News Flash

रहस्यमय स्त्रीप्रधान कथा

साध्या-सरळ मार्गाने जगू पाहणाऱ्या स्त्रियांची होरपळ त्यांचं जगणं कसं अस करून टाकतं हा या कथांचा केंद्रबिंदू आहे.

‘रेस’ हा कविता शिरोडकर यांचा तिसरा दीर्घकथासंग्रह प्रसिद्ध झाला आहे. ‘शिशिरपर्ण’ आणि ‘आतला कप्पा’ या त्यांच्या आधीच्या दोन कथासंग्रहांइतकाच हा नवा कथासंग्रहही उत्कंठावर्धक आहे. प्रामुख्याने स्त्रीच्या मनोविश्वाशी निगडित असलेल्या त्यांच्या कथांना रहस्याची, गूढरम्यतेची डूब असल्यामुळे ‘रहस्यमय स्त्रीप्रधान कथा’ असं या कथांचं वर्णन करता येईल. शिरोडकर यांच्या आधीच्या दोन कथासंग्रहांपेक्षा या संग्रहातील कथा विषय, आशय आणि शैलीच्या दृष्टीने अधिक परिपक्व वाटतात.

आधुनिक जगात सर्वच क्षेत्रांत वाढलेली जीवघेणी स्पर्धा, त्यातून एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची वृत्ती, त्यामुळे मानवी स्वभावात आलेली निष्ठुरता आणि निगरगट्टपणा, आधीच संवेदना हरवलेल्या चेहऱ्यावरही मुखवटा धारण करणारी धूर्त माणसं, अवतीभवतीचं अविश्वासाचं वातावरण, तरीही एखाद्याला पायदळी तुडवून आपला स्वार्थ साधण्यासाठी घोडय़ांच्या ‘रेस’सारखे बेबंद उधळणारे मानवी घोडे – हे वास्तव या संग्रहातील कथांमधून टिपलं गेलं आहे. साध्या-सरळ मार्गाने जगू पाहणाऱ्या स्त्रियांची होरपळ त्यांचं जगणं कसं अस करून टाकतं हा या कथांचा केंद्रबिंदू आहे. असुरक्षित आणि गूढ वातावरणाचा अंदाज न आल्याने या स्त्रिया फसतात तर कधी त्यातूनही ‘फिनिक्स’सारख्या उभ्या राहतात. परंतु त्यांना भोगावं लागणारं वास्तव विदारक असतं.

‘रेस’ आणि ‘शोबिझ’ या दोन दीर्घकथांमधून तथाकथित ‘सोफिस्टिकेटेड’ जगातील हिंस्र आणि विकृत मानवी स्वभावाच्या मनोवृत्तीवर प्रकाश पडतो. ‘रेस’ कथेत कॉपरेरेट कंपन्यांच्या स्पर्धेत  टिकून राहण्यासाठी आपल्याच कंपनीतील माणसांशी खेळले जाणारे अनाकलनीय डाव निरागस नंदिनीच्या वाटय़ाला येतात, तर ‘शोबिझ’ या दीर्घकथेत त्याच नावाच्या इंग्रजी मासिकाच्या संपादिकेची प्रतिष्ठा कशी उतरणीला लागते हे अनुभवायला मिळतं. ‘रॅली’ या कथेत गरिबांना पैसे वाटून सभेला गर्दी जमवणाऱ्या राजकीय पक्षाच्या खेळीला बळी पडणाऱ्या स्त्रियांचं जीवन आणि त्यापायी त्यांची होणारी परवड पाहायला मिळते. ‘तुटलेले पंख’ या कथेत कॉलेजमधील युवक चळवळीत तरुण नेत्याच्या वलयाला भुलून सर्वस्व गमावणाऱ्या तरुणींची व्यथा सामोरी येते. ‘कधी कधी असंही’ या कथेत सुखी वैवाहिक जीवन भासवणाऱ्या जोडप्याच्या आयुष्यात इतक्या टोकाच्या क्रौर्याची प्रचीती येईल, याची कल्पनाही करता येत नाही. ‘इच्छापूर्ती’ या कथेत कॅन्सरमुळे मरणाच्या दाराशी असलेल्या पतीची पत्नीने त्याच्या मित्राबरोबर लग्न करावं अशी इच्छा असते. ती पुरवताना त्याच्या पत्नीने वठवलेलं नाटक तिच्या व्यक्तिरेखेला एक वेगळीच उंची देऊन जातं.

मानवी स्वभावाचे विविध कंगोरे या कथांमध्ये दिसतात. प्रत्येक कथा वेगळ्या पाश्र्वभूमीवरील असली तरी त्या कथेला साजेसं वातावरण उभं करताना लेखिकेच्या सूक्ष्म निरीक्षणदृष्टीचा आणि कल्पकतेचा प्रत्यय येतो. व्यक्तिरेखांची स्वभाववैशिष्टय़े, नेमके आणि बोलके संवाद, वर्णनातून आणि तपशिलांतून वाढत जाणारी उत्कंठा, प्रत्येक कथेने घेतलेली रहस्यमय वळणं यामुळे कथांमधील रहस्य अधिकाधिक गडद होत जातं. प्रत्येक कथेवर एका तरी मृत्यूचं सावट आहे. मात्र त्यातही वैविध्याची परिमाणं आहेत. व्यक्तिरेखा साकारताना त्यांना मिळालेलं मनोविश्लेषणाचं बळ, अकृत्रिम नाटय़मयता आणि कथानुभव मांडण्याची प्रसन्न शैली यांमुळे दीर्घकथेला लागणारा कॅनव्हॉस मोठा असला तरी त्यातून रेखीव कथाकृती निर्माण होते. चित्रकार ल. म. कडू यांचं प्रतीकात्मक मुखपृष्ठ, सजावट आशयाला साजेसं आहे.

रेस’- कविता शिरोडकर

  • अक्षता प्रकाशन, पुणे,
  • पृष्ठे- १५०, मूल्य- २४० रुपये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2018 5:22 am

Web Title: res book by kavita shirodkar
Next Stories
1 युद्धकैद्याचे युद्धानुभव
2 उदारहृदयी पुरातत्त्वज्ञ!
3 दलित साहित्य चळवळीचे ध्यासपर्व
Just Now!
X