अविनाश सप्रे

ज्येष्ठ अनुवादिका उमा वि. कुलकर्णी यांचे ‘संवादु अनुवादु’ हे एक प्रांजळ आत्मकथन आहे. आपल्या लेखनाला उमा कुलकर्णी यांनी ‘आत्मचरित्र’ न म्हणता ‘आत्मकथन’ म्हणणे लेखनाचे एकूण स्वरूप पाहता अधिक सयुक्तिक व अर्थपूर्ण वाटते. एक तर आत्मचरित्रात जाणता-अजाणता येणारा आत्मसमर्थनापासून आत्मशोधापर्यंतचा सूर या लेखनात लेखिकेला अभिप्रेत नाही. ‘कथन’ म्हणजे सांगणे. इथे सांगण्याला महत्त्व आहे. या सांगण्यात घटना, प्रसंग, व्यक्ती आणि घडामोडी जरूर आहेत; पण त्यांना पुरोभागी आणण्याचा अट्टहास नाही की त्यांचे विश्लेषण करण्याकडे त्यांचा कल नाही. अगदी आपल्या अनुभवकथनात निष्कर्ष काढण्याचीदेखील त्यांना घाई दिसत नाही. त्याऐवजी या कथनात सांगण्यातला सहजपणा आणि अनौपचारिकपणा आहे. ओघाओघात जे सांगायचंय ते सांगितलेलं आहे आणि हेच या लेखनाचं सौंदर्य आहे. ‘अनुवाद’ या आपल्या अंगीकृत कार्याच्या अनुषंगाने केलेली आणि अजूनही चालू असलेली वाटचाल लेखिकेने यात विस्ताराने सांगितलेली आहे. लेखिका अनुवादकार्याकडे योगायोगानेच वळली आणि पुढे तेच तिच्यासाठी प्रेयस आणि श्रेयस झाले. त्यातून जगण्याला एक अर्थपूर्णता प्राप्त झाली याचे भान आणि समाधान लेखिकेच्या शब्दा-शब्दांतून व्यक्त झालेले आहे.

Senior educationist writer Meena Chandavarkar passed away
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, लेखिका मीना चंदावरकर यांचे निधन
What Prakash Mahajan Said About Raj Thackeray?
“राज ठाकरे आधुनिक युगातले कर्ण, हिंदुत्वाची शाल पांघरुन..”, प्रकाश महाजन यांचं वक्तव्य चर्चेत
lokrang, article, pandit kumar gandharv, singing style, thoughts, indian classical music, book, about to launch, gandharvanche dene pandit kumarjinshi sanvad,
कुमारजींचा सांगीतिक विचार
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन

या लेखनाचा मुख्य भर हा अन्यभाषिक साहित्याचा मराठीत अनुवाद करताना आलेल्या अनुभवांवर आहे. या क्षेत्रातला उमा कुलकर्णी यांचा अनुभव आणि कार्य प्रदीर्घ आहे. कन्नड साहित्यातील शिवराम कारंथ, कृष्णमूर्ती पुराणिक, पूर्णचंद्र तेजस्वी, यू. आर. अनंतमूर्ती, पुटाप्पा, फकीर महंमद, गिरीश कार्नाड, सुधा मूर्ती ते आताच्या वैदेहीपर्यंत आणि मुख्यत: भैरप्पा अशा भिन्न-भिन्न प्रकृतींच्या नामवंत प्रतिभावंतांच्या साहित्यकृतींचे अनुवाद त्यांनी केलेले आहेत. आणि हे अनुवाद मराठीत लोकप्रियही झालेले आहेत. हे अनुवाद करताना आलेले अनुभव उमा कुलकर्णी यांनी या पुस्तकात सांगितले आहेत आणि ते निश्चितच वाचनीय आहेत. अनुवादकार्याच्या प्रदीर्घ वाटचालीत साहित्याच्या अनुवादासंबंधीची त्यांची काही मते तयार झालेली आहेत. त्यापैकी वानगीदाखल काही : ‘अनुवादक हा निव्वळ भारवाही नाही. अनुवादात सर्जनशीलता हवी’, ‘अनुवादकाला एक वेगळ्या प्रकारची साहित्यिक दृष्टी असणं आवश्यक आहे. ही दृष्टी समीक्षकापेक्षा वेगळी हवी. त्यात कलाकृतीविषयी ममत्व अत्यावश्यक आहे’, ‘अनुवादकानं प्रत्येक शब्दापेक्षा त्यातील आशयाशी प्रामाणिक राहायला पाहिजे. भाषिक कसरतीपेक्षा पात्रांच्या मानसिकतेवर भर दिला पाहिजे’, ‘अनुवाद ‘आज्ञाधारक’ असावा, ‘सांगकाम्या’ नको..’, इत्यादी.

अनुवादासाठी कानडीतील कुठले साहित्य त्या निवडतात, यासंबंधी उमा कुलकर्णी सांगतात, की मराठीमध्ये ज्या पद्धतीचे लेखन आहे, त्या प्रकारचेच कानडी साहित्य निवडण्यापेक्षा जे मराठीत नाहीये त्या प्रकारचे साहित्य देण्यात त्यांना रस वाटतो.

उमा कुलकर्णी यांनी आपल्या कौटुंबिक जीवनाविषयीही लिहिले आहे. लहानपणीचे बेळगावमधले दिवस, कुटुंबातील नातेसंबंध, बेळगावचा परिसर, मित्र-मैत्रिणी, बेळगावच्या अवतीभोवतीची बेडकीहाळ, हक्केरी, हनगंडी, एकसंबा आदी सीमावर्ती गावे, बेळगावचा पावसाळा, कर्नाटकातील ब्राह्मणी कुटुंबांतले रीतिरिवाज, चालीरीती, सणवार, वंशवृक्ष सांगणारे ‘हेळवे’, सनातनी पद्धती, लग्नविधी, संस्कार, खाणेपिणे आदींमधून त्यांनी कर्नाटकातील ब्राह्मण समाजाच्या विशिष्ट संस्कृतीचे चित्रमय दर्शन यात घडवले आहे.

उमा कुलकर्णी यांनी आपल्या आणि पती विरुपाक्ष कुलकर्णी यांच्या सहजीवनासंबंधीही सविस्तर लिहिले आहे. हे सहजीवन परस्परपूरक आहे, समंजस आहे. एकमेकांना मनापासून समजून घेणारे आहे. कौटुंबिक कर्तव्ये व जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडणारे आहे. परस्परांना आदर व प्रेम देणारे आहे. परंपरा आणि नवतेची बूज राखणारे आहे. मैत्रभाव जपणारे आहे. आयुष्याच्या वाटचालीत भेटलेल्या स्नेहीजनांचे चित्रणही त्यांनी अत्यंत आपुलकीने या पुस्तकात केले आहे.

उमा कुलकर्णी यांनी भरपूर प्रवास केला आहे आणि त्याविषयीची त्यांची निरीक्षणेही त्यांनी मार्मिकपणे शब्दबद्ध केली आहेत. मुडबिद्रीसारख्या एका छोटय़ा गावात एका व्यक्तीने कुठल्याही सरकारी मदतीशिवाय आयोजित केलेल्या महासाहित्य संमेलनासंबंधी त्यांनी सविस्तर लिहिले आहे. या चार दिवसीय संमेलनाचे प्रवेश शुल्क (राहणे, नाश्ता, जेवण) फक्त १०० रुपये! २० पानी संमेलनपत्रिका, स्वखर्चाने आलेले हजारो साहित्यप्रेमी, भरगच्च कार्यक्रम, व्याख्याने, सत्कार, करमणुकीचे कार्यक्रम, कविसंमेलन असे खूप काही या संमेलनात होते. खंत ही की,  आपल्या महाराष्ट्रातील साहित्य संमेलनांमध्ये असे अभूतपूर्व दृश्य का दिसत नाही? असो!

कानडी भाषेतील भैरप्पांचे साहित्य मराठीभाषक वाचकांमध्येही अत्यंत लोकप्रिय आहे, आणि त्याचे श्रेय उमा कुलकर्णी यांच्या सुंदर अनुवादांना निश्चितच आहे. परंतु मराठी अभ्यासू जाणकारांमध्ये भैरप्पांच्या साहित्याबद्दल व त्यामागच्या त्यांच्या जीवनदृष्टीबद्दल काहीएक शंका आहेत. त्या उमा कुलकर्णीना निश्चितच माहीत असणार. भैरप्पांची यासंदर्भातली भूमिका नेमकी काय आहे, हेही त्यांना माहीत असणार. त्यासंबंधी त्यांनी या आत्मकथनात लिहायला हवे होते असे वाटते. यू. आर. अनंतमूर्तीच्या शेवटच्या काळात त्यांनी वेदमंत्रांची कॅसेट ऐकणे आणि मृत्यूनंतर माध्व ब्राह्मणांनी मंत्रघोष करणे हा उल्लेख आहे, तो अनुचित वाटतो. या एका घटनेमुळे अनंतमूर्तीनी आयुष्यभर जपलेल्या पुरोगामी मूल्यांना बाधा येते असे बिलकूल वाटत नाही. परंतु ही घटना खरी आहे असे मानले तर उमा कुलकर्णीना प्रिय असणाऱ्या स्नेहीजनांमध्येही असे कितीतरी अंतर्विरोध आहेत हेसुद्धा दाखवता येईल. ते त्यांना दिसले नाहीत, किंवा दिसले असतील तर त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले असे म्हणायचे का? गौतम बुद्ध हा उपनिषदकालीन ऋषी होता, असे भैरप्पा म्हणतात असा उल्लेख आहे. त्याचा पुरावा काय, असे त्यांना का विचारावेसे वाटले नाही? पु. ल. देशपांडे यांच्यासारख्या लोकप्रिय मराठी लेखकाच्या साहित्याचा अनुवाद कानडीमध्ये मात्र लोकप्रिय झाला नाही. असे का घडले, याची चिकित्साही केली गेलेली नाही. ती केली असती तर तेथील सांस्कृतिक अभिरुचीवर प्रकाश पडला असता असे वाटते.

उमा कुलकर्णी या चित्रकारही आहेत. या सर्जनशील छंदाविषयी व त्यातल्या निर्मितीच्या अनुभवांविषयी त्यांनी सविस्तर लिहिले असते तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक विलोभनीय पैलू यात दिसला असता. अर्थात या आत्मकथनामध्ये आत्मप्रौढी नाही, कटुता नाही, दुराग्रह नाही. उलट नितळपणा, मोकळेपणा व पारदर्शकता आहे आणि ‘जे घडले तेचि पसंत’ असा सूर आहे. मराठी आणि कानडीचा प्राचीन काळापासून चालत आलेला ऋणानुबंध आजच्या काळात अनुवादकार्यातून पुढे नेणाऱ्या उमा कुलकर्णी यांचे ‘संवादु अनुवादु’ हे आत्मकथन उत्तरोत्तर अधिक वाचनीय आणि माहितीपूर्ण होत गेले आहे.

संवादु अनुवादु’ – उमा वि. कुलकर्णी,

  • मेहता पब्लिशिंग हाऊस,
  • पृष्ठे- ४३२, मूल्य- ४५० रुपये.