महाराष्ट्रीय प्रबोधनाच्या प्रेरणा व स्वरूप यांचे आकलन आणि त्या पर्वाच्या कृतिशील नायकांचे पुनर्मूल्यांकन करण्याचे आवाहन अनेक अभ्यासकांना वारंवार साद घालताना दिसते. त्याचे कारण- महाराष्ट्राच्या पृथगात्मतेच्या निर्मितीत ज्या मूलगामी घटकांचे निर्णायक योगदान कारणीभूत आहे, त्यात कळीचे असलेले या प्रबोधन पर्वाचे स्थान मध्ययुगीन कालखंडातील वारकरी संप्रदायाची भक्ती चळवळ, त्यातून निष्पन्न झालेला छत्रपती शिवरायांच्या अधिपत्याखालील स्वराज्याचा लढा आणि स्वातंत्र्य चळवळीने रुजविलेला आधुनिक लोकशाही मूल्यांचा संस्कार.. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे आणखी तीन आयाम. स्थलकालपरत्वे आणि अनेकदा अभ्यासकाचे सामाजिक स्थान व त्याचा दृष्टिकोन यामुळे इतिहासाच्या पुनर्वाचनात स्वाभाविकच फरक पडतो. अभ्यासकाची ज्ञाननिष्ठा, न्यायबुद्धी आणि मूल्यव्यूह अशा तऱ्हेच्या सर्जनशील मांडणीसाठी जेवढे आवश्यक तेवढेच मुक्त आणि उदारमनस्क सामाजिक पर्यावरणही.

‘संघर्ष आणि शहाणपण : महाराष्ट्राच्या समाजेतिहासातील काही अध्याय’ या पुस्तकाचे लेखक नरेंद्र चपळगावकर वर उल्लेख केलेल्या चौकटीत विनासायास बसतात याची प्रचिती त्यांच्या पूर्वीच्या लेखनाने वारंवार आली आहे.  न्या. चपळगावकर यांची आतापर्यंत वीसएक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांचे विषय आणि शीर्षकं पाहिली तर आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाबद्दलचा त्यांचा अभ्यास आणि आस्था लक्षात येईल. नामदार गोखल्यांचा भारत सेवक समाज, न्या. केशवराव कोरटकर, कहाणी हैदराबाद लढय़ाची, स्वामी रामानंद तीर्थ यांचे ‘कर्मयोगी संन्यासी’ हे चरित्र, महात्मा गांधी आणि भारतीय राज्यघटना आणि राज्यघटनेचे अर्धशतक वगैरे त्यांच्या पुस्तकांचे अवलोकन केले तर उदारमतवादी राजकारण व समाजकारण आणि संविधानात अपरिहार्यपणे प्रकट झालेला मूल्यविचार यांचा त्यांनी सातत्याने केलेला पुरस्कार ठळकपणे अधोरेखित होतो. समकालीन वातावरणात या विषयांची व त्यावरील विचारमंथनाची प्रस्तुतता महत्त्वाची आहे.

‘संघर्ष आणि शहाणपण’ या प्रस्तुतच्या पुस्तकात १९ व २०व्या शतकातील निवडक घटना, प्रसंग आणि व्यक्ती केंद्रिभूत ठेवून केलेल्या विश्लेषणाचा, त्यात अंतर्भूत असलेल्या विविध प्रवाहांचा पट उलगडला आहे. एकूण नऊ लेख पुस्तकात आहेत. वेगवेगळय़ा निमित्ताने वेळोवेळी ते लिहिले असल्याने त्यात समान सूत्र नसले तरी एका वैचारिक दृष्टिकोनाने ते आतून जोडले आहेत. रानडे, टिळक आणि गोखले यांची या कालखंडावर ठळक मुद्रा उमटली असल्याने त्यांचा पुस्तकातील समावेश अपरिहार्य आहे. महाराष्ट्राच्या बाहेर असूनही महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी महाराष्ट्राच्या इतिहासात आपले मोक्याचे स्थान स्वकर्तृत्वाने निर्माण केले आहे. त्यांच्यावरील लेखाचा पुस्तकात समावेश आहे. महाराष्ट्राचे दैवत असलेल्या पंढरीच्या विठ्ठलाची पुजाऱ्यांच्या तावडीतून मुक्तता करण्याचा मंदिर प्रवेशाचा लढा आणि त्यात साने गुरुजींनी निभावलेल्या भूमिकेचा परामर्श हे या पुस्तकाचे वेगळेपण आहे. स्वातंत्र्य चळवळीत अनेक लढाऊ वृत्तपत्रे म्हणजे समाजाच्या हातातील धारदार अस्त्रे होती. त्या वृत्तपत्रांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर परकीय इंग्रज सरकारने अनेक अन्याय्य निर्बंध लादले, पण त्याचा प्रतिकारही तेवढय़ाच हिरिरीने झाला. त्याचा एक विस्तृत आलेख या पुस्तकात आहे. आजच्या सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांचे प्रबोधन होईल व त्यांना समकालीन घटनांचे विश्लेषण करण्यासाठी ऐतिहासिक पाश्र्वभूमी उपलब्ध होईल एवढी या पुस्तकाची उपयुक्तता आहे. महाराष्ट्राच्या वैचारिक इतिहासात स्वारस्य असणाऱ्या अभ्यासकांनाही एका उदार दृष्टिकोनाचा परिचय होईल.

इंग्रजांचं राज्य भारतात स्थिरावल्यानंतर सामाजिक स्थित्यंतराच्या पहिल्या टप्प्यात लोकांनी एकत्र येऊन विशिष्ट उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी स्वयंस्फूर्तीने सार्वजनिक नागरी संस्था स्थापन केल्या. आधीच्या सरंजामदारी वातावरणात व राजेशाहीत लोकांना आपले प्रश्न मांडणे किंवा ते सोडविण्यासाठी एकत्र येऊन संस्था स्थापन करणे ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती. त्यामुळे नवसमाजनिर्मितीसाठी आवश्यक असलेल्या सामाजिक संस्थांच्या बीजारोपणाचा हा कालखंड अतिशय सर्जनशील मानायला हवा. सामाजिक जबाबदारीची नवी जाणीव लोकांना करून देऊन स्वउत्कर्षांसाठी, विकासासाठी अशा तऱ्हेच्या विविध संस्थांच्या स्थापनेमध्ये त्या काळातल्या धुरीणांनी पुढाकार घेतल्याचे दिसते. त्याची सुरुवात झाली ती मुंबईत. नाना शंकरशेट हे या संक्रमणाचे अध्वर्यू.

या पुस्तकात मुंबईतील अशा तऱ्हेच्या कामांचा उल्लेख नाही. त्यावर इतर अभ्यासकांनी पुष्कळ काम केले आहे. पुण्यात संस्थात्मक कामाची पायाभरणी केली ती महात्मा जोतिराव फुले यांनी. स्त्रिया, वंचितांसाठी आणि विशेषत: मुलींसाठी शाळा सुरू करून, विधवांचा पुनर्विवाह आणि बालहत्या प्रतिबंधकगृहाची स्थापना करून सप्टेंबर १८७३ मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. मानवतावादाचा पुरस्कार केला. न्या. रानडे पुण्यात १८७१ मध्ये न्यायाधीश म्हणून बदलून आले तेव्हा जोतिराव फुले यांच्या कार्याने ते प्रभावित झाले होते आणि त्यांचे समर्थकही! न्या. रानडे यांच्या पुढाकाराने पुण्यातील संस्थात्मक कामाचा अपूर्व विस्तार आणि प्रसार झाला. सार्वजनिक सभेपासून प्रार्थना समाजापर्यंत पुण्यातील एकही अशी संस्था नव्हती ज्यात न्या. रानडे यांचा सहभाग नव्हता. अर्थात, सार्वजनिक काकांपासून भांडारकरांपर्यंत आणि नंतर टिळक, आगरकर, गोखल्यांपर्यंत अनेक मातब्बर आसामींनी पुण्याचे सार्वजनिक आणि संस्थात्मक जीवन समृद्ध केले असले तरी न्या. रानडे ज्याला ‘मंडळीकरण’ म्हणत त्या प्रक्रियेतील संप्रेरक स्वत: रानडेच होते आणि काही काळ तरी ‘रानडे म्हणजे पुणे’ असे समीकरण तयार झाले होते. ‘पुण्यातील प्रत्येक व्यक्ती म्हणजे जणू एक स्वतंत्र संस्थाच’ अशी प्रशंसा नंतर महात्मा गांधींनी केली, त्याची सुरुवात अव्वल इंग्रजी कालखंडातच झाली होती. न्या. चपळगावकर यांनी या कालखंडातील अनेक व्यक्तींचे त्रोटक आणि सारांशाने असले, तरी यथामूल मूल्यमापन करून न्याय्य श्रेय विभागणी केली आहे. रानडे अर्थातच त्यात शीर्षस्थानी आहेत. पुण्यात ग्रंथकारांचे पहिले संमेलन रानडे यांनीच आयोजित केले होते आणि त्याचीच परिणती ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’च्या स्थापनेत झाली आणि आजही ही संस्था मराठी वाङ्मयाच्या व्यवहारात आपले स्थान टिकवून आहे. अशा नागरी संस्था अलीकडच्या काळात आपली स्वायत्तता गमावून प्रभावहीन होत आहेत, अशी खंत व्यक्त करून प्रगल्भ लोकशाहीच्या अस्तित्वालाच त्यामुळे हानी पोहोचते असा इशारा न्या. चपळगावकर देतात. त्यांची ही अस्वस्थता लोकशाहीवादी व उदारमतवादी समाजघटकांचे विद्यमान काळातील प्रातिनिधिक आक्रंदन आहे, असे समजण्यास प्रत्यवाय नाही.

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात टिळक-आगरकर आणि टिळक-गोखले या द्वंद्वांप्रमाणेच रानडे आणि टिळक यांच्यातील परस्पर मतभेदांची चर्चा अटळपणेच होते. रानडे व टिळक या दोन स्वतंत्र विचारसरणी आणि भिन्न मार्ग असल्याने त्यांच्यातील वैचारिक विसंवादाचे प्रतिबिंब समाजमनात उमटले असणार. रानडे आधीच्या पिढीचे, नेमस्त व क्रांतीपेक्षा उत्क्रांतीवर भर देणारे असल्याने, टिळकांना रानडे यांच्याबद्दल आदर असला तरी राजकीय मैदानात त्यांनी रानडे यांच्यावर आक्रमक टीका केली आहे. न्या. रानडे यांनी मात्र त्याचा कधीच प्रतिवाद केला नाही. टिळकांची महत्ता आणि स्वायत्तता ते जाणून होते. या दोघांच्या परस्पर संबंधांवर, ‘लव्ह-हेट’ म्हणता येईल अशा गुंतागुंतीच्या नात्यावर लेखकाने साधार प्रकाश टाकला आहे.

‘लोकमान्य आणि शिक्षण’ या पुढच्याच लेखात टिळकांची शिक्षणविषयक भूमिका आणि राष्ट्रीय शिक्षणाविषयीचे त्यांचे आग्रही प्रतिपादन याची वाचकांना ओळख होते. टिळकांच्या या भूमिकेवर ठाम विश्वास ठेवून विष्णु गोविंद तथा अण्णासाहेब विजापूरकरांनी तळेगाव येथे काढलेल्या समर्थ विद्यालयाचा परिचय आणि विजापूरकरांसारख्यांनी आपले संपूर्ण आयुष्य त्यासाठी कसे पणाला लावले, याची ‘एक लोकशिक्षक’ ही हकिगत आजच्या शिक्षणसम्राटांनी घातलेल्या धूमाकुळात आणि शिक्षणाच्या बाजारीकरणात प्रेरक आणि डोळय़ांत अंजन घालणारी आहे.

विजापूरकरांचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे, नव्या संकल्पनांसाठी मराठी प्रतिशब्दांची जडणघडण. उदा., ‘अग्रलेख’ हा शब्द त्यांनी घडविला आहे. केंद्रीय विधिमंडळाला ‘लोकसभा’ आणि सदनाच्या एका बैठकीला, सेशनला, ‘सत्र’ ही नावे त्यांचीच देणगी आहे.

या पुस्तकातील सर्वोत्तम म्हणता येईल असा लेख म्हणजे ‘उदारमतवादी देशभक्त : ना. गोखले’. नामदार गोखले यांच्या सर्व प्रकाशित चरित्रांचे सार या विस्तृत व्यक्तिचित्रात सामावले आहे. गोखल्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी पूर्ण तादात्म्य पावत फार उमाळय़ाने तो लिहिला आहे. गोखले यांचे राजकारण नेमस्त आणि उदारमतवादी होते, स्वराज्याचे ध्येय साध्य करावयाचे असेल तर सनदशीर घटनात्मक चळवळ हाच त्यासाठीचा मार्ग आहे. यावर त्यांचा गाढ विश्वास होता. न्या. रानडे, ना. गोखले आणि म. गांधी ही अशा विचारांची कडी होती. त्यांचा मार्गच उचित होता यावर आता इतिहासानेच शिक्कामोर्तब केले आहे. परंतु संसदीय मार्गाचा अवलंब करणे म्हणजे इंग्रजानुकूल किंवा ब्रिटिशधार्जिणे धोरण स्वीकारणे असा हेत्वारोप त्यांच्या समकालीन व प्रतिस्पर्धी जहाल राजकीय नेतृत्वाने वारंवार केला आणि गोखल्यांची मानहानी केली. प्रचलित राजकीय परिभाषेतील शेलकी विशेषणे वापरून त्यांना ‘राष्ट्रद्रोही’ असे संबोधण्यात आले आणि त्यांच्या खुनाचा दोनदा प्रयत्नही झाला. चपळगावकर यांनी या लेखाच्या शीर्षकात गोखल्यांसाठी ‘देशभक्त’ हे विशेषण, कदाचित जाणीवपूर्वक, योजून संचित सामाजिक अपराधीपणाची भावनाच व्यक्त केली आहे.

संसदीय लोकशाही मार्गावर ना. गोखले यांची अढळ श्रद्धा होती. इतर पर्याय उपलब्ध असतानाही त्यांनी न्या. रानडे यांचे शिष्यत्व पत्करले. त्याचे कारण- गोखले जन्मजात उदारमतवादी होते, तो त्यांचा स्वाभाविक पिंड होता. केवळ एक राजकीय विचारसरणी म्हणून त्यांनी ती स्वीकारली नव्हती. लोकशाहीचे माहेरघर म्हणून ज्या ब्रिटनचा सन्मान होतो, त्या ब्रिटिश संसदेत ना. गोखले यांना श्रद्धांजली वाहताना तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधानांनी जे उद्गार काढले ते ना. गोखले यांच्या चरित्र आणि चारित्र्याचे यथार्थ मूल्यमापन आहे. ते उद्गार असे, ‘ना. गोखले ब्रिटनमध्ये जन्मले असते तर ते या देशाचे पंतप्रधान झाले असते.’ म. गांधी यांनी निवडलेला गुरू, न्या. रानडे यांनी निवडलेला शिष्य आणि प्रिं. आगरकर यांनी निवडलेला सहकारी किती थोर होता याच्या समर्थनार्थ आणखी पुरावा किंवा तपशील देण्याची गरज नाही.

बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड आणि महाराष्ट्र यांच्यातील विशेष नात्याचे चित्रण फार आपुलकीने करणारा एक दीर्घ लेख या पुस्तकात आहे. लेखकाच्याच शब्दांत ते असे उलगडता येईल.

‘महाराष्ट्रात कोणतीही सत्ता सयाजीरावांकडे नव्हती, तरीही महाराष्ट्राची जनता त्यांना मनोमन आपले महाराज मानत होती. त्या काळातल्या महाराष्ट्राच्या समाजजीवनातील एकही मोठी सार्वजनिक संस्था अशी नसेल, की जिला सयाजीरावांचे पाठबळ मिळाले नाही. मराठा समाजातील अनेक तरुण सयाजीरावांच्या शिष्यवृत्त्यांमुळे, उच्चविद्याविभूषित होऊ शकले, महत्त्वाच्या पदांवर आपली कार्यक्षमता दाखवू शकले. सयाजीरावांनी मदत केलेला एक महत्त्वाचा तरुण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. सयाजीरावांच्या मदतीमुळे त्यांचे शिक्षण निर्वेध पार पडले व त्यांनीच पहिली नोकरी बाबासाहेबांना दिली. महाराष्ट्रातील एक धर्माभ्यासक, महत्त्वाचे समाजसुधारक आणि तत्त्वनिष्ठ राजकारणी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना शिक्षणासाठी आणि पुढे मँचेस्टरमध्ये एकेश्वरी विचारांचे धर्मशिक्षण घेण्यासाठी जाताना प्रवासवृत्ती दिली. त्यांचे नाते आयुष्यभर टिकले. म. फुले यांना बडोद्यात बोलावून त्यांचा गौरव केला. महाराष्ट्राच्या वैचारिक परिवर्तनामध्ये काम करणाऱ्या न्या. रानडे, ना. गोखले, लोकमान्य टिळक, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, विठ्ठल रामजी शिंदे, न्या. चंदावरकर अशा अनेक तत्कालीन मराठी नेत्यांशी त्यांचे स्नेहाचे संबंध होते. पुण्यातील गायकवाड वाडा टिळकांना मोफत देण्याचीही सयाजीरावांची तयारी होती, परंतु तसे करणे इंग्रज सत्तेला आवडणार नाही म्हणून लोकमान्य देऊ शकतील ती किंमत ठरविण्यात आली. अनेक ग्रंथकारांना, देशसेवक आणि क्रांतिकारकांना त्यांनी मदत केली. स्वातंत्र्य चळवळीबद्दल त्यांना आपुलकी होती. बडोद्यात राज्य करीत असतानाही महाराष्ट्राशी असलेले नाते गायकवाड कधी विसरले नाहीत आणि हा राजा आपला आहे हे महाराष्ट्रही विसरला नाही.’

आजचा महाराष्ट्र मात्र सयाजीरावांना विसरला आहे. त्यांचे स्मृतिजागरण करणारा हा लेख त्यामुळेच महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रीय प्रबोधनाच्या कार्यक्रमपत्रिकेत धर्मसुधारणा हा प्राधान्याचा विषय होता. त्या काळी सामाजिक आणि वैयक्तिक जीवनातही धर्माचे अवडंबर प्रचंड माजले होते. ख्रिस्ती धर्मप्रचारकांनी हिंदू धर्मातील विषमता, जातिभेद, वर्णवर्चस्व आणि त्यातून होणारे शोषण या विषयांना अनुसरून केलेल्या वैचारिक हल्ल्यांना प्रतिसाद म्हणून धर्मचिकित्सेची सुरुवात इथे झाली. प्रार्थना समाज आणि सत्यशोधक समाजांची स्थापना ही धर्मसुधारणांच्या प्रयत्नांचीच फलश्रुती. धर्म परिवर्तनशील आहे, त्यात कालसापेक्ष बदल होणे अपरिहार्य आहे आणि मूळ धर्माच्या चौकटीत राहून ते करता येणे शक्य आहे, अशी धारणा असलेल्या केवलानंद सरस्वती यांनी वाईत कृष्णाकाठी प्राज्ञपाठशाळा स्थापन करून धर्मशास्त्राकडे पाहण्याची नवी दृष्टी समाजाला दिली. लक्ष्मणशास्त्री जोशींनी तो वारसा समर्थपणे पुढे नेला. या ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाच्या असलेल्या कार्याचे साधार विश्लेषण करणारा या पुस्तकातील लेख परिवर्तनाच्या पर्वातील एक दुर्लक्षित आयाम आहे.

वृत्तपत्रांचे आणि एकूणच अभिव्यक्तिस्वातंत्र्य आपण आज गृहीत धरतो, परंतु ते ध्येय साध्य करण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रज सत्ताधिशांशी वृत्तपत्रांनी तो अविरत लढा दिला आणि त्यासाठी किंमत चुकविली त्याचा धावता आढावा घेणारा, संदर्भमूल्य असलेला एक उत्तम निबंध या पुस्तकात आहे. महाराष्ट्राचे दैवत असलेले पंढरपूरचे विठ्ठल मंदिर तत्कालीन अस्पृश्यांना दर्शनासाठी खुले व्हावे यासाठी प्राण त्यागाच्या निर्धाराने उपोषणाला बसलेल्या साने गुरुजींच्या आयुष्यातील एका धगधगत्या पर्वाच्या निरूपणाने या पुस्तकाचा समारोप होतो. महाराष्ट्राच्या अस्मितेची एका उदारमतवादी परिप्रेक्ष्यातून होणारी ही आंशिक ओळख विचारप्रवर्तक आणि नव्या पिढीच्या अभ्यासकांना उत्तेजित करणारी आहे.

‘संघर्ष आणि शहाणपण : महाराष्ट्राच्या समाजेतिहासातील काही अध्याय’

नरेंद्र चपळगावकर, मौज प्रकाशन

पृष्ठे- १७९, किंमत- २५० रुपये

सदा डुम्बरे