आपल्या सामथ्र्य व मर्यादांचे योग्य मूल्यमापन करण्याची गरजही वाढली आहे. त्याकरता बहुविध पगडी-साहित्याचे वाचन व मनन करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन आम्ही सेतुमाधवराव पगडी यांच्या समग्र साहित्याच्या मराठी खंडांची दुसरी आवृत्ती काढत आहोत.

निजामाच्या काळात वरिष्ठ सनदी अधिकारी असलेले सेतुमाधवराव स्वातंत्र्य मिळाल्यावर हैदराबादच्या गृह व शिक्षण खात्याच्या प्रमुख सचिवपदावर होते. त्यांची विद्वत्ता, कार्यकुशलता व प्रामाणिकपणा पाहून केंद्र सरकारने त्यांना आय. ए. एस.चा दर्जा बहाल केला. भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर त्यांना मुंबईला यावे लागले. महाराष्ट्र सरकारच्या गॅझेटीअरचे कार्यकारी संपादक म्हणून १९६९ साली ते निवृत्त झाले. १९९२ साली भारत सरकारने ‘पद्मभूषण’ किताब देऊन पगडी यांना सन्मानित केले. १९३५ पासून लेखन करणाऱ्या सेतुमाधवरावांचे बहुविध लेखन महाराष्ट्रात आल्यावरच प्रकाशित झाले. हैदराबादकरांशी त्यांचा स्नेह मात्र कायम राहिला. अतिशय विद्वान, प्रखर बुद्धिमान, अभ्यासू आणि सरकारी अधिकारी असूनही मनमिळाऊ, मिश्किल आणि साधे असे पगडींचे व्यक्तिमत्त्व होते.

हैदराबाद मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष द. पं. जोशी यांनी सेतुमाधवरावांचे हे बहुमोल व दुर्मीळ साहित्य एकत्र करून त्याचे पुनर्मुद्रण करण्याची कल्पना २००९ मध्ये मांडली आणि सर्वजण त्यांच्या मदतीसाठी तत्परतेने सरसावले. समग्र पगडी साहित्य प्रकल्पाची योजना आकार घेऊ लागली. परिषदेचे हितचिंतक चिं. स. लाटकर, कविवर्य ना. धों. महानोर, डॉ. गो. बं. देगलूरकर व डॉ. चंद्रकांत पाटील या सल्लागार मंडळासह या खंडांची योजना तयार झाली. डॉ. उषाताई जोशी यांनी प्रमुख संपादक म्हणून जोशी सरांसह काम पाहिले. डॉ. विद्या देवधर व धनंजय कुलकर्णी यांनी साहाय्यक संपादक म्हणून सर्वतोपरी मदत केली. सेतुमाधवराव पगडी यांची दुर्मीळ पुस्तके मिळवणे हे मोठेच आव्हान होते. या कार्यात हैदराबादमझील मराठी ग्रंथसंग्रहालय, उस्मानिया विद्यापीठ ग्रंथालय व परचुरे प्रकाशन मंदिर, डॉ. देगलूरकर, ग्रंथपाल गिरीश मांडके व लक्ष्मीकांत जोशी यांची मदत झाली. या प्रकल्पाची माहिती समजताच मराठवाडय़ातील काही मंडळींनी आपल्या संग्रहातील त्यांची दुर्मीळ पुस्तकेही दिली. ही पुस्तके मिळवून त्याचे विषयवार संपादन करणे, त्याच्या छायाप्रती बनवून, न उमटलेला भाग लिहून संपादकांकडे पाठवणे हे ओघानेच आले. हे सर्व काम खूप मोठे होते. ऑगस्ट २००९ मध्ये आम्ही प्रत्यक्ष छपाईकामास सुरुवात केली. मुद्रितशोधन हेही एक आव्हानच होते. पंचाहत्तरी उलटलेल्या जोशी दाम्पत्याने दहा हजार पृष्ठे शब्द न् शब्द पुन:पुन्हा वाचून घेतली. मुखपृष्ठाची मांडणी अनिल विश्वासराव यांनी केली. पगडींच्या इतिहास, सामाजिक लेखन व उर्दूसंबंधित पुस्तकांनुसार खंडांसाठी नामवंत व अभ्यासू संपादक ठरले. त्यांचे संपादकीय लेखन सुरू झाले. आणि हैदराबादेत  ‘सेतुमाधवराव समग्र साहित्य’ अक्षरश: एक वर्षांत ऑगस्ट २०१० मध्ये तयार झाले. पुण्याच्या कल्पना मुद्रणालयाचे आनंद लाटकर यांनी हा आपलाच प्रकल्प मानून, ग्रंथ मिळवून, संपादकांकडे पोहोचविण्यापासून छपाईचेही काम बिनचूक व तातडीने करून घेतले. आताही त्यांच्या सहकार्यामुळेच दुसरी आवृत्ती अल्पावधीत तयार झाली आहे. आनंद लाटकर हे जणू हैदराबादच्या साहित्य परिषदेचेच पुण्यातील कार्यकत्रे आहेत.

सेतुमाधवरावांनी १४ ग्रंथ इंग्रजीत लिहिले. पहिल्या खंडामध्ये शिवचरित्र आहे, मुघल-मराठे संबंध व मराठय़ांचा इतिहास आहे; तर दुसऱ्या खंडात हैदराबादच्या स्वातंत्र्यसंग्रामाचा संपूर्ण इतिहास आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हैदराबादचा स्वातंत्र्यसंग्राम अभ्यासू, पण निष्ठावान इतिहास संशोधकाकडूनच लिहिला गेला पाहिजे, या विचाराने सेतुमाधवराव पगडींवर हे काम सरकारने सोपवले. निजामाच्या काळात आदिलाबादसारख्या अविकसित भागात मुद्दाम सेतुमाधवरावांची बदली केली गेली. पण राग न मानता पगडींनी ही इष्टापत्तीच मानली. आपले शासकीय काम सांभाळून आदिवासी घराघरांतून त्यांनी आरोग्यसेवा पुरवली. तसेच त्यांची भाषा शिकून घेतली. पुराणकथा व समाजजीवन समजून घेतले. कोलम व गोंड भाषेच्या व्याकरणावर इंग्रजी ग्रंथ लिहिले. आदिवासींना देवनागरी, तेलुगु लिपी दिली तरी त्यांच्या भाषेत साहित्य दिले पाहिजे, ही कल्पना सेतुमाधवरावांनी स्वातंत्र्यपूर्व काळात राबवली. समाजजीवनाशी एकरूप झालेला हा नि:स्पृह सरकारी अधिकारी म्हणजे सर्वासाठी आदर्शच आहे. इंग्रजी ग्रंथांसाठी आम्हाला संपादकही लाभले ते तेवढेच अभ्यासू आणि कर्मयोगी ज्ञानसाधक डॉ. गो. बं. देगलूरकर. इंग्रजी ग्रंथ मिळवणे, मुद्रिते तपासणे ही कामेही संपादकीय लिहिण्याबरोबर डॉ. देगलूरकर यांनी केली.

इतिहासकार व उर्दूचे तज्ज्ञ म्हणून ओळखले जाणारे सेतुमाधवराव उत्तम ललित लेखक व कथाकार होते. सेतुमाधवरावांच्या पहिल्या खंडामध्ये चार कथासंग्रह व तीन ललित लेखसंग्रह आहेत. तसेच विस्तृत, पण वाचकाला वेड लावणारे आणि त्याचबरोबर अंतर्मुख करणारे ‘जीवनसेतू’ हे आत्मचरित्रही आहे. १९३५ च्या रोमँटिसिझमच्या प्रभावाच्या काळात उर्दूप्रेमी सेतुमाधवरावांनी कथालेखनाला सुरुवात केली. सरकारी अधिकारी असल्यामुळे हैदराबाद राज्यातील गावोगावी ते िहडत होते. ग्रामजीवन त्यांनी सहृदयतेने बघितले आणि त्या अनुभवाच्या आधारे त्यांनी अनेक कथा लिहिल्या. पहिल्या खंडाच्या प्रस्तावनेत उषाताई जोशी लिहितात की, ‘मराठवाडय़ातील निजामशाहीतील शेतकरी- कष्टकरी दलितांची सुखदु:खे, तेथील माणसे, तेथील निसर्ग, नद्या, तळी, झाडे या सर्वाचे चित्रण या कथांतून येते. निसर्ग व माणूस यांच्या एकरूपतेतून सहजसाध्य झालेली तन्मयता आणि त्यातील निसर्गवर्णनासाठी आवश्यक ती तटस्थता येथे भरपूर आहे. प्रणयकथेची वाट सोडून पगडींच्या कथेने स्वत:साठी नवी पायवाट शोधली. ती होती- वास्तवाला भिडण्याची! एवढे वैविध्य व गुणसमुच्चय असलेले लेखन; परंतु त्याचे वेगळेपण समीक्षकांच्या नजरेतून सुटले आहे.’ पगडी गोष्टीवेल्हाळ, विनोदप्रिय, बहुश्रुत आणि संवेदनशील असल्यामुळे त्यांचे ललित लेखसंग्रहही तेवढेच चटकदार आहेत. त्यांचे अवघे व्यक्तिमत्त्व, ऋजु स्वभाव, ज्ञानेच्छु व श्रद्धायुक्त मन, इतिहास व भूगोलप्रेमासह या पहिल्या खंडातील साहित्यातून प्रकट झाले आहे.

राज्यशास्त्राचे पदवीधर, शासकीय सेवेत तहसीलदार म्हणून काम सुरू करून शिक्षण व गृह खात्याच्या सचिवपदाची जबाबदारी पाहणारे सेतुमाधवराव पगडी इतिहासाकडे वळले हे भारतीय इतिहासलेखन क्षेत्राचे भाग्य म्हणावे लागेल. इतिहास संशोधक असून ते इतिहास लेखक तर होतेच; पण उत्तम वक्तेही होते. त्यांनी इतिहासावर अपार प्रेम केले. परकीयांनी लिहिलेल्या आपल्या इतिहासावर विश्वास न ठेवता आपण कष्ट घेऊन, संदर्भ शोधून स्वत:चा इतिहास लिहिला पाहिजे, असा सेतुमाधवरावांचा आग्रह होता. इतिहास आणि भूगोल यांचे नाते लक्षात घेऊन त्यांनी सिद्ध केले की, शिवाजीराजांच्या मोहिमेत गड-किल्ले, नदी-दरी यांतील अंतर व उन्हाळा-पावसाळा यांनाही अनन्य महत्त्व होते. सेतुमाधवरावांच्या इतिहास संशोधनाचे महत्त्व सांगत, त्यांनी लिहिलेल्या ऐतिहासिक ग्रंथांना प्रस्तावना लिहिण्याची अवघड जबाबदारी इतिहासाचे अभ्यासक डॉ. राजा दीक्षित यांनी समर्थपणे सांभाळली. खंड २ व ३ च्या सुमारे २५०० पृष्ठांच्या ऐतिहासिक कार्याचे नेमकेपण डॉ. दीक्षित यांनी स्पष्ट केले आहे. पगडींनी हजारो उर्दू पत्रे भाषांतरित केली. ही पत्रे अस्सल असली तरी त्यातील माहिती शत्रूपक्षाने लिहिली असल्यामुळे त्याला सरसकट इतिहास म्हणून पगडी मान्यता का देत नाहीत, ते दीक्षित अनेक उदाहरणे देऊन सांगतात. ख़ाफीखान मराठय़ांबद्दल शिवराळ भाषा वापरतो, तरीही त्यांच्या शौर्य-धर्याची स्तुतीही करतो.. ताराबाईंच्या, संताजीच्या कामगिरीची तो प्रशंसा करतो, तेव्हा या स्तुतीला ऐतिहासिक महत्त्व आहे. द्वेषभावनेपलीकडे जाऊन मराठय़ांचे कौतुक शत्रू करतो म्हणजे मराठे किती प्रचंड पराक्रमी असतील, हे पगडी सांगतात. पगडी प्रामाणिक इतिहासकार असल्यामुळे स्पष्ट व निर्भीड आहेत. यदुनाथ सरकार यांच्या अनुवादातील ५० चुका त्यांनी दाखवून दिल्या, हे त्यांचे वेगळेपण व आत्मविश्वास! मराठे व निजाम यांच्यातील उर्दू-फारसी पत्रव्यवहार पगडींनीच प्रथम मराठीत आणला. ‘मोगलकालीन महाराष्ट्र’ व ‘हैदराबादचे निजाम’ हे लेख लिहिले. ‘महाराष्ट्र व मराठे’ यामध्ये मुख्यत: मराठय़ांभोवती लक्ष केंद्रित न करता पूरक विषयांच्या अभ्यासाची त्याला जोड दिलेली दिसते. यातून पगडींची व्यापक दृष्टी लक्षात येते. ‘हिंदवी’ हा शब्द जातीला उद्देशून नाही, मोगल काळात तो ‘भारतीय’ या अर्थाने वापरत, हे विषयाच्या ओघात सांगून, पठाण, मोगल, इराणी सोडून सगळे हिंदवी’ असे पगडी सिद्ध करतात. संशोधकाने आग्रही न राहता जसे लवचीक असावे लागते, तसे पगडी होते. म्हणूनच आधी शिवजन्म इ. स. १६२८ चा मानणारे, पगडींनंतर इ. स.१६३० हे शिवजन्माचे वर्ष मान्य करतात. डॉ. राजा दीक्षित लिहितात की, ‘संभाजी महाराजांबद्दल सेतुमाधवरावांना अत्यंत आदर आहे, पण तो आंधळा मात्र नव्हे. काही इतिहासकार संभाजीराजांचे अवमूल्यन करतात; तर संभाजीराजांचा मोठेपणा दाखवण्याच्या नादात काहीजण शिवाजी महाराजांचे अवमूल्यन करतात! या दोन्ही टोकांना जाणाऱ्यांचा तर्कशुद्ध समाचार सेतुमाधवराव पगडी घेतात. पगडींकडून केले गेलेले संभाजीराजांचे एकूण मूल्यमापन राजांच्या धीरोदात्तपणावर भर देणारे आहे. म्हणूनच लेखाच्या शेवटी ते विचारतात, ‘महाराष्ट्र त्यांना कधीतरी विसरू शकेल काय?’

डॉ. विद्या देवधर vidyadeodhar@gmail.com