सार्वजनिक पातळीवर साजऱ्या होणाऱ्या सणांचे औचित्य केवळ रमझानच्या दिवसात भेंडीबाजारात जाऊन कबाब खाण्यापुरते किंवा शोभायात्रांतून पारंपरिक पोशाखात मिरवण्यापुरतेच मर्यादित न राहता, त्यातून समाजात खऱ्या अर्थाने धार्मिक सलोखा निर्माण होणे आवश्यक आहे. अन्यथा रमझानपासून ते दिवाळीपर्यंत धर्म आणि पावित्र्याच्या नावाखाली साजऱ्या होणाऱ्या या असंख्य उत्सवांचे अस्तित्व बेशिस्त झुंडशाहीहून वेगळे उरणार नाही. तसेच अशा प्रकारे एकत्र येणे निर्थक ठरेल.

पावसाळा आला की आपल्याकडे श्रावण व रमझानचे पवित्र महिने सुरू होतात.

या काळातल्या सण-उत्सवांतील मिरवणुका/शोभायात्रेत ढोल-ताशांवर झेंडे नाचवणारा युवा जनसमुदाय.. किंवा रमझानच्या महिन्यात मिळणारे विविध प्रकारचे लझीझ असे सामिष पदार्थ खाण्यासाठी जमणाऱ्या सर्वधर्मीय/सर्वजातीय लोकांची गर्दी; या दोन गोष्टी उत्तराधुनिक काळातील भारतीय समाजाच्या मिश्र धार्मिक-सांस्कृतिक विश्वाचा आजचा चेहरा झालेला दिसून येतो. १९९१ नंतरच्या आर्थिक उदारीकरणानंतर वाढलेल्या क्रयशक्तीमुळे इराण्याच्या हॉटेलमध्ये जाणे किंवा दर आठवडय़ाला वा महिन्याला सहकुटुंब रेस्तरांमध्ये जाणे, ब्रँडेड वस्तूंचा वापर करणे, जर्मन-जपानी वगैरे विदेशी भाषांचा अभ्यास करून बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीत स्थिरावणे, वर्षांकाठी एक परदेशवारी करणे या गोष्टी शहरी मध्यमवर्गाच्या आयुष्यातील सहजप्राप्य घटक बनू लागल्या. या अशा आधुनिक जीवन पद्धतीचे अनुसरण करताना जात-धर्मविषयक कर्मठ नियम, पारंपरिक आहार, त्यावरील र्निबध इत्यादी बाबी आजच्या पिढीकडून मोठय़ा प्रमाणावर दुर्लक्षित होऊ  लागल्या.

नाटक-सिनेमा-मालिकांच्या किंवा जाहिरातींच्या क्षेत्रात काम करणाऱ्या उच्चभ्रू/उच्चजातीय वर्गातील शहरी तरुणवर्गामध्येही तथाकथित अभक्ष्य भक्षण व अपेयपान या गोष्टींचे अप्रूप संपूनही एक मोठा काळ उलटून गेल्याचे दिसते. मात्र याच वर्गामधील युवकांमध्ये गणपतीच्या दिवसांत आपल्या शाळेतील किंवा परिसरातील ढोल-ताशा पथकामध्ये पांढरा कुर्ता पायजमा आणि भगवी टोपी-स्टोल परिधान करून, कानात भिकबाळी घालून झेंडा नाचवणे किंवा ढोल-ताशा वाजविणे, उपनिषद किंवा बौद्ध ग्रंथातील वचनांचे टॅटू अंगावर छापून मिरवणे, शिर्डीची पदयात्रा करणे, आषाढीच्या वारीत धोतर नेसून फोटोग्राफीसाठी सहभागी होणे, इत्यादी प्रकारांतून परंपरेशी असलेल्या निष्ठा किंवा आस्था जपण्याच्या नवीन व्याख्या व पद्धती निर्माण झाल्या. इराण्याच्या हॉटेलमध्ये बुर्जीपावचा नाश्ता करून गणेशोत्सवाच्या ढोल पथकात किंवा आळंदीच्या वारीमध्ये सामील होणे, मुंबईच्या महंमद अली रोड वा भेंडी बाजारातील चमचमीत सामिष पदार्थावर ताव मारून, दिवाळी पहाट किंवा गुढीपाडवा वगैरेच्या निमित्ताने ‘आपली परंपरा जपण्या’च्या मिषाने फडके रोडवर किंवा गिरगावच्या शोभायात्रेत सहभागी होणे यासारख्या कृतींद्वारे आधुनिकता व परंपरा यांचा मेळ घालण्याच्या प्रयत्नांचे होणारे दर्शनदेखील अगदीच लक्षणीय आहे.

१९५० साली भारतीय राज्यव्यवस्थेने संविधानाला सार्वभौमत्व प्रदान केलं आणि १९७२ च्या ४२ व्या घटनादुरुस्तीमध्ये ‘धर्मनिरपेक्षवाद’ हा भारतीय समाजाचा पाया असण्यावर अधिकृतरीत्या शिक्कामोर्तब झालं. या धर्तीवर भारतीय समाजमनातील उत्सवप्रियता व धार्मिक जाणिवांची आजची अभिव्यक्ती ही साधारणत: वासाहतिक काळ, स्वातंत्र्योत्तर काळातील नेहरू युग व १९९० च्या दशकाच्या प्रारंभी सुरू झालेले आर्थिक उदारीकरण आणि राममंदिर-रथयात्रा या तीन टप्प्यांतून निर्माण झालेल्या विविध राजकीय व सांस्कृतिक व्यवस्थांच्या प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष प्रभावातून झाली आहे, असं म्हणता येतं. वर्तमानकाळातील राजकीय व धार्मिक अस्मितांविषयी भाष्य करताना, प्रादेशिक व जागतिक पातळीवरील राजकारणाच्या वाढत्या गतिमानतेमुळे या जाणिवांच्या मुळाशी असलेल्या परंपरा आणि आधुनिकता या दोन्ही गोष्टींविषयीचे बदलत जाणारे आकलन (perception) महत्त्वाचे ठरते. त्या आकलनातून रुजणाऱ्या परिवर्तनशील सामूहिक स्मृती (public memories) व त्यांचे सामाजिक व राजकीय औचित्य हा पुन्हा एकदा कळीचा मुद्दा बनत चालला आहे.

१९४७ साली भारतातून फुटून वेगळ्या झालेल्या राष्ट्रांच्या तुलनेत भारताच्या अस्तित्वाचे वेगळेपण, हे येथील समाजात आधीपासून रुजलेल्या बहुभाषकत्व, बहुधर्मीयत्व आणि बहुसांस्कृतिकता या तत्त्वांवर बेतलेले आहे. वसाहत काळात इंग्रजी सत्ता दृढमूल होत असताना, इंग्रजांचा राजकीय आणि सामाजिक स्तरावर पहिला संबंध आला तो इथले हिंदू आणि मुस्लीमधर्मीय राजे-महाराजे, त्यांच्या दरबारातील सरंजामी अधिकारी-कारकून वर्ग आणि ब्रिटिशपूर्व काळात ‘ज्ञान’व्यवहार करणाऱ्या शास्त्री-पंडित व मुस्लीम पारंपरिक विद्वानांशी. त्यामुळे भारताची आणि भारतीय सांस्कृतिक परिघांशी ब्रिटिशांची ओळख झाली ती या उच्चवर्गीय, उच्चजातीय समूहांद्वारे. भारतावर राज्य करण्यासाठी इथला इतिहास, सांस्कृतिक परंपरा समजून घेण्यासाठी त्यांना मदत करणारा, एतद्देशीय भाषा, साहित्य वगैरेंशी ओळख करून देणारा वर्गदेखील या दोन धर्मातील प्रस्थापित उच्चवर्गच होता. १७८४ साली कोलकात्यामध्ये सर विल्यम् जोन्स यांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली आणि संस्कृत भाषेच्या अभ्यासाला व पर्यायाने ‘भारतीय संस्कृती’चा अभ्यास करण्यास प्रारंभ केला. संस्कृत व प्राकृत भाषांतील अभिजात साहित्य, सुलतानशाही व मुघलकाळातील पर्शियन वाङ्मयातून अभिव्यक्त होणाऱ्या तत्कालीन राजकीय परिस्थितीचे भान असलेल्या अभिजन वर्गाच्या सांस्कृतिक संवेदना यांना केंद्रस्थानी ठेवून, भारताच्या इतिहासाविषयी आणि संस्कृतीविषयी भाष्ये केली गेली. आता भारतीय समाजाच्या दृष्टीने विचार केला तर ब्रिटिशांशी किंवा पाश्चात्त्यांशी पहिला संबंध आला तो अर्थातच वर उल्लेख केलेल्या राजकीय, धार्मिक व ज्ञानव्यवहाराशी संबद्ध असलेल्या वर्गाचाच. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी भारतात पाश्चात्त्य पद्धतीच्या (इंग्रजी) शिक्षणव्यवस्थेचा पाया रोवला गेल्यावर हाच उच्चभ्रू अभिजन वर्ग या शिक्षणव्यवस्थेचा पहिला लाभधारक झाला, व या नव्याने आकार घेणाऱ्या बुद्धिजीवी वर्गानेदेखील जुन्या परंपरा, इतिहास आणि संस्कृतीकारण यांची मांडणीदेखील पाश्चात्त्य प्रभावातून सुरू केली. तेव्हापासून गेल्या दोन शतकांमध्ये भारतीयांनी विशेषत: हिंदू, जैन व बौद्ध धर्मसमूहांनी आपल्या धर्मविषयक जाणिवांना पाश्चात्त्य जगतास अभिप्रेत असलेल्या ‘रिलिजन’ या चौकटीत बसवण्याचे प्रयत्न सुरू ठेवल्याचे दिसून येते. वासाहतिक काळात भारताच्या इतिहास-संस्कृतीविषयी पाश्चात्त्यांचा व एतद्देशीय आधुनिक विद्वानांचा दृष्टिकोन याच परिप्रेक्ष्यातून तयार झाल्याचे दिसते. या प्रभावातूनच भारताची सांस्कृतिक प्रतिमा ही या उभयधर्मीय उच्चवर्गातील संवेदनांशीच केंद्रीभूत असल्याचे दिसून येते.

पाश्चात्त्य प्रभावातून विकसित झालेल्या या आधुनिकतेसोबत भांडवलशाहीचे अर्थकारण व आधुनिक पाश्चात्त्य मूल्यव्यवस्था रुजू लागल्यावर धर्म-परंपरादींच्या चिकित्सेसोबतच उपयुक्ततावादी दृष्टिकोनदेखील समाजात रुजू लागला.  १९ व्या शतकातील सुधारक मंडळींनी निखळ आधुनिकीकरणाची कास धरून परंपरा नाकारण्याचा मार्ग अंगीकारला, तर काहींनी एतद्देशीय परंपरांना प्रमाण मानून पुनरुज्जीवनवादी दृष्टिकोन कमी-अधिक प्रमाणात अनुसरल्याचे दिसून येते. फ्रेंच व अमेरिकी राज्यक्रांतींच्या प्रभावातून निर्माण झालेल्या ‘राष्ट्र-राज्य’ संकल्पनेशी परिचित होऊ लागलेल्या भारतीय समाजातील दोन मुख्य धर्मसमूहांत विवक्षित समूहाधिष्ठित राष्ट्रवाददेखील १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात व २० व्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात मूळ धरू लागला होता. एकीकडे धर्म, चालिरीती, रूढीवादाची चिकित्सा करताना व आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना वर उल्लेखिलेल्या स्वातंत्र्यपूर्व काळातच प्रसृत झालेल्या सामूहिक राष्ट्रवादाचा प्रसार करणाऱ्या विचारांचा लक्षणीय प्रभाव स्वातंत्र्योत्तर काळातही दिसून येतो. या सामूहिक राष्ट्रवादाचा कणा ‘धर्म’व्यवस्था असल्याने आधुनिकतेच्या सुरुवातीच्या काळात अथवा आधुनिकता रुजू लागल्यावर आधुनिकता व संस्कार, परंपरा यांच्या औचित्या-नौचित्याविषयीच्या संभ्रमामुळे भांबावलेल्या, नव्याने आकारास येणाऱ्या मध्यमवर्गाने आपापल्या सोयीनुसार वैयक्तिक स्तरावर आधुनिकता व धर्म-परंपरा यांचे औचित्यीकरण (appropriation) सुरू केले. या पुनरुज्जीवनवादी धारणेचे व धर्मप्रियतेचे राजकीय हक्क समूहाधिष्ठित धर्मकेंद्री राजकारणाचे अनुसरण करणाऱ्या घटकांनी व राजकीय संघटनांनी मिळवले नसते तरच नवल.  या नव्याने पुनर्गठित होणाऱ्या संकल्पना व व्यवस्थांची सार्वजनिक प्रतलात होणारी अभिव्यक्ती हा आधुनिक धर्मकारणाचा  व संस्कृतीकारणाचा महत्त्वाचा भाग मानायला हवा. सुधारक चळवळीच्या प्रभावातून वैचारिक प्रतलावर ‘आपली परंपरा म्हणजे कोणती?’, ‘आपण म्हणजे नेमके कोण?’ असे प्रश्न विचारले जाऊ  लागले.

प्रस्तुत वैचारिक घुसळणीसोबतच धार्मिक, पारंपरिक प्रतलातील गोष्टींचा परस्पर मेळ घालण्याच्या नावाखाली परंपरानिष्ठा व आधुनिकवाद या दोन्हींच्या बळकटीकरणाच्या आणि मेळ घालण्याच्याही प्रक्रियेला १९९१ सालच्या आर्थिक उदारीकरणाद्वारे गती मिळाली व यातून सार्वजनिक स्तरावर धार्मिक असणे, पारंपरिक असणे किंवा उदारमतवादी असणे या ओळखींना (identities) वेगळी परिमाणे मिळू लागली. स्वातंत्र्यपूर्व काळात प्रमाणित झालेल्या शिवाजी महाराज, गणपती वगैरे प्रतिकांशी जोडल्या गेलेल्या उत्सवांच्या यादीमध्ये बाबासाहेब आंबेडकर जयंती-पुण्यतिथी, सावरकरांच्या मार्सेलिस येथील उडीचा स्मृतिदिन, अफझलखानाचे पारिपत्य केलेल्या घटनेचा स्मृतिदिन, इत्यादी दिवसांचे उत्सवीकरण होऊन संबंधित विचारसरणींच्या प्रसारातून राजकीय मतांचे गठ्ठे ठरविले जाऊ लागले. जातिधर्माच्या अस्मिता नव्याने टोकदार होऊ  लागल्या. भांडारकर संस्थेवर झालेल्या २००४ सालच्या हल्लय़ानंतर महाराष्ट्रातील ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाने पुन्हा उचल खाल्ली आणि ब्राह्मण संमेलने, त्याला प्रत्त्युत्तर म्हणून मराठा समाजाची संमेलने भरवून संबंधित जातींनी शक्तिप्रदर्शन सुरू केल्यावर, सोशल-मीडियापासून ते राजकीय व्यासपीठांपर्यंतच्या समाजकारणाला वेगळी दिशा मिळत गेली.

धर्मश्रद्धा किंवा परंपरा या सार्वजनिक पातळीवर अभिव्यक्त होताना, त्यातून प्रतीत होणारे समाजमन व आपल्या जाती-धर्माच्या हितसंबंधांशी हातातहात घालून वेग घेणारी राजकीय गतिमानता, यांचा परस्पर संबंध जोडताना काही गोष्टींचा विचार करणे महत्त्वाचे ठरते. घरगुती सोवळ्या कर्मकांडांमध्ये न रमणाऱ्या आजच्या पिढीने परंपरा व आधुनिकता यांचा मेळ घालण्याच्या या प्रक्रियेत कर्मठ कर्मकांडे व सोवळे विधी यांची जागा नटूनथटून शोभायात्रेत ध्वज नाचवणे व वाद्यवृन्दात सहभागी होणे या कर्मकांडाने घेतली. कॅथरीन बेल नावाच्या समाजशास्त्रज्ञ विदुषीने म्हटल्यानुसार, ‘कर्मकांडांच्या प्रक्रियेचा मुख्य उद्देश हा त्या विवक्षित परंपरांचा प्रसार अथवा जतन करणाऱ्या एजंट्सची निर्मिती करणे हा असतो, आणि अशा क्रियांद्वारे सांस्कृतिक अधिसत्तांचे सूक्ष्म-हितसंबंध जपले जाण्याचे कामच अशा एजंट्सकडून होत असते.’ या अशा मेळाव्यांचे/ मंडळांचे प्रायोजक शोभायात्रेला आवर्जून उपस्थित राहून धर्मकारणासाठी किंवा ‘राष्ट्रनिर्मिती’साठी प्रेरणा देणाऱ्या राजकारण्यांचा सहभाग पाहिला की, अशा सार्वजनिक पातळीवर प्रस्थापित होऊ  लागलेल्या या नव्या कर्मकांडांचा वापर अस्मिता चेतवणाऱ्या राजकारणासाठी होतो; व अनेकदा यात सहभागी होणारी मंडळीदेखील संबंधित संघटनांशी किंवा पक्षांशी जोडली जातात. त्यामुळे अशा उपक्रमांमधला सहभाग हा धार्मिक किंवा सांस्कृतिक अस्मितेची राजकीय अभिव्यक्तीच ठरते. म्हणून सार्वजनिक पातळीवर होणारे ‘रिच्युअलायजेशन’ एका विशिष्ट चौकटीच्या अथवा मर्यादित धर्म/विचारप्रणालीच्या किंवा धर्माधिष्ठित राजकारणाच्या अभिवृद्धीसाठी किंवा त्यासाठीच्या एजंट्सची (कार्यकर्त्यांची) फळी बनविण्यासाठी पूरक ठरते.

एकीकडे कमी-अधिक प्रमाणात स्वीकारली जात असलेली आधुनिकता व आचार-आहारांतून प्रतीत होणारा उदारमतवाद, तर दुसरीकडे त्याच वेळी जातीय संमेलनांमध्ये किंवा झाकीर नाईकांच्या सभांमध्ये आणि बिब्लिकल (ख्रिस्ती धर्मप्रणीत) हिलिंगच्या शिबिरांमध्ये दिसून येणारी युवावर्गाची उपस्थिती यांची उपपत्ती कशी लावावी, असा प्रश्न पडणे साहजिक असले तरी त्याचा अर्थ लावणे तितके अवघड नाही.

एकीकडे कमी-अधिक प्रमाणात स्वीकारली जात असलेली आधुनिकता व आचार-आहारांतून प्रतीत होणारा उदारमतवाद, तर दुसरीकडे त्याच वेळी जातीय संमेलनांमध्ये किंवा झाकीर नाईकांच्या सभांमध्ये आणि बिब्लिकल (ख्रिस्ती धर्मप्रणीत) हिलिंगच्या शिबिरांमध्ये दिसून येणारी युवावर्गाची उपस्थिती यांची उपपत्ती कशी लावावी, असा प्रश्न पडणे साहजिक असले तरी त्याचा अर्थ लावणे तितके अवघड नाही. मध्यमवर्गाच्या हातात खुळखुळू लागलेल्या पैशाने वाढलेल्या क्रयशक्तीमुळे आधुनिक काळाला साजेशा ‘कूल’ वगैरे गोष्टी करण्यासाठीची आर्थिक क्षमता आजच्या तरुणांकडे आहे. यातून विशिष्ट हॉटेल्समध्ये जाऊन खाणे, आहार-विहारासंबंधीचे धार्मिक नियम मोडणे किंवा प्रमाणित समाजांनुसार विशिष्ट समाजांशी जोडल्या गेलेल्या कबाब-बिर्याणी खाण्यापासून ते पुरणपोळी-मोदकाचा आस्वाद घेणे वगैरे ट्रेंडी मानल्या जाणाऱ्या गोष्टी एन्जॉय करणे आता सर्वसामान्य मध्यमवर्गीय मंडळींच्याही आवाक्यात आले आहे.

पण या अर्थनिष्पत्तीच्याही पुढे जाऊन काही महत्त्वाच्या प्रश्नांना नवीन पिढी कशी दिशा देईल, हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. अनेक शक्यता दाखवता येतील. कदाचित, या वाढत्या क्रयशक्तीमुळे सणांची व धार्मिक उत्सवांची गणिते बदलतील व नवे पायंडे पडतील. कदाचित या पायंडय़ामुळे सार्वजनिक पातळीवर साजऱ्या होणाऱ्या सणांचे औचित्य केवळ रमझानच्या दिवसात भेंडीबाजारात जाऊन कबाब खाण्यापुरते किंवा शोभायात्रांतून पारंपरिक पोशाखात मिरवण्यापुरतेच मर्यादित राहील. या सामाजिक एकत्रीकरणातून धार्मिक व सांस्कृतिक राजकारणाच्या व समाजकारणाच्या भिंती तोडून व्यापक उदारत्वाची कास धरण्यास भाग पाडण्याचे सामथ्र्य या पायंडय़ांमध्ये आहे. आपापल्या वैयक्तिक श्रद्धा व विचारप्रणाली यांविषयीचा चिकित्सक विवेक जागृत करून किमान समता-बंधुता या मूल्यांचा अंगीकार होऊन जातिभेदाच्या किंवा धर्मभेदाच्या भिंती पाडून टाकण्यासाठी नवी पिढी पुढाकार घेईल अशी अपेक्षाही यानिमित्ताने करता येईल. शिवाय खाण्यापिण्याच्या बाबतीत दिसून येणारा सलोखा तेवढय़ापुरता मर्यादित न राहता तो वैचारिक सहिष्णुतेला आणि मोकळ्या संवादासाठी पूरक ठरावा. आणि हे सगळे घडण्यासाठी आवश्यक असलेली मूल्यव्यवस्था राबवणारी शिक्षणपद्धती सरकारी पातळीवरून राबवेल का, हा मूळ प्रश्न आहे. सण साजरे करताना आणि संस्कृतींचे ध्वज उत्साहाने व अभिमानाने नाचवताना या प्रश्नांचा गांभीर्याने विचार केला आणि त्यावर सकारात्मक उत्तरे शोधली, तर सण-उत्सव-मिरवणुकी आदींतून एकत्र येण्याला काही उचित व चांगला अर्थ लाभेल. अन्यथा रमझानपासून ते दिवाळीपर्यंत धर्म आणि पावित्र्याच्या नावाखाली साजऱ्या होणाऱ्या या असंख्य उत्सवांचे अस्तित्व बेशिस्त झुंडशाहीहून वेगळे उरणार नाही!

हेमंत प्रकाश राजोपाध्ये rajopadhyehemant@gmail.com