प्रसारमाध्यमांची सहजी उपलब्धता, आधुनिक संगणक तंत्रज्ञानामुळे आपले लेखन त्वरित लोकांपुढे नेण्याची सोय, त्यातून मिळणारी तात्काळ प्रसिद्धी, तंत्रज्ञानामुळे पुस्तक प्रकाशनात अचंबित करणारे झालेले बदल, प्राप्त झालेला वेग या बदलांबरोबरच कविता सर्वत्र पोहोचविण्याच्या उद्देशाने काही कवींकडून कवितावाचनाचे केले जाणारे कार्यक्रम, त्यात वाचल्या/ गायल्या जाणाऱ्या लोकप्रिय कविता.. अशा पर्यावरणात व्रतस्थपणे कविता लिहिणाऱ्यांची संख्या अल्प असणे स्वाभाविक आहे. तरीही अशा सांस्कृतिक पर्यावरणात जो जीवनानुभव प्रत्ययाला आलेला आहे तो आपल्या काव्यविषयक भूमिकेशी प्रामाणिक राहून कवितेतून व्यक्त करणारे काही व्रतस्थ कवी मंडळी आहेतच. याच परंपरेतील सुजाता महाजन या कवयित्रीचा ‘स्वत:तल्या परस्त्रीच्या शोधात’ हा नवा कवितासंग्रह सुमारे ३० वर्षांच्या कालांतराने प्रकाशित झाला आहे. कॉन्टिनेन्टल प्रकाशनाो प्रकाशित केलेल्या या कवितासंग्रहात ७६ कवितांचा समावेश आहे. हेमंत देशपांडे यांची सुबक मांडणी आणि सुप्रिया वडगावकर यांचे काव्यानुभव उत्कटपणे साकार करणारे मुखपृष्ठ, त्यांची आणि हेमंत देशपांडे यांची संग्रहात समाविष्ट केलेली अर्थपूर्ण चित्रे ही या कवितासंग्रहाची वैशिष्टय़े आहेत.
सुजाता महाजन या मोजकेच, परंतु वैशिष्टय़पूर्ण कविता लिहिणाऱ्या ऐंशीनंतरच्या कवयित्री. आतापर्यंत त्यांचे दोन कवितासंग्रह, एक कथासंग्रह आणि अन्य लेखन प्रसिद्ध झाले आहे. मात्र, त्यांचा मूळ पिंड हा कवयित्रीचाच आहे.
आपल्या अस्तित्वाचा शोध हे या कवितासंग्रहातील कवितांचे मुख्य सूत्र आहे. कवयित्रीने विविध पद्धतींनी तो घेतला आहे. अवतीभवतीच्या साध्या घटनांमधून, तिथल्या वरकरणी निर्थक वाटणाऱ्या तपशिलांतूनही कवयित्री हा शोध घेताना दिसते. त्यातून मुख्यत्वेकरून कवयित्रीच्या प्रत्ययाला येते ते भोवतालच्या जीवारण्यातील स्वत:च्या अस्तित्वाचे एकटेपण. या मध्यारण्यात कवयित्रीला स्वत:च्याच सावलीची सोबत उरते. तिला नुसत्या तोंडओळखीच्या माणसांची जगण्यात दाटी झाल्याचा प्रत्यय येतो. संवादात रिकाम्या जागाच उरतात. जगण्यामुळेच मुकेपणा गच्च भरून राहिल्याचा प्रत्यय या शोधात कवयित्रीला येतो.
एकटेपणाच्या या अनुभवाला आणखी एक परिमाण लाभले आहे. मराठीतील बहुतांशी कवयित्रींच्या कवितांमधून साकारणारा एकाकीपणाचा अनुभव हा त्यांच्या अस्तित्वापुरताच, त्यांच्या भावविश्वापुरताच सीमित असल्याचे प्रत्ययाला येते. मात्र, या कवयित्रीच्या कवितांतून व्यक्त होणारा एकाकीपणाचा अनुभव हा इतर व्यक्ती, वस्तुजात, निसर्ग आणि त्यामधील घटक यांच्या संदर्भातदेखील आहे. ही कवयित्री केवळ स्वत:चेच एकटेपण कवितारूपात प्रक्षेपित करीत नाही. तर एकुणातच मानवी एकटेपणाचे, बा पर्यावरणातील विविध घटकांचे एकाकीपणदेखील तिच्या कवितांमधून साकारते. यादृष्टीने या संग्रहातील वयाच्या चाळिशीत स्त्रियांच्या प्रत्ययास येणाऱ्या अनुभवांविषयीच्या कविता विलक्षण चिंतनशील आहेत. या वयात स्त्रीला स्वत:च्याच जगण्याची एक नवी ओळख होते. रात्रीच्या ऐन मध्यावर मेंदूत अराजक निर्माण होते. तिला निरागसपणे मैत्रीसाठी हात पुढे करता येत नाही. अशा संबंधांमागचे सत्ताकारण, अर्थकारण, वासनाकारण आणि त्यातून आलेले शहाणपण यास जबाबदार असते. या वयात कोमल आवाज हिंस्र, चिरका व करुण होत जातो. सर्वच संबंधांत भेगाळलेली जमीन वाटय़ाला येते. फोनवरच्या संभाषणात बोलणारा आणि ऐकणारा यांच्यात कित्येक प्रकाशवर्षांचे अंतर पडत जाते. या संग्रहात व्यक्त होणारा एकटेपणाचा अनुभव केवळ स्त्रियांच्या अस्तित्वापुरताच मर्यादित राहत नाही, तर तो या जीवारण्यातील प्रत्येक व्यक्तीच्या एकटेपणाच्या अनुभवाला जाऊन भिडतो. अध्र्या झोपेने काळवंडलेल्या माणसांवर आवाज आदळत राहतात आणि त्यांची सुख-दु:खे बोन्साय होतात. त्यांच्या विचार-विकारांचे उत्तररात्रीच्या अंधारात खत होऊन जाते. ही माणसे ताजे दु:ख आणि एकाकीपणा वाटून घेतात आणि सामोरी जातात पराभवांच्या रात्रींना. वस्तुमात्रातील आणि विश्वपसाऱ्यातील घटकांचे एकाकीपणही या कवितांमधून मूर्त रूपात साकार झाले आहे. झाडे एकाकी असतात. चांदण्यांमधले आकाश एकाकी असते. हिरवे अंकुरलेले शेतदेखील एकाकी असते. प्रत्येक क्षण एकटा असतो. आणि अंतिमत: समूहस्वरातील, कोलाहलातील एकेकटे आवाजही तसे एकटेच असतात. एकटेपणाची ही जाणीव उत्तरोत्तर तीव्र होत विश्वपसाऱ्यातील सगळ्याच माणसांच्या एकटेपणाला साक्षात करते.
परात्मतेची जाणीव हे आणखी एक लक्षवेधी आशयसूत्र या संग्रहातील कवितांमधून व्यक्त झाले आहे. परात्मता म्हणजे विलगीकरणाची, तुटलेपणाची जाणीव. ही परात्मता, हे तुटलेपण या कवितासंग्रहात दोन प्रकारे व्यक्त झाले आहे. एकतर स्वत:पासूनचे, स्वत:च्या अपरिचित वाटणाऱ्या शरीरापासूनचे तुटलेपण आणि दुसरे भवतालापासूनचे कवयित्रीच्या अस्तित्वाचे तुटलेपण. कवयित्री स्वत:च्या शरीराबाहेर उभी राहून स्वत:चीच वाट पाहत राहते. तिला तिच्या गात्रांतून वाहणारा सूक्ष्म नाद जाणवतो. पण तो ऐकण्याचे धाडस तिला होत नाही. देहावर आश्चर्याचा काटा उभा राहतो. स्वत:शीच स्वत:चा कोणताही संवाद न होता दिवस नसतेपणाने ओसंडून जातो. परकेपणाची ही जाणीव प्राचीन आहे. एकुणातच स्त्रियांच्या संदर्भातील ती अत्यंत दु:खद जाणीव आहे. परके, पोरके होणारे शरीर आपलेच आहे का, असा प्रश्न कवयित्रीला पडतो. या प्रवासात आपण स्वत:त परतून कधी येऊ याची केवळ वाट पाहणेच हाती उरते. भवतालापासूनच्या परात्मतेची जाणीवही तितक्याच तीव्रपणे साकार झाली आहे. किंबहुना, उत्कटता हे या कवितांचे वैशिष्टय़ आहे. संपूर्ण अवकाशात रात्र गप्प बसलेली असते. दिवे आश्चर्याने थिजलेले ठिपके वाटतात. इमारती भयावहपणे गप्प राहतात. आकाश कशाला तरी शिवून टाकल्याचा प्रत्यय येतो. भोवतालच्या या अमानुषपणात शब्द निर्थक असल्याचा भास होतो. चंद्र, सूर्य खरोखरचे आहेत का, भाषा म्हणजे चिन्हांकित वर्णन की स्तब्धता आहे, आपण चालतो आहोत की उभे आहोत, जमीन दुभंगून सामावून घ्यायला सरकते आहे का, असे प्रश्न कवयित्रीला पडतात. येणारी-जाणारी लाट वा ढग, उन्हाचे कवडसे हे सारेच कवयित्रीच्या व्यक्तित्वापासून विलग राहतात. भवतालापासूनचे हे तुटलेपण पाणी, प्रकाश, जमीन यांच्याशी कोणत्या नात्याने आपण जोडले गेलो आहोत, या शोधाच्या जाणिवेतून व्यक्त झाले आहे. यातून अनुभवाला येणारी भ्रमांतरीची जाणीव एका कवितेत विलक्षण उत्कटतेने, एकात्मतेने व्यक्त झाली आहे..‘विजेच्या पाळण्यात, कधी उंच उंच, कधी जमिनीशी, कधी थांबलेल्या पाळण्यात, उलटे होऊन अधांतरी, कधी भोवळ भ्रमांतरी, कधी हातून सुटलेले दोर, कधी स्वत:हून कापलेले!’ एकच एक आशयगर्भ प्रतिमा कवितेचा भावानुभव कसा तोलून धरते याचे ही कविता उत्तम उदाहरण आहे.
भोवतालाकडे, माणसांकडे कवयित्री जीवनविषयक कुतूहलाने पाहत असल्याने या कवितासंग्रहात व्यक्तिलक्ष्यीत्वाचे/ व्यक्तिवेधाचे अनुभवदेखील व्यक्त झाले आहेत. ९२ वर्षांच्या आजीचा भाऊ वारल्याचे दु:ख, पित्याच्या वेगवेगळ्या दु:खावस्था, हुसेन अलीसारख्या स्नेह्यचे दु:ख, एकाकी मृत्यू पावलेली व्यक्ती आणि तिच्या वस्तूंमध्ये भरून राहिलेले दु:ख.. अशा दु:खाच्या अनेक परी इथे व्यक्त होतात. आजीच्या अश्रूंना कोणताच आकार नसल्याचा कवयित्रीला प्रत्यय येतो. तिच्या सांत्वनाचे शब्द निर्थक ठरतात. पित्याचे जगण्याच्या संदर्भातील श्रेयस हरवलेले असते. पण त्याचवेळी त्याच्या लेखी स्वत:चे घर म्हणजे जखमी योद्धय़ाची एक छावणी असते. यातून कुटुंबसंस्थेची अर्थपूर्णता कवयित्रीने व्यक्त केली आहे. पित्याच्या महानगरातील जगण्यावर लाचारीचे मेण साठत जाते. अंतरात एकाकीपण दाटून येते आणि तरीही तो स्वत:चे ‘कविपण’ जपून ठेवतो. मुलाच्या मृत्यूनंतर त्याला मृत्यू आणि नंतरचे दु:ख याविषयीचे मूलभूत प्रश्न पडतात. आयुष्याच्या खांद्यावर मान ठेवलेली माणसे खुळचट नीतिमूल्यांसह धडपडत जगत राहिल्याचा प्रत्यय कवयित्रीला येतो. त्यांचा आधार हरवलेला असतो. सामान्य वाटणाऱ्या तपशिलांमधून एकाकी माणसांचे जगण्यावरच्या सायीसारखे मुलायम मरण कवितेत साकार होते. कुटुंबसंस्था, त्यातील नाती आणि त्यांची अर्थपूर्णता, महानगरीय व्यक्तीच्या जगण्यातील संघर्ष, मृत्यूविषयक मूलभूत प्रश्न असे अनेक आशयघटक या कवितांतून आले आहेत. वस्तुमात्र, भोवतालचा निसर्ग यांमधील घटकांना एकमेकांविषयी असलेली आपुलकी अणि माणसा-माणसांमधील दुरावा, अंतर अशा विरोधात्मक ताणातून मानवी पराभवाची जाणीव यात व्यक्त झाली आहे. बाईला सर्जनातले पराभव पेलावे लागत असताना तिचे सगळेच एका अपरिहार्य मौनात सामावून जाते. तिचे बघणे आणि तिचे बोलणे निर्थक बनत जाते. कुठल्याही प्रकारची स्त्रीवादी भूमिका न घेताही या कविता बाईच्या अवस्थांतरांचा, दु:खाचा भेदक प्रत्यय देतात.
स्वत:च्या काव्यात्म व्यक्तिमत्त्वाला भोवतालाच्या केंद्रस्थानी ठेवून कवयित्री भावानुभव व्यक्त करीत असल्याने या कवितांतून समाजलक्ष्यी/ वास्तवलक्ष्यी जाणिवादेखील व्यक्त झाल्या आहेत. एका बाजूने वास्तवातील व्यक्तिचित्रे, घटना काव्यरूपात साकार होत असताना त्यांच्या तुलनेत कवयित्रीला स्वत:च्या अस्तित्वाचे भान येते, ही एक वैशिष्टय़पूर्ण प्रक्रिया या कवितासंग्रहात घडताना दिसते. कचऱ्याच्या समुद्रमंथनातून बाहेर पडणारा ‘पिचक्या प्रश्नचिन्हा’सारखा ‘चिमुकचिम्ब’ मुलगा, त्याचे लख्ख बुद्धिवादी उजेड टाळणारे डोळे पाहून कवयित्रीला स्वत:ची मध्यममार्गी आत्मतृप्तता दिसत राहते. तिचे आत्मविभोर हास्य, तिच्या सभोवतालची आरक्षित/ सुरक्षित तटबंदी गळून पडते आणि त्या मुलासारखेच आपणही अनोळखी असल्याची जाणीव गडद होते. अनाथ ‘शारदा अमुक अमुक’ला सरकारी संस्थेचा अनुभव घेताना अंगावर उसळून येणारे जग अनुभवायला मिळते. असे ‘शारदा अमुक अमुक’सारखे जगणे आपल्याला अनुभवावयास मिळाले नाही, ही जाणीव ‘मी पाहिल्याच नसतील कदाचित/ पिवळय़ा कुडत्याच्या/ चुरगाळलेल्या कडा!’ या ओळीतून व्यक्त होते. ६ डिसेंबर १९९२ च्या पाश्र्वभूमीवर लिहिलेली एक कविता देशाचा सामाजिक-सांस्कृतिक लेखाजोखाच मांडते. जखमी अंत:करणाने लिहिलेली ही एक प्रभावी वास्तवलक्ष्यी कविता आहे. जागतिकीकरणाच्या आजच्या काळात सभोवतालचे सारेच वस्तुवत झाल्याची जाणीवदेखील इथे व्यक्त झाली आहे. त्यातूनच मग पावडरी, साबण, शाम्पू, व्हिस्पर्स या वस्तू चौकाचौकांत उभ्या असल्याचे दिसते. वाहिन्या, जाहिराती, वस्तू यांच्या हिंस्र जगात कवयित्री बिनचेहऱ्याने वावरत राहते. आजच्या सगळ्याचेच रूपांतर क्रयवस्तूत होण्याच्या या काळात हा अनुभव प्रत्येकाच्याच वाटय़ाला येणारा आहे. म्हणूनच तो निखालसपणे समकालीनही आहे. समाजलक्ष्यी, समष्टीलक्ष्यी अनुभवांच्या माध्यमातून स्वअस्तित्वाला आणि व्यक्तीच्या अस्तित्वाला साकार करणे, हे या कवितांचे वैशिष्टय़ आहे.
मृत्यू आणि अंतिमत: विनाशाची जाणीव आणि पुनर्निर्मितीची जाणीव अशा दुहेरी स्वरूपाच्या जाणिवा या संग्रहातील काही कवितांमधून व्यक्त झाल्या आहेत. मृत्यू हा सतत हरेक क्षणी आपल्यासोबत असतो. तो प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सखाच असतो. मृत्यू केवळ सजीवांनाच नसतो, तर तो वस्तूंनाही असतो. वस्तू गायब होतात.. त्यांच्या आवाजानिशी. वातावरणात केवळ सन्नाटा भरून राहतो. हा प्रत्यय कवयित्रीला येतो. मृत्यूची ही जाणीव आणखी व्यापक होऊन विनाशाच्या जाणिवेत परिवर्तित होते. जगण्याच्या प्रवासात चार पावले टाकायची ठरविली तरी वरून दरड कोसळणार हे ठरूनच गेलेले असते. वस्तूंना विनाशाची पालवी फुटते. निसटत्या क्षणांवर नावे कोरून ठेवू पाहणारे लोक वादळवाऱ्यात गडप होऊन जातात. जगाच्या नकाशावरून आपला इतिहास, आपले नाव-गाव क्षणार्धात गायब होऊ शकते, ही दु:खद जाणीव इथे व्यक्त होताना दिसते. विनाशाची ही जाणीव सर्वव्यापी व सार्वकालिक आहे. मात्र, विनाशाच्या या जाणिवेला छेद देणारे पुनर्निर्मितीचे आशयसूत्रही इथे साकार झाले आहे. वृक्षाच्या फांद्या त्यालाच येऊन मिळतात आणि पुन्हा पुन्हा त्यालाच जन्म देतात. जगणे असुरक्षित असले, विनाश अटळ असला, तरीदेखील भाषेत ‘उद्या’ हा शब्द असतोच. सृष्टीचक्राचे, जीवनसातत्याचे हे आशयसूत्र या कवितांना विलोभनीय परिमाण प्राप्त करून देते.
मूलत: या कवयित्रीची वृत्ती चिंतनशील आहे. त्यामुळेच माणसाचा एकटेपणा, विश्वपसाऱ्यातील प्रत्येक घटकाचा एकटेपणा, स्वत:पासूनचे आणि भोवतालापासूनचे तुटलेपण, परात्मता, माणसाचे जगणे, मृत्यू, विनाश आणि पुनर्निर्मिती, भाषेची अपरिहार्यता या सर्वच आशयसूत्रांमधून कवयित्रीने मूलभूत स्वरूपाचे चिंतन केले आहे. त्यातून कवयित्रीची प्रगल्भ जीवनदृष्टी व्यक्त होते. ती वाचकालाही सकारात्मकतेचे भान देते.
सभोवतालच्या घटना, तपशील, वस्तूंचे निर्देश, अन्य घटक यांच्या अर्थपूर्ण संयोगातून आकाराला येणारी या कवितांची शैली आहे. त्यामुळे या कविता आपल्या अनुभवांच्या भूमीशी पक्क्या बांधलेल्या आहेत. भावानुभव नेमकेपणाने व्यक्त करणारी आशयगर्भ शब्दकळा आणि त्याद्वारे व्यक्त होणारा अनोखा अनुभव हे या शैलीचे वैशिष्टय़ आहे. अनुभव प्रकटीकरणाच्या ओघात कवयित्री नव्या अर्थपूर्ण शब्दप्रतिमाही तयार करते. या शैलीमुळे ‘स्वत:तल्या परस्त्रीच्या शोधात’मधील कविता एखाद्या प्रदीर्घ स्वगतासारख्या उलगडत जातात. काव्यशैली आणि अनुभवांचे हे रूप लक्षात घेऊनच कदाचित कवितांना शीर्षके न देता केवळ क्रमांक दिले असावेत. सजीव-निर्जीव वस्तू, सर्व ॠतूंमधल्या निसर्गातील तसेच दैनंदिन जीवनातले घटक यांचाच वापर प्रतिमा म्हणून केला गेलेला आहे. त्यामुळे या प्रतिमा सर्वक्षेत्रीय आहेत. संयत शैलीमुळे या कविता स्त्रीच्या व्यथा-वेदना, तिच्या ठायीचा वात्सल्यभाव, करुणा याविषयी बरेच काही सांगतात आणि वाचकालादेखील समृद्ध करतात. भावानुभव आणि शैलीचे औचित्यपूर्ण नाते इथे प्रत्ययाला येते. मराठी काव्यपरंपरेचे भान असलेली, ती स्वत:त सामावून घेणारी आणि तरीही पूर्वसुरींचा प्रभाव नसलेली, चिंतनशीलतेचा स्वर लाभलेली ही सच्ची भावकविता आहे. म्हणूनच तिचे अप्रूप!
‘स्वत:तल्या परस्त्रीच्या शोधात’- सुजाता महाजन, कॉन्टिनेन्टल प्रकाशन,
पृष्ठे- ८४, मूल्य- ७५ रुपये.

नीलकंठ कदम

daughters become guests in their own father house after marriage
नातेसंबंध : माहेर उपरं करतं?
Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
There is no end to the songs of Dalits
गीतांचा भीमसागर… : दलितांच्या सुरांना अंत नाही!
Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?