शरद पवार.. महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या राजकारणाचीही चर्चा ज्यांच्या नावाशिवाय पूर्ण होत नाही असं एक मुत्सद्दी व्यक्तिमत्त्व. जुन्या पिढीतले असूनही सतत काळाबरोबर राहिलेले.. राजकारणाबरोबरच साहित्य, कला, संस्कृती, क्रीडा, शेती, उद्योग अशा नानाविध क्षेत्रांतील घडामोडींबाबत नित्य अद्यावत असलेले.. या सगळ्यात कायम समरसून सहभागी होणारे शरद पवार.. त्यांची सुमारे ५० वर्षांची राजकीय कारकीर्द अनेक चढउतार आणि वादविवाद यांनी सतत गाजती राहिली. येत्या आठवडय़ात होणाऱ्या त्यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त गतायुष्याकडे वळून पाहताना त्यांना आज नेमकं काय वाटतं, याबद्दल गिरीश कुबेर आणि संतोष प्रधान यांनी त्यांच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा..

मा लिनीबाई राजुरकर.. मुलायमसिंह यादव.. मदनमोहन.. ममता बॅनर्जी.. मळी.. मनमोहन.. मतपेटी.. या आणि अशा सगळ्या विसंवादी सुरांना कवेत घेत उतरलेली उन्हं. उतरतीची ‘मारवा’ वेळ. आणि व्यक्तीही तशीच. शरदचंद्र गोविंदराव पवार.

Wardha Lok Sabha
राष्ट्रवादी २५ वर्षांनंतर पुन्हा वर्ध्याच्या रिंगणात
uddhav thackeray
उद्धव ठाकरेंच्या भाषणादरम्यान संजय राऊत, अंबादास दानवे झोपले? भाजपा पदाधिकाऱ्याने शेअर केला VIDEO
Beed Lok Sabha
बीडमध्ये मराठा ध्रुवीकरणाचा शरद पवारांचा प्रयोग
mudda maharashtracha indian center for policy and leadership development survey about Imbalance of development in vidarbha
मुद्दा महाराष्ट्राचा : विदर्भ- असमतोलाची अस्वस्थता…

स्थळ- ६ जनपथ.. दिल्लीतलं. त्यांच्यासारखंच त्यांचं प्रशस्त घर. निमित्त- पुढच्या आठवडय़ातली त्यांची पंच्याहत्तरी. हे वय सर्वसाधारणपणे किरकिरेपण बरोबर घेऊन येतं. माणसं भूतकाळात बोलायला लागतात. स्मरणरंजनात आनंद मानू लागतात.
यातलं काहीही शरद पवार यांच्याबाबत घडलेलं नाही. बोलताना क्वचित आलेला एखादा पिढय़ांतराचा संदर्भ सोडला तर ते आपली पंच्याहत्तरी जाणवूही देत नाहीत. ताजे व्हॉट्सअप् विनोद सांगतात. (समोरचा एकजण वाचून दाखवतो : आज मोदी लोकसभेत आपल्या जागेवर बसल्यावर (विमानात लावतात तो) सीटबेल्ट शोधत होते, म्हणून!) ट्विटरचा त्यांना उत्साह आहे. त्याचवेळी जुन्नरातल्या एका शेतकऱ्याच्या मळ्यातले ५० फुटी उसाचे फोटो ते दाखवतात. इतक्या वाढलेल्या उसाचा उतारा काय असेल, हा प्रयोग सर्वत्र करता येईल का, असे प्रश्न त्यांना पडतात. मधे मधे कन्या खासदार सुप्रिया यांचं येणं-जाणं सुरू असतं. त्यांना बाहेर जायचं असतं. पण पाहुणेही येणार असतात. अशावेळी केवळ मुलगीच वडिलांना सांगू शकेल अशा आवाजात आणि सुरात.. आपल्या पाहुण्यांचं आगतस्वागत कसं करावं, याचे आदेश ते घेत असतात. घराबाहेर कार्यकर्त्यांची शिस्तबद्ध लगबग. व्यत्यय येणार नाही अशी. मेजावर काही पुस्तकं. मागच्या कपाटात ती हारीनं मांडलेली. काही पुस्तकातनं माना वर करून दिसणाऱ्या खुणपट्टय़ा त्यांचा वापर दाखवत असतात. खोलीत तीन मोठी पेंटिंग्ज. स्थानिक कलाकारांची. खोलीत कंटाळवाण्या पांढऱ्या टय़ुब कटाक्षानं टाळलेल्या. वातावरण तिथं राहणाऱ्याचं चवीनं जगणं दाखवणारं.
..तर अशा तऱ्हेनं शरद पवार वयाची पंच्याहत्तरी अगदी सहजपणानं वागवतायत. गेली तब्बल ४८ र्वष सलग.. एकही दिवसाचा खंड न पडलेला संसदीय राजकारणाचा देशातला एकमेवाद्वितीय असा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. या अनुभवांच्या कडू-गोड.. कडूच बऱ्याचशा कदाचित.. आठवणी त्यांच्या गाठीशी आहेत. कोणाला पटो- न पटो, पण राजकारण आणि समाजकारणातला प्रचंड मजकूर या माणसानं गोळा केलाय. इतकं वैविध्यपूर्ण काम केलेली, संपर्कसाधना असलेली व्यक्ती आज महाराष्ट्रातच काय, पण देशातही- कोणत्याही राजकीय पक्षात नाही. त्याचमुळे राहुल बजाज त्यांच्याविषयी ‘द बेस्ट पीएम इंडिया नेव्हर हॅड..’ असं म्हणतात ती अतिशयोक्ती वाटत नाही.
पण प्रश्न हा, की खुद्द पवार यांनाही तसं वाटतं का? किंवा खरं तर काय वाटतं? वयाच्या आणि कारकीर्दीच्या या टप्प्यावर मागे वळून पाहताना त्यांना आपलंही जरा काही चुकलंच, असं वाटतं का? तर्कतीर्थ, एसेम, डॉ. अ. भि. शहा, गोवर्धन.. इंदुमती परिख अशांची अनुपस्थिती जाणवते का? या आणि अशांच्या अनुपस्थितीनं राजकारणाचं काय नुकसान झालं याचा धांडोळा ते घेतात का? नव्या लेखकांशी त्यांना कधी गप्पा माऱ्याव्याशा वाटतात का?.. अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न म्हणजे ही मुलाखत. ती अर्थातच पूर्ण नाही. ती फक्त ओळख करून देते- पवार यांना भिडणाऱ्या प्रश्नांची. आणि जाणीव करून देते- या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याच्या त्यांच्या क्षमतेचीही. ती झाली दिल्लीत.

राजकारणाची इयत्ता मागे सोडून मुत्सद्दीपदाला (स्टेट्समन) पोहोचलेल्या पवार यांना दिल्लीनं खऱ्या अर्थानं कधी आपलं मानलं नाही. तेव्हा ही मुलाखत दिल्लीतच होणं, हा योगायोग.
दोन घरं सोडून ‘१० जनपथ’ हे सोनिया गांधींचं घर आहे, हाही योगायोगच की!

देशात आणि राज्यात काँग्रेस आपले संस्कार घेऊन घट्ट उभी होती. पण त्याच काँग्रेस पक्षाला गेल्या वर्षी निवडणुकीनंतर लोकसभेत
विरोधी पक्षनेतेपदही मिळू शकलं नाही. काँग्रेसची गृहितकं कुठेतरी चुकली असं आपल्याला वाटतं का?

– काँग्रेस पक्ष हा पूर्वी एका कुटुंबासारखा होता. पक्षाच्या अधिवेशनाला नेतेमंडळी गेल्यावर आजच्याप्रमाणे शासकीय विश्रामगृहं किंवा हॉटेल्समध्ये राहत नसत. अधिवेशन असेल तर तिथल्याच स्थानिक नेतेमंडळींच्या घरी नेत्यांचा मुक्काम असे. चर्चा व्हायची, मतं मांडली जायची. विशेष म्हणजे या चच्रेतल्या मतांचा निर्णयप्रक्रियेत विचार व्हायचा. पक्षात उमेदवारी देतानाही जिल्हापातळीवरील शिफारसी लक्षात घेतल्या जात असत. जिल्ह्य़ातून दहा नावांच्या शिफारशी केल्या गेल्या, तर त्यात क्वचितच एखाद् दुसरा बदल केला जायचा. त्यामुळे जिल्हा काँग्रेस समित्या सक्षम होत्या. आमच्या काळात तेव्हा माझ्यासह अनेक नेत्यांना दिल्ली माहीतही नव्हती. दिल्लीतले नेते आम्हाला ओळखतही नसत. तेव्हा बायोडाटा घेऊन दिल्लीत या बंगल्यातून त्या असं कधी कोणाला िहडावं लागलं नाही. पण इंदिरा गांधी यांनी पंतप्रधानपदाबरोबरच पक्षाचं अध्यक्षपद स्वत:कडे कायम ठेवलं आणि तेव्हापासून पक्षात बदल होत गेले. हायकमांड संस्कृतीमुळे काँग्रेस हळूहळू दुबळी होत गेली. पुढे पुढे करणाऱ्यांना बरे दिवस आले. काम करणारे नेते आणि कार्यकत्रे मागे पडले. जनमानसावर त्याचा परिणाम झाला. जनतेनंही अशा नेत्यांना झिडकारलं. यातूनच पक्षाचा पाया ठिसूळ झाला. तेव्हा त्याचा परिणाम साहजिकच काँग्रेस संघटनेवर झाला. सध्या पक्षाचं काय चित्र आहे ते दिसतंच आहे.

काँग्रेस ही प्रागतिक राजकारणासाठी त्यावेळी ओळखली जायची. त्या काँग्रेस-विचाराच्या छायेत तुम्ही गेली पाच दशकं अनेक स्थित्यंतरं अनुभवलीत.. त्याचे काय अनुभव..

– आमच्या घरात काँग्रेसवाला मी पहिलाच. बाकीचे सगळे विचारांनी डावे, शेकापवाले. माझी आई लोकल बोर्डाची सदस्या होती. १९४८ च्या सुमारास नाशिकजवळच्या दाभाडी इथं झालेल्या बठकीनंतर काँग्रेसमधल्या दिग्गजांनी शेतकरी कामगार पक्षाची वाट धरली. तेव्हा आमच्या घरात शेकापचं वातावरण होतं. घरात भिंतींवर कार्ल मार्क्स, लेनिन, मॅक्झिम गॉर्की अशांच्या तसबिरी असायच्या. पण मी मात्र सुरुवातीपासून काँग्रेस विचारसरणीकडे आकर्षति झालो. १९६० मध्ये युवक काँग्रेसमध्ये सक्रिय झालो. १९६७ पासून आजपर्यंत सतत संसद किंवा विधिमंडळाच्या कोणत्यातरी सभागृहाचा मी सदस्य राहिलो आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या बेरजेच्या राजकारणाचा मी सातत्यानं अंगीकार केला. या राजकीय कारकीर्दीत अनेक स्थित्यंतरं अनुभवली. प्रत्येक टप्प्यावर चित्र पालटत गेलं. मी राजकारणात प्रवेश केला तेव्हा राजकीय नेते व कार्यकर्त्यांमध्ये सुसंवाद होता. छोटय़ा छोटय़ा कार्यकर्त्यांना त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी मिळत असे. महाराष्ट्रात पक्ष आणि सरकारमध्ये समन्वय असायचा. नेमका हा संवाद आता राहिलेला नाही. यातूनच नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये अंतर वाढत गेलं. त्याचमुळे नेतेमंडळींना जनमानसाची नाडी ओळखणं कठीण जाऊ लागलं. काँग्रेस पक्षातही चित्र बदलत गेलं. यातूनच काँग्रेसचा पाया खचला.

त्याकाळी राजकीय नेत्यांचा, विशेषत: यशवंतराव, तुम्ही, वसंतदादा वगरे.. अन्य क्षेत्रांतल्या व्यक्तींशी चांगला संपर्क असे. तर्कतीर्थ होते, डॉ. अ. भि. शहा होते, एसेम.. झालंच तर गोवर्धन परिख आणि इंदुताई होत्या.. ही माणसं काळाच्या पडद्याआड गेली तसतसा राजकारणाचा- आणि तुमच्या राजकारणाचा पोत बदलत गेला.. काय कारण असेल त्यामागचं?

– ही सगळी माणसं पितृतुल्य होती. त्यांच्या असण्याचं म्हणून एक नतिक अधिष्ठान होतं. ते नाहीसं झालं. राजकीय नेत्यांना अशी माणसं असणं आवश्यक असतं. ज्यांचे काहीही वैयक्तिक हितसंबंध नाहीत, जे विद्वान आहेत, आपल्याला ज्यातलं कळत नाही त्यातले अधिकारी आहेत, अशी माणसं हा मोठा आधार असतो. प्रत्येक राजकारण्याला तो असायला हवा. आता राजकारणातल्या नवीन वर्गाला त्याची गरजच वाटत नाही, हे दुर्दैव आहे. राजकारणाचं आणि समाजाचंही! शास्त्रीबोवांकडे (तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी) कोणताही विषय घेऊन जाता येत होतं. ही माणसं लागतात, कारण त्यांच्या मनात राजकारण्यांसारखी सतत असुरक्षितता नसते. अशांकडून राजकारण्यांना विचार आणि धोरणांत खूप मदत आणि मार्गदर्शन होतं. आता असा संवादच तुटलाय. ही अशी माणसं होती म्हणून राजकारणाला संयम, शुचितेचा पोत होता. तो आता गेला आहे.

तुमच्या राजकारणात बरेच प्रयोग झाले. १९७८ साली पुलोद.. १९८६ मध्ये तुम्ही पुन्हा काँग्रेसवासी झालात. त्या काळातल्या तुमच्या राजकारणाची चर्चा आजही होते. वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसलात, वगरे.. पुढे तुम्ही भाजपच्याही जवळ गेल्याचं बोललं जातं..

– १९७७ च्या जनता लाटेनंतर राज्यात काँग्रेस ही इंदिरा काँग्रेस व चव्हाण-रेड्डी काँग्रेसमध्ये विभागली गेली. यशवंतराव चव्हाण यांना मानणारे आम्ही सर्व रेड्डी काँग्रेसमधून निवडून आलो होतो. देशात काँग्रेसचा धुव्वा उडाला तरी महाराष्ट्रात दोन्ही काँग्रेस एकत्र आल्यानं सत्तेचं गणित जुळलं. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री, तर नासिकराव तिरपुडे हे उपमुख्यमंत्री झाले. तिरपुडे तेव्हा इंदिरा काँग्रेसचे पक्षनेते होते. त्या सरकारमध्ये अजिबात एकजिनसीपणा नव्हता. मंत्रिमंडळ बठकीपूर्वी तिरपुडे यांच्या दालनात काँग्रेसच्या मंत्र्यांची वेगळी बठक व्हायची. या सरकारबद्दल राज्यातील नेत्यांमध्ये वेगळी भावना निर्माण झाली. हे सरकार पडलं पाहिजे असा मतप्रवाह वाढत गेला. मी स्वत:, सुशीलकुमार शिंदे, दत्ता मेघे आणि सुंदरराव साळुंखे या मंत्र्यांनी राजीनामे दिले आणि सरकारला घरघर लागली. किसन वीर, आबासाहेब कुलकर्णी, अण्णासाहेब शिंदे आदी ज्येष्ठ नेत्यांनीही- सरकार पाडलं पाहिजे अशी भूमिका मांडली. पण यशवंतराव चव्हाण यांची भूमिका काय असेल याबद्दल अंदाज येत नव्हता. त्याकाळी महाराष्ट्रातील कोणतीही राजकीय घटना यशवंतरावांना विचारल्याशिवाय होत नसे. पण त्यांच्या मनात काय आहे हे जाणून घेण्याचा एक हमखास मार्ग होता, तो म्हणजे गोविंदराव (तळवलकर) काय लिहितायत. त्याकाळी त्यांचा ‘हे सरकार पडावे ही श्रींची इच्छा’ असा अग्रलेख प्रसिद्ध झाला आणि आम्हाला काय तो संदेश मिळाला. पण दिल्लीच्या मनात वेगळं होतं. सरकार पडू नये म्हणून प्रयत्न सुरू झाले. आम्हाला ‘सरकार वाचवा’ असा दिल्लीहून निरोप आला. खुद्द यशवंतराव चव्हाण यांचा फोन आला. ते आम्हाला ‘जरा दमानं घ्या’ असं सांगत होते. पण तिथे असलेल्या किसन वीर यांनी फोन हातातून हिसकावून घेतला आणि त्यांनी ‘यशवंतराव दोर कापले गेलेत, आता माघार नाही..’ या शब्दांत सुनावलं. राज्यात फक्त किसनरावांनाच तो अधिकार होता. त्यांचे आणि यशवंतरावांचे संबंध अत्यंत सलोख्याचे आणि बरोबरीचे होते. तेव्हा वसंतदादा सरकार पडलं. आळ माझ्यावर आला. मग पुलोदचा प्रयोग करण्याचा निर्णय झाला. (त्यावेळी शरद पवार वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.) पुढे इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर सहानुभूतीच्या लाटेत राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला तीन-चतुर्थाश जागा मिळाल्या. तेव्हा देशात वेगळं वातावरण होतं. त्यामुळे आम्हीही १९८६ साली काँग्रेसमध्ये परतण्याचा निर्णय घेतला. १९९९ च्या निवडणुकीत सोनिया गांधी यांच्या विदेशीचा मुद्दा चच्रेत येईल असा पक्षात मतप्रवाह होता. काँग्रेस कार्यकारी समितीच्या बठकीत मी, संगमा व तारिक अन्वर यांनी हा विषय उपस्थित केला. बठक संपून पुण्यात पोहोचतो तर सोनिया गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची बातमी आली. पुढे माझीही पक्षातून हकालपट्टी झाली. त्यातून राष्ट्रवादीचा जन्म झाला. नंतर २००४ च्या निवडणुकीच्या वेळी एकत्र लढू म्हणून सोनिया गांधी स्वत: माझ्या दिल्लीतील निवासस्थानी आल्या होत्या. त्या प्रयत्नातून साऱ्या निधर्मवादी शक्ती एकत्र येऊन यूपीएचा जन्म झाला. पुढे दहा र्वष आम्ही एकत्र राहिलो. २०१४ च्या निवडणुकीनंतर मी किंवा राष्ट्रवादी भाजपच्या जवळ गेलो, ही टीका निर्थक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून माझे त्यांच्याशी चांगले संबंध होते. कृषीमंत्री म्हणून माझा देशातील सर्वच मुख्यमंत्र्यांशी संबंध येत असे. मोदी गुजरातमध्ये शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करीत. त्यांना नावीन्याची, प्रयोगाची आवड आहे. परदेशातही काय चाललंय हे त्यांना समजून घ्यायचं असे. मुख्यमंत्रीपदी असताना त्यांना अमेरिका व ब्रिटननं व्हिसा नाकारला होता. त्यावेळी माझ्या नेतृत्वाखाली इस्रायल दौऱ्यात मी त्यांचा शिष्टमंडळात समावेश केला होता. तेव्हा मोदी आणि माझे संबंध हे असे जुने आणि सकारात्मक, कार्यालयीन आहेत. वस्तुस्थिती ही आहे. आता बोलणारे बोलतात.. कुणाकुणाला उत्तरं देत बसायचं?

भाजपबरोबर माझी जवळीक वाढलीय असा खोटा प्रचार केला जातोय. विरोधाला विरोध ही माझी कधीच भूमिका नव्हती व राहणारही नाही. यूपीए सरकारच्या काळात गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काँग्रेसमध्ये फारच तीव्र नाराजी होती. तेव्हा काहीही अडलं की मोदी माझ्याशी संपर्क साधत. तेव्हापासून आमचे चांगले संबंध आहेत. संसदेत किंवा राज्य विधिमंडळात राष्ट्रवादी नेहमीच भाजपच्या विरोधात भूमिका घेतो. वैयक्तिक संबंध आणि राजकारण यांची गल्लत केली जाऊ नये असं माझं मत आहे.

हा आरोपांचाच मुद्दा.. १९९० च्या दशकात तुमच्यावर गुन्हेगारांना मदत करण्यापासून वाटेल ते आरोप झाले. तेव्हा या आरोपांना प्रत्युत्तर देण्यात आपण कमी पडलो आणि त्याचा खूप मोठा परिणाम आपल्या राजकारणावर झाला असं नाही तुम्हाला वाटत?

– हे सगळे आरोप-प्रत्यारोप मी काँग्रेसमध्ये परतल्यावर सुरू झाले. गोपीनाथ मुंडे, गो. रा. खैरनार यांनी आरोपांची राळ उठवली. खैरनार ट्रकभर पुरावे देणार होते. पण काय झालं, हे खैरनारच जाणोत. युती सरकारमध्ये मुंडे हे गृहमंत्री होते. माझ्याविरोधात झालेल्या आरोपांची ते चौकशी करू शकले असते. पण मुंडे यांनीही काहीही केले नाही. कारण त्यांत काही तथ्य नव्हतंच. एकदा खुद्द मुंडे म्हणाले, निवडणुकीच्या वेळी हे असले आरोप करावे लागतात. पण ते सारे खोटे आहेत हे त्यांनाही माहीत होतं आणि मलाही. त्यामुळे खोटय़ा आरोपांना कशाला उत्तरं द्या, हा विचार करून मी त्याकडं दुर्लक्ष केलं. पण त्याची मला किंमत मोजावी लागली, हे मात्र त्रिवार सत्य आहे. या आरोपांमुळे निवडणुकीतही फटका बसला ही वस्तुस्थिती मी नाकारत नाही. खरं तर त्याही वेळी १९९५ च्या निकालानंतर अपक्षांच्या मदतीनं सरकार स्थापन करावं, असा दिल्लीचा निरोप होता. मी ते करूही शकलो असतो. पण तसं केलं असतं तर ती चूक झाली असती. म्हणून मी सरळ राजीनामा दिला आणि राज्यात पहिल्यांदा सेना-भाजपचं सरकार आलं.

आमच्या काळात तेव्हा माझ्यासह अनेक नेत्यांना दिल्ली माहीतही नव्हती. दिल्लीतले नेते आम्हाला ओळखतही नसत. तेव्हा बायोडाटा घेऊन दिल्लीत या बंगल्यातून त्या असं कधी कोणाला हिंडावं लागलं नाही. पण इंदिरा गांधी यांनी पंतप्रधानपदाबरोबरच पक्षाचं अध्यक्षपद स्वत:कडे कायम ठेवलं आणि तेव्हापासून पक्षात बदल होत गेले. हायकमांड संस्कृतीमुळे काँग्रेस हळूहळू दुबळी होत गेली. पुढे पुढे करणाऱ्यांना बरे दिवस आले. काम करणारे नेते आणि कार्यकत्रे मागे पडले.

पंजाब करारापूर्वी प्रकाशसिंग बादल यांच्याशी चर्चा असो वा ममता, जयललिता यांची मनधरणी, मुलायमसिंह यादव, लालूप्रसाद यादव किंवा डाव्या पक्षांचे नेते- सर्वच राजकीय पक्षांच्या पहिल्या फळीतील नेत्यांना शरद पवार जवळचे वाटतात.. हे असं तुमच्यात काय आहे?

– राजकारणात मी नेहमीच यशवंतराव चव्हाण यांच्या संवादाच्या धोरणावर भर दिला. राजकारण आणि वैयक्तिक संबंध यांत कधी गल्लत केली नाही. बारामतीमध्ये बापूसाहेब काळदाते माझ्याविरोधात टीका करायचे, पण रात्री मुक्कामाला ते माझ्या घरी असत. माझे सर्वच राजकीय नेत्यांशी उत्तम संबंध आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, समाजवादी चळवळीतील एस. एम. जोशी, मृणालताई गोरे यांनी अनेकदा माझ्यावर टीका केली. पण मी कधीच व्यक्तिगत संबंधांत याचा परिणाम होऊ दिला नाही. राष्ट्रीय पातळीवर काम करण्यास सुरुवात केल्यावर मी दिल्लीतील सर्व नेत्यांशी संवाद साधला. महाराष्ट्रातले नेते दिल्लीत फार कुणात मिसळत नाहीत. मी मात्र सर्व नेत्यांना भेटायचो. भूज भूकंपानंतर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बठकीत अशा नसíगक आपत्तींना सामोरे जाण्याकरिता धोरण असावं अशी मागणी पुढे आली. तसं धोरण तयार करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवावी अशी एकमुखी सूचना सोनिया गांधी यांच्यासह साऱ्या नेत्यांनी केली होती. देशात कोठेही नसíगक आपत्ती कोसळल्यावर ‘एनडीआरएफ’चे पथक मदतीला पाठवलं जातं. हे पथक स्थापन करण्याची शिफारस माझ्या अध्यक्षतेखालील समितीनेच केली होती. देशाच्या ऊर्जा धोरणाचा फेरआढावा घेण्याकरिता मी मुख्यमंत्री असताना राष्ट्रीय पातळीवर समिती नेमण्यात आली होती. त्या समितीत डॉ. मनमोहन सिंग, ज्योती बसू, भरोसिंह शेखावत यांच्यासारख्या दिग्गजांचा समावेश होता. राजकारणाच्या वेळी राजकारण करायचं, पण एरव्ही सर्वाशी संवाद ठेवायचा, हे माझं धोरण. राजकारणाच्या पलीकडे मत्री जपता येते, हे तत्त्व मी आजही पाळतो.

अनेक राज्यस्तरीय नेत्यांना- उदाहरणार्थ एन. टी. रामाराव, करुणानिधी, प्रकाशसिंग बादल, जयललिता, ममता बॅनर्जी, नवीन पटनायक वगरेंना- त्यांच्या त्यांच्या राज्यांमध्ये स्वबळावर सत्ता मिळवता आली. महाराष्ट्रात शरद पवार यांच्याबद्दल दरारा, आदर सगळं काही.. पण तरी पवारांना राज्यानं कधीही एकहाती सत्ता दिली नाही. हे असं का?

– माझ्या नेतृत्वाखाली स्वबळावर लढताना जास्तीत जास्त ५०-६० आमदार निवडून आलेत ही वस्तुस्थिती नाकारण्यात अर्थ नाही. हे असं होतं आणि झालं, याचं कारण महाराष्ट्र व अन्य राज्यांमधील परिस्थिती वेगळी आहे. आंध्र प्रदेशमध्ये ‘तेलगुबिड्डा’ किंवा तेलगू अस्मितेचा मुद्दा पुढे आला. तामिळनाडूमध्ये द्रविडी राजकारणच कायम सुरू आहे. तेथे अण्णा द्रमुक किंवा द्रमुक हे गेली चार दशकं आलटून-पालटून सत्तेत आहेत. काँग्रेस अजूनही तिथे चाचपडतेय. पंजाबमध्ये शीख राजकारणाचा बाज आहे. या राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात केवळ भाषिक आधारावर मतदान होत नाही. मुंबई किंवा आसपासच्या ठाणे, नवी मुंबईच्या परिसरात, अन्य शहरांत बहुभाषकांची संख्या लक्षणीय आहे. मुंबईत प्रयत्न करूनही मला किंवा माझ्या पक्षाला यश मिळालेलं नाही, हे मी मान्यच करतो. मुंबईत मराठीबरोबरच सर्वभाषकांचा पािठबा मिळवावा लागतो. यात आम्ही काही प्रमाणात कमी पडलो. मुंबईतील केवळ २७ टक्के मराठी मतदारांच्या पािठब्यावर विजयाचं गणित जुळत नाही. मुंबईप्रमाणेच मला विदर्भानंही साथ दिली नाही. विदर्भातही मराठीबरोबरच बिगर-मराठी मतदारांची संख्या जवळपास समसमान आहे. विदर्भात नितीन गडकरी यांचा अपवाद वगळता अन्य कोणा नेत्याचं नेतृत्व सर्वमान्य झालेले दिसत नाही. तिकडे वऱ्हाड आणि नागपूर हे दोन भाग पडतात. वऱ्हाडात यश मिळालं तरी नागपूरमध्ये आमची ताकद कमी आहे. मराठवाडा, कोकण, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्राने मला पािठबा दिला. पण २८८ पकी १०० पेक्षा जास्त आमदार असलेल्या विदर्भ तसेच मुंबई, ठाणे पट्टय़ात आम्हाला तेवढा पािठबा मिळाला नाही. महाराष्ट्राच्या या रचनेमुळे प्रादेशिक पक्षांच्या राजकारणाला कायमच मर्यादा राहतील. कोणताही प्रादेशिक पक्ष महाराष्ट्रात सर्वव्यापी होणार नाही.

दोन मुद्दे : हे लिपीमुळे झालं का? आणि तुमचं हे विश्लेषण शिवसेनेलाही लागू आहे का?

– याला केवळ लिपी जबाबदार आहे असं नाही. महाराष्ट्र हा असाच आहे. राज्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल इतकं आकर्षण होतं. पण बाळासाहेबांनाही स्वत:च्या हिमतीवर कधी महाराष्ट्र जिंकता आला नाही. महाराष्ट्रात प्रादेशिक पक्षांच्या वाढीवर नेहमीच मर्यादा आल्या आहेत व यापुढील काळातही प्रादेशिक पक्ष वाढतील अशी चिन्हं दिसत नाहीत. मुंबई ही देशाची आíथक राजधानी असल्यानं मुंबईत बहुभाषकांचा पगडा आहे. केवळ मराठी मतांवर निवडणुका जिंकता येत नाहीत. भूमिपुत्रांच्या नावे काही पक्ष राजकारण करीत असले तरी निवडणुका जिंकण्याकरिता हा मुद्दा लागू पडेल असं वाटत नाही. यामागे मराठी माणसाचा कष्ट टाळण्याकडे असलेला कलही कारणीभूत आहे. राज ठाकरे यांच्या आंदोलनानंतर नाशिक पट्टय़ात ‘कामगार पाहिजेत’ अशा पाटय़ा झळकलेल्या मी पाहिल्यात. जालन्यातील पोलाद उद्योगात ओडिसातील कामगारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे केवळ मराठी मतांवर राजकारण करता येणार नाही. दुसरं म्हणजे केवळ संकुचित राजकारण करण्याला माझा नेहमीच विरोध राहिला आहे. मी कधीच मराठी किंवा भाषक मुद्दय़ांवर राजकारण केलेलं नाही.

अनेक उद्योगपतींनी तुम्ही पंतप्रधानपदासाठी किती योग्य आहात, हे म्हटलंय. मग ते जेआरडी असोत किंवा राहुल बजाज. प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी तुमचं नाव पंतप्रधानपदासाठी चच्रेत असतं. पवारांसारख्या नेत्याला हे सर्वोच्च पद मिळालं पाहिजे अशी सर्वसामान्यांची भावना असते. पण या पदानं मात्र तुम्हाला सतत हुलकावणी दिली..

– माझं नाव जरी चच्रेत असलं तरी मला माझ्या मर्यादांची चांगलीच जाणीव आहे. माझा पक्ष तेवढा मोठाही नाही. २५ खासदारांच्या जोरावर देवेगौडा पंतप्रधान झाले होते. परंतु मीदेखील ५० खासदारांचा गट कधी माझ्यामागे उभा करू शकलो नाही, ही वस्तुस्थिती कशी नाकारणार?
१९९८ मध्ये राज्यातून काँग्रेसचे ३५ पेक्षा जास्त खासदार मी निवडून आणले होते. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर माझं नाव चच्रेत होतं. दिल्लीतील काही नेत्यांनी तसा आग्रहही धरला होता. पण हेही खरं आहे की तेव्हा मला अपेक्षित पािठबा मिळू शकला नाही. विशेषत: उत्तरेचे खासदार माझ्यामागे उभे राहिले नाहीत. पण ते नरसिंह राव यांना जमलं. खेरीज काँग्रेसमध्ये ‘१० जनपथ’ हे मोठं शक्तिस्थळ आहे. या ‘१० जनपथ’चा (सोनिया गांधी यांचं निवासस्थान) मला पािठबा मिळाला नाही. माझ्याबद्दल तेव्हा संशय निर्माण केला गेला. मी पंतप्रधान झालो तर हाताबाहेर जाईन अशी हवा केली गेली. माझ्यामागे मला ‘लंबी रेसचा घोडा’ म्हणायचे काही काँग्रेसजन. त्यामुळे माझ्याकडे नेहमीच साशंकतेनं बघितलं गेलं. १९९६ आणि १९९८ च्या निवडणुकीत काँग्रेसला संधीच नव्हती. १९९९ मध्ये माझी पक्षातून हकालपट्टी झाली आणि राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर पक्षाच्या मर्यादा लक्षात घेता हे पद मिळणं शक्यच नव्हतं.

‘शरद पवार नेहमी दिल्लीच्या तख्ताशी जुळवून घेतात..’ अशी टीका तुमच्यावर केली जाते. केंद्रात भाजपची सत्ता येताच आपण भाजपच्या जवळ गेलात, असा आरोप काँग्रेसकडून केला जातो. याबद्दल आपली भूमिका काय आहे?

– भाजपबरोबर माझी जवळीक वाढलीय. हा खोटा प्रचार केला जातोय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन स्वतंत्र पक्ष आहेत. विरोधाला विरोध ही माझी कधीच भूमिका नव्हती व राहणारही नाही. काही विधेयकांवरून काँग्रेस आणि आमच्यात वेगळी भूमिका होती. वस्तू व सेवा कर (जीएसटी), विमा आदी काही सुधारणा झाल्या पाहिजेत, ही माझी स्पष्ट भूमिका आहे. वस्तू आणि सेवा कायद्यात कराची १८ टक्के अट ठेवावी, ही काँग्रेसची आताची अट. माझा तिला विरोध आहे. ही अट भयंकर आहे. ती मान्य झाली तर प्रत्येक कर-दरबदलासाठी घटनादुरुस्ती करावी लागेल. आता हे चिरंजीवांना कळत नसेल. पण या अटीला मी विरोध केलाय. तेव्हा हे पसरवणार- मी भाजपच्या जवळ जातोय, वगरे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अरुण जेटली, सुषमा स्वराज, नितीन गडकरी आदी भाजपच्या नेत्यांशी माझे वैयक्तिक संबंध आहेत. याचा अर्थ मी भाजपच्या जवळ गेलो असा नाही. १९९९ मध्ये राज्य विधानसभेच्या निवडणुकीनंतर सत्तास्थापनेसाठी मी काँग्रेसबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन यांच्यासह अनेकांनी मी शिवसेना-भाजपबरोबर यावे म्हणून खूप प्रयत्न केले होते. मी माझ्या भूमिकेवर ठाम राहिलो. यूपीए सरकारच्या काळात गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काँग्रेसमध्ये फारच तीव्र नाराजी होती. तेव्हा काहीही अडलं की मोदी माझ्याशी संपर्क साधत. तेव्हापासून आमचे चांगले संबंध आहेत. संसदेत किंवा राज्य विधिमंडळात राष्ट्रवादी नेहमीच भाजपच्या विरोधात भूमिका घेतो. वैयक्तिक संबंध आणि राजकारण यांची गल्लत केली जाऊ नये, हे माझं मत आहे.

आजवरच्या माझ्या राजकीय प्रवासात मला अनेक पदं मिळाली. ते सगळं अद्भुत आणि अविश्वसनीय वाटावं असंच आहे. आयुष्य इतकं काही देईल असं कधी वाटलं नव्हतं. तेव्हा मागे वळून पाहताना मनात निश्चितच समाधान आहे.. एक तृप्ती आहे.

फक्त राजकारणच नाही तर क्रीडा, साहित्य, कला, संस्कृती, उद्योग या क्षेत्रांमध्येही आपला चांगला वावर आहे. क्रीडा क्षेत्रात तर जागतिक पातळीपासून राज्यातील अनेक संघटनांचे पदाधिकारीपद तुम्ही भूषवलंत. राजकारण करताना हे सारं कसं शक्य झालं?

– हे यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार. चव्हाणसाहेबांचे सर्वच क्षेत्रांमधील दिग्गजांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. मलासुद्धा फक्त राजकारण एके राजकारण न करता सर्वच क्षेत्रांमध्ये घडणाऱ्या नव्या गोष्टींचा अभ्यास करायला आवडतो. त्या- त्या क्षेत्रातील जाणकारांकडून मी माहिती घेत असतो. राजकारण्यानं विरोधी बाकांवर असताना लोकांत मिसळायला हवं. त्यामुळे बरंच काही कळतं. आणि पुन्हा सत्ता मिळाल्यावर त्यानुसार बदल करता येतात, असा माझा अनुभव आहे. आता मी सत्तेत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त दौरे करून मी सगळ्याची माहिती करून घेत असतो. अलीकडेच विदर्भाच्या दौऱ्यात शेतीबाबत नवीन माहिती मिळाली. संगीत, नाटय़ यांची मला सुरुवातीपासून आवड आहे. सत्तेत असो वा नसो, वेळ मिळेल तेव्हा मी कला तसंच सांस्कृतिक कार्यक्रम बघत असतो. लोकांशी संवाद असला की त्याचा फायदाच होतो. क्रीडाक्षेत्राशी माझा महाविद्यालनीय जीवनापासून संबंध आहे. महाविद्यालयात असताना मी क्रीडा विभागाचा सचिव होतो. पुढे कबड्डी, खो-खो, अॅथलेटिक्स या संघटनांची जबाबदारी माझ्यावर आली. क्रीडाक्षेत्रात काम करताना त्या- त्या खेळांना न्याय देण्याचा मी प्रयत्न केला. याचे एक उदाहरण म्हणजे मी राज्य कबड्डी संघटनेचा अध्यक्ष होतो. बुवा साळवी हे कबड्डीतील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व. बुवांनी एखादी बाब माझ्या नजरेस आणल्यावर मी राज्याचा मुख्यमंत्री असताना लगेचच तसा निर्णय घेतला जायचा. क्रिकेटची मला आवड होती. मुंबई क्रिकेटचा अध्यक्ष झालो. पुढे भारतीय नियामक मंडळ आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. क्रीडाक्षेत्रात काम करताना मी माझ्या राजकीय जीवनातल्या जबाबदाऱ्यांवर परिणाम होऊ दिला नाही, किंवा राजकारणात व्यस्त असल्यानं क्रीडा संघटनांकडे दुर्लक्ष होऊ दिलं नाही. हे पथ्य मी आजही पाळतो.

गोपीनाथ मुंडे, गो. रा. खैरनार यांनी माझ्याविरोधात आरोपांची राळ उठवली. खैरनार ट्रकभर पुरावे देणार होते. पण त्याचं काय झालं, हे खैरनारच जाणोत. युती सरकारमध्ये मुंडे हे गृहमंत्री होते. माझ्याविरोधात झालेल्या आरोपांची ते चौकशी करू शकले असते. पण मुंडे यांनीही काहीही केलं नाही. कारण त्यांत काही तथ्य नव्हतंच. पण या आरोपांमुळे निवडणुकीत आम्हाला फटका बसला ही वस्तुस्थिती मी नाकारत नाही.

तुम्ही क्रीडा किंवा विविध क्षेत्रांत जसा रस घेता तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींकडेही आपले बारीक लक्ष असते. विशेषत: चीनबद्दलचा आपला अभ्यास दांडगा आहे. त्याबद्दल..

– चीनबद्दल एक वेगळा अनुभव सांगतो. १९९१ मध्ये केंद्रात संरक्षणमंत्री झाल्यावर चिनी सीमेवरील तणाव कमी करण्याकरिता भारतानं पुढाकार घ्यावा असा निर्णय आम्ही काही वरिष्ठ नेत्यांनी एकत्र बसून घेतला. त्यानुसार मी आणि तत्कालीन संरक्षण खात्याचे सचिव चीन दौऱ्यावर गेलो. तिथं चीनच्या संरक्षणमंत्र्यांशी आमची सविस्तर चर्चा झाली. सीमेवर दोन्ही बाजूंनी सन्य कमी करण्यावर एकमत झालं. ही चर्चा यशस्वी झाल्यानंच बहुधा चीनच्या संरक्षणमंत्र्यांनी आमची पंतप्रधानांशी भेट ठरवली. पंतप्रधानांशी चर्चा झाली. मधे काही वेळ होता म्हणून चीनचे पंतप्रधान गप्पा मारत होते. त्यावेळी ते जे म्हणाले ते थक्क करणारं आहे.. ‘आíथक महासत्ता होणं हे आमचं लक्ष्य आहे. तसं ते होईपर्यंत शेजारचा भारत, जपान किंवा अन्य राष्ट्रांबरोबर आमचे वाद चालूच राहतील. पण आम्ही आमचं उद्दिष्ट नजरेआड करणार नाही. एकदा का आम्ही महासत्तापदाला पोहोचलो की या प्रश्नांना हात घालू. आमच्याकडे तेवढा संयम आहे.’ हे त्यांचं विधान २४ वर्षांपूर्वीचं. यावरून चीनच्या एकूणच धोरणाचा अंदाज येतो. चीन ज्या वेगानं विकास साधतोय त्या तुलनेत आपण कुठेही नाही. तेव्हा आपल्याला खरं आव्हान, डोकेदुखी असणार आहे ती चीनचीच.

पुढच्या आठवडय़ात तुमचा अमृतमहोत्सव होतोय. वयाच्या या टप्प्यावर मागे वळून पाहताना काय वाटतं? तुम्ही समाधानी आहात?

– तुम्हाला खोटं वाटेल, पण वीस वर्षांचा होईपर्यंत मी मुंबई बघितलेली नव्हती. मी पहिल्यांदा मुंबईत आलो तेव्हा एकविशीत होतो. आमचे मित्र धनाजी जाधव यांच्याकडे राहिलो होतो. मला आठवतंय, त्यावेळी त्यांना मी म्हणालो होतो- मला तीन गोष्टी फक्त मुंबईत पहायच्यात. एक ट्राम, दुसरा समुद्र आणि तिसरं म्हणजे मंत्रालय. पुढे १९६७ मध्ये मला पक्षानं उमेदवारी दिली व निवडून आलो. तेव्हापासून चालतोय. या प्रवासात अनेक पदं मिळाली. ते सगळं अद्भुत आणि अविश्वसनीय वाटावं असं आहे. आयुष्य इतकं काही देईल असं कधी वाटलं नव्हतं. तेव्हा मागे वळून पाहताना मनात निश्चितच समाधान आहे.. एक तृप्ती आहे.

@@girishkuber
@sanpradhan