News Flash

आत्मलक्षी कविता

कवितेची सुरुवातच माणसाचे रूप वेडेवाकडे करणाऱ्या उरुसातल्या आरशाच्या अत्यंत समर्पक प्रतिमेने होते.

कुठल्याही ललित लेखनातून लेखकाचे आत्मचरित्र डोकावत असते असे म्हणतात. कवितेसारख्या आत्मनिष्ठ साहित्यप्रकाराच्या बाबतीत तर ते अधिकच जाणवते. गणेश आत्माराम वसईकर यांचा ‘मधल्या मध्ये’ हा कवितासंग्रह वाचताना त्यांच्या कवितांतून त्या- त्या कवितेतल्या निवेदकाचे नव्हे, तर या कवीचेच आत्मचरित्र आपण वाचतो आहोत असे वाटत राहते. या कवितासंग्रहातील पहिलीच कविता ‘१० मिन्टं’ ही प्रदीर्घ ३० पानांची कविता आहे. कवितेचा निवेदक कामाच्या ठिकाणी वेळ संपण्याआधीच दहा मिनिटे घरी जातो म्हणून त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई होते. निवेदकाचे म्हणणे कोणी ऐकूनच घेत नाहीत. त्याचा विलक्षण संताप होतो. त्याला भरीस घालणारे युनियन लीडर ऐनवेळी नांग्या टाकतात. निवेदकाला अपमानास्पद माघार घ्यावी लागते. ही कविता म्हणजे त्याची घालमेल आणि तगमगच आहे. कवितेची सुरुवातच माणसाचे रूप वेडेवाकडे करणाऱ्या उरुसातल्या आरशाच्या अत्यंत समर्पक प्रतिमेने होते. ती पाहून बालवयातल्या निवेदकाला ‘हे खोटे आहे’ असे ओरडावेसे वाटले होते. प्रौढ वयात त्याच्यावर आरोप ठेवले गेल्यावर त्याला त्याचीच आठवण होते. पण शेवटी हे आरोप स्वत:च मान्य करावे लागण्याची नामुश्की त्याच्यावर ओढवते तेव्हा या प्रतिमेची सार्थता गणेश वसईकर एक कवी म्हणून अधोरेखित करू शकले असते. पण ते तसं करत नाहीत. साहेबापुढे लाचारी पत्करावी लागण्याच्या पाश्र्वभूमीवर ते दर्यावर राजासारखे जगणाऱ्या बापजाद्यांचे स्मरण दूरान्वयानेच करतात. मॅनेजरविरुद्ध मनात येणारा उद्रेक व्यक्त करतात खरे, पण मॅनेजरचे खलनायकत्व स्पष्ट करणारे किंवा स्वत:चे निरपराधित्व सिद्ध करणारे तपशील वाचकांना माहीतच आहेत असे ते गृहीत धरतात. मॅनेजरबद्दल मनात येणारे हिंसक विचार आपण कृतीत आणू शकत नाही, हे मात्र ते विस्ताराने सांगतात. कदाचित या सर्व दु:स्वप्नवत कालखंडाचा आपल्या कवितेजवळ- म्हणजे पर्यायाने स्वत:जवळच कबुलीजबाब देणे, ही कवीची आंतरिक निकड असावी. म्हणूनच या कवितेत ना आत्मसमर्थनाची ढाल आहे, ना प्रत्यारोपांची तलवार आहे, किंवा ना कवीपणाची कवचकुंडले परिधान केली आहेत. त्यातूनच त्यांचा सच्चेपणा आतून जाणवत राहतो. हा सच्चेपणाच गणेश वसईकरांच्या कवितांना ऑथेंटिक करतो, त्यातले अनुभवविश्व वाचकांना प्रतीत करतो.
अंतर्मुखता हा या संग्रहातील सर्वच कवितांचा स्थायीभाव आहे. त्यामुळे बाहेरच्या गोष्टीकडे पाहतानाही ते पुन: पुन्हा स्वत:च्या आत डोकावतात. आपली मुलगी केवळ रविवारीच अनाथ नसते, असे म्हणताना त्यांना सलत असते ते आपले केवळ रविवारपुरते तिचे आई-पप्पा असणे! किंवा सोललेल्या बोकडाच्या बॉडीसमोरच्या दृश्याचे वर्णन करताना ते मनातल्या मनात चाचपडत राहतात आपल्या खिशातले रिकामे पाकीट. पण असे चाचपडणे पाकिटातल्या पैशांसाठी नसते. त्यांची प्रार्थना असते- ‘मला शब्द सापडोत.. मला अर्थ सापडोत.’ कारण मुळात त्यांना प्रतीक्षा असते ती कवितेच्या झुळुकीची. मग ती पूर्ण असो की अपुरीही!
चिमण्यांचा आवाज ऐकू आला असे वाटून अत्यंत उत्साहित होऊन बायकोला बोलावल्यावर ती तो कोंबडय़ांच्या पिल्लांचा कलकलाट आहे असे सांगून किचनकडे वळते तेव्हा कवीला वाटते- ‘तिने मागे वळून पाहिलं नाही, नाही तर तिलाही दिसलं असतं चिमण्यांच्या प्रतीक्षेतलं माझ्या आत्म्याचं घरटं, जे हेलकावतं पूर्ण कवितेच्या झुळुकीनं.’ किंवा तिच्या अपुरेपणात आपल्या कवितेचे अपुरेपणही ते जाणतात. ‘भेलकांडणारे वर्तमान’ त्यांना कवितेत पकडायचे असते; पण ते जमले नाही तर ते स्वत:ची समजून घालतात- ‘माझ्या कवितेला पकडता येत नाहीये धावती गाडी, जाऊ द्या हो आजकाल कविता वाचतंय तरी कोण..’ बिघडत चाललेल्या परिस्थितीचा आपणही भाग होत चाललो आहोत हेही त्यांना जाणवते. टय़ूशन लावली नव्हती तरी आपण द्वेष करायला शिकतो, मैत्रीपासून दूर जातो, चंगळवादात सामील होतो. पण पत्कराव्या लागणाऱ्या या नव्या जीवनमूल्यांबाबत आतून वाटणारी चीड ‘थुंकू फुंकू हगू एकमेकांवर’ अशा शब्दांतून तिखटपणे व्यक्त होते. कधी कधी परिस्थितीच्या प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी परमेश्वराकडे पाहिले जाते. पण त्यानेही निराश केल्यावर ते प्रार्थना करतात- ‘तू नामशेष हो प्रार्थनेतून प्रार्थनेसकट.’ आणि मग जवळ उरते ती कविताच! कोणत्याही काळात कवीला संताप आला पाहिजे असे कवीला वाटते. पण असा संताप अनावर झाल्यावरही कवी हातात पेन घेतो, सुरा नाही घेत- हे त्यांना माहीत आहे. मग अशा संतापाचे वांझोटेपण जाणवून ते वैतागाने म्हणतात की, ‘जवळ खुर्ची, टेबल, कागद, पेन आणि वेळच वेळ असला तरीसुद्धा मी कविता लिहिणार नाही.’ पण हे एखाद्या प्रेयसीने प्रियकराला ‘मी तुझ्याशी बोलणार नाही’ असे सांगावे तसे आहे. मी कविता लिहिणार नाही, हे सांगण्यासाठीसुद्धा ते कविताच लिहितात. कारण त्यांच्या मनात कविताच आहे! त्यांच्या ‘पाऊस पब्लिक’ कवितेत जाहिरातीतला गुडघाभर पाण्यातून सायकल चालवणारा मुलगा पाहून त्यांना वाटते, की या शहरात पाऊस पडायचं काहीच कारण नाही. पण पाऊस पडतोय मुलाच्या इच्छेला धरून आणि त्या कवितेच्या शेवटी ते म्हणतात- ‘मलाही प्रतीक्षा आहे मी लहानपणी पाण्यात सोडलेल्या होडीची, आणि मला दिसते ती लख्ख मुलाच्या सायकलीच्या मागोमाग जाहिरातीबाहेर..’ या संग्रहातल्या शेवटच्या कवितेची शेवटची ओळ आहे- ‘तरीसुद्धा मी कविता लिहिणार नाही.’ पण या संग्रहाबाहेरही गणेश आत्माराम वसईकरांच्या येऊ घातलेल्या कविता लख्ख दिसत आहेत आणि त्यांची प्रतीक्षाही आहेच.
‘मधल्या मध्ये’- गणेश आत्माराम वसईकर,
लोकवाङ्मय गृह प्रकाशन,
पृष्ठे- ८८, किंमत- १२० रुपये
हेमंत गोविंद जोगळेकर  hemantjoglekar@yahoo.co.in

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2016 1:53 am

Web Title: review of marathi poem book written by ganesh atmaram vasaikar
Next Stories
1 दखल : स्वातंत्र्योत्तर पिढीचे आत्मरंग
2 अटलांटिक सनद भारतीय स्वातंत्र्याची दुसरी बाजू
3 ‘सर्न’द्वारी नटराज!
Just Now!
X