प्रायोगिक / समांतर रंगभूमी आणि चित्रपटांतून अभिनय, ‘अभिव्यक्ती’ संस्थेतर्फे नाटय़निर्मिती, तसेच उत्तम अनुवादक अशा विविध रूपांत परिचित असलेल्या रेखा सबनीस यांचे त्यांच्या सुह्रदाने रेखाटलेले व्यक्तिमत्त्व..

१९६६ साली मला तारा वनारसे हिने लिहिलेल्या ‘कक्षा’ या नाटकाचा प्रयोग ‘नाटय़शिल्पी’ या संस्थेतर्फे महाराष्ट्र राज्य नाटय़स्पध्रेत सादर करायचा होता, त्या वेळची गोष्ट. या नाटकात मला एक महत्त्वाकांक्षी व तडफदार, दिसायला सुंदर अशी मुलगी नायिकेच्या भूमिकेकरिता हवी होती. मुंबई विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन स्पध्रेत चर्चगेटच्या क्लब हाऊसच्या नाटय़गृहात झालेल्या एकांकिका स्पध्रेत एल्फिन्स्टन महाविद्यालयाच्या नाटकात रेखा सबनीसला मी पाहिलं होतं. मला जाणवलं, की ‘कक्षा’ नाटकात ऊर्मिला या नायिकेच्या भूमिकेकरिता हीच मुलगी योग्य आहे. मी तिचा शोध घ्यायला निघालो. त्या वेळी एल्फिन्स्टन कॉलेजात रेखा सबनीस संस्कृत विषयाची प्राध्यापिका होती. मी कॉलेजमध्ये जाऊन तिला नाटकाचं पुस्तक दिलं. तिनं पुस्तक वाचून मला होकार दिला. या नाटकात ऊर्मिला ही एका गरीब संगीत मास्तराची मुलगी असते. त्या मास्तराकडे एका श्रीमंत बापाचा कुचकामी मुलगा केवळ तिचा सहवास मिळावा म्हणून शिकवणीकरिता येत असतो. ऊर्मिलाची तिच्याच ताकदीच्या, पण त्या श्रीमंत माणसाकडे आश्रित म्हणून वाढलेल्या प्रभाकर या महत्त्वाकांक्षी तरुणाकडे ओढ असते. मात्र त्या श्रीमंत माणसाने आपल्या वडिलांवर केलेल्या उपकारांची जाणीवही ऊर्मिलेला असते. प्रभाकरच्या प्रेमाचा ती स्वीकार करत नाही. या कक्षा पडल्यामुळे ती शिकवणीकरिता येणाऱ्या मुलाशीच लग्न करण्याचा निर्णय तडकाफडकी घेते. मी नाटकात मास्तराच्या मुलाची भूमिका करत होतो व दिवाकर जठार त्या महत्त्वाकांक्षी तरुणाची भूमिका करत होता. नाटक फारच छान झाले आणि विदर्भ साहित्य परिषदेचे त्याला पारितोषिक मिळाले होते.

arguments with the team
ताणाची उलगड : वादाला महत्त्व किती?
High Court
अपंगांसाठीचे कायदे पुस्तकापुरते मर्यादित ठेवू नका, दृष्टीहीन महिलेला रेल्वेतील नोकरीबाबत दिलासा देताना उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती
shubhangi galande bold decision of pregnancy happy single mother
मला आई व्हायचंय… म्हणणाऱ्या शुभांगी गलांडेच्या ‘या’ धाडसी निर्णयाचे सोशल मीडियावर कौतुक; पाहा…
kamal nath
भाजपात जाण्याच्या चर्चांवर कमलनाथांची रोखठोक भूमिका, प्रसारमाध्यमांवर संताप व्यक्त करत म्हणाले…

माझ्या माहितीप्रमाणे रेखाचं हे पहिलंच मराठी नाटक होतं. याअगोदर रेखाने दिल्लीला ‘शाकुंतलम्’ या संस्कृत नाटकात शकुंतलेचं काम केलं होतं. नाटकाचं दिग्दर्शन नटवर्य दाजी भाटवडेकर यांनी केलं होतं व ते स्वत: दुष्यंताच्या भूमिकेत होते. ‘कक्षा’ या नाटकानं माझी आणि रेखाची चांगली ओळख झाली. मी पुढे माझे मित्र पावसकर यांच्या ‘निर्माल्य वाहिले चरणी’, ‘नाटय़शिल्पी’च्या शंभुमित्रांच्या ‘कांचनरंग’ या नाटकात कामं केली. रेखाने ‘ओम नाटय़साधना’च्या ‘रुपाली’ या नाटकात काम केलं. पुढे रेखा आणि मी एका कार्यक्रमात मध्यांतरात चहा घेता घेता ठरवलं, की आपल्याला प्रायोगिक रंगभूमीची ओढ आहे, तर आपणच एखादी संस्था काढावी आणि तीद्वारे आपण नाटके करावीत. त्याच वेळी आम्ही या संस्थेचे नाव ‘अभिव्यक्ती’ असं ठरवलं. दाजी भाटवडेकर हे अध्यक्ष व रेखा आणि मी या संस्थेचे संयुक्त कार्यवाह झालो.

‘अभिव्यक्ती’ने नंतर मागे वळून पाहिले नाही. एकामागोमाग एक नाटके करण्यास सुरुवात केली. त्यांत ‘हे रंग मानवाचे’, ‘पाच वाजून पाच मिनिटे’, ‘विवस्त्रा’, ‘मृत्यू आता इथे थांबणार नाही’, ‘आकाश’ या नाटकांची आम्ही निर्मिती केली. ‘हे रंग मानवाचे’ हे नाटक करताना मी गिरगावातील खोताच्या वाडीच्या परिसराचा नेपथ्याकरता अभ्यास केला होता. पांडुरंग कोठारे याने नाटकाचा छान सेट तयार केला होता. पडदा उघडल्यानंतर तो अप्रतिम सेट पाहूनच टाळ्यांचा गजर होत असे. पाश्र्वनाथ आळतेकर स्पध्रेत या नाटकाला बरीच बक्षिसे मिळाली. रेखाच्या पारखी नजरेची एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे कोकणस्थ वैश्य समाजाच्या शेणवी वाडीतील सभागृहात तालमीच्या वेळी आम्हाला दोन छोटी मुले हवी होती. त्यातील एक चित्रा पालेकर होती. दुसरा तिचा छोटा भाऊ हवा होता. तालमीच्या वेळी मी तिकडे जाऊ शकलो नव्हतो. दुसऱ्या दिवशी रेखा मला म्हणाली की, ‘तो मुलगा मिळाला. तालमीच्या वेळी हॉलच्या गॅलरीत मी एक मिस्कील मुलगा पाहिला. तो त्या दुसऱ्या मुलाच्या भूमिकेला मला योग्य वाटला आणि मी त्याला घेतला.’ हाच मुलगा पुढे लक्ष्मीकांत बेर्डे या नावाने मराठी रसिकांच्या गळ्यातील ताईत बनला. लक्ष्मीकांतने पुढे एका मुलाखतीतही सांगितलं होतं, की माझं पहिलं नाटक म्हणजे ‘अभिव्यक्ती’चं ‘हे रंग मानवाचे’ हे नाटक! त्याचं क्रेडिट रेखाला जातं.

महात्मा गांधींच्या हत्येवर रेखानं ‘पाच वाजून पाच मिनिटे’ हे नाटक बसवले होते. मूळच्या ललित सगलच्या ‘हत्या – एक आकार की’ या नाटकाचा तो मराठी अनुवाद होता. त्यावर ‘फाइव्ह पास्ट फाइव्ह’ हा इंग्रजी सिनेमा तयार होऊन त्याला गांधी जन्मशताब्दीला अमेरिकेत बक्षीसही मिळालं होतं. या नाटकात केवळ चार पात्रं होती. त्यात अिहसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका शांततावादी नेत्याचा काटा काढण्याचा कट रचला जातो. पण आयत्या वेळी त्या चारांपकी एकाचं म्हणणं पडतं की, आपण त्या शांततावादी नेत्याचं – म्हणजेच गांधींचं म्हणणं नीट समजून घ्यावं. त्या वेळी इतर तिघांना वाटतं की, हा एकटा जरी विरोधात गेला तरी आपला सारा कटच उधळला जाईल. म्हणून ते एक मॉक ट्रायल घ्यायचं ठरवतात. त्यात एक न्यायाधीश होतो तर अन्य दोघांपकी एक गोडसेचे प्रतिनिधित्व करतो, तर दुसरा कटाला विरोध करणारा आरोपी होतो. मग आरोपांची मालिका सुरू होते. फिर्यादीच्या – म्हणजे गोडसेच्या भूमिकेत मी स्वत: होतो. आरोपी म्हणजेच गांधींच्या भूमिकेत सुहास भालेकर होते. एक गोष्ट ठरली होती – ती म्हणजे आरोपी जर हरला, तर त्या शांततावादी नेत्याचा खून करायचा. पण आरोपी सर्व आरोपांना नीट उत्तरे देतो. शेवटी फिर्यादी हताश होतो व ‘तू हरलास’ असे जबरदस्तीने सांगून तिघांना घेऊन जातो व त्या शांततावादी नेत्याचा खून करतात. पडद्यामागून पिस्तुलाच्या गोळ्यांचा आवाज ऐकल्यानंतर आरोपीच्या पिंजऱ्यात असलेला तो नेता म्हणतो की, ‘तुम्ही हत्या एका आकाराची केलीत; त्याच्या तत्त्वाची नाही.’ अशी ‘हत्या एक आकार की’ या मूळ हिंदी नाटकाची कथा होती. नाटकाचं दिग्दर्शन रेखानं केलं होतं. या नाटकाला उषा मेहता व इतर काही गांधीवाद्यांचा विरोध होता. दिल्लीला हे सारे रस्त्यावर निदर्शने करीत. रेखा जेव्हा एखाद्या नाटकाला हात घाली तेव्हा जिद्दीनं काम करी. हे नाटक चौपाटीच्या भारतीय विद्या भवनच्या नाटय़गृहात करायचं ठरलं. प्रयोगाच्या दिवशी भारतीय विद्या भवनने कळवलं की, हे नाटक आमच्या नाटय़गृहात तुम्ही सादर करू नका. कारण त्याला विरोध करणारे उषा मेहता व इतर कार्यकत्रे इथे नाटकाविरोधात निदर्शने करणार आहेत. या लोकांचा विरोध होता तो नाटकात गोडसेला महत्त्व दिले होते म्हणून! वास्तविक या शीर्षकाच्या इंग्रजी सिनेमाला गांधी जन्मशताब्दी वर्षांत अमेरिकन टीव्हीवर पारितोषिक मिळाले होते. रेखाने त्यानंतर चर्चगेटच्या के. सी. कॉलेजमधील नाटय़गृह बुक केले. तिथेसुद्धा तीच पुनरावृत्ती झाली व त्याच कारणानं आम्हाला प्रयोग करण्यास मनाई केली गेली. मग आम्ही पत्रकार परिषद घेतली. त्यामुळे वर्तमानपत्रांतून नाटकाचा गाजावाजा झाला. ‘गांधीहत्येच्या नाटकाला बंदी’ अशा शीर्षकाच्या बातम्या सर्वत्र आल्या. उलट, आमची प्रसिद्धी जास्त झाली. पुढे गवालिया टँकच्या तेजपाल ऑडिटोरिअममध्ये हा प्रयोग झाला. विरोधाला घाबरून लोक केवळ तीस-चाळीसच आले; पण बाहेर पोलीस मात्र पन्नास-साठ होते.

‘अभिव्यक्ती’ची स्थापना झाल्यानंतर तेरा वष्रे मी या संस्थेशी संबंधित होतो. प्रत्यक्षात रेखानेच ही संस्था बरीच वष्रे चालवली. मधल्या काळात मी फोटोग्राफी करावयास सुरुवात केली होती. यापुढचं माझं आयुष्य वेगळ्याच वळणावर गेलं. फोटोग्राफी विश्वात थोडय़ा अवधीतच इतका खोलवर गेलो तेव्हा रेखाला मी म्हटलं, ‘आता मी अशा ठिकाणी गेलो आहे, की आता पाठीमागे बघता येत नाही. तरी मी माझ्या ‘अभिव्यक्ती’च्या कार्यवाहपदाचा राजीनामा देतो.’ रेखा म्हणाली, ‘तुम्हाला पुन्हा केव्हाही ‘अभिव्यक्ती’त यावंसं वाटलं तर जरूर या.’

रेखा एक जिद्दी कलाकार होती. तिने स्वत:ला नाटय़क्षेत्रात झोकून दिलं होतं. ती नेहमीच हसतमुख असे. तिला रागावून बोलताना मी कधीच पाहिलं नाही. एखादी गोष्ट मनावर घेतली की, ती ते करून दाखवायचीच. ती ऑपेरा हाऊस येथील अवंतिकाबाई गोखले स्ट्रीटवर ज्या ‘इंदिरा निवास’ या इमारतीत राहत होती, ती त्यांची स्वत:ची इमारत होती. आमचं ‘अभिव्यक्ती’चं ऑफिस तिथेच होतं. मणी कौलने दिग्दर्शित केलेल्या (१९७१ साली आलेल्या) ‘आषाढ का एक दिन’ या िहदी सिनेमात रेखा सबनीस नायिकेच्या भूमिकेत होती. या सिनेमाला फिल्म फेअरचे बेस्ट क्रिटिक अ‍ॅवार्ड मिळालं होतं. सत्यदेव दुबेंना दिग्दर्शनाकरिता बोलावून ‘ययाती’सारखं नाटक व त्यात डॉ. श्रीराम लागूंना काम करावयास लावणं, हे केवळ रेखाच करू शकते. ‘२७ डाऊन’ हा कलात्मक सिनेमा फिल्म फायनान्स कॉर्पोरेशनच्या साहाय्याने दिग्दर्शक अवतार कौल आणि फोटोग्राफर गोिवद निहलानी यांना करायचा होता. त्या वेळी रेखाने ठाकूरद्वारच्या खत्रीवाडीतील अनेक मंडळी आणून त्यातील लग्नसमारंभाचे चित्रण करण्यास मदत केली होती. मलाही त्यात भुसावळच्या हॉस्पिटलमधील डॉक्टरची भूमिका केवळ रेखामुळेच करावी लागली होती. राखी ही व्यावसायिक सिनेमांत काम करणारी अभिनेत्री पहिल्यांदाच या कलात्मक सिनेमात काम करत होती. तिच्या बरोबर रेखाही दुय्यम भूमिकेत होती. या सिनेमाला राष्ट्रीय पारितोषिक व एक आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. ज्या दिवशी रेडीओवरून राष्ट्रीय पारितोषिक जाहीर झालं, त्याच रात्री दिग्दर्शक अवतार कौलचा अपघाती मृत्यू झाला. अवतार कौल यांचे शिष्य गोिवद निहलानी यांनी मात्र पुढे आपली छाप सिनेसृष्टीवर चांगलीच उमटविली. रेखाला व्यावसायिक सिनेमाकरिता चित्रपटकर्ते विचारीत असत; पण घरची ती सुस्थितीत असल्याने तिने आपल्याला केवळ कलात्मक नाटक-सिनेमांपुरतेच सीमित केलं होतं.

रेखाने ‘अभिव्यक्ती’मधून बरेच कलावंत तयार केले आणि बरीच नाटकं रंगभूमीवर आणली. पण ही सारी नाटकं प्रायोगिक होती. प्रायोगिक रंगभूमीवर रेखाचं मोठं योगदान आहे. भटक्या कुत्र्यांसाठी कार्यरत असणाऱ्या संघटनेतही तिने काम केलं. ‘युवक बिरादरी’तही तिने बरंच काम केलं. या गोष्टी मला वर्तमानपत्रांतून कळत असत. शेवटी मुंबई मराठी साहित्य संघाच्या कला शाखेची ती प्रमुख झाली. तिथेही तिने हौशी कलाकारांची नाटकं विनामूल्य सादर केली. थोडक्यात, नाटकाशी ती शेवटपर्यंत निगडित राहिली. मी रेखाला ‘असा मी, तसा मी’ हे माझं आत्मकथनाचं पुस्तक दिलं तेव्हा ती म्हणाली, ‘मी पुस्तक वाचेन व माझं मत कळवेन.’ नंतर पुस्तक आवडल्याचं तिनं सांगितलं. तेव्हा रेखाला मी म्हटलं की, ‘नाटय़क्षेत्राबाहेर फेकला गेल्यामुळे एक अपराधीपणाची भावना माझ्या मनात दाटून होती. म्हणून मी ‘अशा व्यक्ती, अशा वल्ली’ या फोटोग्राफीवर आधारलेल्या घटनांवरून एक नाटक लिहिलं आणि त्याचे काही प्रयोगही केले.’

आमचं परंपरागत घर रत्नागिरीला आहे. ते आता तीन मजली केलेलं आहे. माझ्या बाल्कनीमधून रत्नागिरीतला नयनरम्य नजारा दिसतो. मी त्याचं वर्णन रेखापुढे केलं व तिला घरी येण्याचं आमंत्रण दिलं, तेव्हा रेखा ताबडतोब म्हणाली, की मी नक्कीच येईन. ती माझ्याबरोबर रत्नागिरीला आली. पाच दिवस राहिली. तिला आम्ही रत्नागिरी व सिंधुदुर्ग भागात फिरवले. तिला १३ कि.मी. अंतरावर असलेल्या कोंडवी येथील माझ्या फार्म हाऊसवरही नेलं. तेव्हा ती म्हणाली की, तुम्ही इथे जेव्हा छोटं घर बांधाल तेव्हा मी जरूर राहायला येईन. पण ते व्हायचं नव्हतं. काही दिवसांनी मला फोन आला की, रेखा आता या जगात नाही. मी हतबुद्धच झालो. रेखाला रत्नागिरीत आणलं व तिच्याबरोबर बऱ्याच गप्पा झाल्या, एवढंच समाधान आता माझ्यापाशी उरलं आहे.

श्रीकांत मलुष्टे shreekant.malushte@gmail.com