News Flash

आजि सोनियाचा दिनु..

लीलूताईंची माझी प्रत्यक्ष गाठभेट पडली ती फार पुढे.. म्हणजे साधारण दहा-पंधरा वर्षांपूर्वी.

डॉ. लीलाताई गोखले

पुण्यातील जुन्या काळातल्या प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. लीलाताई गोखले या येत्या १६ नोव्हेंबर रोजी वयाची शतकी खेळी पूर्ण करीत आहेत. त्यानिमित्ताने लीलाताईंच्या चतुरस्र कार्यकर्तृत्वाचा निकटतम सुहृद सई परांजपे यांनी घेतलेला दिलखुलास वेध.. लीलाताईंच्या भल्यामोठय़ा एकत्र कुटुंबाच्या पाश्र्वभूमीसह!

मी लघु कुटुंबात वाढले. आई, आजोबा आणि मी.. अशी ईन मिन तीन माणसं. मला स्वत:चं भावंड तर नव्हतंच; पण आईसुद्धा एकुलती एक असल्यामुळे आसपास मावस किंवा मामे भावंडांचाही राबता नव्हता. थोडक्यात म्हणजे मला खेळायला हक्काचे सवंगडी नव्हते. मग मी माझा माझा मार्ग शोधून काढला. अवघी घराणीच्या घराणीच मी दत्तक घेतली.  भाऊआजोबांचे ‘गोपिकाश्रमा’त नांदणारे दोन चुलींपल्याडचे गोकुळ, आमच्याच रँग्लर परांजपे रस्त्यावरची चितळेवाडी आणि एक वळण पलीकडे असलेले रानडे संस्थान.. अशी काही निवडक ठिकाणं मी शिक्कामोर्तब केली.

पैकी रानडे बंगला पुरुषोत्तमाश्रमापासून जवळ होता. एका हाकेच्या अंतरावर. आम्ही ऑस्ट्रेलियाहून परतल्यावर आपल्या संस्कारांची ओळख व्हावी म्हणून अच्युतमामा (अच्युत रानडे) मला त्यांच्या या एकत्र कुटुंब साम्राज्यात घेऊन गेला. त्याच्या पहिल्याच नातवाच्या माऊंद्याच्या समारंभाला. त्या अपूर्व सोहळ्यात तान्ह्य़ा अजितचे आई-वडील, आजोबा-आजी आणि पणजोबा-पणजी हे सहाही जण उपस्थित होते. त्या अफाट संस्कृतीदर्शनाचे मला फार अप्रूप वाटले. एकाच वेळी उपस्थित असलेले अगणित सगेसोयरे पाहून मी थक्क झाले. मी तेव्हा दहा-अकरा वर्षांची असेन. त्या दिवसापासून मी रानडे गजबजाटात सामावून गेले. ‘मान न मान, मैं तेरा मेहमान’ या नात्याने दारची होते, ती घरची झाले. रानडे बंगल्याचे सिद्ध कुटुंबप्रमुख गोविंद विष्णू रानडे. त्यांची मुलं म्हणजे अच्युतमामा, पद्माकरभाऊ, परशुरामभाऊ, विशाभाऊ, रंगाकाका, श्यामूकाका, कमळाताई, मालूताई, सुलूताई आणि लीलूताई. पैकी बहुतेकजण आपटे रोडवरच्या या प्रचंड वास्तूत स्वतंत्र भिंतींच्या आडोशाला, पण एकमेकांना धरून राहत असत. अर्थात सगळेच एका वेळी हजर नसत. नोकरीनिमित्त जाऊन-येऊन असत. आदर्श एकत्र कुटुंबाचा मासला म्हणून रानडे परिवाराचा दाखला देता येईल.

या गोकुळात मुलांचा सुकाळ होता. सुधा, चंदू, जयंत, संध्या, कुमुद, मीरा, शिना, प्रभा, मंगला यांच्याबरोबर तऱ्हेतऱ्हेचे खेळ खेळायला गंमत येई. साखळीची शिवाशिवी, ऐसपैस (I spy चा अपभ्रंश) हे पळापळीचे आणि झब्बू, बदाम सात आणि ‘नॉटेठ्ठोम’ हे पत्त्याचे खेळ आमचे विशेष आवडीचे. या सुखाच्या काळात माझी मीराशी जी मैत्री जुळली, ती कायमची. अखेपर्यंत. सुमारे दहा वर्षांपूर्वी कॅन्सरने घणाघाती हल्ला केला आणि मी माझ्या या सख्ख्या मैत्रिणीला मुकले. रानडे परिवाराच्या मोठय़ा माणसांमध्ये मी अच्युतमामाखेरीज मालूताई आणि मामी (उषावहिनी) यांच्याशी विशेष जवळीक साधली. लीलूताई पुण्यामध्ये एक स्त्रीतज्ज्ञ डॉक्टर म्हणून मान्यता पावल्या होत्या आणि फग्र्युसन रोडवर त्यांनी आपला सुसज्ज दवाखाना थाटला होता. बाळ-बाळंतिणींसाठी प्रसूतिगृह.

जोरात चालणाऱ्या आपल्या डॉक्टरी पेशात आणि संसारात गर्क असल्यामुळे लीलूताईचे माहेरी फारसे येणे-जाणे होत नसे. एक निष्णात कर्तृत्ववान विदुषी म्हणून दुरूनच मला त्यांच्याविषयी दबदबा वाटे. त्यात ऊठसूठ कुणाचे उगीच कौतुक न करणारी माझी आई ‘लिली हुशार आहे, आणि नि:स्पृह पण!’ असे प्रशंसोद्गार काढीत असे. त्यांच्या नि:स्पृहतेचा दाखला त्यांच्या आत्मचरित्रात आढळतो. आपल्या पेशातल्या अनुभवांबद्दल त्या लिहितात.. ‘गर्भपात कायदेशीर झाल्यावर भ्रूणाचं लिंग शोधून स्त्रीभ्रूण असेल तर गर्भपात करायचा, असं सर्रास सुरू झालं. खरं तर डॉक्टरला भ्रूणलिंगाशी काय देणंघेणं? पण ते पैशासाठी सर्रास केलं जाऊ लागलं. माझ्या मते, पैशासाठी भ्रूणहत्या म्हणजे सुपारी घेऊन खून करण्यासारखं आहे. याचे दुष्परिणाम आता दिसायला लागले आहेत. शंभर पुरुषांमागे सत्तर स्त्रिया इतकं हे प्रमाण घटलं आहे. त्यामुळे बलात्कार आणि वेश्यागमनामुळे होणारे रोग यांचं प्रमाण वाढलं आहे. आता जरी हे निदान बेकायदेशीर ठरवलं असलं तरी काही डॉक्टरांना ‘सुपारी’ घेण्याची जी चटक लागली आहे ती सहजासहजी कमी होईल असं वाटत नाही.’

लीलूताईंची माझी प्रत्यक्ष गाठभेट पडली ती फार पुढे.. म्हणजे साधारण दहा-पंधरा वर्षांपूर्वी. पत्त्यांच्या टेबलावर. रानडे मंडळी आवडीने रमी खेळतात. मीराने मला या पत्ते-कंपनीत दाखल केलं, आणि लीलूताईंशी खरी ओळख तेव्हा झाली. आमचे सूर जुळले. पत्ते खेळता खेळता त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे पैलू पाहून मी अवाक् झाले. त्यांच्या स्मृतीखजिन्यामधल्या त्यांच्या कौटुंबिक किंवा डॉक्टरी पेशामधल्या गोष्टी अशा काही रंगतदार असत, की एकेका गोष्टीवर सिनेमा बेतावा. लीलूताईंचे पाठांतर अफाट आहे. बालवर्गामधल्या शिशुगीतांपासून ते ओव्या, सणासुदीची गाणी, समरगीतं, संस्कृत श्लोक आणि स्तोत्रं त्या घडाघड म्हणतात. कुठेही न अडखळता. त्या रशियन शिकल्या आहेत आणि त्या भाषेच्या परीक्षेत त्यांनी बक्षीसही मिळवलं आहे. त्यांनी पाच-सहा मिनिटांची रशियन गोष्ट एका दमात मला सांगितली. तेव्हा हातातले बदाम, इस्पिक राजे-राण्या नि:स्तब्ध ऐकत राहिल्या.

लीलूताईंचा विवाह कम्युनिस्ट पक्षाचे कट्टर कार्यकर्ते बंडू गोखले यांच्याशी झाला. कम्युनिस्टांची धरपकड झाली तेव्हा गोखल्यांना तुरुंगवास घडला. प्रकृतीच्या कारणामुळे त्यांना एक महिना पॅरोलवर सोडण्यात आलं. तेवढय़ात त्या दोघांनी लग्न केलं. पुढे दोन वर्ष बंडू गोखले तुरुंगातच होते, तेव्हा लीलूताईंनी नेटाने आपला दवाखाना चालवला. त्या मुळातच शिस्त आणि टापटीप याबाबत पराकोटीच्या दक्ष आणि ‘परफेक्शनिस्ट’ असल्यामुळे त्यांच्या दवाखान्याचा कारोबार दृष्ट लागावी असा चाले. बाळंतिणीसाठी लीलूताईंच्या घरी कढवलेल्या साजूक तुपाची एक बरणी मुक्रर असे.  तिचं जेवणही त्यांच्या घरूनच जाई. दिवसाआड चादरी, पलंगपोस, अभ्रे, टॉवेल बदलले जात. पेशंटच्या कपडय़ांना इस्त्री लागत असे. खोली रोज साबणाचे पाणी, फिनेल, ब्रश यांनी साफ केली जाई. रुग्ण घरी गेली की तिची गादी गच्चीत उन्हात टाकली जाई. दवाखान्यातले वातावरण नवागत अर्भकांच्या स्वागतासाठी सतत प्रसन्न असे. ‘सुखरूप’ या शब्दाचा मान लीलूताईंनी सर्वतोपरी राखला होता.

रूढीप्रिय आणि सनातन कुटुंबात जन्म घेऊनही लीलूताईंनी आपला पुरोगामी बाणा अगदी तरुण वयात दाखवून दिला. पाळीच्या वेळेला बाजूला बसण्याचे बंधन त्यांनी झुगारून दिले. डॉक्टर होण्याचे तर त्यांनी चौथ्या इयत्तेतच ठरवले होते. ते स्वप्न त्यांनी पुरे करून दाखवले. पुण्यात तेव्हा मेडिकल कॉलेज नव्हतं. तेव्हा त्या सरळ मुंबईला ग्रँट मेडिकलमध्ये दाखल झाल्या आणि एम. डी. (गायनॅक)च्या परीक्षेत अकरा जणांच्यात त्या एकटय़ाच पहिल्या झटक्यात पास झाल्या. प्रथम श्रेणीत. लीलूताई आवडीने इराणी हॉटेलात चिकन खात असत. सिगरेट पण ओढीत. टेनिस खेळत. कॉलेज संपल्यावर सिगरेटला त्यांनी निरोप दिला.

लीलूताईंना तीन मुलं. तिघंही आपल्या आई-वडिलांप्रमाणे तल्लख निपजली. (बंडू गोखले बी. एस्सी.ला मुंबई विद्यापीठात पहिले आले होते. त्यांना दक्षिणा फेलोशिप मिळाली होती.) अनिताने पुणे विद्यापीठातून भूगोलाची एम. ए. पदवी घेऊन पुढे ‘ग्रामीण विकास’ या विषयाचे उच्च शिक्षण अहमदाबादच्या ‘सी. ई. पी. टी.’मधून प्राप्त केलं. तिच्या सखोल अभ्यासाचा पुणे शहराला चांगलाच फायदा झाला. पुण्याला वेढणाऱ्या टेकडय़ा तिने बांधकाम लॉबीच्या कचाटय़ातून सोडवल्या. आणि सध्या ती चालवत असलेल्या ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीज् अ‍ॅण्ड अ‍ॅक्टिव्हिटिज्’ या मातब्बर संस्थेद्वारे ती पुण्यामधल्या नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याच्या कार्यात गुंतली आहे.

अतुलने पुण्यात बी. ई. करून अमेरिकेत मटीरिअल इंजिनीअरिंग हा विषय घेऊन मटीरिअल सायन्सची पीएच. डी. मिळवली. त्याच्या कामाचा विषय गहन आहे. आजच्या प्रगत उद्योगांमध्ये लागणाऱ्या अद्ययावत यंत्रसामग्रीत होणाऱ्या बिघाडाचा वेध घेणं, आणि नेमका दोष हेरला की चोख दुरुस्ती करणं आणि पुन्हा बिघाड होणार नाही अशी दक्षता घेणं, हे जोखमीचं काम तो करतो. थोडक्यात, काहीशा डिटेक्टिव्हगिरीचा हा मासला आहे.

शेंडेफळ अनुपमा रसायनशास्त्र घेऊन MBA आणि CTA झाली आणि तब्बल पंधरा वर्ष तिने अमेरिकेत मार्केट रिसर्चचं कार्य केलं. तिने निकिता ओक या धडाडीच्या आर्किटेक्टबरोबर विवाह केला. आईचा मनस्वी ध्यास असल्यामुळे ती पुढे भारतात परतली. लीलूताईंच्याच इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर तिचे आणि निकिताचे बिऱ्हाड आहे. ‘IMDR’ या मॅनेजमेंट विद्यापीठात ती व्हिजिटिंग फॅकल्टीमध्ये आहे. कैद्यांच्या पुनर्वसनाचा वसा घेतलेल्या ‘नवजीवन मंडळ’ या संस्थेत ती ट्रस्टी आहे. सध्या अनुपमा उद्योजक या नव्या अवतारात  रमलेली दिसते. सत्त्वयुक्त ग्रॅनोलाची रुचकर न्यारी न्याहारी बनवण्याचे काम तिने हाती घेतले आहे. तिच्या सकस मालाला जोरदार मागणी आहे.

लीलूताईंच्या तिन्ही मुलांमध्ये त्यांची शिकवण आणि संस्कार यांचं हृद्य दर्शन घडून येते. त्यांची सामाजिक जाण ठायी ठायी प्रत्ययाला येते. ‘पोलीस-मित्र’ म्हणून नाव नोंदवून पुण्याच्या पिसाट रहदारीला ताळ्यावर आणणे, घनकचरा निर्मूलनाचा प्रसार करणे, प्रसंगी टेकडय़ा साफ करणे.. अशा प्रकारचे त्यांचे नाना उद्योग चालू असतात.

योगायोग असा की, मी लीलूताईंच्या सान्निध्यात जेव्हा आले त्याच सुमाराला कारणाकारणाने पुढच्या पिढीबरोबरही माझे संबंध जुळत गेले. जेन् नेक्स्ट! फिलाडेल्फिया विद्यापीठाने माझी ‘दिशा’ फिल्म विद्यार्थ्यांना दाखवायला आणि भारतीय सिनेमावर तीन दिवसांचं सत्र चालवायला मला निमंत्रित केलं होतं. परतीच्या वाटेवर मी न्यूयॉर्कला अतुल-जयूकडे मुक्काम केला. न्यूयॉर्कला छेदणाऱ्या ईस्ट रिव्हर नदीच्या मधोमध एक गोमटे बेट आहे. रूझव्हेल्ट आयलंड. या बेटावर एका शानदार इमारतीमध्ये या दोघांचं घरकुल आहे.

तसं पाहिलं तर या सर्व मंडळींच्यात जयू सगळ्यात जवळची होती. म्हणजे अगदी घरची. मीराची छोटी नणंद म्हणून मी तिला अक्षरश: रांगती पाहिली आहे. पण आमच्यापेक्षा फारच लहान म्हणून एक लिंबूटिंबू एवढीच काय ती तिची दखल घेतली गेली. जयू पुढे मायक्रोबायोलॉजी घेऊन बी. एस्सी. झाली. मग मुंबईच्या टाटा रिसर्च इन्स्टिटय़ूटमधून कॅन्सर रिसर्चमध्ये एम. एस्सी. आणि पुढे अमेरिकेत पीएच. डी. झाली. तिने न्यूयॉर्कला मोठमोठय़ा वैद्यकीय प्रसारण संस्थांमधून सायंटिफिक डायरेक्टर म्हणून बरीच वर्ष काम केलं. आता मात्र घराबाहेर पडायला कंटाळून तिने स्वत:ची कन्सल्टन्सी सुरू केली आहे. घरूनच. मागणी खूप आहे. ती सुट्टीला पुण्याला आली तरी तीन-चार असाइनमेंट्स बरोबर घेऊन येते. कॉम्प्युटरवर बसून डेडलाइन्सना टक्कर देते.

अतुल-जयूनी मला मनमुराद न्यूयॉर्कदर्शन घडवलं. आम्हा तिघांचे आवडीचे प्रांत जुळत असल्यामुळे माझा त्यांच्याकडचा मुक्काम ही एक अखंड पिकनिक ठरली. एक-दोनदा नाही, तर चार वेळा मी त्यांचा पाहुणचार घेतला आहे. देशविदेशचे भोजनप्रकार, वाइन्स, आवडते लेखक, नाटकं, सिनेमे, चित्रप्रदर्शनं आणि टेनिस हे आमचे खास आवडीचे विषय.  त्यांच्या बाल्कनीत बसून खालून संथ वाहणारी ईस्ट रिव्हर पाहत वाइन चाखायला बहार यायची. एकदा तर मी या दोघांच्या आमंत्रणावरून केवळ यू. एस. ओपन पाहायला म्हणून न्यूयॉर्कला गेले होते. याहून अधिक राजेशाही पाहुणचार काय असू शकतो?

ही दोघं पुण्याला आली की त्यांच्या निमित्ताने माझंही लीलूताईंकडे जाणं-येणं होऊ लागलं. थोडक्याच अवधीत माझ्या लक्षात आलं, की आपल्या आवडीनिवडी तर अवघ्या परिवाराबरोबर जुळताहेत. गोखल्यांच्या घराला वयोमर्यादेचा अडसर नव्हता. माझ्यापेक्षा वीस वर्षांनी वडील असलेल्या लीलूताई आणि सुमारे तितक्याच वर्षांनी माझ्याहून लहान असलेल्या अनिता-अनुपमा-जयू या सगळ्याच मला मैत्रिणी वाटतात. घरात अर्थात लीलूताई केंद्रबिंदू आहेत. त्यांच्याभोवती गोफ विणला जातो. त्या आता फारशा चालत नाहीत. पण खुर्चीत बसल्या बसल्या त्या अखंड कार्यमग्न असतात. अजूनही अतिशय समृद्ध जीवन जगतात. वाचन, लिखाण, विणकाम, क्रोशे, शब्दकोडं, स्क्रॅबल आणि पत्ते.. काही ना काही चालूच असतं. कुणाला वैद्यकीय सल्ला देणं, किंवा आपल्या खाणाखजिन्यामधील एखादी हुकमी पाककृती समजावून देणं, हे त्यांचं आवडीचं काम. त्यांचा स्वत:चा आहार वक्तशीर आणि काटेकोर आहे. दिवसा जेवण आणि रात्री भाजीचं सूप, बिस्किटं आणि आवर्जून घरी केलेला च्यवनप्राश त्या न चुकता घेतात. त्यांच्या उत्तम प्रकृतीचं रहस्य म्हणजे नित्यनेमानं घेतलेला च्यवनप्राश असं आपलं मला वाटतं.

अतिशय रटाळ अशा टेलिमालिका लीलूताई अत्यंत आवडीनं पाहतात. मला फार नवल वाटतं. इकडे निकितानं एकाहून एक सरस असे गाजलेले सिनेमे (‘गेम चेंज,’ ‘हिडन फिगर्स, ‘द क्वीन’) किंवा हेलन मिरनची थरारक पोलिसी मालिका ‘प्राइम सस्पेक्ट’ मिळवलेली असते. आम्ही श्वास रोखून तो खजिना लुटण्याच्या तयारीत असतो. पण लीलूताई आपल्या टेलिमालिका थांबवायला तयार होत नाहीत. मग वादंग माजतं. लीलूताई विरुद्ध इतर सगळे. सरशी कुणाची होते, हे सांगायला नको. वडीलकीचा हक्क बजावला जातो. मग शेवटी उशिरा केव्हातरी आमचा सरंजाम सुरू होतो. गंमत म्हणजे आमच्या सोहळ्यात प्रेक्षक म्हणून त्या आनंदाने सहभागी होतात. आणि मग हळूच केव्हातरी त्यांना डुलकी लागते.

आपल्या कार्याची आणि जीवनपटाची ओळख सांगणारी दोन पुस्तकं लीलूताईंनी लिहिली. ‘अनुभवाचे बोल’ हे विविध विषयांवरचे त्यांचे चिंतन म्हणता येईल. वाढत्या लोकसंख्येचा भेडसावणारा प्रश्न, नव्या शतकाची आव्हाने, ‘सत्यमेव जयते’ची आजच्या युगात शुचिता.. अशासारख्या जटिल प्रश्नांचा त्यांनी सडेतोडपणे ऊहापोह केला आहे. त्यांची स्त्रीविषयीची आस्था ठायी ठायी जाणवते. तिच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्याबद्दल त्यांना आच आहे. स्तनपानाबद्दलची आग्रही मते, मासिक पाळीबाबत केलेले संशोधन, उतारवयात घ्यायची काळजी, इ. अनेक उपयुक्त कानगोष्टी त्यांनी या पुस्तकात सांगितल्या आहेत.

‘माझी गोष्ट’ हे त्यांचं दुसरं पुस्तक. हे सरळसरळ आत्मचरित्र आहे. त्यांच्या जीवनाइतकंच रंगतदार, स्फूर्तिदायक आणि संपन्न. रानडे वाडय़ासंबंधीचं प्रकरण तर लाजवाब आहे. विष्णुपुऱ्यामधल्या भाऊमहाराजांच्या बोळात पसरलेला हा रानडे वाडा. कुणी कुशल सिनेदिग्दर्शक आपला कॅमेरा घेऊन गुपचूप या वाडय़ात शिरून एका जिवंत इतिहासाचं जणू दर्शन आपल्याला घडवतो आहे असं हे पुस्तक वाचताना वाटतं. पाहता पाहता एका सुखवस्तू, शालीन आणि प्रसन्न एकत्र कुटुंबाची ओळख होते. कुटुंबात माणसं किमान शंभर. ही झाली प्रत्यक्ष नात्याची मंडळी. याखेरीज आश्रयाला असलेले दूरचे संबंधित, दोघी-तिघी सोवळ्या बायका आणि इतर आश्रित मिळून ही संख्या बरीच फुगते. या समस्त मंडळींचा जीवनक्रम, त्यांचे रीतिरिवाज, आपसी संबंध, सणासुदीचे कार्यक्रम, मुलांचे खेळ, बायकांचे दागिने- अशा नाना वर्णनांनी हे प्रकरण बोलके झाले आहे. थेट लक्ष्मीबाई टिळकांच्या आत्मचरित्राच्या पंक्तीला बसावं अशा योग्यतेची ‘माझी गोष्ट’ या पुस्तकाची दुसरी आवृत्ती लवकरच मौज प्रकाशन गृहातर्फे झळकणार आहे.

१६ नोव्हेंबरला लीलूताई शतक पूर्ण करणार आहेत. त्या आनंदसोहळ्याचं वर्णन करायला खुद्द ज्ञानदेवांच्या पंक्ती मी उचलेन..

‘आजि सोनियाचा दिनु

वर्षे अमृताचा घनु॥’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2017 1:10 am

Web Title: sai paranjape article on gynecologist dr leelatai gokhale on completing 100 years
Next Stories
1 स्त्री-जाणिवांचा ठाशीव उद्गार!
2 पुरातत्त्वीय पुरावा अपुरा असला तरी विश्वसनीय आणि तर्कनिष्ठ!
3 नाटक : प्रदर्शन नव्हे, दर्शन!
Just Now!
X