गेल्या दोन वर्षांत देशातील बदललेल्या वातावरणाबद्दल आणि त्याला कारण ठरलेल्या गोष्टींसंदर्भात ज्येष्ठ साहित्यिक श्याम मनोहर यांना उन्मेखून व्यक्त व्हावंसं वाटलं. त्यांचं हे मुक्त चिंतन..
१) ३७० कलमावर चर्चा व्हायला हवी.
२) आरक्षणावर चर्चा व्हायला हवी.
३) घटना बदलण्यावर चर्चा व्हायला हवी.
४) ‘हिंदुराष्ट्र’ यावर चर्चा व्हायला हवी.
मी कागद घेऊन लिहिले.
१) परमेश्वराचे साक्षात् दर्शन होते, यावर चर्चा व्हायला हवी.
२) फलाची इच्छा न ठेवता कर्म करावे, यावर चर्चा व्हायला हवी.
३) सुख-दु:ख, यश-अपयश समानच.. स्थितप्रज्ञत्व.. यावर चर्चा व्हायला हवी.
४) जो मुळावर घाव घालतो, किंवा ज्याने लावणी केली, त्या दोघांनाही वृक्ष एकसारखीच सावली देतो.. यावर चर्चा व्हायला हवी.
५) ब्रह्मज्ञान, मोक्ष.. यावर चर्चा व्हायला हवी.
६) वासना, विकार, षड्रिपू जिंकावेत, देहासक्ती सोडावी.. यावर चर्चा व्हायला हवी.
७) अहंकार, ‘मी’पणा पूर्णपणे गेला पाहिजे.. यावर चर्चा व्हायला हवी.
माणूस अखंड आनंदात राहू शकतो. सर्व दु:खांतून मुक्त होऊ शकतो. इतकेच नव्हे तर प्रत्यक्षात मृत्यूच्या वेळीही आनंदात राहू शकतो.
ही वाक्ये एखाद्या फिक्शनमध्ये असती, तरी लुभावून गेली असती.
माणूस सदा आनंदात राहू शकेल काय? अगदी मृत्यूच्या वेळीही आनंदात राहू शकेल काय? हे प्रश्न विचारात घेणे हेच मुळात प्रतिभेचे लक्षण आहे.
होय, माणूस सदा आनंदात राहू शकतो.. मुक्त, पूर्ण स्वतंत्र होऊ शकतो.. हे भारतीय भूमीत निर्माण झालेल्या अध्यात्मशास्त्राचे वचन आहे. वचन म्हणजे सुभाषित नव्हे. वचन म्हणजे वचनच. प्रॉमिस.
‘याचि देही, याचि डोळा, मुक्तीचा सोहळा’.. हे वचन अध्यात्मशास्त्राने अखिल मानवजातीला दिले आहे.
मी अध्यात्मशास्त्राचा अभ्यास वगैरे केलेला नाहीये. भारतात जन्माला आले की अध्यात्म कानावर पडतेच. आताच्या वातावरणात हे वाक्य असे लिहावे लागेल : ‘भारतात (वा परदेशातही) हिंदू कुटुंबात जन्म घेतला की अध्यात्म कानावर पडतेच.’ हां, सगळ्यांचे तिकडे लक्ष जाईल किंवा न जाईल. तरुण वयात, तरुण वयापास्नं या वयापर्यंत माझेही खास असे अध्यात्माकडे कुठे लक्ष गेले होते? आज आठवले, लक्ष गेले.. हा चमत्कारच! पण.. अध्यात्म शब्द एक वेळ सोडून द्या, माणूस मृत्यूच्या वेळीही आनंदात राहू शकतो, हे वाक्य (वचन म्हणायचीही गरज नाही.) चकित करणारे आहे. या वयात, या क्षणी मी चकित झालेय. कित्येक वर्षांनी मी अशी चकित झालेय. आनंद सोडा, चकित व्हायला मिळणे.. मोठाच लाभ असतो.
दुपार होती. खूप उकडत होते. वीज गेली होती. एसी यंत्र असून निरुपयोगी. पंखा असून निरुपयोगी. घालमेल होत होती. अंथरुणावर पडले होते. कॉट लांब-रुंद होती. गादी योग्य मऊ, योग्य कठीण होती. बेडशीट स्वच्छ, मऊ होते. उशी स्वच्छ अभ्य्राची, मऊ होती. एकतर वीज नाही आणि उन्हाळ्याचे दिवस- ह्य़ांनी सगळे निरुपयोगी झाले होते.
फोन आला.
‘हं, बोल मिलिंद.’
‘कशी आहेस मावशी?’
‘आत्ता एकदम ठीक. वीज गेलीय रे.’
‘हो, सगळ्या शहराचीच गेलीय. येईल थोडय़ा वेळात. पोट ठीक आहे ना?’
‘अगदी व्यवस्थित.’
‘काय जेवलीस?’
‘एक पोळी, कोबीची भाजी, ताक-भात, उकडलेले गाजर, अर्धा गुलाबजाम.’
‘मस्त. म्हणजे ठीक आहेस. चारला फोन करतो. रात्रीचे बिरडय़ा वगैरे जड काही खायचे नाही. काय? बाय.’
काल रात्री बिरडय़ाची उसळ खाल्ली होती. खरं तर दोन चमचेच खाल्ली होती. आणि रात्रभर पोट डब्ब. या कुशीवरनं त्या कुशीवर. पहाटे केव्हातरी झोप लागली. नऊ वाजता कामावर जायच्या आधी मिलिंद आल्यावर त्याला बोलले होते. रात्री बिरडय़ा वगैरे जड खायचे नाही. शहाणपण टिकत, कायम राहत नाही. कधी येते, कधी येतच नाही.
तीनशे सत्तर कलमाची चर्चा ते अहंकार पूर्णपणे गेला पाहिजे, ही चर्चा- हे मी का विचार करत बसले? का लिहिले? यावर मी झोप येत नाही म्हणून विचार करत राह्य़ले. उगाचच्या उगाच मी विचार नाही करत. उगाचच्या उगाच कुणीच विचार करू शकत नाही. प्रश्न पडला, घटना घडली, तरच विचार होतात. उगाचच्या उगाच जुन्यापान्या आठवणी येत राहतात. त्यातून भावनांची, विकारांची निर्मिती होते. आठवणी कोणत्याही, कशाही येतात. आठवणी येण्याचे नियम काय आहेत?
अर्थात् आत्ता मी नियम शोधणार नाहीये. ३७० कलमाची वगैरे चर्चा ते अहंकार गेला पाहिजे चर्चा : हे मी का करत बसले? मला कारणे शोधायचीत. कोणत्या घटना घडल्या, की ज्यामुळे मी ही चर्चा, हे मुद्दे काढले?
तीनशे सत्तर कलम वगैरे चर्चा या मुद्दय़ामागची घटना लगेच आठवली.
चार दिवसांपूर्वी सकाळी कामावर मिलिंद जायच्या आधी नेहमीप्रमाणे आला होता.
‘कशी आहेस मावशी?’
‘एकदम फिट्. मस्त झोप झालीय.’
‘गोळी घेतली होतीस?’
‘अजिबात नाही. नॅचरल झोप!’
‘हात दुखत नाहीये?’
‘अजिबात नाही.’
‘कुठेच दुखत-खुपत नाहीये?’
‘सगळे पार्ट ठीकठाक.’
‘बरं, मग आता ३७० कलमावर चर्चा कर बरं!’ मोठय़ांदा हसत मिलिंद म्हणाला होता.
‘तुम्हाला काश्मीर प्रश्न सोडवताच येणार नाही.’ मिलिंदच्या गालावरनं हात फिरवत मी म्हणाले होते.
‘मावशी, म्यानमार, श्रीलंका, पाकिस्तान, बांगला देश, अफगाणिस्तान यांसह हिंदुराष्ट्र होते की नाही बघच..’
‘मी कश्याला जगतेय इतकी?’
‘तू शंभर वर्षे जगणार आहेस. तुला हिंदुराष्ट्रात फिरवून आणणाराय मी. बघच!’
यावरून ३७० कलम वगैरे चर्चा डोक्यात आली. ते विशेष काही नाही. मिलिंदच्या आणि माझ्यात गेली तीसेक वर्षे अशी बोलणी, मजा चालते. अहंकार पूर्णपणे गेला पाहिजे वगैरे आध्यात्मिक विचार डोक्यात आले, त्याची घटनाही मला तासाभरात आठवली. तेव्हाच ठरवले- मरेपर्यंत स्मृती नीट टिकवायची असेल तर आठवणी मुद्दामहून काढायच्या. प्रॅक्टिस करायची.
बँक. बँकेत मी अनेकदा जाते. बँकेचे दार, काऊंटर्स नीट आठवली. बँकेत गर्दी होती. गर्दी नीट आठवायची गरज नाही. गर्दीतली माणसे आपण नीट बघतच नसतो. मी बाकावर बसून घेतले. एक प्रौढ स्त्री हाका मारत होती- ‘अशोकरा२२व, अशोकरा२२व..’
एक प्रौढ गृहस्थ त्या प्रौढ स्त्रीकडे गेले. म्हणजे ते अशोकराव.
‘कळलंय ना तुम्हाला?’ – प्रौढ स्त्री म्हणाली. तिचा आवाज कातर, घाबरा होता. ‘आठवतंय नीट. गुड.’
‘सविता, कळलंय.’ – अशोकराव कुजबुजत दु:खाने म्हणाले.
अशोकरावांनी सविताबाईंना हाताला धरून बाकाकडे आणले. माझ्या शेजारीच बसले.
‘डायलिसीस फार पेनफुल असते ना?’ – अशोकराव म्हणाले.
‘आठवडय़ात दोनदा असते.’ डोळ्यांत पाणी. सविताबाई म्हणाल्या- ‘सोमवार आणि गुरुवार. मंगळवार वाईट जातो. शुक्रवार वाईट जातो. निम्मा बुधवार आणि निम्मा शनिवार बरा जातो. रविवारी, बुधवारी दुपारनंतर पुढच्या डायलिसीसची धास्ती सुरू होते.’
‘एक बोलू का?’ – अशोकराव म्हणाले.
‘डायलिसीसनंतरचे जगणे, सगळेच खूप दु:खाचे आहे. याला कारण शास्त्रज्ञ आहेत. मूत्रपिंडावर बरे करण्याची औषधे शास्त्रज्ञांनी अजून शोधली नाहीत म्हणून हे दु:ख आपल्याला भोगावे लागतेय. पन्नासेक वर्षांनी मूत्रपिंडावरची औषधे शोधली जातीलही. आपल्याला त्याचा काहीच उपयोग नाही. विज्ञानाची ही कमतरता आहेच. विज्ञान पूर्णावस्थेत कधी जाईल, माहीत नाहीये. विज्ञान अर्धवट अवस्थेत असताना आपण जगतोय.’ थांबून अशोकराव म्हणाले, ‘भारतीय अध्यात्मशास्त्र पूर्णावस्थेत गेलेय असे म्हटले जाते. अध्यात्माने सर्व दु:खांतून मुक्त व्हायचा मार्ग सांगितलाय. देहासक्ती सोडायची.’
काहीशी हसत, कपाळावर हात मारत सविताबाई म्हणाल्या, ‘देहासक्ती सोडायचे कुठले जमतेय आपल्याला!’
थोडय़ा वेळाने अशोकराव म्हणाले, ‘बँकेचे काम झाले?’
‘हो.’ सविताबाई म्हणाल्या. हयातीची सही करायची होती. बहीण आलीय सोबत.
बहीण, सविताबाई, अशोकराव बँकेबाहेर गेले. मी बघत होते. अशोकरावांनी रिक्षा थांबवली. बहीण, सविताबाई रिक्षांनी गेल्या. अशोकराव दिसेनासे होईपर्यंत मी पाठमोरे त्यांना बघत होते.
अशोकराव मला आवडले. आत्ता आठवतानाही आवडत होते. शास्त्रज्ञांनी औषध शोधले नाही, त्यामुळे सविताबाईंचे दु:ख आहे. देहासक्ती सोडणे हा दुसरा इलाज आहे. अशोकराव मला आवडले. अशोकरावांशी लग्न करायला मला आवडेल. माझ्या आईचे माझ्या वडिलांशी लग्न झालेय हे मला कळल्यापास्नं मी कुणाशी लग्न करायचे, हे ठरवायचे. मुलं, पुरुष बघायचे. ह्य़ाच्याशी लग्न करावे का? त्याच्याशी लग्न करावे का? असे मनात म्हणायचे. कोणत्या देवाशी लग्न करावे, हे पण मी मनात करायचे. ‘देहासक्ती सोडणे कुठलं जमतंय?’ हे हसत, कपाळावर हात मारत सविताबाई म्हणाल्या हेही मला आवडले. हसत आणि कपाळावर हात मारत म्हणायचे. विनोदी वाटणे आणि असहायता. सौंदर्यशास्त्रातला वेगळाच आविष्कार.
देहासक्ती सोडणे नाही जमणार. अहंकार घालवणे नाही जमणार. अध्यात्म वाचायचे. वर्तमानपत्रातही रोज छोटेसे असते. अध्यात्म ऐकायचे. खूप आध्यात्मिक गुरू आहेत. अध्यात्म मानायचे. काही वेळ गुंग व्हायचे. अध्यात्म श्रेष्ठ आहे; जमणार नाही. अध्यात्म गुंफलेले धर्मविधी करायचे. धर्मविधीही काटेकोरपणे नाहीत होत. काटेकोरपणा माहीतही नसतो. अध्यात्मावर श्रद्धा ठेवून जमेल तेवढे, जमेल तसे करायचे.
आध्यात्मिक म्हणवणारे आश्रम श्रीमंत करताहेत. आयुर्वेदाचा व्यापार करताहेत. राजकारणात जातायत. खासदार-मंत्री होताहेत. साधूंचे आखाडे एकमेकांत लढताहेत. धर्म ढोलपथकात गुंगवला जातोय. मंदिरांच्या ट्रस्टींत जायची धडपड जास्त असते. नागरिकाला श्रद्धा ठेवता ठेवता दमछाक होतेय.
हिंदूंच्यात कोटय़वधी देव आहेत. गाईच्या पोटात तेहतीस कोटी देव आहेत. महत्त्वाचा देव कोणता? कोणत्याही देवाला नमस्कार करा- तो शेवटी केशवाला पोहोचतो. केशव म्हणजे विष्णू.
विष्णू. शेषशायी. कृष्ण.. भगवद्गीता महत्त्वाची. कृष्णलीला- अडचणीच्या. शंकर महत्त्वाचा; पण स्मशानात राहणारा. अडचणीचा म्हसोबा नको.
राम- योद्धा. शत्रूंचा नायनाट करतो. देवी शस्त्रास्त्रधारी- शत्रूंचा नायनाट करते; पण स्त्री आहे. राम पुरुष आहे. आणि रामराज्य.
रामाचे जन्मस्थान माहीत आहे. त्या ठिकाणी मशीद. तिथे रामाचे मंदिर करायचेय. राम राम करत साक्षात रामाचे दर्शन नाही घ्यायचे. रामाला ऐतिहासिक पुरुष केलेय. हिंदूंचा इतिहास वैभवशाली आहेच. मधल्या काळात परकीय आक्रमणे झाली. त्या आक्रमणांचा इतिहास नव्याने लिहायचाय. स्वातंत्र्यलढय़ाचा इतिहास नव्याने लिहायचाय. हिंदूंचे वैभव पुन्हा प्राप्त करायचेय. म्यानमार, पाकिस्तान, अफगाणिस्तानसह हिंदुराष्ट्र करायचेय. हिंदुराष्ट्रात रामराज्य आणायचेय.
नागरिकांत दोन प्रकार होतात. १) हिंदुत्ववादी, २) हिंदुत्वविरोधी.
विचार करणे ही प्रक्रिया विचारसरणीतच घालून झगडे सुरू आहेत.
भारतात पूर्वी विमान होते, असे म्हटल्यावर भारतीयांना आनंद होणे साहजिकच आहे. माणूस पहिल्यांदा चंद्रावर गेला तो भारतीय नव्हता. पण माणूस चंद्रावर गेला, याचा भारतीयांना आनंद झालाच.
पूर्वी भारतात विमान होते, हिंदू सभ्यतेत विमान होते, मीही हिंदू आहे, विमानाचे ज्ञान माझ्या रक्तात आहे, असे समजून चेकाळणे हास्यास्पद आहे. न्यूटनने कॅल्क्युलस शोधले. न्यूटन इंग्रज होता. म्हणून प्रत्येक इंग्रज म्हणू लागला, की मला कॅल्क्युलस कळते, तर ते हास्यास्पद आहे. प्रत्येक इंग्रजाला शेक्सपिअर कळतो असे नाही. शेक्सपिअर अधिक कळणारे इंग्लंडबाहेर आहेत. गणिताचा क्लास चालवणाऱ्याने ‘मी मॅथेमेटिशियन आहे’ म्हणणे हास्यास्पद आहे.
विमान भारतात होतेच, हे सिद्ध करायला हवे. त्यासाठी सिद्ध करण्याची पद्धत निर्माण करायला हवी. सिद्ध करायची पद्धत म्हणजे अभ्यासपद्धत.
समजा, विमान प्रत्यक्ष नव्हते. विमानाची फक्त कल्पना होती. अशी कल्पना असणे, सुचणे हे काही कमी महत्त्वाचे नाही. कल्पनांतून सर्जनशीलता सुरू होते.
आणि अभ्यासपद्धती निर्माण करून सर्जनशीलता पूर्ण होते.
आणि एक गोष्ट सिद्ध करता आली की सगळ्याच गोष्टी सिद्ध करता येतात असे नाही. पृथ्वी गोल आहे, हे सिद्ध करता आले म्हणून ब्लॅक होलचे अस्तित्व सिद्ध करता येईल असे नाही. एक श्रेष्ठ कविता लिहिली म्हणून पुढची कविता श्रेष्ठ होईल असे नाही.
माणूस विवेकी असतो, तसेच अविवेकीही असतो. अविवेक बाजूला सारत सारत अभ्यासपद्धत निर्माण करायची असते. अभ्यासपद्धत निर्माण करणे म्हणजे विवेक. विचार करण्यापेक्षा विवेक करणे महत्त्वाचे असते. विवेकातून शोध लागतात. ज्ञानशाखा निर्माण होतात. विचारांतून दृष्टिकोन तयार होतात.
आपण गणित शिकतो म्हणजे गणिताचे तंत्र शिकतो. आपण कविता शिकतो म्हणजे कवितेचे तंत्र शिकतो. आपण शेती शिकतो म्हणजे शेतीचे तंत्र शिकतो. माझा एक मित्र- इंजिनिअर- सेवानिवृत्तीनंतर ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करू लागला. त्याने तंत्र आत्मसात केले. आता तो त्या तंत्रानुसार भविष्य सांगतो. मी शंभरी गाठणार.. मला म्हणाला.
गणिताचे तत्त्व, कवितेचे तत्त्व, शेतीचे तत्त्व, धर्माचे तत्त्व जाणायला हवे. ज्ञानशाखांचे तत्त्वज्ञान समाजात तळागाळापर्यंत पसरायला हवे, म्हणजे बुद्धीला शिस्त येते. इथेच थांबायचे नसते. पुढे विवेक वापरायचा. वेगवेगळ्या अभ्यासपद्धती निर्माण करायच्या. तंत्र शिकून स्मार्टनेस येतो; शोध लावता येत नाहीत. विवेकाने शोध लागतात.
बेल वाजली. नेहमीप्रमाणे कामावर जायच्या आधी मिलिंद आला.
‘मावशी, आज भलतीच फ्रेश दिसतेयस!’
‘ गेले दोन दिवस मला नीट झोपच नाहीय.’
‘काय म्हणतीयस? पण फ्रेश दिसतेयस. कसं काय?’
‘मी लिहितेय.’
‘हिंदुत्वावर?’ हसत मिलिंद म्हणाला- ‘लिही. सडकून टीका कर.’
‘चांगला रागच आणते तुला.’ मीही हसत म्हणाले.
‘मला तुझा कधीच राग येणार नाही. हवी तेवढी टीका कर.’
मिलिंदच्या गालावरनं हात फिरवत मी म्हणाले, ‘तुला नाही रे राग यायचा. इतर स्वयंसेवकांना येईलच राग.’
‘अजिबात नाही! मला राग येणार नाही म्हणजे कोणत्याही स्वयंसेवकाला राग येणार नाही. सरसंघचालक धरून सर्व स्वयंसेवकांचे मन एकसारखेच असते. चल निघतो. चारला फोन करीन.’
‘मन एकसारखे खुशाल ठेव. पण तेवढय़ानेच सगळे मन भरून नको ठेवूस..’ हे पुढे कधीतरी बोलेन मिलिंदला.
(२)
मला देवाचे स्वरूप जाणायचेय. कारण? कारण मला माहीत नाही. म्हणजे लगेच लक्षात येत नाहीये. विचार केला तर एखाद्या वेळेस लक्षात येईलही. पण आत्ता मला कारण शोधावेसे वाटत नाही. आत्ता मला देवाचे स्वरूप शोधायचेय. आंतरिक गरजांचे क्रम कसे असतात, त्याचे नियम आहेत का? हे बघितले पाहिजे. तरी आत्ता ती गरज नाहीये, हे नक्की.
मला केवळ माणसांचा देव नकोय; केवळ पृथ्वीचा देव नकोय. विश्वाचा देव हवाय का? हा प्रश्न आपोआप आलाय. पण त्यालाही माझा आतून होकार येत नाही.
मी लिहायचे बराच वेळ थांबते.
पाचेक तास थांबले. पण गप्प नाही राह्य़ले. बऱ्याच दिवसांत काही फोन करायचे राहिले होते, ते केले. चहा प्याले.
काहीतरी सुचले. त्याचे ध्यान केले. मनात वाक्येही जुळवली.
आता लिहितेय.
विश्वात मूर्त आहेच. अमूर्तही आहेत. दगड, धोंडे, डोंगर, पाणी, सजीव प्राणी, रक्त, ग्रह, तारे.. मूर्त. नाक मूर्त, श्वासोच्छ्वास अमूर्त. ऊर्जा, अवकाश, काळ, इच्छा, वासना, विकार, लोभ, हिंस्रपणा.. अमूर्त.
विश्वात मूर्त आहेच. अमूर्त आहेच.
तिसरा काही प्रकार आहे काय?
(३)
पंतप्रधान कसा असावा?
पंतप्रधानपद असते.
गणितज्ञ, कवी, गायक ही पदे नसतात. गणितज्ञ आयुष्यभर गणितज्ञ असतो. कवी आयुष्यभर कवी. गायक आयुष्यभर- आवाज गेला तरी गायक असतो. कुणीही आयुष्यभर पंतप्रधान नसतो. मर्यादित कालापुरते पंतप्रधानपद असते. पंतप्रधानपदासाठी अनेक व्यक्ती लायक असतात. कुणी एकच एका वेळी पंतप्रधानपदी असतो. पंतप्रधानपदी असणाऱ्या व्यक्तीने हे भान ठेवायला हवे.
पंतप्रधानाने शूर, धाडसी, कार्यक्षम, कुशल, मुत्सद्दी, दूरदर्शी, कष्टाळू, करारी, प्रेमळ, उत्तम वक्ता.. जरूर असावे. आपल्याला सगळे कळते असे जगात कुणीच नसते. पंतप्रधानपदी असणाऱ्या व्यक्तीने आपल्याला सगळं कळतं असं समजू नये. पंतप्रधानपदी असणाऱ्या व्यक्तीने आपल्याला काय काय कळते, किती कळते, किती करता येते, किती जमते, किती जमले, कुठले काम जमले नाही, हे स्पष्टपणे जाणावे. आणि हे जाणणे पंतप्रधानपदी असणाऱ्या व्यक्तीच्या वावरण्यातून, वागण्यातून स्पष्टपणे व्यक्त व्हावे.
माणसात काही ना काही गंड असतात. पंतप्रधान हाही माणूस असतो. पंतप्रधानाला त्याचे विकार, गंड ह्य़ाची खोलवर जाणीव असावी. विकार, गंड आवरून धरायची शिस्त त्याने शोधावी. वेळप्रसंगी ती शिस्त सांगावी. विकार, गंड नाहीतच असे समजू नये. कधी एखाद्या प्रसंगी विकार, गंड उघड झाले तरी सारवासारव करायचा प्रयत्न करू नये. पंतप्रधानात विकार, गंड असू शकतात, हे जनतेनेही समजून घ्यावे. हा निकोपपणा हवाय.
सृष्टीचे अमूर्त नियम, विश्वासंबंधीचे अज्ञात, काळाचा सूक्ष्मपणा व करालपणा, सजीवांचे जग- रंगानुसार, वंशानुसार वगैरे, माणसाचे असणे ते माणूस म्हणून असणे.. अशा अनेक गुंतागुंतींचे ज्ञान संशोधक निर्माण करतात. पंतप्रधानाला या ज्ञानासाठी संशोधकांवर, कलावंतांवर अवलंबून राहावे लागते. पंतप्रधान स्वत: हे ज्ञान निर्माण नाही करू शकत.
तिसऱ्या जगात असे संशोधक दुर्मीळ असतात, आणि पंतप्रधान ज्ञानापासून वंचित राहतो. तिसऱ्या जगातल्या पंतप्रधानांची ही अडचण असते. तिसऱ्या जगात विचारवंत असतात. विचारवंत दृष्टिकोन सांगतात. दृष्टिकोन तीन प्रकारचे असतात. १) पंतप्रधानांचे सगळेच बरोबर आहे. २) पंतप्रधानांचे सगळेच चूक आहे. ३) पंतप्रधानांचे अमुक अमुक बरोबर आहे, तमुक तमुक बरोबर नाही. यात विचित्रपणा असा येऊ शकतो की, एकजण जे बरोबर आहे म्हणतो ते दुसरा चूक म्हणतो. पंतप्रधान गोंधळतो, आणि आत्मविश्वासाला हाक देऊन आपल्याला पाहिजे तेच करतो.
तिसऱ्या जगातल्या पंतप्रधानाला संशोधनाची भीती वाटते. संशोधनातून भलतेच काही आले तर?
आणि संशोधनातून भलतंच येऊ शकते. अज्ञातात भलतेच असते. पंतप्रधान असे संशोधन होऊच नये म्हणून बंदोबस्तही करू पाहतात. ‘तिसऱ्या जग’पणातून मुक्त होण्यासाठी, ज्ञानासाठी भलते होत असले तरी अशा संशोधनाला पंतप्रधानांनी धीटपणे मोकळीक मान्य करावी.
अशा अनेक गोष्टी सोसण्यासाठी विनोद उपयोगाचा असतो. पंतप्रधानांनी जगण्यातले विनोदाचे स्थान जोपासावे.
माणसांना नाना, अनेक, हजारो, लाखो प्रकारची दु:खे असतात. पंतप्रधान जगण्याच्या सोयी करू शकतो. त्या पंतप्रधानाने चोखपणे कराव्यात. प्रयत्न तरी करावेत. प्रयत्न दिसावेत. किती जमले.. वगैरे अचूकपणे जोखावे. तेच बोलावे. माणसाची आतली दु:खे पंतप्रधान नाही घालवू शकत, ह्य़ाची जाणीव पंतप्रधानाला असावी. आणि ह्य़ावरून रात्री झोपताना पंतप्रधानाला उदास वाटावे.
हे करत पंतप्रधानाने सत्ताकारण जरूर करावे. तो माणसाचा गुणधर्म आहे. विरोधकांना नामोहरम करावे. आपल्याच पक्षाच्या विरोधकांना आठवून हसत कपाळावर हात मारावा.
(४)
मूर्त, अमूर्त.. तिसरा प्रकार.. ह्य़ावर विवेक करायचे सोडून मी पंतप्रधान ह्य़ावर का विचार केला? असे का झाले?
पर्यावरणात राजकारणाचेच अति वाजतेय.. तेच मनात, डोक्यात घोंघावतेय म्हणून?
किंवा मी तितकी बुद्धिमान नसेन.. किंवा मी सतत तेज बुद्धी ठेवली नसेल, किंवा.. खूप वेळ बुद्धी कार्यक्षमतेने वापरणे जमत नसेल.
इयत्ता चौथी ते सीए होईतो नात्यातले, ओळखीतले, वर्गातले शिक्षक, प्राध्यापक मला बुद्धिमान म्हणायचे. सीए झाल्यावर उमेदवारी करत दोन वर्षांनी मी स्वत:ची फर्म काढली. एका वर्षांत माझी फर्म एस्टॅब्लिश झाली. पुढच्या तीन वर्षांत इंटेरिअर डेकोरेशनसह बंगला झाला. नात्यातले, ओळखीतले, मित्रमैत्रिणी, इतर फर्मवाले मला कर्तबगार म्हणू लागले. एका स्त्रीने तिशीच्या आत कर्तबगारी केली, ह्य़ाचे विशेष कौतुक झाले. फर्म चालू. चालू. चालू. वर्षांमागून वर्षे. समारंभांत, सोहळ्यांत मला आदर मिळायचा. पुढची चाळीस वर्षे.. गुपचूप माझा दरारा. सत्तरीनंतरही मी माझे काम चालू ठेवले. सत्त्याहत्तपर्यंत मी कार्यरत राह्य़ले याचे लोकांनी माझे कौतुक केले. सत्त्याहत्तराव्या वर्षी मी फर्म विकली. ‘छान केलेत. आता निवांतपणे आयुष्य एन्जॉय करा..’ जिवंत असलेले माझे समकालीन म्हणाले. मी ऐंशीला आले. माझा सहस्रदर्शन सोहळा मिलिंदने पुढाकार घेऊन साजरा केला. माझे गुणगौरव झाले.
आता मी शहाऐंशीची आहे. शहाऐंशीव्या वर्षी मी एकटी राहते, हिंडते, फिरते, माझी कामे मी स्वत: करते, ह्य़ाचे तरुण-तरुणींनाही आश्चर्य वाटते. अशोकराव मला आवडले, त्यांच्याशी लग्न करावेसे वाटले, शहाऐंशीव्या वर्षी माझ्यापेक्षा लहान पुरुष आवडला, त्याच्याशी मला लग्न करावेसे वाटले, ह्य़ाची मला स्वत:लाच गंमत वाटली. शहाऐंशीव्या वर्षी माझ्या मनात गंमत आहे तर! मूत्रपिंडावर शास्त्रज्ञांनी औषध शोधले नाही म्हणून आपल्याला दु:ख असते. देहासक्ती सोडणे हा एक इलाज आहे; पण जमत नाही, हे शहाणपण गमतीदार आहे. माझी स्मरणशक्ती चांगली आहे. किरकोळ आजारपणं असतात. शहाऐंशीच्या पुढचे आयुष्य बोनस असते, असे लोक म्हणतात. बोनसचा वेगळा आनंद असतो. बोनस ही संकल्पना कुणी काढली? दिवाळीत कामगारांना बोनस.. हे कुणी काढले? भांडवलशाहीने की कम्युनिझमने?.. मी छान जगले. छान जगतेय. मिलिंद न् त्याची बायको माझी काळजी घेतात. मिलिंदची बायको- माझी भाच्चेसून मला म्हणते.. मिलिंदसमोर हसत म्हणते, ‘मावशी, तुम्ही मिलिंदला हिंदुत्वावरनं उल्टं बोलता, त्यामुळे मिलिंद ताळ्यावर राहतो.’ मिलिंद एम. टेक्. आहे. विकसनशील राष्ट्रात सर्व सुविधा, सुखं, चैनी काही थोडय़ा लोकांना मिळतात, त्या मिलिंदला मिळाल्यात. माझी भाच्चेसून आनंदात आहे. ती चिंतेने, काळजीने, काहीसे भयाने मला म्हणते, ‘मावशी, आता पुरे एकटे राहणे. आमच्याकडेच राहायला या.. घरात घुसून भरदिवसा एकटय़ा ज्येष्ठ नागरिकावर हल्ला, लूट.. रस्त्यात भरदिवसा गोळीबार. दोन मृत्यू, चार जखमी, दोन अत्यवस्थ.. जग धड नाहीये.. काय काय भयंकर रोज कानावर येते.. इकडेच राहायला या.. इथे हव्या तशा राहा.’ मी अजून हा विचार केला नाहीये. मिलिंद रोज दिवसातून दोनदा येतो. दिवसातून दोनदा फोन करतो. माझ्यावरनं चिडवत मिलिंदची बायको मिलिंदला म्हणते, ‘तुझी मैत्रीण बरी आहे ना? काय म्हणतेय?’
बुद्धिमान ते कर्तबगार ते सत्त्याहत्तपर्यंत कार्यरत ते शहाऐंशीव्या वर्षीही एकटी मस्त जगते.. हा माझ्या आयुष्याचा आलेख.
मी बुद्धिमान होते. बुद्धिमानांनी शोध लावायचा असतो, हे माझ्या कधी लक्षातच कसे आले नाही? विवेकाचे याआधी लक्षातच कसे आले नाही?
स्वत:ला हसत मी कपाळावर हात मारून घेतला.
बेल वाजली.
दार उघडले.
‘कशी आहेस मावशी?’
‘ते जाऊ दे. मला तुझ्याशी बोलायचेय.’
‘हिंदुत्वावर?’ मिलिंद खळाळून हसला.
‘लहानपणी, तरुणपणी बुद्धिमान असणारे लोक पुढे आयुष्यात मोठे शोध लावत नाहीत?.. बैस.’
मिलिंद कोचात बसला.
‘मी आधी म्हटले, त्यावर नको बोलायला.’
‘हं.’
‘विश्वात मूर्त आहे, अमूर्त आहे. तिसरा काही प्रकार असू शकतो का? .. हा प्रश्न विचारात घ्यावा, असा तरी आहे का?.. इथपासून चर्चा करायची.’
‘चालेल!’

श्याम मनोहर

Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पूर्वपरीक्षेच्या अभ्यासाचे नियोजन
Science Day is Not just to celebrate but to practice it
विज्ञान दिन साजरा करण्यासाठी नव्हे, आचरणात आणण्यासाठी…
UPSC Preparation Facing the Prelims Exam
यूपीएससीची तयारी: पूर्व परीक्षेला सामोरे जाताना..