अनुवादाच्या क्षेत्रात मनोविकास प्रकाशनाने अलीकडच्या काळात लक्षणीय स्वरूपाची कामगिरी केली आहे. विविध भारतीय भाषांमधील अनेक उत्तमोत्तम साहित्यकृतींचा मराठी वाचकांना परिचय करून दिला आहे. भारतीय तसेच युरोपीय भाषांतील अतिशय सरस अशा साहित्यकृतींचा अनुवाद प्रसिद्ध केला आहे. ‘भारतीय लेखिका’ या अनुवादमालेत मनोविकासने आतापर्यंत पंधराहून अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत. तमीळ, तेलुगू, मल्याळम्, ओरिया, संथाली तसेच हिंदीतील लक्षणीय साहित्यकृतींचे अनुवाद प्रसिद्ध केले आहेत. या अनुवादमालेने दुहेरी स्वरूपाची कामगिरी केली आहे. एक म्हणजे अनुवादांमुळे त्या संपर्कभाषेतील भाषासाहित्याची जाण वाढत असते. या अनुवादमालेत विविध विषयसूत्रांशी संबंधित साहित्यकृती अनुवादित केल्या गेल्या आहेत. दुसरे स्वरूप म्हणजे भारतातील निरानिराळ्या प्रदेशांतील स्त्रियांच्या अनुभवविश्वाच्या कहाण्या मांडणाऱ्या या साहित्यकृती आहेत. आधुनिक काळातील स्त्रियांचे प्रश्न व पुरुषप्रधान सामाजिक पर्यावरणाचे वास्तव रेखाटणाऱ्या या लक्षणीय साहित्यकृती आहेत. लिंगभावाचे राजकारण उघड करणाऱ्या आणि गुंतागुंतीच्या समाजकारणाचा बहुमुखी पट मांडणाऱ्या या विविधप्रांतीय भाषांतील साहित्यकृती आहेत. त्यामध्ये ललित तसेच वैचारिक, संशोधनात्मक ग्रंथही आहेत. या अनुवाद प्रकल्पाच्या निमित्ताने भारतीय स्तरावरील स्त्रियांच्या समांतर अनुभवाच्या कथा मराठी वाचकांना उपलब्ध झाल्या आहेत. विविध भाषांमधील हे अनुवाद संवादपूल बांधण्याचे काम करत असतात. अनुवाद-संस्कृतीच्या भरभराटीसाठी असे प्रयत्न नेहमीच फलदायी ठरतात.
या अनुवादमालेत नुकताच विविधभाषक भारतीय लेखिकांच्या तीन साहित्यकृतींचा अनुवाद प्रकाशित करण्यात आला आहे. यापैकी तमीळ लेखिका वासंती यांच्या ‘जन्मसिद्ध हक्क’ या लघुकादंबरीचा अनुवाद सुनंदा भोसेकर यांनी केला आहे. स्त्रीवादी तसेच आधुनिक साहित्याला वेगळे परिमाण प्राप्त करून देणारी ही साहित्यकृती आहे. तमीळ ‘इंडिया टुडे’च्या संपादिका वासंती यांनी लिहिलेली ही कादंबरी आहे.
तामीळनाडूमधील सेलम या गावाची पाश्र्वभूमी ‘जन्मसिद्ध हक्क’ या कादंबरीला आहे. कादंबरीची नायिका मनो हिने भारतीय समाजाचे स्त्रीवादी दृष्टीने केलेले विवेचन या कादंबरीत आहे. ती स्वत: स्त्रीरोगतज्ज्ञ आहे. स्त्रीभ्रूणहत्येसारख्या प्रश्नात लिंगभानाबरोबरच विषम समाजरचनेचे प्रश्न किती दाहक आहेत याचा प्रत्यय कादंबरीत येतो. असंख्य अनाम स्त्रियांच्या वंचनेने नाहीशा झालेल्या अर्भकांचा त्यास संदर्भ आहे. एकाच वेळी कुटुंब आणि समाजात स्त्रीला मिळणारी दुय्यमत्वाची, भेदाची वागणूक त्यात आहे. पितृपरंपरेच्या विषम सावलीमागे दडपलेल्या अनेक स्त्रियांचा दु:खस्वर तीत आहे. मनो नावाची स्त्रीरोगतज्ज्ञ जणू काही कर्तव्यभावनेने स्त्रीभ्रूणहत्येत सहभागी असते. ती हे काम करते- जन्माला येणाऱ्या मुलीला पुढे त्रास होऊ नये म्हणून. मात्र, अखेरीस तिला सत्याचा साक्षात्कार होतो. स्व आणि इतरेजणांना भोगाव्या लागलेल्या यातनामुक्तीसाठी ती हे सारे करीत असते. आपला वैद्यकीय व्यवसाय, त्यात स्त्रीभ्रूणहत्येसाठी आलेल्या अनेक स्त्रिया, त्यांच्या करुण कहाण्यांची साखळी आणि दुसऱ्या बाजूला आपले कुटुंब आणि त्यातला पुरुषकेंद्री जाणिवेचा संघर्ष अशी समांतरपणे ही कथा सांगितली गेली आहे. या कादंबरीचा एक लक्षणीय वेगळेपणा म्हणजे भारतीय समाजाने बाईची जी घडण केली- बाई कशी घडविली, रचली जाते, त्याची फार चांगली जाण या कादंबरीतून प्रकट झाली आहे. सामाजिक हेतूचे उच्चारण करणाऱ्या अनेक पारंपरिक संहितांचा कल्पक उपयोग यात केला गेला आहे. जीवनरीतीपासून ते भाषापातळीपर्यंत हे कसे घडवले गेले, हे फार चांगल्या रीतीने कादंबरीत सूचित केले आहे. सतीप्रथा ते ‘हे माझं (पुरुषाचं) घर आहे’ अशा अनेकविध गोष्टींचा त्यात उच्चार आहे. परंपरेतील मिथक प्रतीकांना स्त्रीसंदर्भात नवे अर्थ प्राप्त करून दिले आहेत. यात रामायण, महाभारत ते लोकवाङ्मयात पसरलेल्या अनेक तत्त्वांचा फार कल्पकतेने वापर केला गेला आहे. जीभ बाहेर काढणारी कालीमाता अशी दानवांचा नाश करणारी स्त्रीप्रतिमा पुरुषांना असहाय बनवते. त्यामुळे पुढे त्यांनी सीता प्रतिमा घडवली. किंवा एका अद्भुत रामायणात राम मूíच्छत होतो तेव्हा सीतेनं धनुष्य उचललं आणि रावणाचा वध केला, ही संहिता बाईनेच रचली असावी. अशा पुनर्वाचनाच्या व नव्या संहितानिर्मितीच्या अनेक बाबी या रचनेत आहेत. स्त्रीसंदर्भात मोठय़ा सामाजिक चित्रफलकावर मांडणी करणारी ही साहित्यकृती आहे.
या अनुवादमालेतील प्रिया छाब्रिया यांची ‘जनरेशन- १४’ ही आणखी एक कादंबरी. मूळ इंग्रजी कादंबरीचा सुनेत्रा जोग यांनी हा अनुवाद केला आहे. ही एक वैशिष्टय़पूर्ण अशी विज्ञान कादंबरी आहे. चोविसाव्या शतकात घडलेली ही कथा आहे. वास्तव व कल्पित आणि वैज्ञानिक शोधाची दिशा यांतून निर्माण होऊ पाहणारे जग या कादंबरीत मांडले गेले आहे. शरीरसंबंधांशिवाय निर्माण होणाऱ्या जीवसृष्टीचे जग या कादंबरीत आहे. प्राण्यांमध्ये क्लोनिंगच्या माध्यमातून अशी जीवसृष्टी निर्माण करता येते हे आता सिद्ध झाले आहे. वर्तमानातल्या माणसांना अशक्य वाटावं अशा भविष्यातील जगाचे सूचन या कादंबरीमध्ये आहे. क्लोनिंगचा एक जागतिक संप्रदाय निर्माण झाल्यानंतर काय घडू शकते याचे चित्र तीत आहे. हे सांगत असताना मानवी मनातील मूलभूत, स्वाभाविक भावनांचा लय आणि दुसऱ्या बाजूला निर्जीव संवेदनाविश्व यांच्या सरमिसळीतून निर्माण झालेले जग या कादंबरीत आले आहे.
आधुनिक जगाच्या वाटचालीत विज्ञान-तंत्रज्ञानाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भविष्यात या तंत्रज्ञानाचा मानवी जीवनावर कोणता परिणाम होईल, याचा कल्पिताच्या पातळीवरचा शोध या कादंबरीत आहे. क्लोन संप्रदायाचे जग घडत असताना मूलभूत व स्वाभाविक अशा मानवी भावभावनांचे, संवेदनांचे काय होईल, तसेच लैंगिकता, प्रजनन, भीती, मृत्यू, दडपशाही, युद्धज्वर, हुकूमशाही, हिंसा, भूक, भ्रम या गोष्टींचा वावर कादंबरीभर आहे. भूतकाळातील प्राचीन कथा, लोकजीवन, इतिहास, मिथक, स्थलावकाश आणि भविष्यातील व्यक्तींचे जग अशा विविध संहितांची सरमिसळ करून कल्पिताच्या साहाय्याने या नव्या जगाची संवेदना साकार केली गेली आहे. वाचकांना ही कथनसृष्टी समजून घ्यायला खूपच दमछाक होईल अशी ही विज्ञान कादंबरी आहे. भूतकाळाच्या नाडीला स्पर्श करून भविष्याचे भाकीत विज्ञानाच्या तत्त्वाधारे कल्पिताच्या साहाय्याने यात घडवण्यात आले आहे. ते लोकविलक्षण आहे. या विश्वात मानवी जीवनातील मूलभूत स्वरूपाचे खूप काही हरवले आहे. मात्र, हे घडत असताना नेणिवेतील आदिम खुणांची उपस्थिती कादंबरीतील कथनसृष्टीत आहेच. या नव्या जगाने निर्माण केलेले नैतिक महापेच ही कादंबरी अधोरेखित करते.
या अनुवादमालेतील अमेरिकास्थित भारतीय लेखिका वंदना सिंग यांच्या कथासंग्रहाचा मराठी अनुवाद सुमती जोशी यांनी ‘ती ग्रह आहे एक’ या नावाने केला आहे. कल्पित कथांचे अद्भुत जग या कथांमधून वंदना सिंग यांनी मांडलेलं आहे. विज्ञानकथा आणि अद्भुत कथा यांच्या सरमिसळीतून ती साकार झाली आहे. मराठीमध्ये अशा प्रकारचे फारसे लेखन होताना दिसत नाही. मध्यमवर्गीय कुटुंबांतील ताण व गुंते यांचा अद्भुततेच्या साहाय्याने लेखिकेने शोध घेतला आहे. या ताणाचे निवारण करण्यासाठी विमुक्ततेचा, अनपेक्षित चमत्कृतींचा, विज्ञानतत्त्वांचा आधार घेण्यात आला आहे. प्रत्यक्ष जीवनात वावरणाऱ्या माणसाच्या मनात वरकरणी दुटप्पीपणाचा भाव असतो. अंतरंगात काहीतरी दाबून ठेवलेलं असतं. ते अशा अद्भुताच्या, विस्मयाच्या अंगाने उलगडले आहे. दृश्य गजबजाटाच्या आत काहीतरी लपलेलं आहे. या लपलेल्या जगात मानवी स्वातंत्र्याचे प्रश्न आहेत, आंतरिक प्रेरणा आहेत, हे विमुक्ताच्या साहाय्याने यात उघड करण्यात आले आहे. गणितातले सिद्धान्त आणि प्रत्यक्षातला मानवी वर्तनव्यवहार यांतल्या परी शोधल्या गेल्या आहेत. पती-पत्नीतले अंतर आणि त्याची परिणती, दिल्लीचा भूतकाळ आणि वर्तमानकाळ अशा प्रश्नांची मांडणी लेखिकेने अद्भुताच्या, कल्पिताच्या साहाय्याने केली आहे.
भारतीय पातळीवरील उत्तमोत्तम साहित्य प्रकाशित करून मराठी वाचकांच्या जाणिवा समृद्ध करेल अशा प्रकारचे हे अनुवाद ग्रंथ आहेत. या तिन्ही साहित्यकृतींतून वेगळ्या प्रकारचे अनुभवविश्व प्रकटलेले आहे. स्त्रीसंवेदनेचे अनुभवविश्व तसेच विज्ञानविषयक तसेच कल्पित कादंबरीला विविधांगी परिमाणे प्राप्त करून देणाऱ्या या साहित्यकृती होत. या पुस्तकांत त्यांचे वेगळेपण सांगणारे प्रास्ताविक आहे. या प्रकारच्या अनुवाद-संस्कृतीच्या परस्परसंपर्कातून समृद्ध व संपन्न ऐवजाची उपलब्धी होत असते. असे प्रयत्न साहित्याच्या निकोप वाढीसाठी नेहमीच आवश्यक ठरतात.
‘जन्मसिद्ध हक्क’- वासंती, अनुवाद- सुनंदा भोसेकर, पृष्ठे- १४८, किंमत- २४० रुपये.
‘जनरेशन १४’- प्रिया सरुक्काई छाब्रिया, अनुवाद- सुनेत्रा जोग,
पृष्ठे- २९६, किंमत- ३९५ रुपये.
‘ती ग्रह आहे एक!’- वंदना सिंग, अनुवाद- सुमती जोशी, पृष्ठे- २३४, मूल्य- ३३० रुपये. मनोविकास प्रकाशन, पुणे.
प्रा. रणधीर शिंदे

shree ram mandir
१२वीच्या पुस्तकातून बाबरी पतनाचा उल्लेख गायब…
Loksatta kutuhal Scope of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीची व्याप्ती
It is necessary to change the mentality with effort to make the work perfect
जिंकावे नि जगावेही : मी ‘परिपूर्ण’…?
Why are we 50 years behind the world in the field of irrigation
आपण सिंचन क्षेत्रातच तेवढे जगाच्या ५० वर्षे मागे का?