|| राखी चव्हाण

भारतीय शेती आणि भारताचे अर्थकारण अजूनही पावसावरच अवलंबून आहे. सामान्य माणसाला पावसाची प्रतीक्षा असतेच; किंबहुना, त्याहीपेक्षा अधिक प्रतीक्षा शेतकऱ्याला असते. त्यामुळे हवामान खात्याकडून वर्तवल्या जाणाऱ्या पावसाच्या अंदाजाकडे सर्वाचेच डोळे लागलेले असतात. मात्र, गेल्या काही वर्षांत हवामान खात्याकडून वर्तवले जाणारे मोसमी पावसाचे अंदाज फसत चालले आहेत. त्यामुळे हवामान खात्याच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

पावसाच्या लहरीपणावर जितकी चर्चा होते, दुर्दैवाने तितकी चर्चा हवामान खात्याच्या लहरी अंदाजांच्या बाबतीत होताना दिसून येत नाही. पावसासंदर्भात अनेकदा हवामान खात्यातील शास्त्रज्ञांनी आधीच काही तारखा जाहीर केलेल्या असतात. त्यामुळे या तारखा खऱ्या ठरवण्यासाठी मग आटापिटा केला जातो. मात्र, अशा तऱ्हेने घाईघाईने वर्तवल्या जाणाऱ्या पावसाच्या अंदाजाकडे आशेने डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो याबद्दल त्यांना काहीच देणेघेणे नसते. प्रसार माध्यमांकडेही हवामान खात्याने जाहीर केलेल्या पावसाच्या अंदाजाची सत्यासत्यता तपासून पाहण्याचे कोणतेही परिमाण नसते. त्यामुळे हवामान खात्याकडून जी माहिती दिली जाते, तीच सत्य मानून ती लोकांसमोर ठेवली जाते. साधारणपणे हवामान विभागाच्या दिल्ली आणि पुणे कार्यालयांतून दिल्या जाणाऱ्या माहितीवरच प्रसार माध्यमांची सारी भिस्त असते. यात फसगत मात्र बिचाऱ्या शेतकऱ्याची होते. कारण पावसावरच शेतकऱ्याचे पीक लागवडीचे सगळे गणित अवलंबून असते. हे गणित चुकले की शेतकऱ्याचे संपूर्ण अर्थकारणच उलटेपालटे होते. त्यातून शेतकऱ्याचा कर्जबाजारीपणा वाढून ते फेडता न आल्याने पुढे आत्महत्येत त्याची परिणती होते. भारतात वर्षभर कोणत्या ना कोणत्या कारणाने पाऊस पडत असतो. पण तो सर्वच पाऊस मोसमी असतो असे नाही. सर्वसामान्य लोकांना मोसमी पावसाची नीटशी ओळख नाही. वाऱ्याच्या दिशेवरून तो ओळखला जातो. हवामान खात्याच्या मॉडेलमध्ये पाऊस किती पडणार, तो पडणार की नाही, हे कधी कधी बदलते. मात्र, वाऱ्यांची दिशा आणि तापमान हे  या मॉडेलमध्ये स्थिर असतात. पण हवामान खात्याकडून वाऱ्यांची दिशा न तपासताच मोसमी पावसाचे आगमन जाहीर केला जातो. ‘स्कायमॅट’सारख्या हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या काही खासगी संस्था अस्तित्वात आल्यामुळेच की काय, पण गेल्या काही वर्षांत हवामान खात्याकडून मोसमी पावसाचे आगमन व संभाव्य प्रमाण जाहीर करण्याची प्रचंड घाई केली जात आहे. केरळमध्ये पावसाचे आगमन झाल्यानंतर साधारणपणे महाराष्ट्रात पाऊस येण्यासाठी दहा दिवस लागतात. यादरम्यान वाऱ्यांची दिशा बदलून मोसमी पाऊस मागेपुढे होऊ शकतो. संपूर्ण महाराष्ट्रात वाऱ्यांची दिशा पश्चिम किंवा दक्षिण पश्चिमेकडून असते, तर भारतात उर्वरित ठिकाणी- म्हणजेच दिल्ली वगैरे भागात वाऱ्याची दिशा वेगळी असते. जमिनीवर आणि जमिनीपासून सुमारे १५ हजार फुटापर्यंत वारे पश्चिम किंवा दक्षिण-पश्चिमेकडून येतात तेव्हाच तो खऱ्या अर्थाने मोसमी पाऊस असतो. हा मोसमी पाऊस मागेपुढे होऊ शकतो. मोसमी पावसाचा संदेश आल्यानंतरच शेतकरी पेरणी करतात. कारण संथ बरसणाऱ्या मोसमी पावसाने पेरणी केलेल्या बीजांना अंकुर फुटतात. वळिवाचा पाऊस हा गडगडाटी असल्याने पेरणी वाहून जाते. आपल्याकडची शेती ही अजूनही मोसमी पावसावरच अवलंबून आहे. त्यामुळे मोसमी पावसाला विलंब झाला की शेतीचे वेळापत्रक बिघडते. मोसमी पावसाशी जुळवून घेणे हे शेतकऱ्याला- त्यातही विदर्भातील शेतकऱ्याला कधीच जमले नाही. प्रतिकूल हवामानाला निसर्गाचा कोप समजून हतबल होणे आणि त्यातूनच पुढे आत्महत्येचा मार्ग पत्करण्यापर्यंत शेतकऱ्यांची मजल जाते. यास्तव मोसमी पावसा करता केवळ हवामान खात्याच्या भाकितावर अवलंबून न राहता मोसमी पावसाची प्रक्रिया शेतकऱ्यांनी समजून घेतली पाहिजे. ही प्रक्रिया समजून घेत शेतीचे नियोजन केले तर होणारे नुकसान बऱ्याच अंशी टाळता येईल.

हवामान खात्याच्या अंदाजाचा परिणाम शेअर मार्केटवरसुद्धा होतो. त्यामुळे अधिकाधिक सकारात्मक अंदाज देण्याकडे या खात्याचा कल असतो. मात्र, याचे विपरीत परिणाम होतात याचा विचार खात्याकडून कधीच केला जात नाही. मोसमी पावसाचे पूर्वानुमान करणे इतके सोपे नाही. मोसमी पावसाच्या आगमनाचे काही निकष आहेत. आणि प्रत्येक वेळी ते निकष लागू पडतीलच असे नाही. मोसमी पावसाच्या वाऱ्यांची जशी दिशा आहे, तसेच ढगांच्या बाबतीतही काही निकष आहेत. मोसमी पावसाचे ढग मध्यम उंचीचे आणि दूरवर पसरलेले असतात. तसाच मोसमी पाऊसदेखील गडगडाट न करता सातत्य राखून संथपणे बरसत असतो. किमान दोन दिवस सातत्याने चालणारी पावसाची रिमझिम म्हणजेच मोसमी पाऊस होय. परंतु मोसमी आणि वळिवाच्या पावसात अजूनही आपल्याकडे गफलत केली जाते. मागील वर्षी हवामान खात्याच्या अंदाजावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. त्याचा सर्वात मोठा फटका त्यांना बसला. शेतकऱ्यांची दुबार नव्हे, तर तिसरी पेरणीसुद्धा वाया गेली. दोन वर्षांपूर्वी असेच हवामान खात्याचे अंदाज चुकल्याने राज्यातील हजारो शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. ‘वेधशाळेने पावसाबद्दलचे खोटे अंदाज व्यक्त करून माझे आणि राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान केले आहे. हा फसवणुकीचा प्रकार आहे,’ अशी तक्रार बीड जिल्ह्यतील एका शेतकऱ्याने पोलिसात दाखल केली होती. त्यात वेधशाळेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्याने केली होती. हवामान विभागाने सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज व्यक्त केल्यामुळे महागडे बियाणे घेऊन आपण पेरणी केली. मात्र, आता पावसाने ओढ दिल्याने पेरणी वाया गेली. यासाठी सर्वस्वी हवामान खाते जबाबदार आहे असे त्यांनी त्या तक्रारीत म्हटले होते. एवढेच नव्हे तर हवामान विभाग आणि बी-बियाणे कंपन्या आपल्या फायद्यासाठी अशी चुकीची माहिती प्रसारित करीत असल्याचा आरोपही केला होता.

हाताशी आधुनिक उपकरणे असतानाही हवामान खात्यातील तज्ज्ञ व शास्त्रज्ञ मोसमी पावसाविषयी अचूक माहिती का देऊ शकत नाहीत, हा प्रश्न यानिमित्ताने उभा राहतो. विकसित देशांमध्ये हवामानाचा अंदाज चुकला तर शास्त्रज्ञांना जाब विचारला जातो. त्यांच्याकडून भरपाई घेतली जाते. आपल्याकडे असे काही होत नसल्याने शास्त्रज्ञही बेफिकीर झाले आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. दुसरीकडे काही खासगी हवामान संस्थांचे अंदाज अचूक ठरत असल्याचे गेल्या काही वर्षांत निदर्शनास येत आहे. मूठभर लोक असलेल्या स्कायमॅट, क्यू बेक वेदर यासारख्या संस्थांचे आव्हान पेलताना हवामान खात्याच्या कारभारात सुधारणा होणे गरजेचे आहे. भारतीय हवामान खात्याच्या मदतीसाठी व मोसमी पावसाच्या अचूक माहितीसाठी हवामान संशोधन केंद्र- म्हणजेच ‘आयआयटीएम’ (इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी) ही हवामानावर संशोधन करणारी संस्था कार्यरत आहे. मात्र, या दोन्हीमध्ये समन्वयाचा अभाव आणि श्रेयवाद आहे. २०१४ साली सुमारे एक महिना महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यंत गारपिटीने शेतकरी बेजार होत असताना नागपुरातील हवामान संशोधन केंद्राने त्यांची रडार यंत्रणा बंद ठेवून त्यांच्या अ‘कार्यक्षमते’चा दर्जा दाखवून दिला होता. महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देश या संस्थेकडे आशेने पाहत असतो. पण अलीकडे त्यांच्या हेतूविषयी शंका यायला लागली आहे. युरोप-अमेरिकेसारखे विकसित देश समशीतोष्ण कटिबंधात येतात. त्यामुळे तेथे हवामानाची माहिती अचूकपणे शक्य होते. भारत उष्ण कटिबंधात येत असल्याने काही अडचणी येतात असे कारण वर्षांनुवर्षे सांगितले जात आहे. मात्र, उष्ण कटिबंधात येणारा भारत हा एकमेव देश नाही. अमेरिकेसह आफ्रिका खंडातील अनेक देशांतील प्रदेश हे उष्ण कटिबंधात मोडतात. विशेष म्हणजे या प्रदेशांतदेखील तेथील हवामान विभागाकडून बिनचूक माहिती अगदी दर तासाला दिली जाते.

हवामानाची अचूकता हा मुद्दा व्यक्तीजीवनाशी जोडला जातो. बदलत्या हवामानाचे ‘वर्तमान’ तात्काळ जनतेपर्यंत पोहोचविण्यावर हवामान खात्याची विश्वासार्हता अवलंबून असते. ही माहिती चुकली तर हवामान संशोधकांवर थेट न्यायालयातच खटले दाखल केले जातात. हवामान संस्थाप्रमुखांना कारागृहात पाठवून त्यांच्या वेतनातून नुकसानभरपाई वसूल करण्याच्या घटना रशियासारख्या देशात घडलेल्या आहेत. विदेशात शेतकऱ्यांनाच नाही, तर सर्वसामान्य नागरिकांनासुद्धा हवामानाचे ताजे वर्तमान त्यांच्या भ्रमणध्वनीवर कळवले जातात. हवामानाचे धोके संभवणार असतील तर त्याचीही माहिती दिली जाते.  एवढेच नव्हे तर त्या धोक्यांपासून बचावासाठी काय काळजी घेतली पाहिजे याच्या सूचनाही दिल्या जातात. भारतीय हवामान खात्याकडून असे संभाव्य धोके आणि त्याबद्दलच्या सूचना द्यायचे तर दूरच; आत्मविश्वासाने हवामानाची अचूकता देण्याचे दायित्वदेखील निभावले जात नाही. हवामानविषयक मॉडेल ‘अपग्रेड’ होत असले तरीही त्यांचा वापर करून भाकित वर्तवणारी माणसे मात्र तीच जुनाट आहेत. विदेशात भारतीय हवामान संशोधकांची पाठ थोपटली जाते. परंतु भारतीय हवामान खाते या संशोधकांच्या ज्ञानाचा उपयोग करून घेण्यास मात्र तयार नाही.

rakhi.chavan@expressindia.com