रामदासांच्या वाङ्मयातील सामाजिक आशय आणि त्याची प्रचलित काळातही असलेली विलक्षण उपयुक्तता समजावून सांगणारे आणि जाता जाता जमेल तितके ‘शहाणे करून सोडावे सकल जना’ या हेतूने योजलेले पाक्षिक सदर..

समर्थ रामदास वाङ्मयवेध मालिकेच्या पहिल्या भागात आपण रामदासांच्या वेगळेपणाचा ऊहापोह केला. संतपरंपरेत रामदासांचे वेगळेपण काय, यावर त्यात काही मुद्दे होते. तो विषय अधिक स्पष्ट करण्यासाठी आज आपण तोच धागा पुढे नेणार आहोत.

What Ajit Pawar Said?
“द्रौपदीचा विचार करावा लागतो की काय?”, मुलींच्या जन्मदरावर बोलताना अजित पवार काय बोलून गेले?
dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?
chandrapur s 19 Month Old Survi Salve Enters India Book of Records
दीड वर्षाची सुरवी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये, जाणून घ्या वैशिष्ट्य…
praniti shinde question photos of pm narendra modi
खतांच्या बॅगांवर मोदींचा फोटो, आचारसंहितेमुळे शेतकऱ्यांना खत विकत घेणे मुश्किल; प्रणिती शिंदे संतापल्या

यासंदर्भातील महत्त्वाचा विचार म्हणजे रामदासांनी कधीही कोणत्याही टप्प्यावर देह आणि देहभोगास कमी लेखले नाही, हे समजून घेणे गरजेचे आहे. ज्याकाळी देहाची नश्वरता, मानवी देह म्हणजे ८४ कोटी योनींचा फेरा वगरे निर्थक पारमाíथक भाषा वापरली जात होती आणि अज्ञानी जन देहाच्या असण्यास भार मानत होते त्या काळात रामदासांनी जे सांगितले ते अद्भुत ठरते. देह अचेतन आहे, तो काय- आज ना उद्या जाणारच, आत्मा अमर आहे, सर्वाच्यात तो वास करतो.. तेव्हा आत्माच काय तो महत्त्वाचा.. सगळ्यांचे अंत:करण एकच असते.. इतरांच्या आनंदातच सुख असते.. वगरे थोतांडी सल्ले रामदासांनी कधीही दिले नाहीत. उलट, ते या कल्पनांची खिल्लीच उडवतात. त्याचे काही मासले पाहा-

सर्प डसाया येतो । प्राणी भेऊन पळतो

येक अंत:कर्ण तरी तो । विरोध नसावा ॥

सगळ्यांचे अंत:करण जर एकच असेल तर साप चावावयास आल्यावर भिऊन का पळता, आणि त्यास विरोध का करता, हा रामदासांचा रोकडा प्रश्न निरुत्तर करणारा नव्हे काय? या सर्वाचे अंत:करण एकच असते, हा मुद्दा पूर्ण खोडून काढताना रामदासांनी काय काय दाखले दिलेत-

अंत:कर्ण येक असतें। तरी येकाचें येकास कळों येतें।

कांहीं चोरितांच न येतें । गौप्य गुह्य़।।

येक जेवितां अवघे धाले। येक निवतां अवघे निवाले।

येक मरतां अवघे मेले । पाहिजेत कीं।।

म्हणजेच अंत:करण सर्वाचेच एक असते तर एकाचे दुसऱ्याला कळलेच असते आणि कोणाला काही चोरी वगरे करता आली नसती. तसेच एक जेवल्यावर दुसऱ्याचेही पोट भरले असते आणि एकाच्या निधनाने सगळेच गेले असते. हे असे अर्थातच होत नाही. म्हणजे प्रत्येक शरीर हे वेगळे आहे. अशा प्रत्येक शरीरातला आत्मा, जीव वेगळा आहे. याचा अर्थ असा की, हे शरीराचे वेगळेपण त्यामुळे जपावयास हवे. म्हणजेच शरीर उत्तम सांभाळावयास हवे. शरीर उत्तम सांभाळावयाचे म्हणजेच त्याची देखभाल करावयाची. व्यायाम आदी मार्गानी ते निरोगी राहील याची खबरदारी घ्यावयाची.

परंतु हे का करावयाचे? या प्रश्नाचे उत्तर ध्यानात घ्यावयास हवे. नाहीतर कोणास वाटावयाचे की, रामदास ‘महाराष्ट्र केसरी’ होता यावे याचा सल्ला देत आहेत आणि शरीरशृंगाराची तरफदारी करीत आहेत. तसे नव्हे. शरीर चांगले, तंदुरूस्त ठेवावयाचे कारण- ते तसे असेल तरच ते इतरांच्या कामास येऊ शकते, हा मुद्दा इच्छुकांनी जरूर लक्षात घ्यावयास हवा. याचे कारण वरवर विचार करणाऱ्यांस असे वाटू शकते की, रामदास शरीरस्वार्थाचे समर्थन करीत आहेत. तर तसे नाही. शरीरस्वार्थ साधावयाचा तो परमार्थासाठी. यासंदर्भात विमानप्रवासाचे उदाहरण प्रसंगोचित ठरावे. विमान उड्डाणापूर्वी मार्गदर्शन करताना विमानसेविका हवेचा दाब कमी झाल्यास प्राणवायूचा पुरवठा करणारे मुखवटे आधी मोठय़ांनी स्वत:च्या तोंडावर चढवावेत, मग बरोबरीच्या लहान मुलांना ते घालण्यास मदत करावी असे सांगतात. तेव्हा त्यामागे काय मोठय़ांचा स्वार्थ असतो की काय? तर तसे नव्हे. पालकांनी स्वत:च्या तोंडावर चटकन् ते प्राणवायूचे मुखवटे चढवण्याचा स्वार्थ साधायचा, कारण त्यामुळे इतरांना मदत करण्याचा परमार्थ साधता यावा, म्हणून. तसेच रामदासांच्या मते देहाचे. आपलाच देह निरोगी नसेल तर इतरांच्या सेवेत तो येणार तरी कसा? हेच दाखवून देताना रामदास म्हणतात-

नरदेह पांगुळ असता। तरी तो कार्यास न येता।

अथवा थोंटा जरी असता । तरी परोपकारास न ये।।

नरदेह अंध असिला। तरी तो निपटचि वायां गेला।

अथवा बधिर जरी असिला । तरी निरूपण नाहीं।।

नरदेह असिला मुका । तरी घेतां नये आशंका।

अशक्त रोगी नासका । तरी तो नि:कारण।।

नरदेह असिला मूर्ख । अथवा फेंपऱ्या समंधाचें दु:ख।

तरी तो जाणावा निर्थक । निश्चयेंसीं।।

किती मौलिक विचार! जनांची सेवा जरी करावयाची असेल तर आधी स्वत:चा देह उत्तम हवा. पुन्हा त्याचे सर्व अवयवदेखील उत्तम आणि निरोगी हवेत. कारण रामदासच दाखवून देतात-

मुक्याने गुळ खादला। गोडी न ये सांगावयाला..

म्हणजे शरीराप्रमाणे तुमची वाणीही उत्तम हवी. ती नसेल तर मुक्या व्यक्तीस गुळाच्या चवीचे वर्णन करण्यास सांगण्यासारखेच.

पुन्हा गंमत अशी की, संवर्धन उपायांनी देह सजवला म्हणून तो लगेच आपला मानायचा नाही, असा सल्ला देण्यास रामदास विसरत नाहीत. हा मुद्दा पटावा यासाठी ते मानवी देहास उत्तम बांधलेल्या घराची उपमा देतात. म्हणजे घरासाठी भले आपण कष्ट घेतलेले असोत; पण आपण बांधले म्हणून घर काही फक्त आपले एकटय़ाचे नसते. ते त्यात राहावयास येणाऱ्या मुंग्यांचे असते. कोळिष्टकांचे असते. इतकेच काय, झुरळे, िवचू, कुत्रे आणि मांजरी यांचादेखील त्या घरावर तितकाच हक्क असतो. काय सुंदर विचार आहे पाहा..

मूषक म्हणती घर आमुचें। पाली म्हणती घर आमुचें।

मक्षिका म्हणती घर आमुचे। निश्चयेसीं।।

कांतण्या म्हणती घर आमुचें। मुंगळे म्हणती घर आमुचें

मुंग्या म्हणती घर आमुचें। निश्चयेंसी॥

िवचू म्हणती आमुचें घर। सर्प म्हणती आमुचें घर।

झुरळें म्हणती आमुचें घर। निश्चयेंसी॥

मार्जरें म्हणती आमुचें घर। श्वानें म्हणती आमुचे घर।

मुंगसें म्हणती आमुचें घर। निश्चयेंसी॥

ढेकुण म्हणती आमुचें घर। चांचण्या म्हणती आमुचें घर

घुंगर्डी म्हणती आमुचें घर। निश्चयेंसी॥

बहुत किडय़ांचा जोजार। किती सांगावा विस्तार।

समस्त म्हणती आमुचें घर। निश्चयेंसी॥

हे झाले प्राण्यांचे! माणसांचे काय? तर..

पशु म्हणती आमुचें घर। दासी म्हणती आमुचें घर।

घरीचीं म्हणती आमुचें घर।  निश्चयेंसी॥

पाहुणे म्हणती आमुचें घर। मित्र म्हणती आमुचें घर।

ग्रामस्थ म्हणती आमुचें घर। निश्चयेंसी॥

एवढेच नव्हे, तर..

तश्कर म्हणती आमुचें घर। राजकी म्हणती आमुचें घर

आग्न म्हणे आमुचें घर।भस्म करूं॥

समस्त म्हणती घर माझें। हें मूर्खही म्हणे माझें माझें।

सेवट जड जालें वोझें। टाकिला देश॥

यात महत्त्वाचा भाग हा, की हे असे आहे म्हणून घरच बांधावयास नको, असा निवृत्ती विचार करायचा नाही. ते बांधायचेच. पण म्हणून आपले आपले करीत बसावयाचे नाही. ही कसरत आहे. भावनांची तसेच बुद्धीचीही.

ती कशी करायची, याबाबत रामदासांची शिकवण पुढील भागात..

 

रामदास विनवी
samarthsadhak@gmail.com