प्रख्यात चित्रकार एस. एम. पंडित यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. त्यानिमित्ताने त्यांच्या कलाकीर्दीचे विवेचन करणारा चित्रकार वासुदेव कामत यांचा खास लेख..
सर ज. जी. कला महाविद्यालयात १९७२-७३ साली प्रथम वर्षांत शिकत असताना मौखिक परीक्षेत आमच्या प्राध्यापकांनी मला प्रश्न विचारला, ‘तुमच्या आवडत्या काही चित्रकारांची नावे सांगा.’ माझ्या सदसद्विवेकबुद्धीला स्मरून मी नावे सांगू लागलो. ‘चित्रकार दीनानाथ दलाल, एस. एम. पंडित, मुळगांवकर, पी. सरदार..’ वगैरे. प्रश्नकर्त्यां सरांनी मला मधेच रोखले आणि म्हणाले, ‘हे सर्व कॅलेंडर पेंटर्स आहेत. एक वेळ दीनानाथ दलाल चालतील. आर्टिस्ट्सची नावे सांगा.’ मी ‘अं.. अं..’ करीत मूक झालो. क्षणभर वाटले की, अमुक अमुकच ‘आर्टिस्ट’ आहेत आणि अमुक अमुक नव्हेत, हे आता ठळक विभाजन झाले आहे की काय? त्यावेळी एस. एम. पंडित हे केवळ कॅलेंडर पेंटर म्हणून ‘आर्टिस्ट’ या श्रेणीत न बसणारे आहेत, असे जे सुचवले गेले ती बोच मला आजही जाणवत आहे. आज या कलाक्षेत्राचा व्यापक विस्तार अनुभवताना वासुदेव गायतोंडे, प्रभाकर बर्वे, प्रभाकर कोलते सर यांची चित्रे ज्या उंचीने मला अत्यंत आवडतात, त्याच माझ्या मनातली एस. एम. पंडितांच्या चित्रांची गोडी कांकणभरही कमी झाली नाही की ओसरली नाही.
आपल्याकडील एका मोठय़ा चित्रकाराने ‘रविवर्मा हे आर्टिस्ट नव्हतेच,’ असे विधान केले होते. परंतु रवींद्रनाथ टागोर यांनी मात्र चित्रकार राजा रविवर्माची कलाश्रेष्ठता ठरविताना लिहिले आहे की, ‘एकेकाळी आमच्या घरातील भिंतींवर पाश्चात्त्य चित्रांच्या प्रती टांगल्या जात, त्या जागी राजा रविवर्माच्या लिथो प्रिंट्स लावल्या गेल्या.’ त्यांच्या चित्रांची वाहवा स्वामी विवेकानंदांनीदेखील केली होती. इथे रविवर्मा यांचा उल्लेख करण्याचे विशेष कारण म्हणजे एस. एम. पंडितांसारखे काम करणाऱ्या चित्रकारांची नाळ त्यांच्याशी जोडली गेली आहे, हे या क्षेत्रातले अभ्यासक जाणतात. राजा रविवर्मा यांची चित्रे केवळ संस्थानिकांच्या महालांत लावली गेली नाहीत, तर भारतातील सर्वसामान्य नागरिकांच्या घरांत आणि देवघरांत त्यांना स्थान मिळाले. त्यांची चित्रे सर्वसामान्यांच्या हृदयात अग्रक्रमाने विराजमान होऊन राहिली. तशीच कॅलेंडरच्या माध्यमातून एस. एम. पंडितांची चित्रेही सर्वसामान्य माणसांच्या घराघरात पोहोचली. आणि या सामान्यजनांमध्ये पंडितांनी चित्रकलेची रसिकता निर्माण केली, हे कुणीही नाकारू शकत नाही.
दोन वर्षांपूर्वी राजा रविवर्मा यांच्या जीवनावर आधारित ‘रंगरसिया’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याच्या गुणवत्तेवर किंवा कथानकावर अधिक भाष्य न करता मला त्यात आवडलेली एक गोष्ट इथे मुद्दाम नमूद करावीशी वाटते. समाजातील उच्च-नीचतेच्या भेदाने पछाडलेला दलित समुदाय राजा रविवर्माकडे येऊन कृतज्ञता व्यक्त करतो की, त्यांना कधी मंदिरप्रवेश करून देवदर्शन घेता आले नाही; परंतु रविवर्माच्या देवादिकांच्या चित्रांनी त्यांना प्रकट देवदर्शन घडले! ही घटना ऐतिहासिक की काल्पनिक, यापेक्षाही ती तत्कालीन वस्तुस्थिती आहे, हे खरे. एस. एम. पंडितांचेही असेच कलाक्षेत्राला फार मोठे योगदान आहे. त्यांनी कॅलेंडरसाठी चित्रे काढली म्हणून ते कॅलेंडर पेंटर आहेत, अशी श्रेणीसूचकता दर्शविण्यापेक्षा त्यांनी कॅलेंडरला उच्च असा कलात्मक दर्जा मिळवून दिला होता असे म्हणावे लागेल.
एखादी कलाकृती कलाकार निर्माण करतो तोपर्यंत ती त्याची असते. परंतु त्या चित्रावर ज्यावेळी पूर्णत्वाची स्वाक्षरी उमटते तिथे त्या चित्राची कलाकाराशी असलेली नाळ तुटते आणि ती कलाकृती स्वतंत्रपणे जगू लागते. तिचा प्रत्यक्ष संबंध समोर उभ्या असलेल्या प्रेक्षकाशी, रसिकाशी किंवा समीक्षकाशी येत असतो. आता या परस्परभेटीत ती कलाकृती पाहणाऱ्याच्या बुद्धिविलासात किंवा हृदयाला कशा तऱ्हेने स्पर्श करून जाते त्यानुसार तिच्यावरील अभिप्राय ऐकू येऊ लागतात. आणि ही संख्या प्रत्येक कलाकृतीच्या संदर्भात कमी-अधिक असू शकते. तरीदेखील एस. एम. पंडितांच्या चित्रांनी श्रीमंतांच्या भिंतींपासून सामान्यजनांच्या घरातील भिंतींपर्यंत अमर्याद सत्ता गाजविली, हे वास्तव आहे. आजही पंडितांच्या चित्रांबद्दल बोलताना समोरील व्यक्तीच्या चेहऱ्यावर सात्त्विक आनंद जाणवतो.
दृश्यकला क्षेत्रातील नवनवीन आधुनिक प्रयोगांच्या प्रवाहात वास्तववादी शैलीत किंवा यथार्थ शैलीत काम करणारे अनेक कलाकार डळमळू लागत, तिथे एस. एम. पंडित हे दीपस्तंभाप्रमाणे अविचल आणि दूरवर कीर्तीचा प्रकाश देत होते. कॅलेंडरव्यतिरिक्त व्यक्तिचित्रे, पौराणिक तसेच महाकाव्यांवर आधारित विषयांवरील अनेक चित्रे त्यांनी रंगविली. त्यांची संख्या त्यांनी केलेल्या कॅलेंडर्सपेक्षाही अधिक आहे. त्यांच्या चित्रांतील मानवाकृती, त्यांची अ‍ॅनाटॉमी ही पाश्चात्त्य शैलीला जवळची असली तरी भारतीय प्रमाणबद्धता आणि शरीरसौष्ठव सोडून नव्हती, हे विशेष. त्यांच्या चित्रांतील अवकाश, निसर्ग आणि प्रत्यक्ष विषय यांत दैवी आध्यात्मिकता सरमिसळून व्यक्त होत असते.
रंग, रेषा, आकार, रचनाकुशलता ही चित्रकलेतील मूलभूत तत्त्वे त्यांनी कधीच डावलली नाहीत. उलट, या सर्व मूलभूत तत्त्वांमध्ये आध्यात्मिकता ओतप्रोत सामावलेली असे. शकुंतला पत्रलेखन, विश्वामित्र-मेनका, रामायण-महाभारतातील अनेक प्रसंग आदी चित्रे ही जणू एस. एम. पंडितांची ओळख (identity) ठरली. पुराणकथेतील मेनका प्रत्यक्षात मात्र प्रथम पंडितांच्याच कॅनव्हासवर उतरली असे म्हटल्यास अतिशयोक्त ठरू नये, इतकी त्या चित्रात वास्तवता आहे. त्यांच्या चित्रातले ‘वास्तव’ ऐतिहासिक चित्रांना दैवी साज चढवते, तर पौराणिक विषयांवरील चित्रांमध्ये ऐतिहासिक वास्तवतेचा भास निर्माण करते.
जलरंग, विशेषत: पारदर्शक-अपारदर्शक जलरंग- टेंपेरा यांच्या मिश्र माध्यमात ललितपूर्ण अभिव्यक्तीची सुरुवात पंडितांनी केली. पुढे अनेक कलाकारांनी पोस्टर कलर्स आणि जलरंगांचे मिश्रण करून चित्रे रंगविण्याचे अनुकरण केले. तैलरंग हेही माध्यम अत्यंत कुशलतेने पंडितांनी हाताळले.
मनात एखादी कल्पना सुचली की त्वरित समोर असलेल्या कोणत्याही कागदावर पेन्सिल किंवा जवळ असलेल्या बॉलपेनने ते स्केच करू लागत. त्यांच्या चित्रातला एखादा आकारदेखील अनेक रेषांनी जणू त्रिमित स्वरूप धारण करू लागे. कधी कधी चित्रातील विषयाच्या रचनेला कागद अपुरा पडला तर त्या कागदाला जोडून दुसऱ्या कागदावर ती रेषा धावू लागे. त्यांची अशी अनेक स्केचेस संग्रहित आहेत. एकेका विषयाकरिता त्यांनी अनेक स्केचेस केली.. आणि प्रत्यक्ष चित्रात आणखीन बदल होत कलेच्या पूर्णत्वाचे दर्शन घडे.
त्यांची व्यक्तिचित्रे प्रत्यक्ष समोर बसून काढलेली आहेत, तसेच फोटोवरूनदेखील केलेली असली तरी ही चित्रे केवळ फोटोंचे अनुकरण नसून त्यांना व्यक्तिचित्रणाचा उच्च कलात्मक दर्जा आहे.
त्यांच्या जलरंगात जसे पारदर्शक-अपारदर्शक रंगलेपन हे संतुलित असेच असे, तसेच तैलरंगांतही पारदर्शक-अपारदर्शक रंगलेपन ते अत्यंत कुशलतेने हाताळीत. माध्यमाचे गुण-अवगुण अनुभवसिद्ध असल्याने कॅनव्हासची क्षमता, रंगांमधील ऑइलचा अंश आणि मिश्रणात त्याची उचित आवश्यकता याविषयी ते काम करताना अत्यंत जागरूक आणि सजग असत. रंगलेपनातील अनेक थर रचताना तेलाचे आवश्यकतेनुसार प्रमाण वाढवणे, अगोदरचा थर पूर्ण सुकला असल्याची खात्री करून घेणे, अशा सावधानतेमुळे त्यांची चित्रे आजही तजेलदार आणि सुबकता राखून आहेत.
एस. एम. पंडित आपल्या चित्रांतील व्यक्तिरेखांसाठी मॉडेलचा वापर करीत होते का, असा प्रश्न त्यांना अनेकदा विचारला जाई.) त्यांच्या चित्रांतील मनुष्याकृतींचा अचूकपणा, भावदर्शन आणि त्यातली वस्त्रप्रावरणे यामुळे हा प्रश्न सहज कुणाच्याही मनात येऊ शकतो. परंतु त्यांची रेखाटने पाहिली असता हे जाणवत नाही. पंडितजी स्वत:च सांगायचे, की चित्र काढण्यापूर्वी ध्यानस्थ अवस्थेत तो प्रसंग त्यांच्या डोळ्यांपुढे तरळू लागे आणि मग ते चित्र भराभर कागदावर किंवा कॅनव्हासवर आकार घेऊ लागे.
विवेकानंद स्मारकासाठी त्यांनी रंगवलेली माँ शारदा देवी, गुरू रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद ही अद्भुत व्यक्तिचित्रे आहेत. स्वामी विवेकानंदांचे उभे व्यक्तिचित्र हे कोणत्याही छायाचित्राचेील्ल’ enlargement नाही. ते पूर्णपणे त्यांनी आपल्या कल्पनेतून साकारलेले व्यक्तिचित्र आहे. स्वामी विवेकानंदांच्या संन्यस्त व्यक्तिमत्त्वाला साजेसा परिवेष हा एका कलाकाराने चढवलेला आहे, हे फारच थोडेजण जाणून असतील. त्यांची व्यक्तिचित्रे असोत किंवा प्रसंगचित्रे असोत- त्यातला प्रकाश पाश्चात्त्य चित्रांप्रमाणे थिएट्रिकल नव्हता. आकाशात ढग जमा झाले असता जशी प्रकाशाची तीव्रता ओसरते, तो परिणाम पंडितजींच्या चित्रांतून आपणास दिसतो. प्रत्येक आकारांची बारेषा कधी तीक्ष्ण, तर कधी अस्पष्ट होत त्रिमित रूप धारण करते. चित्राच्या चौकटीत जेव्हा एक व्यक्ती असते त्यावेळी ते पोट्र्रेट म्हणून आपण पाहतो; परंतु ज्यावेळी एकापेक्षा अधिक व्यक्ती त्या चौकटीत येतात त्यावेळी त्या चित्रात विषयाचा प्रवेश होतो. त्यामुळे चित्र आकार घेत असताना रंग, रेषा, आकार, रचना यांचा जसा विचार करावा लागतो, तसेच त्या प्रसंगचित्रात कोणता विषय अभिव्यक्तहोत आहे त्या संरचनेचाही विचार कलाकाराला करावा लागतो. कारण या रचना-कुशलतेच्या दोन्ही अंगांनी प्रेक्षकाची नजर चित्रातून प्रवास करीत असते. ही गुणवत्ता एस. एम. पंडितांच्या चित्रांतून परिपूर्णरीत्या होती.
वास्तववादी शैलीत भारताबाहेर पाश्चात्त्य जगात जसे अमर्याद काम झाले आहे, तसे आपल्याकडे संख्यात्मक मात्रेने कमी असेल कदाचित; परंतु आपल्याकडील साहित्य आणि व्यक्तिरेखा यांच्यावर आधारित प्रसंगचित्रे वा संकल्पना चित्रे करण्याकरिता मोठाच खजिना आहे. आपल्याकडील अनेक चित्रकारांनी त्यावर काम केले आहे. त्यात एस. एम. पंडितांच्या कलानिर्मितीचे मोठे योगदान आहे. परंतु ही निर्मिती अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने करण्याची परंपरा आणि क्षमता कलाक्षेत्र आज गमावून बसले आहे, ही अत्यंत दुर्भाग्यपूर्ण बाब आहे. ही क्षमता चटकन् ठरवून येत नसते. त्याकरिता अनेक वर्षांचा अभ्यास आणि सराव आवश्यक आहे.
आज कलेच्या आधुनिकीकरणात अशा ऋ षितुल्य कलाकारांच्या चित्रांना जेव्हा कुणी केवळ अ‍ॅकेडमिक श्रेणीत ढकलतो तेव्हा एस. एम. पंडितांची मनोभूमिका उन्मेखून मांडावीशी वाटते. ‘जग बदलते आहे म्हणून माझी चित्रे मी बदलावीत असं मला वाटत नाही. दुसऱ्याला आनंद देणं, त्यांना त्यांची दु:खं विसरायला लावणं, हे कलेचं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि मला वाटतं, माझी चित्रं लोकांना आनंद देतात. ते उद्दिष्ट साध्य करतात,’ असे पंडित म्हणतात.
एस. एम. पंडितांनी वास्तववादी शैलीतच संपूर्ण आयुष्यभर काम केले. त्यांच्या व्यावसायिक आणि ‘स्वान्त सुखाय’ अशा दोन्ही प्रकारच्या कलानिर्मितीत परिपूर्ण प्रावीण्य दिसून येते. ‘६ x ८’ फुटांच्या त्यांच्या महाभारतातील युद्धप्रसंगाच्या चित्रातील खोली आपल्याला खूप दूपर्यंत घेऊन जाते आणि पाहणारा स्तिमित होऊन जातो. केवळ चार दिवसांत हे चित्र साकार झाले, हे सांगतानाच ते पुढे म्हणतात की, ‘या चित्रातील चार दिवसांचे काम गत ८० वर्षांची तपस्या, कलेप्रति समर्पण, चिकाटी आणि मेहनत घेऊन साकार झाले आहे!’
पंडितांचे सुपुत्र कृष्णराज पंडित आणि त्यांचा नातू प्रसिद्ध चित्रकार आदित्य चारी यांच्या अथक परिश्रमांमुळे पंडितांच्या कलाकृतींचा भव्य संग्रह आपणास पुन्हा पाहावयास मिळतो आहे, ही त्यांच्या जन्मशताब्दी वर्षांतील पर्वणीच आहे.
वासुदेव कामत – vasudeokamath@gmail.com

narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
Kangana Ranaut Vikramaditya Singh Himachal Pradesh Mandi Loksabha Election 2024
Celebrity Fight: कंगनासमोर राजघराण्यातील वंशजाचे आव्हान; सोनिया गांधींनी केली वाट बिकट
Rohit Sharma Talking about his retirement in the Breakfast with Champions show
रोहित शर्मा कधी म्हणणार क्रिकेटला अलविदा? हिटमॅनने निवृत्तीबाबत केलं मोठं वक्तव्य
Manmohan Singh journey from economic reform face to accidental PM analysis by Neerja Chowdhury
आर्थिक सुधारणांचा शिल्पकार ते ‘अपघाती पंतप्रधान’; निवृत्तीनंतर मनमोहन सिंगांना इतिहास न्याय देईल?