‘सदानंदयात्रा’ या पॉप्युलर प्रकाशनाचे दिवंगत सर्वेसर्वा सदानंद भटकळ यांच्या संकलित लेखसंग्रहात त्यांनी आपल्या सुहृदांच्या रेखाटलेल्या आठवणींपैकी धर्मानंद कोसंबी आणि दामोदर कोसंबी या विद्वान पिता-पुत्रावरील लेख..
धर्मानंद कोसंबी (१८७७ ते १९४७) आणि त्यांचे सुपुत्र दामोदर धर्मानंद कोसंबी (१९०८ ते १९६८) दोघेही प्रकांडपंडित. दोघांनाही त्यांच्या कर्तृत्वामुळे जागतिक कीर्ती मिळाली. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने माझा या दोघांशीही संबंध आला. यामुळे माझे अनुभवविश्व आणि विचारविश्व दोन्ही समृद्ध झाले. प्रथम आपण थोरल्या कोसंबींबद्दल विचार करू. धर्मानंदांना मी पाहिले नाही. माझा या नावाशी संबंध आला तो ‘आचार्य धर्मानंद कोसंबी स्मारक ट्रस्ट’ यामुळे. धर्मानंदांनी आपली शेवटची काही वष्रे महात्मा गांधींच्या आश्रमात घालवली. काही दिवस साबरमती येथे आणि त्यानंतर जीवनयात्रा संपवली ती सेवाग्राम येथे. वर उल्लेख केलेला ट्रस्ट हा महात्मा गांधींच्या सूचनेवरूनच स्थापन करण्यात आला. धर्मानंदांच्या निधनानंतर लगेचच एका प्रार्थनासभेत त्यांनी असा ट्रस्ट व्हावा असे सूचित केले आणि कमलनयन बजाज यांनी दिलेल्या देणगीतून हा ट्रस्ट उभा राहिला. आचार्य काकासाहेब कालेलकर हे प्रथमपासून या ट्रस्टचे विश्वस्त. काकासाहेबांच्या आग्रहावरूनच मी त्या ट्रस्टचा सभासद झालो. आणि बजाज व काकासाहेबांच्या नंतर या ट्रस्टची धुरा मलाच सांभाळावी लागली.
अर्थात या ट्रस्टने फार मोठे काही कार्य केले असे नाही. याचे मुख्य कारण म्हणजे ट्रस्टचा उद्देश हा फार संकुचित होता. भारतातून श्रीलंकेत जाऊन बौद्ध धर्म व पाली भाषा शिकण्यास तयार असलेल्या अभ्यासकांना शिष्यवृत्ती देणे हा मुख्य उद्देश होता. भाषेचे अध्ययन याबाबतीत स्वातंत्र्योत्तर काळात खूपच बदल झाले. स्वातंत्र्यापूर्वी संस्कृत, पíशयन, उर्दू, पाली, अर्धमागधी या सर्व भाषांना फार नसला तरी सेकंड लँग्वेजचा दर्जा असे. मी शाळेत असताना आमच्या शाळेचे एक शिक्षक दातार (त्यांचे पहिले नाव आठवत नाही.) यांचे पाली ग्रामर पॉप्युलरने प्रसिद्ध केल्याचे आठवते. यानंतर मात्र काही वर्षांतच वर उल्लेख केलेल्या सर्व भाषांचे महत्त्व कमी झाले. प्रारंभी एखादा भारतीय विद्यार्थी श्रीलंकेस जायला तयार होत असे. नंतर त्यांची संख्याही आणि एकंदर पाली शिकणाऱ्यांची संख्या इतकी कमी झाली, की ट्रस्टला काही कामच राहिले नाही. तरीही काही वष्रे या उद्दिष्टांना थोडीशी मुरड घालून आम्ही कॉलेजच्या पहिल्या- दुसऱ्या वर्षी पाली शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देत असू. मात्र, नंतर तेही थांबले.
असे जरी असले तरी धर्मानंदांचे जीवन व जीवितकार्य याबद्दल मात्र फारच थोडय़ा लोकांना माहिती आहे, ही एक दुर्दैवाची बाब होय. खरे म्हणजे शालेय पुस्तकांतसुद्धा त्यांची माहिती यावी असे प्रेरणादायी जीवन ते जगले. त्याची थोडीशी माहिती देण्याचा मोह मी आवरू शकत नाही.
धर्मानंद मूळचे गोव्याचे. चिखली या छोटय़ाशा खेडेगावात ते जन्मले. बालपणातच खेडेगावातील मुलांना कुमारवयात आल्यावर जी कामे करावी लागतात- शेतीची किरकोळ कामे, गुरांना सांभाळणे वगरे- ती त्यांच्याही वाटय़ाला आली. शालेय शिक्षण घेण्याचा प्रश्नच नव्हता. कारण अशा खेडय़ात शाळाच नव्हती. लग्न झाले ते चौदा वर्षांचे असताना व तेही त्यांच्या मनाविरुद्ध. वाचनाची खूप आवड. असेच एकदा भगवान बुद्ध यांचे छोटेसे चरित्र वाचल्यानंतर त्यांच्या मनात भगवान बुद्धांबद्दल जास्त जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली. या वयात असतानाच बौद्धज्ञानाची आस इतकी जबरदस्त होती, की त्यासाठी काही करावयास ते तयार होते. मूळ स्वभाव भटकंतीचा.. कोल्हापूर, कोकण, कोचीन इथे ते गेलेच; पण लग्नानंतर आणि एका मुलीचा जन्म झाल्यानंतरही त्यांनी खेडय़ातून पलायन केले. उद्देश एकच- संस्कृत अणि पालीचा अभ्यास आणि बौद्ध धर्माचे अध्ययन. आणि पुढील पंधरा वर्षांत त्यांनी या विषयांवर प्रभुत्व मिळवले. त्यामुळे त्यांना हार्वर्ड विद्यापीठ, लेनिनग्राड येथील शिक्षणसंस्था, कलकत्ता विद्यापीठ, फग्र्युसन कॉलेज- पुणे अशा जागतिक कीर्तीच्या शिक्षणसंस्थांमध्ये अध्यापन करण्याची संधी मिळाली. शिवाय बडोदे संस्थानानेसुद्धा त्यांना सन्मानाने काम करता यावे म्हणून काही काळ शिष्यवृत्ती देण्याची व्यवस्था केली. हे सर्व करीत असताना त्यांनी अपार कष्ट केले. स्वत:च्या कुटुंबाच्या स्वार्थाचा बिलकूल विचार केला नाही. काही काळ त्यांनी रीतसर बौद्ध धर्माचे भिक्षुत्व पत्करले आणि पंधराएक वर्षांनतर ते गृहस्थाश्रमाकडे वळले आणि आपली कौटुंबिक जबाबदारी स्वीकारली. त्यांना तीन मुली व एक मुलगा. या बहुतेकांचे उच्च शिक्षण अमेरिकेत झाले- ही त्यांची पुण्याईच. आपण एक लक्षात घेऊ या, की प्रवासाच्या सोयी आता आहेत तितक्या नसताना या महापुरुषाने उत्तरेत नेपाळ व दक्षिणेत श्रीलंका हे प्रवास अनेकदा फक्त ज्ञानार्जनासाठी केले. अनेकांनी चांगल्या पगाराचे आकर्षण देऊन त्यांच्या आवडत्या विषयावर काम करण्यास त्यांना प्रवृत्त केले. यांतील अनेकांना त्यांनी अव्हेरले. कारण त्यांच्या अपरिग्रहाच्या तत्त्वात ते बसत नव्हते. मला वाटते की, अनेक वेळा त्यांनी त्यांना मिळत असलेल्या मानधनातही कपात करून घेतली. हे अगदी अपूर्वच!
जिज्ञासेपोटी बौद्ध धर्माबरोबरच पाली भाषेचा पाठपुरावा करणारे धर्मानंद यांच्या एकंदर कर्तृत्वाची माहिती सर्वाना व्हावी यासाठी ‘आचार्य धर्मानंद कोसंबी स्मारक ट्रस्ट’ यांच्यासाठी ग्रंथ लिहावा अशी विनंती धर्मानंदांची नात इंद्रायणी सावकार यांना मी केली. त्या ग्रंथाचे नाव- ‘बाळा बापू’! इंग्रजीतही ‘A man from the sun’ या नावाने तो प्रसिद्ध झाला आहे. स्वत: आचार्य धर्मानंदांनी लिहिलेले निवेदन व खुलासा असे स्वरूप असलेल्या या आत्मचरित्रपर छोटय़ाशा पुस्तिका प्रसिद्ध झाल्या आहेत. आणि त्यांवर आधारित ‘धर्मानंद’ या नावाने एक चरित्रग्रंथ लिहिला आहे. स्वत: आचार्याच्या नावावर सतरा ग्रंथ प्रकाशित आहेत. त्यांतील काही ग्रंथांच्या आवृत्त्याही निघाल्या आहेत.
एक बाब सांगावयाची राहिलीच. आचार्य धर्मानंदांचा जीवनप्रवास हा बौद्ध धर्म, पाली भाषा एवढाच नसून जैन धर्माच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यासही त्यांनी केला आहे. त्यांचा जागतिक स्तरावर अनेक भाषातज्ज्ञ, तत्त्वज्ञानी व्यक्ती आणि राजकारणी यांच्याशीसुद्धा परिचय झाला. पं. जवाहरलाल नेहरू यांच्या एका लेखामुळे रशियातील समाजवादी सरकार व त्यांचे कार्य याकडेही त्यांचे लक्ष गेले. त्यामुळे लेनिनग्राडची वारी त्यांनी केली आणि अखेरच्या पर्वात ते गांधींच्या विचारसरणीने प्रभावित झाल्यामुळे देशकार्य करावयास प्रवृत्त झाले. शिरोडय़ाच्या मिठाच्या सत्याग्रहात ते सहभागी होते. पण राजकारण हा त्यांचा प्रांत नव्हता.
आपले इहलोकीचे कार्य संपले असे आपल्या मनाला पटवून त्यांनी अन्नाचा त्याग केला आणि आपले जीवन संपविले. जिज्ञासा, जिद्द, एखाद्या विषयाची उत्सुकता, इच्छाशक्ती या गुणांचा मिलाफ असलेले हे एक अजब आणि अद्वितीय व्यक्तिमत्त्व होते.
*******
दामोदर धर्मानंद कोसंबी ऊर्फ डी. डी. कोसंबी यांच्या कर्तृत्वाचे मोजमाप करताना ‘बाप से बेटा सवाई’ हा शब्दप्रयोग वापरण्यात येतो. मात्र, मला हे अत्यंत अयोग्य आहे असे वाटते. आचार्य धर्मानंद यांना काहीही औपचारिक शिक्षण नसताना पंधराएक वर्षांत पांडित्याचे शिखर गाठता आले, तर डीडींना हार्वर्ड विद्यापीठासारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या शिक्षणसंस्थेत अध्ययन करता आले. शिवाय आचार्य धर्मानंदांची पुण्याई आणि जागतिक स्तरावर असलेला दबदबा या दोन्ही गोष्टी त्यांच्या पाठीशी होत्याच ना! तर त्या दोघांची तुलना करणे हे दोघांवर अन्यायकारक आहे. आणि खरे म्हणजे अशी तुलना करण्याची आवश्यकताही नाही. असो.
माझी डीडींशी प्रथम भेट झाली त्यावेळी माझे वय सोळा-सतरा वर्षांचे होते. बालपणापासून घराबाहेर भटकंती करणे हे मला प्रिय. बालपणात मुंबईतल्या मुंबईत काका, आत्या व इतर नातेवाईकांकडे राहण्यासाठी मी जात असे. या गोष्टीला आईने प्रोत्साहनच दिले. वडिलांच्या संमतीचा प्रश्नच येत नव्हता. कारण त्या काळात त्यांना व्यवसाय एके व्यवसाय- एवढेच माहीत. चोवीस तास, सात दिवस- असे वर्षांनुवष्रे कष्ट केल्यामुळे ‘पॉप्युलर’ स्थिरावले. त्यांना कौटुंबिक बाबींकडे लक्ष देण्यास त्यामुळे फुरसतच नसे. नंतर हायस्कूलमध्ये असताना मुंबईबाहेर साकोरी, महाबळेश्वर, सज्जनगड अशा अनेक ठिकाणी मी गेल्याचे आठवते. असेच एकदा पुण्याला गेलो असताना माझी डीडींशी पहिली भेट झाली. डीडींचे वाचन अफाट. त्यांचा अभ्यासाचा विषय गणित असला तरी छंद खूप. हार्वर्डमध्ये असताना त्यांनी लॅटिन व ग्रीक भाषांचा अभ्यास केला होता. भारतात परत आल्यावर प्राचीन भारतीय संस्कृती, उत्खनन, प्राचीन नाणी, आपल्या भारतातील वेगवेगळ्या लोकांचे जीवन अशा अनेक विषयांत त्यांना रस होता. या सर्व विषयांवरील नवीन नवीन साहित्य जसजसे उपलब्ध होत असे, ते सर्व पॉप्युलर बुक डेपोतून ते विकत घेत. त्या काळात बहुतेक सर्व साहित्य आठवडय़ातून एकदा इंग्लंडहून येत असे आणि त्यात रस असलेल्या विषयांची पुस्तके आम्ही आमच्या रसिक ग्राहकांसाठी राखून ठेवत असू. मी पुण्याला जायचे ठरविले तेव्हा वडिलांनी माझ्याकडे एक बंडल डीडींसाठी दिले. मला वाटते, त्या वेळेला भांडारकर इन्स्टिटय़ूट रोड येथे डीडी राहत होते. ‘त्यांना भेटायचे म्हणजे अगदी सकाळच्या प्रहरी!’ असे त्यांनी बजावून सांगितले. मी त्यांच्या बंगल्यावर पोहोचलो तेव्हा ते आपली सकाळची रपेट करण्यास नुकतेच गेले होते. तेही त्यांच्या घराजवळ असलेल्या टेकडीवर. मी त्या दिशेने निघालो. खरे सांगायचे म्हणजे अशी टेकडी चढण्याची माझी पहिलीच वेळ. आणि म्हणून डीडी ज्या वेगाने टेकडी चढत होते त्या वेगाने जाणे कठीण होते. शेवटी आमची गाठ पडली. नवीन पुस्तक मिळण्याचा आनंद त्यांना झाला होता. या छोटय़ाशा भेटीतच माझ्यावर त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्त्वाची छाप पडली.
यानंतर चार-पाच वर्षांत मी ‘पॉप्युलर’मध्ये रुजू झालो. माझी जागा काऊंटरजवळच.. जिथून अशा महत्त्वाच्या ग्राहकांची सेवा करणे सोपे जात असे- तिथे होती. डीडींच्या भाषाप्रभुत्वाबद्दल त्यावेळी मला जास्त जाणीव झाली. त्यावेळेला डीडी भारतीय विद्याभवनसाठी सुभाषितांचे संपादन करत होते. शिवाय हार्वर्ड विद्यापीठासाठी काही पुस्तकांचे संपादनही. ‘पॉप्युलर’मध्ये अनेक रसिक, वाचक, संशोधक नियमितपणे येत असत. त्यांत सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये अध्यापन करणारे युरोपियन प्राध्यापक यांच्याशी त्यांचा जर्मन, इटालियन भाषेत संवाद होत असे. डीडींना किती भाषा येतात याबद्दल मला नेहमीच कुतूहल वाटत असे.
आठवडय़ातून एकदा तरी त्यांची फेरी आमच्याकडे होत असे. एखादे वेळी कोकणी किंवा बहुधा मराठीतच आम्ही बोलत असू. या वारंवार होणाऱ्या भेटींमुळे त्यांच्याबद्दल वाटणारा आदर वाढतच गेला. तसा त्यांचाही माझ्यावर, माझी पत्नी निर्मला (तिनेही व्यवसायाच्या थोडय़ा जबाबदाऱ्या अंगावर घेतल्या होत्या.) हिच्यावर लोभ. आमच्या घरी दोन-तीनदा ते पाहुणचार घ्यायलाही आले होते.
ते आपल्या विषयांवर आणि त्यांनी केलेल्या संशोधनावर अनेक आंतरराष्ट्रीय नियतकालिकांत लेख लिहीत. त्यांच्या संशोधनाचा एक भाग भारताच्या पश्चिम किनाऱ्यापासून मध्यभागी पठारावर जाण्यासाठी पूर्वी वापरलेले मार्ग यांचा शोध घेणे असा होता. मुंबई, वसई, ठाणे इथून जुन्नर इथे जाण्यासाठी मेळघाट व माळशेज घाट वापरले जात. आपल्याला माहीत असलेला कर्जतचा बोरघाट नंतर तयार झाला. आताही पूर्वी वापरत असलेले घाट आपण वापरू शकू, अशी त्यांची भूमिका होती. एकदा त्यांनी टूम काढली. मला म्हणाले, ‘येतोस का माझ्याबरोबर?’ डीडी, मी, निर्मला आम्ही तिघे गाडीने कल्याणमाग्रे त्या मेळघाटाच्या पायथ्याशी गेलो. त्यानंतर काही मल पायपीट. या सर्व प्रवासात त्यांनी अनेक गोष्टींबद्दल माहिती दिली व त्यांच्या संशोधनकार्याची थोडीशी चुणूक मला दिली. त्यांचे मुख्य प्रमेय होते ते म्हणजे आपण इतिहासाचा अभ्यास करताना जो दृष्टिकोन घेतो तो चुकीचा आहे. आपण फक्त राजे व राजवटी आणि त्यांनी केलेले कार्य यांचीच नोंद घेतो. परंतु जनता, रयत, सामान्य लोक तसेच त्या- त्या काळात अनेक तंत्रज्ञान अवगत असलेल्या व्यक्ती यांच्या दृष्टीने इतिहासाची मांडणी केली पाहिजे. त्यांच्या या विचारांचे आणि संशोधनाचे फलित म्हणजे ‘Introduction to the Study of Indian History’ हा ग्रंथ होय. या ग्रंथाच्या प्रकाशनानंतर डीडींचे विचार व प्रमेये सर्वमान्य झाली आहेत. या पुस्तकाचा भारतातील अनेक भाषांत अनुवाद झाला आहे.
या प्रकाशनाचा करार करताना त्यांनी त्यांच्या विनंतीनुसार भारताबाहेरील विक्रीचे हक्क स्वत:कडेच राहावेत अशी विनंती केली. ‘पॉप्युलर’मध्येसुद्धा पुस्तकांची जागतिक बाजारपेठ गाठण्याची क्षमता फारच कमी होती. म्हणून आम्ही ही विनंती मान्य केली. किरकोळ बदल करून हाच प्रबंध ‘The Culture and Civilization of Ancient India’ या नावाने लंडनमध्ये प्रकाशित केला. आम्ही प्रकाशित केलेल्या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या आम्हाला प्रसिद्ध कराव्या लागल्या आणि या पुस्तकामुळे प्रकाशक ही ‘पॉप्युलर’ची प्रतिमा निश्चितच उज्ज्वल झाली.

lokrang
गीतांचा भीमसागर…: चळवळीची गाणी…
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..
mercury retrograde in aries negative impact on these zodiac sing budh vakri
एप्रिलमध्ये बुध करणार वक्री चाल; ‘या’ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार संकट? आर्थिक हानीची शक्यता